भाडेतत्वावर घ्या, नीट वापरा आणि परत करा हा येत्या काळाचा फंडा असणार आहे. सो काही महागड्या वस्तूत इन्व्हेस्ट करणार असाल तर चार वेळा विचार नक्की करा. काही वर्षांपूर्वी बंगलोर आणि पुण्यात ' कॅमेरा गिअर' रेंटवर मिळण्याची सोय झाली. अनेकांना वाटले होते, हे चालणार नाही परवडणार नाही. पण ओव्हर द पिरियेड हे मॉडेल मॅच्युअर झाले. कमर्शियल फोटोग्राफर्सच्या गरजा तर अजूनच जास्त असतात. किती इन्व्हेस्ट करणार याला लिमिट असते. माझ्यासारख्या किरकोळ फोटोग्राफरकडे काही लाखांची किट आहे. पण ह्या सोयीमुळे आता मला पाहिजे ती लेन्स रेंट करता येते.
वर्षातून एकदा येणाऱ्या इव्हेंटसाठी मी लाईफ टाईम इन्व्हेस्टेड राहत नाही. प्लस आपला चक्रम स्वभाव, आज आवडले म्हणून केले, उद्या नाही आवडले तर काय करायचे हा मेजर प्रश्न आता पडणार नाही. वर्षातून एकदा किंवा दोनदा सुट्ट्यांवर जाणाऱ्या लोकांसाठी तर ही जबरदस्त सोय आहे. आजकाल कोणत्याही मोबाईलमध्ये उत्कृष्ट कॅमेरा हा असतोच. मग जर तुम्ही जंगलात जाणार असाल तर वाईल्फलाईफ किट रेंट करा आणि दिल्ली राजस्थान जाणार असाल तर लँडस्केप किट रेंट करा. परत दरवर्षी नव्या कॅमेऱ्याची मजा आहेच. अर्थात ही सजेशन्स नॉन कमर्शियल फोटोग्राफर्स साठीच आहेत.
असाच एक मोठा बदल आपण वाहनांच्या ओनरशिप मध्ये येत्या दहा वर्षात बघणार आहोत. आज पुण्याहून निघतांना मी सेल्फ ड्राईव्ह बीएमडब्ल्यू सेव्हन सीरिज रेंट केली, औरंगाबादला गाडी परत केली, तीन दिवस औरंगाबादमध्ये फिरायला मला टू व्हीलर हवे होते म्हणून मी हार्ले फॅट बॉय रेंट केली. तीन दिवसांनी मला पुण्याला परत यायचे होते पण खूप सामान आहे सोबत, टेम्पो का करायचा सामानासाठी, इसुझु डीमॅक्स मी रेंट केला, सामान घरी रिकामे केले आणि मग कोथरूडला स्टेशनवर परत केला, येतांना मेट्रो पकडून घरी आलो. स्वप्ने आहेत म्हणून मोठे ब्रँड्स वापरले आहेत, या मॉडेलमध्ये सर्वांना परवडेल अश्या गाड्या असतीलच. सध्या माझ्याकडे असलेली कार कदाचित मी विकत घेतलेली शेवटची कार असेल. वर्षाला जेमतेम दहा हजार किलोमीटर गाडी चालवतो मी आजकाल. इएमआय, मेंटेनन्स आणि इन्शुरन्स कॉस्ट बघितली तर कार विकत घेणे हा मी केलेला मूर्खपणा आहे. कार स्टेटस सिम्बॉलमधून कधीच बाहेर पडले आहे. एक बेसिक टू व्हीलर हीच खरी गरज आहे माझी.
गाडी आणि कॅमेरात इन्व्हेस्ट करणार असाल रेंट मॉडेलचा विचार नक्की करा. सेम केस घरासाठी पण आहेच. आपण भारतीय लोक निर्जीव वस्तूत फार जीव लावतो अस माझं ऑब्झरर्व्हेशन आहे. घर ही फार मोठी इन्व्हेस्टमेंट येत्या काळात ठरू शकते. पुण्यात घर घेणे म्हणजे कर्मकठीण आहे. किमती बघितल्या की शामतच होत नाही. दोन बेडरूमचे घर सर्वसाधारणपणे पाऊणशे लाखांना पडते इथे. ( मी फारच रिझनेबल बोललो का? ) पन्नास लाख लोन केले असा विचार केला तरी वर्षाला साधारण पाच लाख हप्त्यात जातील, या पाच लाखातले काही लाख अनेक वर्षे व्याज म्हणून जातील. मासिक वीस हजार बजेट असेल तर पुण्यात चकचकीत फ्लॅट भाड्याने मिळू शकतो. दर वर्षी इतके पैसे तर आपण व्याज म्हणूनच भरू, प्लस, आता माझ्यामते अॅप्रिसिएशन खूप जास्त नक्कीच होणार नाही. मग आयुष्यभराचे लोड का घ्यावे? अर्थात हे माझे विचार आहेत, सगळ्यांना पटतीलच असे नाही !!!
लेखक- हर्षद शामकांत बर्वे
**********
Google Key Words - Harshad Shamkant Barve, Renting trend, Hire and Return, Market Trend.
हायर अॅन्ड रिटर्न
निवडक सोशल मिडीया
हर्षद शामकांत बर्वे
2021-07-16 10:00:03