सहा कोटी वर्षे जुनी मुंग्यांची संस्कृती


अंक - सृष्टी,  सप्टेंबर १९७५

'मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सूर्यासी' याला संत मुक्ताईंनी 'नवलाव जाहला' असं म्हटलं असलं तरी त्यांना यातून मुंगीच्या अफाट क्षमतेकडेही निश्चितच निर्देश करायचा असणार. कारण मुंग्यांचे 'सामाजिक व्यवहार' पाहिले तर माणूस चकीत होतो. निसर्गाने अगदी क्षूद्रातल्या क्षुद्र जिवालासुद्धा जगण्यासाठी संघर्ष करण्याची कुवत, बुदधी आणि कल्पकता दिलेली आहे. त्यातील खाचाखोचा लक्षात आल्या तर निसर्गापुढे नतमस्तक होतो आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीनं पाहू लागतो. मुंग्यांच्या वर्तनाविषयी अशीच  स्तिमित करणारी माहिती या लेखात दिलेली आहे. निसर्गनवलाच्या अनेक कथा सांगणाऱ्या सृष्टी या मासिकाच्या  सप्टेंबर १९७५च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.  हा लेख वाचल्यावर नक्कीच मुंगी या विषयावर आपल्याला अधिक वाचावेसे वाटेल. पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले 'मुंगी- एक अद्भभूत विश्व' हे प्रदीपकुमार माने यांचे पुस्तक  ती उत्सुकता शमविण्याचे काम निश्चित करु शकेल.

**********

मनुष्याला वाटते मनुष्यच सर्व सजीव प्राण्यांत बुद्धिमान!

मानव कोटीत जन्माला आल्याचा आपण किती अभिमान बाळगतो! आपल्या बुद्धीचा, आपल्या संस्कृतीचा मानवाला केव्हा गर्व! पण शास्त्रज्ञांना प्राणिशास्त्राच्या अभ्यासाने असे दिसून आले की, हा आपला गर्व फोल आहे आणि मानवाचे गर्वहरण कोणी केले! तर ते एका छोट्या मुंगीने!

मुंग्यांच्या ३५०० जाती आहेत. त्यांची संस्कृती निदान सहा कोटी वर्षांची जुनी आहे असे समजले जाते. कारण सहा कोटी वर्षांपूर्वीचे त्यांचे अवशेष काही लाकडांतून सापडले आहेत. त्यावरून असे दिसते की, मुंग्या ज्या पद्धतीने आज जगतात व कार्य करतात. त्याच पद्धतीने त्या सहा कोटी वर्षांपूर्वीही कार्य करीत होत्या. सहा कोटी वर्षांपूर्वीच्या मुंग्यांच्या जीवनात व आजच्या त्यांच्या जीवनात काही फरक नाही. याचाच अर्थ त्यांची संस्कृती सहा कोटी वर्षांची पुरातन आहे! मुंग्यांमध्ये व्यवस्थितपणा दिसून येतो. त्यांच्या सवयी आश्चर्यकारक असतात. त्यावरून असे वाटते की, त्यांच्या ठिकाणी बुद्धिमत्ता व रचनाकौशल्य ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या सवयीचा ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला त्यांच्याच शब्दात काही गोष्टी खाली देत आहे.

डॉ. वियोडोर सी. शेनेरिला-अमेरिकेतील एका संग्रहालयाचे प्रमुख आहेत. त्यांनी मुंग्यात दिसून येणाऱ्या सैनिकी संघटनेची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. ते म्हणतात, ‘मुंग्यांच्या सैन्यात निरनिराळ्या तुकड्या असतात. त्या एकदम हल्ला करतात आणि कोळी, टोळ, विंचू एवढेच नव्हे तर सरडे, साप व पक्ष्यांनासुद्धा हरवतात. त्यांचे कँप असतात व त्यात काही बारीक कीटक त्यांच्यात मिसळून राहतात. ते कीटक मुंग्यांना दुधासारखा पदार्थ देतात व मुंग्या त्यांचे संरक्षण करतात.

डॉ. शेनेरिला यांनी मुंग्या हल्ला कसा करतात याचा नकाशा काढला असून ते सांगतात की, त्यांच्या चढाईची पद्धत उत्कृष्ट असते. त्या एका जागी तीन आठवडे तळ ठेवतात आणि अन्नासाठी आसपासच्या प्रदेशावर हल्ला चढवितात. रात्र होताच काही मुंग्या एक दीडफूट उंचीच्या लाकडांच्या ओंडक्यावरून किंवा दगडावरून एकमेकांना लटकून एक साखळी जमिनीपर्यंत तयार करतात. अर्थात असे करण्यासाठी त्यांना कोणाच्या आज्ञेची आवश्यकता नसते. मग थोड्याच वेळात मुंग्यांच्या शरीरांनी बनलेला एक जाळीदार जनानखाना तयार होतो. त्यात मुंग्यांची राणी सुरक्षित राहते. हा जनानखाना कित्येक भिंतींचा किंवा थरांचा असतो. सकाळ होताच काही मुंग्या ह्या जाळीतून बाहेर पडतात. त्यामुळे आत हवा जाण्यास मार्ग तयार होतात. मग सांगा बरे! ह्या सर्व गोष्टी मुंग्यांची उच्च प्रकारची बुद्धिमत्ता दाखवीत नाहीत काय?

प्रो. ए. ला. फाऊर यांचा अनुभव फार गमतीदार आहे. एकदा ते सहलीला गेले होते. मुंग्या लागू नयेत म्हणून त्यांनी आपला डबा अशा ठिकाणी ठेवला की त्या ठिकाणी मुंग्या जाणार नाहीत. पण काय आश्चर्य पहा! त्या डब्यावर झाडाची फांदी आली होती त्या फांदीवर मुंग्या चढल्या. त्यातील एका पानावर त्या गेल्या मग त्या पानाचा देठ तुटला. आणि मुंग्यांचे पॅराशुट प्रोफेसरसाहेबांच्या टिफिनच्या डब्यावर उतरले! प्रोफेसरसाहेबांना वाटले जणू आपली डिग्री काढून घेतली आहे!

डॉ. ओ. स. बॅटी यांचा पण मुंग्यांनी एकदा पराभव केला. खाद्यपदार्थ मिळविण्यासाठी व जमविण्यासाठी मुंग्या प्राणावर पण उदार होतात. डॉक्टरसाहेबांनी एकदा आपल्या सहाध्यायी मित्राबरोबर पैज मारली की मी खाद्याचा एक साठा एक आठवडाभर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवीन. त्यांनी एक परात घेतली. त्यात काठोकाठ पाणी भरले. त्यात स्टुल ठेवले. नंतर त्यावर चॉकलेटने भरलेली बशी ठेवली. त्यांनी त्या परातीचा बाहेरचा भाग हळूहळू वाळणाऱ्या रंगाने रंगविला. उद्देश असा की त्या रंगाच्या चिकटपणाने मुंग्या त्याला चिकटतील व पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

एक आठवडाभर डॉक्टरसाहेब मोठे खुषीत होते. कारण त्यांना विश्वास होता आपण जिंकणार म्हणून! पण तो विश्वास वृथा निघाला. कारण बशीतील निम्म्यापेक्षा जास्त चॉकलेट मुंग्यांनी लांबविली होती! डॉक्टरसाहेब दिग्‌मूढ झाले! हे कसे घडले?

त्यांच्या पैजेची बातमी मुक्या मुंग्यांना कशी लागली कुणास ठाऊक! त्यांच्या सेनापतीने आपल्या सैन्याला हुकूम दिला. सैन्याची अनेक भागांत विभागणी झाली. एक तुकडी पुढे सरसावली व बेधडकपणे त्यांनी आपली शरीरे त्या चिकट रंगात फेकून दिली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे-

‘टाकतो उड्या आम्ही निखाऱ्यावरी

जा तुम्ही आम्हावरून पैल सत्वरी’

असे म्हणत जळत्या खंदकात उड्या मारल्या तितक्याच हिरीरीने असंख्य मुंग्या त्या चिकट रंगात पडल्या व मेल्या आणि त्यांच्या निर्जीव शरीराचा एक पूल तयार झाला! त्या पुलावरून काही मुंग्या पुढे गेल्या! पण पुढे आणखी एक संकट होते. कारण परातीत पाणी होते. पाणी म्हणजे मुंग्यांचा शत्रू नंबर एक. पण मुंग्यांच्या कल्पनेला किनारा नव्हता-मर्यादा नव्हती. लगेच प्रमुख कचेरीत निरोप गेला. आणि एक तुकडी गवताची पाती, कपड्यांचे तुकडे घेऊन परातीच्या काठवर उपस्थित झाली. त्या कामचलाऊ होड्या पाण्यात सोडण्यात आल्या! प्रत्येक होडीत अनेक मुंग्या होत्या व ते ‘आरमार’ स्टुलाच्या पायाला लागले! स्टूल उंच होते, पण मुंग्यांचा उत्साह त्यापेक्षाही उंच होता. त्यांना स्टुलाच्या पायावरून वर चढण्यास फार अवकाश लागला नाही. त्या चॉकलेटच्या बशीत पोहोचल्या. पण त्यांच्या यशाचा वाटा त्यांना मिळाला नाही. कारण मुंग्यांची एक तुकडी त्यांच्या अगोदरच तेथे पोहोचली होती. पण ही तुकडी तेथे एकदम आली कोठून?

त्यांच्या सेनापतीने एका तुकडीस भिंतीवरून बरोबर चॉकलेटच्या बशीवर उडी घेण्यास सांगितले होते! योजना मोठी धाडसी होती. पण त्यात कल्पनेचा कळस होता. ती तुकडी बशीच्या बरोबर वर जाऊन पोहोचताच, आढ्यापासून सर्व मुंग्यांनी पाळीपाळीने आपली शरीरे खाली झोकून दिली. त्यांची हलकी शरीरे हवेत तरंगत तरंगत बरोबर चॉकलेटच्या बशीत पडली! स्थळ, उंची, हवेचा प्रवाह याबद्दल त्यांनी केलेले गणित किती बरोबर होते! जे धाडस करतात त्यांना यशाचा वाटा मिळावा यात काय नवल! डॉक्टरसाहेब पैज हरले व आश्चर्य करीत बसले!

मुंग्यांची शक्ती फार मोठी आहे. त्या आपल्या शरीराच्या कित्येक पट मोठा पदार्थ उचलतात. मुंगीचे वजन १५० पौंड वजनाच्या माणसाबरोबर आहे अशी कल्पना केली तर एक मुंगी ३० टन वजन उचलू शकेल. मानवा! तुला तरी एवढी शक्ती आहे का? खरोखर मुंग्यांचा देह मोठा असता तर त्यांनी बुद्धीत व शक्तीत या गर्विष्ठ मानवाचा केव्हाच पराभव केला असता!

**********

लेखक - प्र.द. इनामदार

अधिकचा दुवा  
  1. मुंगी- एक अद्भभूत विश्व'  या प्रदीपकुमार माने  लिखित पुस्तकासाठी पद्मगंधा प्रकाशनाच्या    http://www.padmagandha.com/ वेबसाईटला अवश्य भेट द्या. 
  2. सजीवसृष्टीबद्दल रंजक माहिती सांगणारा पुनश्च संग्रहातील हा लेख अवश्य वाचा. वृक्षवल्लींचे 'लैंगिक' व्यवहार -  लेखिका - शरदिनी डहाणूकर 
Google Key Words -  An Ant's World, P.D. Inamdar.

ज्ञानरंजन , सृष्टी

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.