या शतकाच्या अखेरीस अाताच्या पन्नास ते नव्वद टक्के भाषा नष्ट होतील असे युनेस्कोच्या अहवालात नमूद केलेले अाहे.
अाता जगातील ५० लोकसंख्या केवळ वीस भाषा बोलतात. महाराष्ट्रातील निहाली, कोरकू व अाणखी अशा भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर अाहेत. भारतापुरते बोलायचे तर प्रमुख १२२ भाषांपैकी ६६ भाषा या तिबेटी-बर्मी प्रकारच्या असल्या तरी त्या केवळ १% लोक बोलतात. सामाजिक-राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे भाषालोपाचे एक प्रमुख कारण अाहे. अापल्याकडे शहादा भागातील अादिवासींचे पुनर्वसन होताना त्यांना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी मराठीतून शिकवण्याचा निर्णय झाल्यावर त्यांच्या मूळ भाषांचा र्हास होणे साहजिक बनले.
वर उल्लेख केलेल्या युनेस्कोच्या अहवालाप्रमाणे मराठीला या शतकाअखेरपर्यंत तरी मरण नाही असा उल्लेख अाहे. भिल्ल गावांमध्ये गोड पाण्यातील माशांचे जवळजवळ पंधरा प्रकार प्रचलित होते. मात्र त्यांचे पुनर्वसन केल्यानंतर त्यांना केवळ दोन-तीन प्रकारचेच गोड पाण्यातील मासे उपलब्ध होत असल्यामुळे कितीतरी शब्द मागे पडले. इंग्रजीत आत्या-मावशी यांना आंट असे संबोधले जाते. हिन्दीत तर अशा नात्यांना अाणखी वेगवेगळे शब्द उपलब्ध अाहेत.
मात्र भिल्ल समाजातील बहुपत्नित्वामुळे धाकटी सवत, थोरली सवत यांच्यासाठीही वेगवेगळे शब्द अाहेत. एक प्रमाणभाषा असते अाणि तिच्या अनुषंगाने अनेक बोलीभाषा निर्माण होतात असे सहसा समजले जाते. प्रत्यक्षात या बोलीभाषा आधीच अस्तित्वात असतात. त्यातलीच एक बोली विविध कारणांनी वरचढ होते व प्रमाणभाषा बनते. कोकणी ही मराठीची बोलीभाषा असल्याचे वारंवार स्पष्ट झालेले असले तरी अहिराणी भाषा मात्र गुजराती किंवा मराठीची बोली भाषा नसून स्वतंत्र व भिली भाषागटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.
डेक्कन कॉलेजने हाती घेतलेल्या प्रकल्पातून मराठीच्या बोली भाषा निश्चितपणे किती अाहेत हे स्पष्ट होईल. एकाच प्रक्रियेचे वर्णन या बोलीभाषांमध्ये कसे होते याची दोन उदाहरणे खाली दिली अाहेत. यातली एक क्रिया 'एकाने अापल्या मनगटावरील घड्याळ काढून दुसर्याच्या मनगटावर बांधले' अाणि तर दुसरी 'एकीने अापला डबा उघडून दुसर्याला घास खाऊ घालून स्वत:ही जेवण केले' ही. मात्र त्याचे वर्णन महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कशा पद्धतीने केले गेले हे पाहणे रंजक अाहे.
विवेक साहित्य मंचाच्या वतीने 'बोली कथा अभिवाचन अाणि परिसंवाद' या कार्यक्रमात अाज पुण्यातील सावरकर अध्यासानात डेक्कन कॉलेजच्या डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी अापल्या बीजभाषणात सांगितलेला काही भाग. अफाट क्षेत्र अाहे. लष्करच्या भाकरी भाजण्याचे पण अतिशय महत्त्वाचे काम. एखादी भाषा मेली तर काय बिघडले, इथपासून काही जणांची सुरूवात असते अाणि इथे यावरचे कितीतरी मोठे काम उभे झालेले अाहे. बाकी मराठीबाबतचे युनेस्कोचे भाकीत काहीही असले तरी शासकीय धोरणांमुळे मराठीसारखी एखादी प्रमुख प्रमाणभाषा लुप्त झाली नाही तरी बोलीभाषेत रूपांतरीत होते की काय हे पहावे लागेल.
**********
लेखक- राजेश कुलकर्णी
बोलीभाषांचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास
निवडक सोशल मिडीया
राजेश कुलकर्णी
2021-08-17 14:00:01