युगात्मा
भूमिका- मधुकरराव चौधरी
महात्मा गांधींचे जीवन हा विसाव्या शतकाने पाहिलेला एक अभूतपूर्व चमत्कार होता. एका अर्थाने या चमत्काराची कारणमीमांसा करणे सोपेही आहे. याचे कारण असे की, माणसांवर निर्मळ प्रेम करणारा माणूस असेच या चमत्काराचे मूलभूत स्वरूप आहे. या आंतरिक करुणेच्या, प्रेमाच्या बळामुळेच गांधीजी सत्याची व अहिंसेची साधना करू शकले, या बळामुळेच पूर्वीच्या हजारो शतकांशी त्यांनी दुवा जोडला आणि भविष्यकाळात येणाऱ्या हजारो शतकांसाठी संजीवक संस्कार ते देऊ शकले. खऱ्याखुऱ्या अर्थाने ज्याला युगात्मा म्हणता येईल असा हा महामानव प्रत्यक्ष जगताना, कार्य करताना आपण पाहू शकलो हे आपले परम भाग्य असे म्हटले पाहिजे.
युग म्हणजे काय ? या शब्दाने माणूस जे व्यक्त करू पाहतो ते व्याख्येच्या चौकटीत बसवता येणार नाही, कॅलेंडरातल्या तारखांनी ते बांधता येणार नाही. भूत, वर्तमान, भविष्य यांत जो बांधता येतो, तारखांच्या चौकटीत जो धरता येतो, घड्याळाच्या काट्यांनी ज्याची गती आखता येते अशा काळावर मात करणाऱ्या चैतन्याचा साक्षात्कार जेव्हा माणसाला होतो तेव्हा या कालातीत साक्षात्काराची उत्कटता व्यक्त करण्यासाठी 'युग' हा शब्द माणूस वापरतो. काळावर मात करणाऱ्या या चैतन्याचा साक्षात्कार गांधीजींच्या रूपात मानवाला झाला. 'युगात्मा' हा शब्द जणू या साक्षात्काराची खूण आहे. आत्म्याचा साक्षात्कार होतो, पण त्याचे वर्णन करता येत नाही. युगाचा आत्मा झालेल्या गांधीजींचे व्यक्तिमत्त्वही असेच शाब्दिक वर्णनाच्या पलिकडचे आहे. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आणि पुढेही तसा प्रयत्न केला जाईल- पण तरीही विश्लेषणाच्या पकडीत सापडत नाही असे काहीतरी उरतेच अशी जाणीव होते. जे केवळ विचारांनी व्यक्त करता येत नाही, जे तर्काच्या कक्षेतून निसटून जाते ते व्यक्त करण्याचे सामर्थ्य कलेत असते. कलेची साक्षात्कारी शक्ती यातच आहे. या जाणिवेतूनच, मराठी भाषेतील सर्जनशील ललितलेखकांच्या महात्मा गांधींच्या जीवनदर्शनातून स्फुरलेल्या ललितलेखांचा संग्रह गांधीजन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रसिद्ध करावा अशी कल्पना सुचली. या ललित कृती नव्याने लिहून घ्यायच्या म्हणजे काही अडचणी अर्थातच निर्माण होणे स्वाभाविक होते. एक म्हणजे, नित्रंधाला विषय नेमून देतात त्याप्रमाणे विषय देऊन या ललितकृती निर्माण करा असे या कलावंतांना सांगणे शक्य नव्हते-कारण कोणत्याही कलाकृतीचे बीज त्या कलावंताच्या जाणिवेतूनच निर्माण व्हावे लागते. दुसरे असे की, चांगली ललितकृती निर्माण होणे हे नाही म्हटले तरी कलाकाराच्या लहरीवर अवलंबून असते ठराविक अवधीत मागणीबरहुकूम ती तयार मिळू शकत नाही. परंतु सत्यसंकल्पाप्रमाणेच सौंदर्यसंकल्पाचाही दाता भगवानच असतो असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातल्या बहुतेक ललितलेखकांना आम्ही 'युगात्मा' या अभिनव संग्रहाची ही कल्पना कळवली आणि यात आपली ललितकृती द्यावी असे आवाहन त्यांना केले. या आवाहनाला लाभलेले सुंदर यश म्हणजेच 'युगात्मा हे पुस्तक होय.
गांधीजींनी केलेल्या कार्याची वा मांडलेल्या विचारांची ऐतिहासिक जंत्री अगर वैचारिक मीमांसा असे 'युगात्मा' या पुस्तकाचे स्वरूप नाही. "कलाबंताच्या संवेदनाशील मनावर महात्मा गांधींच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची जी प्रतिमा उमटली ती त्याने आपल्या शैलीत साकार करावी" असे लेखकांना आवाहन करणाऱ्या या पत्रात आम्ही लिहिले होते. श्री० काका कालेलकर, खांडेकर, फडके, माडखोलकर यांच्यापासून तो तेंडुलकर, दळवी, कर्णिक, खानोलकर यांच्यापर्यंत महाराष्ट्रातले बहुतेक प्रमुख लेखक कवी या पुस्तकात आहेत. एका अर्थाने, गेल्या पन्नास वर्षांतल्या मराठी साहित्यशैलीचे प्रातिनिधिक दर्शन या पुस्तकातून घडते असे म्हणायला हरकत नाही. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच अवतीभोवतीच्या सामाजिक राजकीय जीवनाचे चिंतनही अप्रत्यक्षपणे, लेखांच्या कलारूपाला ढळ न लावता, या कलाकृतींतून व्यक्त होते.
१९२० ते १९७० या जवळजवळ पन्नास वर्षाच्या कालखंडात गांधीजींच्या कोणत्या दर्शनाने या कलावंतांना अंतर्मुख केले ? गांधीजींचे आदर्श प्रत्यक्षात रुजलेले त्यांना दिसले काय ? आपल्या सामाजिक राजकीय जीवनात कोणत्या नव्या प्रेरणा त्यांना गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात दिसल्या १ गांधीवधामुळे हे कलावंत का आणि कसे हलले १ विराट मानवी जीवनाच्या संदर्भात या मरणाचा कोणता अर्थ त्यांनी लावला ? या अनेक प्रश्नांची उत्तरे मराठी रसिक वाचकाला युगात्मा या पुस्तकात शोधता येतील. मराठी भाषेतल्या बहुतेक प्रमुख लेखककवींच्या जाणिवेचा आविष्कार गांधीजीवनाच्या संदर्भात इथे झाला असल्यामुळे 'युगात्मा' या अभिनव पुस्तकाला एक आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
'युगात्मा' या पुस्तकाला प्रस्तावनेदाखल विनोबांनी तीन शब्द लिहून दिले आणि या पुस्तकाचे प्रकाशन आपल्या हस्ते करण्यास अनुमती दिली याबद्दल समिती त्यांची ऋणी आहे. या पुस्तकाचे प्रकाशन विनोबांच्या हस्ते आणि तेही वर्ध्याला व्हावे हा योग अपूर्वच म्हटला पाहिजे.
या पुस्तकासाठी ज्या लेखक- कवींनी आपले साहित्य पाठवून सहकार्य दिले आहे त्यांची समिती ऋणी आहे. श्री मंगेश पाडगांवकर यांनी संपादनविषयक काम विशेष आपुलकीने व चोखंदळपणे केले आहे व त्याबद्दल समितीतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो. पुस्तकाला जे सुंदर व नीटस स्वरूप प्राप्त झाले आहे त्याचे श्रेय मौज मुद्रणालयाचे श्री० वि० पु० भागवत व प्रा० श्री० पु० भागवत यांना आणि चित्रकार श्रीमती पद्मा सहस्रबुद्धे व श्री० देवीदास बागूल यांना द्यावयास हवे. समितीतर्फे व वाचकांतर्फे मी त्यांचे खास आभार मानतो.
बहुविध डॉट कॉम वर डिजिटल पुस्तक विभागात हे डिजिटल पुस्तक दाखल झाले आहे. आपल्याला ते घ्यायचे असल्यास ९८२१०१४७१६ या क्रमांकावर आपले नाव नोंदवून ठेवा.
बहुविध चे सभासदत्व* घ्या.