fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

सत्ताधारी पक्षाची ‘गरज’ -दै. पुढारीनिवडक अग्रलेख- दिनांक २३ ऑगस्ट २०१९

एखादे शीर्षक वाचले की लेखात काय असेल याचा अंदाज येतो. ‘ ज्याची लाठी त्याची ….’ हे शीर्षक असलेला लोकसत्ताचा अग्रलेख, सीबीआय आणि ईडी, यांचा भाजप सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रच्छन्न गैरवापराचे वर्णन करतो. सोशल मिडीयाचा परिणाम अग्रलेखांवर कसा होतो हेही या लेखात बघायला मिळतंय. सदर लेखावर भाजप-भक्त काय काय आक्षेप घेतील ते नमूद करून अगोदरच त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. आणि हो, चिदंबरम हे (केवळ आरोपी असून) जोवर गुन्हेगार ठरलेले नाहीत, तोवर त्यांच्याबद्दल काहीही भले अथवा बुरे लिहिण्याची गरज नाही, असेही गिरीश कुबेरांनी नमूद करून टाकले आहे. त्यामुळे हा अग्रलेख वाचायला मजा येते.

या पार्श्वभूमीवर प्रहारचा अग्रलेख जे घडले ते त्रयस्थपणे सांगतो आहे. चिदंबरम यांच्यावर आरोप न करता, त्यांच्या सर्व प्रकरणांचा थोडक्यात तपशील आणि भाजप सरकार / अमित शहा यांचे वचपा काढण्याचे धोरण या दोन्हीचा व्यवस्थित परामर्श घेतो. प्रत्येकाचे माप त्याच्या पदरात टाकणारा ‘ जे पेराल ते उगवते ‘ हा अग्रलेख अधिक संतुलित झाला आहे.

सामनाचा अग्रलेख या विषयावरच. ‘चिदंबरम यांचे अधःपतन’ सांगताना त्यांनी स्वतः गृहमंत्री असताना याच प्रकारे केलेला सत्तेचा गैरवापर, घोटाळे यांची हा लेख आठवण करून देतो. ते सगळं ठीक, पण सामनाने उपस्थित केलेला एक प्रश्न जबरदस्त आहे. जामीन नाकारल्यावर गायब झालेले चिदंबरम ७२ तास दिल्लीतच होते. आणि पुन्हा स्वतः कॉंग्रेस मुख्यालयात प्रकट झाल्यावर सीबीआयला ते  दिसले. दरम्यान एवढ्या महत्वाच्या व्यक्तीला जर सीबीआय शोधू शकत नसेल तर गुन्हेगार आणि अतिरेक्यांना ते कसे शोधणार ?… एकदम व्हॅलीड पॉइंट :)

मुलायम सिंग यांच्या सैफई या गावात सामूहिक रॅगिंगचा भयंकर प्रकार बघायला मिळाला. एमबीबीएस च्या पहिल्या वर्षाच्या दीडशे विद्यार्थांना सिनियर्सनी टक्कल करून परेड करायला लावली. आश्चर्य म्हणजे संस्थाप्रमुखांनी याचे सुरुवातीला समर्थनही केले. ‘रॅगिंग’चा रोग या विषयावरचा सकाळचा अग्रलेख दोन्ही अर्थांनी चिंतनीय आहे.

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या सर्व प्रकारावर भाष्य करणारा लोकमतचा अग्रलेख सर्वपक्षीय लुटीवर प्रकाश टाकतोय. {{ शरद पवारांनी बँकेवर कब्जा केला आणि तिथूनच बँकेच्या ºहासाला सुरुवात झाली. विशेषत: अजित पवारांनी या बँकेच्या माध्यमातून सहकार चळवळ अक्षरश: मोडीत काढली. ज्या सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची थकबाकी होती, असे कारखाने स्वस्तात विकत घेतले गेले. ज्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश झाला आहे, त्यात राष्टÑवादीचे अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफांसह शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर, शेकापच्या मीनाक्षी पाटील, काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण आदींचा समावेश आहे. }}

नागपूर तरूण भारतला भाजपचे मुखपत्र का म्हणतात हे सिद्ध करणारा, चिदंबरम प्रकरणी कॉंग्रेस आणि आधीच्या सरकारांना झोडून काढणारा; मोदी सरकार जणू मसीहा असल्याचे प्रतिपादन करणारा हा अग्रलेख खास भक्त मंडळींना खाद्य पुरवणारा आहे.

वायुसेनेच्या प्रमुखांनी ४४ वर्षे जुनी मिग विमाने वापरावी लागतात, या संदर्भात व्यथा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने याचा इतिहास आणि वर्तमान यांची चिकित्सा करणारा, बेळगाव तरुण भारतचा अग्रलेख वाचनीय आहेच.

विमानांद्वारे आकाशात बीज पेरणी करून कृत्रिम पाऊस पाडला जातो. या विषयावर’ शास्त्र देते, कर्म नेते ‘ हा दिव्य मराठीचा लघु -अग्रलेख थोडक्यात आढावा घेणारा आहे.

‘मंदीचा विकास’ हा मटाचा अग्रलेख अर्थातच, सध्याची उद्योगजगताला आलेली मलुली, पार्ले सारख्या कंपनीवर झालेला परिणाम, स्वतः रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना आलेले भान, त्यांची बदललेली भाषा यावर भाष्य करतोय. त्यातले {{ अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ अॅलन ग्रीन्सपॅन यांनी पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या विक्रीच्या आलेखाचा देशाच्या आर्थिक स्थितीच्या आलेखाशी संबंध असल्याचा सिद्धांत मांडला होता. त्यादृष्टीनेही देशातील पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या विक्रीचा आलेख मंदावलेला आहे. }} हे वाक्य अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्वाचे.

‘सत्ताधारी पक्षाची गरज’ हा एक अप्रतिम अग्रलेख आज पुढारी मध्ये वाचायला मिळाला. तरुणाईच्या फेसबुकीय भाषेत ज्याला ‘चाबूक’ म्हणावे तसा हा लेख जमून आला आहे. चिदंबरम प्रकरण, त्यात भाजपचे राजकारण, कॉंग्रेसचे तोंडघशी पडणे, इंदिरा गांधी खिंडीत सापडल्या असतानाही त्यांनी केलेले अत्यंत चतुर राजकारण, या सर्वांवर भाष्य करणारा हा लेख मी बुकमार्क करून ठेवलाय .

त्यामुळे आजचा निवडक अग्रलेख पुढारीचाच. खालील लिंकवर क्लिक करून तो वाचता येईल.

https://www.pudhari.news/editorial/editorial/editorial-article-pudhari-about-Indian-political-situation-/

दैनिक पुढारी, संपादक- विवेक गिरधारी

**********

हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील.

सुधन्वा कुलकर्णी

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 8 Comments

 1. सुधन्वा, हा एक छान आणि उपयुक्त उपक्रम आहे. आता बहुधा आम्ही दररोज सकाळी वर्तमानपत्र उघडण्याआधी या लेखाची वाट बघत जाऊ. 👍

  1. धन्यवाद

 2. खुप छान लिहिले आहे मी आपले नाव पाहिले किती लेख वाचणे, अभिनंदन

  1. धन्यवाद

 3. सगळ्याच अग्रलेखांची लिंक द्यावी म्हणजे आवडीप्रमाणे ज्याला त्याला वाचता येईल आणि आपली शिफारस पण करावी म्हणजे आमची भूक अधिक भागेल

  1. ‘ निवडक अग्रलेख ‘ हे जे शीर्षक आहे, त्यात आजचा सर्वोत्तम (वाटलेला) अग्रलेख असं अभिप्रेत आहे. म्हणून एकच लिंक दिली जाते. एकंदर अनुभव असा आहे की, लिंकवर क्लिक करून लेख वाचण्याकडे फार थोड्या वाचकांचा कल असतो. मात्र वाचकांचा आग्रह असल्यास सर्व अग्रलेखांच्या लिंक्स देता येतील. ते काही कठीण काम नाही.

 4. सुधन्वा, खूप धन्यवाद. साऱ्या अग्रलेखांचा समाचार असा एका लेखात समालोचन होत वाचता आला ही आज प्रभातसमयी मोठी उपलब्धी ठरली. उत्तम.

  1. धन्यवाद देवेंद्रजी!

Leave a Reply

Close Menu