चॉकलेट सँडविच
***
प्रभात रोडवरचा पराक्रम आटोपून शार्दूल त्याच्या महात्मा सोसायटीतल्या घरी आला तेव्हा रात्र झाली होती. सगळीकडे गणपतीच्या वातावरणाचा आनंदी सुगंध पसरला होता. घरी आला तेव्हा तिथे पाहुण्यांचा गप्पांचा फड रंगला होता. आपला खुललेला चेहरा कोणाला दिसू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली तरी पाहुण्यांच्या चाणाक्ष नजरेने जे टिपायचं ते टिपलंच.
शार्दूलच्या आईला तो का आणि कुठे जाणार याची कल्पना होती. बाबांना नेहमीप्रमाणे फक्त कुणकूण लागली होती. तरीही शक्य तितका साधा चेहरा त्याने ठेवला आणि गप्पांत सहभागी झाला. तिथे ओवीलाही आभाळ ठेंगणं झालं होतं. घरी पांगापांग झाल्यानंतर ती तिच्या खोलीत गेली स्वत:च गिरक्या घेतल्या आणि फोन उघडला. शार्दूलला भसाभसा मेसेज केले. काल दोघंही दिवसभराच्या कामांमुळे थकले होते.त्यामुळे कालचा फोन लवकर आटपला होता.
शेवटी आज संध्याकाळी त्यांच्या FC road च्या चॉकलेट सँडविचच्या अड्ड्यावर भेटायचं ठरलं. कालच्या पैठणीनंतर आज ओवी पुन्हा हॉट पॅन्ट्सवर आली होती. त्यामुळे शार्दूलला थोडंसं हायसं वाटलं. अशाही गोष्टींची सवय होते हे त्याला जरा नवीनच होतं. प्रेमात पडल्यापासून अशा अनेक नवीन गोष्टी त्याला उमजल्या होत्या. एका नव्या विश्वात दोघांनी प्रवेश केला होता. नववीपासून ते एकत्र शिकले होते. एकमेकांशिवाय पान हलत नाही हे त्यांना लगेच कळलं होतं. पण तरी प्रेमात बिमात पडू असं त्यांना वाटलं नव्हतं. पण असं अवचित झालं नाही ते प्रेम कसलं?
“अथर्वशीर्ष कधी पाठ केलं रे? ओवीने सँडविचचा पहिला घास घेत विचारलं. “हॅलो मला चौथीपासून येतं.” शार्दूलने कॉलर टाईट केली. “जाम शहाणा आहेस. मला सांगितलं नाहीस कधी हे.” “गीतेचा पंधरावा अध्याय पण येतो... शिकवू का?” “गपे.. गीतेचा अध्याय म्हणे. काल जाम सुटलेलास हां. मंदीबिंदी, शाईनिंग खाल्लीस फार काल.” “इतक्या थोर लोकांसमोर काहीतरी निभाव लागायला हवा ना.. ते राजेंद्र काका काल विचारत होते, कँपस प्लेसमेंट झालंय का तुझं इतकं मंदीबद्दल बोलतोय” “ते जरा आगाऊच आहेत. मलाही सारखं ऐकवत असतात.. फर्ग्युसन आधीसारखं राहिलं नाही वगैरे..
” तेवढ्यात ओवीच्या ओठाला चॉकलेट लागतं. याची नजर तिथे जाते. ती लगेच त्याला एक स्त्रीसुलभ फटका मारते आणि ओठांवरचं चॉकलेट पुसते. “आई विचारत होती काल. तुझा फोटो दाखवला पैठणीतला. एवढी खूश झाली ना. तुला साडी घालता येते..” शार्दूल सावरून बोलण्याचा प्रयत्न करतो. “घालता नाही रे नेसता” “हां तेच ते..” “हे पाहूनच तिला फार आनंद झाला. म्हणे गौरीच्या दिवशी जेवायला बोलाव. “
“काsssssय?” “ओव्या प्लीज ये ना.. मजा येईल. मी परीक्षा दिली. आता तू दे.” “यार नको ना.. मला जाम टेन्शन येतं.. माम्या मावश्या, आत्या असतील तुझ्या.. मुलींकडे लगेच लोक वेगळ्या नजरेने पाहतात रे. मी एकदम कॉन्शस होते. “ “ओ मॅडम.. काल मी एवढी परीक्षा दिली त्याचं काय? कसले एकामागोमाग एक टाकत होते तुझे बाबा. आणि बायदवे तू आमच्या घरची सून होणारेस. तू यायलाच हवं. यापेक्षा चांगली संधी कोणती मिळणारे?” “ए अरे.. नको ना.” ओवीने हातपाय आपटले.
"मिस ओवी दांडेकर, तुम्हाला हे करावं लागेल." पाच मिनिटं फक्त एफसी रोडवरचा गोंगाट ऐकू येत होता. "मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलेले तेव्हा काकूंनी आप्पे केले होते ना.. वाडेश्वरचे आप्पे फिके आहेत त्यासमोर" ओवी अचानक भावनिक झाली. "हो.. मला फार आवडत नाही. पण तुला आवडतात म्हणून करायला लावलेले. " आता खरंतर दोघांनाही टेन्शन आलं होतं. वातावरण हलकं करण्याची गरज लगेचच शार्दूल च्या लक्षात आली .
" आजचं चॉकलेट सँडविच जरा जास्तच tempting झालंय ना ओवे" " तू गप रे" ओवी बेक्कार लाजली. तरी एक फटका द्यायला विसरली नाही.. दोघंही हसायला लागले. दीड दिवसाचे गणपती विसर्जित करून लोक घराकडे जात होते. ओठावरचं चॉकलेट पुसलेला टिश्यू पेपर बराच वेळ टेबलवर तसाच पडला होता..
(क्रमशः)
**********
लेखक - रोहन नामजोशी
समाजकारण
, कथा
, सोशल मिडीया