मराठी माणसे अशी का घडली?

पुनश्च    रमेश आगाशे    2020-05-06 06:00:22   

अंक: अंतर्नाद ,मे २०१२

मराठी माणूस नाटकवेडा असतो, तो जाईल तिथे एखादी संस्था स्थापन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करतो अशी मराठी माणसाची बरीच लक्षणे सांगितली जातात. मात्र तरीही मराठीपण म्हणजे नेमकं काय, असं कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं निश्चित असं काही उत्तर देता येत नाही. शिवाय अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलतही असतात. आचार्य अत्रे यांनी 'कऱ्हेचे पाणी'च्या पाचव्या खंडात 'मराठीपण म्हणजे काय' अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. त्यात इतिहासातले अनेक दाखले देत त्यांनी प्राचिन काळापासून अनेकांनी मराठी लोकांविषयी काय काय लिहून ठेवले आहेत, त्याची  रंजक उदाहरणेही दिली आहेत. त्यात त्यांनी न्या.रानडे यांचेही मत दिले आहे. त्यात एक वाक्य असे आहे- 'धर्माचे आग्रही स्वरूप महाराष्ट्रात आढळून येत नाही. धर्माबाबत उदासिनपणा हा या महाराष्ट्राचा विशेष गुण आहे.' रानड्यांनी ह्यांस 'गुण' म्हटले होते हे लक्षात घ्या. आज तशी परिस्थिती राहिली आहे का?  मराठीपण म्हणजे नेमकं काय  याचा उहापोह करणारा, या महिन्याच्या चिंतन सदरातील हा लेख नुकत्याच साजऱ्या झालेल्या ६० व्या महाराष्ट्र दिनाच्या त्यानिमित्ताने. अंतर्नादच्या  'मे २०१२' च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता.**********

मराठीपण म्हणजे नेमके काय, ती टिकवता येणारी गोष्ट आहे, का सतत बदलणारी, आणि ते टिकवायचे असेल तर कसे? मराठीपण हा शब्दच मराठी भाषेशी आणि मराठी भाषकांशी जोडला गेला असल्याने मराठीपण हे केवळ भाषेशी जोडले गेले आहे, का मराठी प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी, मनोवृत्तीशी आणि वागण्याच्या जीवनपद्धतींशी? मला स्वत:ला असे वाटते, की मराठीऐवजी या मुलखाची भाषा जरी प्राकृत राहिली असती, तरी इथल्या माणसांची वागण्याबोलण्याची, विचार करण्याची पद्धत, स्वभाववैशिष्ट्ये (Regional character) आत्तासारखीच राहिली असती. म्हणजे प्रत्येक प्रदेशातील स्वभाववैशिष्ट्य तिथल्या प्राकृतिक परिस्थितीतून किंवा तिथल्या मातीतून जशी निर्माण होतात, तशी ती मराठी मुलुखातही झाली असतील. त्यामुळे ‘मराठीपण’ या शब्दापेक्षा ‘महाराष्ट्रीयत्व’ हा शब्द जास्त अर्थवाही वाटतो.

महाराष्ट्रीयांच्या जडणघडणीला इथली नैसर्गिक-भौगोलिक परिस्थिती जास्त कारणीभूत ठरली आहे, असे म्हणायला जागा आहे. जवळजवळ वीस टक्के भूभाग वैराण, कठीण पाषाणांचे उघडेबोडके डोंगर आणि त्यावरील खुरट्या जंगलांचा. देशावरील एक तृतीयांश भाग सतत दुष्काळी असल्याने अभावग्रस्त. कोकण आणि नागपूरपासून पूर्वेकडचा टापू सोडल्यास पावसाची कमतरता, त्यामुळे नव्वद टक्के शेती कोरडवाहू आणि शेतीचे उत्पन्न उपजीविकेच्या फार पुढे न जाणारे आणि तेही कष्टसाध्य. यामुळे मराठी माणसाने कामाला कधी कमी मानले नाही. शिवाय, त्यातून निर्माण झालेली साधी राहणी, कमी अपेक्षा (लई नाही लई नाही मागणं देवा...), ऐदी श्रीमंतीबद्दल तिटकारा. जीवनसंघर्ष कठीण असल्याने (सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे) आणि त्यासाठीही स्पर्धा करताना टिकून राहण्यासाठी करावी लागणारी कठोर, सरळ स्पष्टोक्ती. जिच्यामध्ये मार्दवाचा किंवा गोडीचा अभाव. सडेतोड स्वाभिमानी वागणूक (कुणाचं फट म्हणून घेणार नाही...) इत्यादी अनेक मराठी स्वभाववैशिष्ट्ये सरळपणे इथल्या साधनसंपत्तीच्या अभावांशी जोडलेली दिसतात. या सर्व महाराष्ट्रीयांच्या अभिव्यक्तीची भाषा मराठी, म्हणून याला मराठीपण म्हणायचे एवढेच.

महाराष्ट्रीय स्वभाव इथल्या अर्वाचीन इतिहासाशीही तसाच सशक्तपणे जोडलेला आहे. मराठी तलवारींनी इतिहासात गाजवलेली वीरश्री स्वत:च्या ‘लढवय्ये’ या प्रतिमेच्या रूपाने खोलवर मुरलेली आहे, जी वागण्याबोलण्यात अधूनमधून उचल खात राहते. राष्ट्रकूट आणि यादव राजवटींच्या काळापासूनच अनेक महाराष्ट्रीय हे सैनिकी पेशात होते. जिथे कृषिबहुलता नसते,अशा सर्वच प्रदेशांतील लोकांसाठी हे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन असते. हिमालयाच्या पहाडी क्षेत्रातील डोग्रा, हिमाचली, राजपूत, गढवाली, कुमॉउनी, गोरखा पलटणी हे त्याचेच दृश्य रूप. महाराष्ट्रातही इथल्या बलदंड जातींनी इतिहासकाळात वेळोवेळी नांगर टाकून हातात तलवारी घेतल्याचे इतिहास सांगतो. शिवछत्रपतींनी सोडलेला स्वराज्याचा संकल्प मराठी माणसांच्या शौर्यातून आणि ‘मोडेन पण वाकणार नाही.’ या वृत्तीमधूनच साकारला गेला. या शौर्यगाथांच्या आठवणींमुळे मराठी समाजाचा स्वाभिमान एकदम दसपटीने वाढला आणि त्यामुळेच सैनिकी पेशाची परंपरा इथे आजपर्यंत सन्मानाने टिकून आहे. महाराष्ट्रीय अस्मितेचे हे बळकट मूळ सर्वपरिचित असल्याने यावर जास्त बोलायला नको. पण एक काळजी मात्र घ्यायची वेळ आली आहे. इतिहासाच्या अतिरेकी उदात्तीकरणातच रंगून गेल्यामुळे आमच्या अनेक मंडळींची गाडी शिवाजी महाराज टर्मिनसपासून पुढे सरकायलाच तयार नाही.

इतिहासाबद्दल आणखी थोडे लिहायचा मोह आवरत नाही. मराठी मुलखाबाहेरील स्वाऱ्यांमध्ये जिंकणाऱ्या मराठी बारगिरांनी तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मोठ्‌या प्रमाणात लूट करून दहशत माजवली. चौथाई सरदेशमुखी करून मुलुखगिरीचा खेळ मांडला गेला, तेव्हा तिथल्या जनतेच्या सुशासनाची जबाबदारी सर्वस्वी अंगाबाहेर टाकून त्यांनी फक्त वसुल्या केल्या. त्यामुळे बंगाल, उत्तर आणि मध्य भारत, राजस्थान इथल्या प्रजेमध्ये मराठे म्हणजे लुटेरे, दरोडेखोर अशी जी वाईट प्रतिमा निर्माण झाली, ती अनेक मराठीजनांच्या गावीही नसते. मूल झोपले नाही, तर बंगाली माता त्याला चूप करायला बोरगी (बारगीर) आला, असा धाक दाखवायच्या. याचा कौतुकास्पद उल्लेख आमच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याचे चांगले स्मरते. पण जिथे मराठी सरदारांनी राज्ये करत वसाहती निर्माण केल्या, त्या ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा वगैरे संस्थानांतील मात्र सुशासनही कौतुकाला पात्र झाले. पानिपतच्या इतिहासाचा उल्लेख केल्याशिवाय मराठी इतिहास पूर्ण होत नाही. अहमदशहा अब्दालीने पंजाब-दिल्ली प्रांतावर केलेल्या अनेक स्वाऱ्यांमध्ये स्थानिक जनतेचा खूप छळ केला. शीख पंथीयांना त्याने विशेष त्रास दिला. अब्दालीचा मुकाबला करताना पानिपतच्या रणांगणावर लाखाहून जास्त मराठी बांगडी फुटली, पण अब्दालीच्या स्वाऱ्या बंद झाल्या. त्यामुळे पंजाबमध्ये मराठी माणसांच्या वीरश्रीचा विशेष गौरव केला आहे.

माझ्या केंद्र शासनातील नोकरीमुळे पंजाब व हरियाणात सुमारे २० वर्षे माझे वास्तव्य झाले. त्या दीर्घ वास्तव्यात अनेकदा सरदार मित्रांनी ‘जो मरके हटा वह मऱ्हाटा’ ही मऱ्हाटा शब्दाची व्युत्पत्ती अनेकदा ऐकवली ती पानिपतच्या अनुभवामुळेच आणि हे ऐकताना अनेकदा छाती फुगून गेली. वीरमाता जिजाबाई, पंचवीस वर्षेपर्यंत गनिमी सैन्याच्या नेतृत्वाची धुरा वाहणारी ताराबाई, पुण्यशील अहिल्याबाई किंवा वीरांगना लक्ष्मीबाई यांच्यामुळेही मराठी स्त्रीत्वाचा देशात मोठाच गौरव झाला. इतिहासावर बोलायला लागल्यावर आपल्या सर्वांनाच गुंतून पडायला होते. हाही महाराष्ट्रीयांचा एक विशेष (दोष ठरू शकतो असा).

आता थोडे भाषेबद्दल. मराठी भाषा इतिहासकाळापासून वेळोवेळी बदलत गेली आहे. ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांना समजण्यासाठी जी रचना केली, ती त्याकाळची सोपी मराठी आजच्या मराठीत मांडल्यावरच आम्हांला नीटपणे समजते. आगरकरांची इंग्रजी शब्दविरहित मराठी आज प्रचलित नाही. मराठी वाङ्‌मयात इंग्रजीमधून आलेले निबंध (Essays), लघुनिबंध, प्रबंध (Thesis), लघुकथा (Short Stories), दीर्घकथा किंवा कादंबऱ्या (Novelets, Novels), संपादकीय (Editorials) इत्यादी भर पडल्याने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. तसे ते इतिहासकालीन उर्दू, पर्शिअन शब्दांची भर पडल्यामुळेही झाले होतेच. मग इंग्रजीमधले हजार एक सर्वांना समजणारे आणि आता सर्रास वापरत असलेले (जसे बटण, टेबल इ.) शब्द बोलण्यात किंवा लिहिण्यात आले, रुळवले तर भ्यायचे कशाला? विशेषत: नव्या जगात जे नव्याने तंत्रज्ञान अवतरले किंवा नवे आर्थिक व्यवहार निर्माण झाले, त्यांतील बँकांचे व्यवहार, गुंतवणुकीचे पर्याय, शेअर बाजार, इलेक्ट्रॉनिक माध्यमे इत्यादींमध्ये जिथे सोपे मराठी पर्याय उपलब्ध नाहीत (उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक), तिथे मूळ इंग्रजी शब्द वापरल्याने काय बिघडणार आहे? यामुळे रेल्वे स्टेशनला ‘अग्निरथ विश्राम धाम’ किंवा की बोर्ड आणि क्लिकला ‘कळपट्टी’ आणि ‘खटका’ असे शब्द वापरण्याचा अट्टहास कशाला? इथे मराठीमध्ये (विशेषत: संस्कृतच्या प्रयोगातून) पर्यायी मराठी शब्द निर्माण करण्याची क्षमता आहे हे जरी मान्य केले, तरी भारतीय आणि जागतिक पातळीवर मूळ इंग्रजी शब्द वापरल्याने संवाद जास्त सुलभ होणार नाही का? असे हजार एक नवे इंग्रजी शब्द मराठी वाक्यरचनेमध्ये आणि व्याकरणात जर सामावून घेता आले, तर मराठीची हानी न होता ती जास्त समृद्ध बनेल.

मराठी भाषेला खरा धोका आमच्या नातवंडाच्या पिढीपासून पुढील पिढ्यांसाठी मात्र निश्चितपणे निर्माण झाला आहे, ज्यामुळे मराठी संपू शकते. याचे मुख्य कारण मराठी शाळांच्या जागी धडाधड इंग्लिश माध्यमांच्या शाळा अस्तित्वात येणे हा आहे. याचे लोण आता हळूहळू ग्रामीण भागांपर्यंत पसरत आहे. जेव्हा माझी नातवंडे ‘आजोबा, वेन्सडेला मराठीत बुधवार म्हणतात का गुरुवार?’ किंवा ‘एकोणतीस म्हणजे इंग्रजीत किती?’ असा प्रश्न विचारतात, तेव्हा कपाळावर हात आपोआप जातो. उद्या हे सर्व प्रश्न कदाचित ग्रामीण भागातही विचारले जातील. अशा अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील मास्तरांचे इंग्रजी ज्ञान कितपत खोल, असाही प्रश्न पडतो, मनात येतो. आत्ताच शहरांतील शाळांमधील इंग्रजी शिक्षकांच्या दर्जाविषयी शंका घ्यायला जागा आहे. नाहीतर उद्या मराठीही गेले आणि इंग्रजीचीही आम्ही वाट लावली, असे होईल. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानापाठोपाठ उद्या सर्व इंग्रजी शिक्षण अभियान राबवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सर्व भारतीयांसाठी हिंदी आणि सर्व जागतिक व्यवहारासाठी आम्हाला इंग्रजी भाषा येणे हे चांगलेच. पण ते करताना मराठीचा नाश होऊ देणारी नीति नको.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे, हे अनेक तज्ज्ञांनी केव्हाच मान्य केले आहे. आमची पिढी पाचवीपासून पुढे एक विषय म्हणून इंग्रजी शिकली व त्यामुळे आमचे मराठी तर टिकलेच; पण इंग्रजीमुळे - सुरुवातीच्या काही वर्षात सफाईदार इंग्लिश बोलण्याची अडचण सोडता - पुढे काहीच अडचण भासली नाही. कुठलीही भाषा तिच्यात सतत वाचन, लेखन किंवा संभाषणामुळे सहज आत्मसात होते, असे आजवरच्या सर्वच पिढ्यांनी व्यावसायिक किंवा नोकरीच्या काळात अनुभवलेले सत्य आहे. मग आताच पहिल्या वर्गापासून इंग्रजीच्या इतका आग्रह कशासाठी? आणि त्यासाठी मराठीचा बळी का?

युरोप खंडातील सर्व देश व जपान, चीन वगैरे अनेक राष्ट्रे इंग्रजीशिवाय आपली प्रगती चांगली करू शकली नाहीत काय? तिथल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमच्याकडे आल्यावर संपर्कापुरतेच तोडकेमोडके इंग्रजी बोलताना आम्ही पाहतोच. शिवाय भाषांतर करण्याचीही सोय असतेच. मग भारतातच इंग्रजी सर्वांनीच शिकण्याचा एवढा आग्रह का, हे समजत नाही. त्यामुळे आमची मातृभाषा टिकवून ठेवण्यासाठी आज आम्हांला आपले शैक्षणिक धोरण तपासून सुधारण्याची खूप गरज आहे. अन्यथा आपली मातृभाषा कल्पनेपेक्षा लवकर संपेल.

सुरुवातीला महाराष्ट्रीय स्वभावधर्म इथल्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीतून कसा घडत गेला, हे आपण पाहिले. गेल्या पन्नास-साठ वर्षांत इथली भौगोलिक परिस्थिती जरी तीच राहिली असली, तरी राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीमधील बदलांमुळे मराठी माणसांचे भौतिक जीवन बरेच बदलल्यामुळे आमचा स्वभावधर्म बराच बदलत गेला आहे. आमची वाटचाल आता महाराष्ट्रीयत्वाकडून भारतीयत्वाकडे सुरू झाली आहे. त्याविषयी हे शेवटचे निवेदन.

ब्रिटनची एकछत्री सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतीय एकत्वाचा पाया धार्मिक, सांस्कृतिक स्वरूपाचा होता. इथे पूर्वी अनेक राजकीय सत्ता एकाच वेळी नांदत असल्याने, राजकीय अंगाने भारत हे एक राष्ट्र, हा विचार काही द्रष्ट्या विचारवंतांपलीकडे फार कुणाला ज्ञात नव्हता. ब्रिटिश सत्तेविरोधात जे दीर्घ स्वातंत्र्ययुद्ध चालू राहिले, त्यामधून हा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचत जाऊन हळूहळू बळकट होत गेला. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच एक विशाल राष्ट्र म्हणून आम्ही उभे राहिलो. महाराष्ट्रीयत्वपलीकडचे, पण त्याहून मोठे असे, आमचे भारतीय व्यक्तिमत्त्व आमच्या मनात ठसण्यास आता सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया अजून चालू आहे. सर्व देशासाठी समान राज्यघटना, समान नागरिकत्वाचे हक्क, समान कायदे, समान प्रशासनिक व्यवस्था, समान विकासाच्या संधी इत्यादींमुळे समान भारतीयत्वाची भावना बळकट होत आहे आणि पुढेही होत राहणार आहे. उपलब्ध राष्ट्रीय निधीची बऱ्यापैकी समन्यायी वाटप होत असल्याने भौगोलिक प्रतिकूलतेमधून मार्ग निघत आहेत.

दळणवळणाच्या सुलभतेमुळे एका ठिकाणचे जास्त उत्पादन दुसऱ्या ठिकाणी पोहोचू लागले. भारतीय पातळीवरच्या नोकऱ्या आणि उद्योग व्यापारांच्या संधीमुळे माणसे एक- दुसऱ्या प्रदेशात येऊ-जाऊ लागली आणि दुसऱ्या प्रांतातल्या चांगल्या गोष्टी किंवा शहाणपण पाहू, समजू, शिकू शकली. त्यामुळे प्रांतिक दुराभिमान हळूहळू मावळू लागले. एकाच भारतीयत्वाच्या विशाल तंबूमध्ये आमच्या वेगवेगळ्या प्रादेशिक अस्मितांच्या छत्र्या सामावल्या गेल्याने प्रादेशिक छत्र्यांचे थिटेपण आम्हांला आता जाणवू लागले आहे. त्यामुळे शेवटी सर्वच प्रांतिक अस्मिता बोथट होत जाऊन शेवटी एकाच भारतीय अस्मितेमध्ये त्या विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे आमचे वेगवेगळे भाषिक-सांस्कृतिक रंग, आमचे सण-समारंभ, यात्रा जर टिकवून ठेवता आल्या तर आमची विविधता टिकेल आणि एकत्वातील तोचतोपणा (मोनॉटॉनी) टाळता येईल. त्यामुळे वेगवेगळ्या अस्मिता जपण्यासाठी नको, पण भाषिक विविधता टिकवण्यासाठी भाषिक संस्कृती टिकवून ठेवायला हवी आणि महाराष्ट्रीयत्वाची भारतीयत्व ही मर्यादाही आम्ही सांभाळायला हवी.

***********

लेखक : रमेश आगाशे

अधिकचा दुवा - याच विषयाशी निगडीत  पुनश्चच्या संग्रहातील खालील लेखही अवश्य वाचा.
  1. मराठी माणूस : प्रतिमा आणि वास्तव - लेखक : अरुण साधू
  2. मुंबईत मराठी माणसाचं खच्चीकरण झालंय! - लेखक: अभय गोखले
Google Key Words - Marathi Culture, Development of Marathi Language, Marathi People, Regional Pride, Ramesh Agashe, Antarnad

अंतर्नाद , चिंतन , समाजकारण

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.