अनुशासन पर्व नव्हे, ते आंतक-पर्व आहे. निर्दय दमन-पर्व आहे.

आणीबाणी    संकलन    2018-06-16 06:00:11   

विचार कृतीत येण्यााधीची पायरी असते ती ते विचार लिखीत स्वरूपात कागदावर येण्याची. विचार कागदावर आले आणि लोकांपर्यत पोचले की त्यांना अधिक बळ आणि बळकटी येते. त्यामुळेच हुकुमशाही प्रवृत्तींना नेहमीच विचारांचे आणि शब्दांचे भय वाटत आले आहे. ज्यांच्या शब्दांत ताकद आहे अशांचा बंदोबस्त ते आधी करतात. आणिबाणीच्या विरोधातील प्रवाहांचे वैचारिक नेतृत्व करू शकणाऱ्या व्यक्ती आणि प्रकाशने यांच्या मुसक्या आवळण्याचे काम कठोरपणे झाले. त्याचे पडसाद अनेकांच्या पत्रव्यवहारांत उमटले. आणिबाणी विशेषांकाच्या लेखमालिकेत आज असेच तीन पत्रव्यवहार देत आहोत. विनोबा भावे यांनी आणिबाणीला 'अनुशासन पर्व' म्हटल्याने दादा धर्माधिकारी दुखावले आणि त्यांनी विनोबांना पत्र लिहून विरोध व्यक्त केला होता ते पत्र. 'साधना'च्या प्रकाशनावर गंडांतर आल्याने यदुनाथ थत्त्यांनी ते 'कर्तव्य' या नव्या नावाने प्रसिध्द करण्याची हुषारी दाखवली तेव्हा हरिभाऊ जोशींनी त्यांना लिहिलेले  पत्र.  मधु दंडवते यांनी तुरुंगातून पत्र म्हणून एकदा मंगेश पांडगावकरांची 'भिंत' ही कविताच लिहून पाठवली, ती कविता. त्या काळातील वैचारिक घुसमटीचे आणि घुसळणीचे चित्र या पत्रांमधून उभे राहते.

आणिबाणीतील पत्रे आणि पाडगावकर यांची कविता  

पत्र क्र. १

।।श्री।।

 दादा धर्माधिकारी

पू. बाबा, आज आपल्या स्वातंत्र्याचा एकोणतिसावा वाढदिवस, की पहिली पुण्यतिथी हे तुम्हालाच ठाऊक! पण पहिल्या भेटीपासून तुमचा जो माझ्यावर अढळ लोभ आहे, ते ईश्वरी वरदान आहे. त्यात तुमच्या प्रेमाच्या अमृतावर आतापर्यंत जगलो, म्हणून तुमच्याशी प्रतारणा करवत नाही. दिलखुलास तुम्हाला लिहितो. आजपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या वेळी प. पू. भाऊसाहेब (दादांचे काका) व पू. बापू ( गांधीजी), पुण्यश्लोक जमनालालजी व माझे पुण्यश्लोक वडील यांना लिहीत आलो आहे. तसे हे पत्र लिहीत आहे.

इंदिरा गांधी आणि विनोबा भावे इंदिराजींचे विषयी माझ्या मनात अढी नाही, पण त्या जे काम करीत आहेत त्याने मात्र प्राण व्याकुळ होतो. जिवाचा धडा करून त्यांच्या आव्हानाला तोंड द्यावे अशी तळमळ आहे. पण ही तगमग सहन करून संयमाचा तुमचा आदेश पाळण्याचे मी ठरवले आहे. तुमच्या प्रेमामृतामुळे मी परलोकातून परत आलो. पण आलो नसतो तर बरे झाले असते असे आता वाटू लागले आहे. ती सगळी तळमळ हलाहलाप्रमाणे गिळून तुमचा संयमाचा आदेश पाळण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे पंढरपूरला विठाई माउली आणि थेऊरला श्री विनायक यांच्या दर्शनाला जाणार आहे. त्याच्या आधी श्रद्धेय तातोबांच्या (बाळकोबाजी भावे) पायांजवळ काही दिवस राहणार आहे. तुमच्याशी प्रतारणा करणे शक्य नाही. म्हणून हे पत्र लिहीत आहे. इंदिराजींचे विषयी माझ्या मनात अढी नसल्याचे मी लिहिलेच आहे. तरीपण त्यांनी या देशाच्या लोकांच्या हक्कांची पायमल्ली केली हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही त्यांच्या आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हटले आहे, ते मिथ्या आहे, खोटे आहे. तुमच्या तोंडून चि. बापू साठेजवळ असे उद्‌गार कसे हो निघाले! बापू साठे माझ्या मुलांइतकाच मला प्रिय आहे. पण त्याचा मार्ग चुकला आहे. तो पथभ्रष्ट झाला याचे मला दु:ख आहे. इंदिराजींच्या आणीबाणीला तुम्ही ‘अनुशासन पर्व’ नाव दिलेत ते अयथार्थ आहे, बाबा! बाबा! बाबा! इंदिराजींची आणीबाणी ‘अनुशासन पर्व’ नव्हे, ते ‘आंतक पर्व’ आहे. ‘निर्दय दमन पर्व’ आहे. त्यातले अनुशासन दमन, दडपशाहीचे आहे. आत्महनन करून पंचमहापातकांपेक्षा मोठे पातक आहे. मी बरा झालो आहे. पण व्यर्थ झालो असे वाटू लागले आहे.

विनीत, दादा धर्माधिकारी १५ ऑगस्ट १९७५

********

पत्र क्र. २

।।श्री।।

हरिभाऊ जोशी

२५/३५५, लोकमान्यनगर

पुणे ३०

श्री. यदुनाथ थत्ते, संपादक साधना, यांसी सप्रेम नमस्कार, ‘साधना’ प्रकाशनास शासनाने बंदी केली असल्याचे वृत्त, ‘कर्तव्य’मधील तुमच्या निवेदनावरून अधिकृतपणे आज कळले. इतक्या उच्च पातळीवरून समाजशिक्षणाचे कार्य करणारे माध्यम अशा रीतीने दडपले जाणे म्हणजे समाजाला प्रकाश पोचू न देण्याइतके अविवेकाचे ठरेल. साधनेच्या प्रारंभापासून मी तिचा वाचक आहे. मुख्यत: आणीबाणीच्या गेल्या वर्षातील तुमचे बहुतेक अंक मी आस्थेने वाचलेले आहेत. वृत्तनियंत्रणाचा इतका जाच असताना तुम्ही निर्भयपणे केलेल्या राजकीय प्रचाराला सद्य:स्थितीत तोड सापडणे कठीण. ‘भूमिपूत्र’ व श्री. गोरवाला यांचे पत्र, या पत्रांनीही असाच धैर्याचा लढा दिलेला आहे. १८९६-९७ व १९०७-८ या कालात लोकमान्यांनी ‘केसरी व्दारा केलेल्या देशसेवेच्या तोडीची तुमची ही सेवा आहे, असे कृतज्ञतेचे उद्‌गार महाराष्ट्रभर निघतील.

मध्यभागी यदुनाथ थत्ते आणि उजवीकडे कविवर्य वसंत  बापट गेल्या वर्षातील तुमच्या लेखनामध्ये देशहितविघातक किंवा समाजकल्याणास बाधक असे कधी आले आहे असे वाटत नाही. सध्याच्या विचित्र राजकीय परिस्थितीत कायद्याच्या कक्षेत राहून जरूर तो राजकीय प्रचार करण्याचे अलोट धैर्य व चातुर्य तुम्ही दाखवले आहे. समाजपरिवर्तनाच्या सर्व कार्यक्रमांचा पोटतिडकीने तुम्ही पाठपुरावा केलेला आहे. शांततेच्या मार्गाचाच सतत पुरस्कार केलात; तुमच्या लेखनातून कायद्याचे कोठे उल्लंघन झालेले असेल, असे वाटले नाही. असे वाटत असल्याने, साधनेविरुद्ध न्यायालयीन इलाज करण्याऐवजी, शासकीय आदेशाने तो बंद केली जावी, ही अयोग्य अशी बाब आहे. या अन्याय्य निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशीच इच्छा सर्व समंजस नागरिकांची व विचारवंतांची असणार. गेल्या वर्षात साधनेने केलेल्या कर्तव्यनिष्ठ व निर्भय राजकीय प्रचाराबद्दल सारा मराठी वाचकवर्ग व नागरिक-स्वातंत्र्याची कदर असलेले सहस्त्रावधी राजकीय कार्यकर्ते निरंतर कृतज्ञ राहातील. तुमच्या या राजकीय लढ्यातील तुमच्या साऱ्या सहकाऱ्यांना व सहायकांना माझे हार्दिक प्रणाम कळावे. हरिभाऊ जोशी दि. १४ जुलै १९७६

********

भिंत (मधु दंडवते यांनी पत्रात लिहिलेली कविता)

भिंत माझ्या भोवती भिंत तुझ्या भोवती भिंतामि भिंतव: भिंताम: भिंती भिंती सर्व गडे इकडे तिकडे चोहिकडे १

भिंत भीतीची भीति भिंतीची, भिंतीला कान असतात म्हणून प्रत्येक भिंतीला भीति प्रत्येक भिंतीची लहान लहान भिंतीची २

एक प्रचंड भिंत अदृश्य कोंडणारी भिंतीसमोर उभे रहा जीभ कापून उभे रहा कानात बोळे उभे रहा, डोळे बंद उभे रहा, खाली बसा, उभे रहा कान धरा, उभे रहा, ३

कोणीतरी हरवला कोण बरे? कळलेच नाही तिघांचे डोळे गेले कोणाचे कळलेच नाही! एकसाथ आवाज द्या ‘सर्व भिंती सर्वांच्या कल्याणासाठी’ ४

एकाने आवाज दिला नाही तो दिसेनासा झाला कोण बरे कळलेच नाही! भिंतीची सवय होईल सवयीची भिंत होईल भिंतीला शिस्त हवी शिस्तीला भिंत हवी ५

एक दोन तीन चार भिंतवाल्यांची डोकी हुषार जय बोला हो जय बोला जय बोला हो जय बोला   -

मंगेश पाडगावकर  

आणीबाणीतील पत्रे -भाग २;  संपादक- अरुण लिमये  


राजकारण , साधना , आणीबाणी , दादा धर्माधिकारी , मंगेश पाडगावकर , मधु दंडवते , यदुनाथ थत्ते

प्रतिक्रिया

  1. Sachinkachure

      6 वर्षांपूर्वी

    मौन म्हणजे काय???? गप्प बसणे?? इकडे अर्थाचे अनर्थ होतात आणि आपण मात्र मौन पळायचं? कसला मूर्खपणा आहे हा?? बाकी 'अनुशासन पर्व' या गोंडस नावाने विनोबांना काँग्रेसने 'भारतरत्न' बहाल केले यात तिळमात्र संशय नाही.

  2. rajendrakadu

      6 वर्षांपूर्वी

    देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या पत्रकार, विचारवंत, लेखकांच्या हत्या केल्या जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. बेरोजगारीत बेसुमार वाढ होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलणा यांना देशद्रोही ठरवले जात आहे. कोणी काय खायचे, कोणते कपडे घालायचे यावर नियंत्रणे आणली जात आहेत, ही अघोषित आणीबाणीच.

  3. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    आदित्यजी.. फार छान ...

  4. subkem

      6 वर्षांपूर्वी

    इंदिरा गांधींनी आणीबाणी व अनुशासनपर्व जाहीर करून देशाची एकात्मकता जपली आणि सार्वभौमत्व राखले. पण, याच आणीबाणीच्या काळात नोकरशाही आणि पोलीस यांचे अतिरेक वाढले. अनेक कार्यकत्र्याना तुरुंगात डांबले गेले. मीडियावर सेन्सॉरशिप लादली गेली आणि एक प्रकारची एकाधिकारशाही आली. 1977 च्या निवडणुकीत लोकांनी त्या एकाधिकारशाहीचा पराभव केला. -कुमार केतकर आणीबाणी स्मरणातली आणि विस्मरणातली! लोकमत, २१ जून २०१५ http://www.lokmat.com/manthan/emergency-remembered-and-forgotten/

  5. adityabapat

      6 वर्षांपूर्वी

    विनोबा भावे आणि 'अनुशासन पर्व' : सत्य आणि विपर्यास दिनांक २५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. तत्पूर्वी सहा महिने आधीच, म्हणजे २५ जानेवारी १९७५ पासून विनोबांनी "तुका म्हणे वाचा वाहिली अनंता | बोलायचे आता काम नाही" || म्हणत 'मौन' स्वीकारलं होतं. तेंव्हापासून त्यांचा सर्व संवाद फक्त लेखी स्वरूपात आणि तोही अगदी मोजक्या - थोडक्या शब्दांत होत होता. अशात आणीबाणीच्या घोषणेनंतर अकरा दिवसांनीच - म्हणजे दिनांक ६ जुलै १९७५ या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास अनपेक्षितपणे कॉंग्रेसनेते वसंतराव साठे त्यांची कन्या सुनीतीसह विनोबांना भेटायला पवनार आश्रमात आले. 'विनोबा कुटी'त प्रवेश केल्यावर खुणेनेच विनोबांनी "कसं येणं केलंत?' असा प्रश्न साठेंना केला. "ह्या नव्या पर्वानंतर मुद्दाम आपल्याला भेटायला आलो आहे" असं साठे यांनी एका कागदावर लिहून विनोबांकडे तो कागद सोपवला. त्यांच्या वाक्यातील "ह्या नव्या पर्वानंतर" शब्दांना अधोरेखित करून विनोबांनी त्यापुढे "अनुशासन पर्व ?" (प्रश्नचिन्ह महत्त्वाचं) असे प्रश्नार्थक उद्गार लिहिले. त्या दिवसांत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भाषणात 'अनुशासन' शब्द वारंवार येत असे. इंग्रजी वृत्तपत्रांमाध्येही 'डिसिप्लीन' शब्द असायचाच. तोच धागा पकडून साठे यांच्या "ह्या नव्या पर्वानंतर" या शब्दांना प्रश्न म्हणून "कोणते नवे पर्व?... अनुशासन पर्व?" असा सहज संवाद विनोबा, भेटायला आलेल्या साठेंबरोबर करू इच्छित होते हे लक्षात येतं. 'अनुशासन पर्व' च्या पुढे पूर्णविराम नव्हता, तर प्रश्नचिन्ह होतं. कोणालाही सहज प्रश्न पडेल कि 'अनुशासन पर्व' पुढे प्रश्नचिन्ह का ? जर विनोबांनी तिथे प्रश्नचिन्ह वापरलंच नसतं तर असं वाटणं अगदी स्वाभाविक होतं कि ते आणीबाणीला जणू एक प्रतिशब्दच वापरत आहेत. आणीबाणीचं अप्रत्यक्ष समर्थन करत आहेत. पण विनोबांना तसं काही सुचवायचं नव्हतं. त्याच म्हणजे ६ जुलैच्या रात्री रेडीओ वरच्या बातम्यांत वसंतराव साठ्यांचं विधान प्रसारित करण्यात आलं, ज्याचा आशय असा होता कि, विनोबांनी आणीबाणीला 'अनुशासन पर्व' म्हंटलं आहे. झालं; एका रात्रीत देशभर खळबळ माजली. समाजवादी आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांकडून तर तीव्र प्रतिक्रिया आल्या. विनोबांविषयी गैरसमज वाढत गेले, त्यांच्यावर तीव्र टिका आणि दोषारोप होऊ लागले. त्यांची प्रचंड निंदा करण्यात येऊ लागली... आता याला काय म्हणावं?, विनोबांना विचारायचा होता प्रश्न आणि बातम्यांतून सांगण्यात आलं होतं कि त्यांनी आणीबाणीचं वर्णनच जणू 'अनुशासन पर्व' अशा शब्दांत करून एक प्रकारे आणीबाणीचं समर्थन केलंय. स्वतः विनोबा आणि त्यांचे आश्रमातील सहकारी या सर्व घटनेचे नुसते मूकदर्शक झाले. विनोबांनी सहकाऱ्यांना सूचना केली, "इसे कोल्ड स्टोरेज में रखो" अर्थात कोणीही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नये. त्यामुळे त्या सुचनेचं होईल तेव्हढं पालन करण्याचं बंधन सर्वांवरच होतं. पुढे काहीच दिवसांत; दिनांक १८ जुलैला कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते, पक्षाचे माजी कोषाध्यक्ष नि गुजरात राज्याचे माजी राज्यपाल श्रीमन्नारायणजी विनोबांना भेटायला पवनार आश्रमात आले. वसंतराव साठे नि विनोबा यांच्यातल्या लेखी संवादाचा तपशील त्यांनी आश्रमातल्या साधकांकडून जाणून घेतला आणि विनोबा अजूनही मौनातच असल्याने केवळ तीन प्रश्न एका कागदावर लिहून ते विनोबांपुढे ठेवले. पहिला प्रश्न होता, "साठे यांनी तुमच्या बरोबरचा संवाद माध्यमांत प्रकाशित करण्याची अनुमती तुमच्याकडून घेतली होती का ?" विनोबांनी "मौनं" असं लिहून पुढे नकार दर्शवणारी 'X' काढली. त्यांचा दुसरा प्रश्न होता, "जे घडलं त्याचं रेडीओ वरील वार्तांकन योग्य होतं का ?" यावरही विनोबा 'X' अर्थात नाही असं उत्तरले. आणि तिसरा प्रश्न, "वार्तांकन जर अयोग्य होतं तर त्याचं खंडन करावं का ?" त्यावरही विनोबा 'X' इतकंच लिहिते झाले. या सर्व घटना आणि संवादांमधून विनोबांच्या भूमिकेविषयी पुरेशी स्पष्टता येते. आजही विनोबा म्हंटलं कि अनेकांना त्या घटनेचा कोणताही आगा पिछा माहित नसताना केवळ त्यांचे 'अनुशासन पर्व' हे कथित (खरंतर अकथित !) उद्गारच आठवतात आणि अज्ञानातून आजही टिका टिपणी चालू राहते. मग सहजच विनोबांचीचं त्यांच्या एका पुस्तकातली वाक्य आठवतात, "माझ्यावर जर कुणी जास्तीत जास्त उपकार केले असतील तर ते म्हणजे माझ्या निंदकांनी, माझे दोष वारंवार सांगणाऱ्यांनी. म्हणून मी एक नियम ठरवून टाकला आहे कि कोणी माझ्यावर व्यक्तिगत टिका वा निंदा करत असेल तर मी त्याला कधीही उत्तर देणार नाही. कारण मला यातंच त्यांच्या (म्हणजे टिकाकारांच्या) माझ्यावरील उपकाराची जाणीव होते. त्यांचं असंही एक विधान आहे कि, अहिंसे मध्ये एक्सप्लोईटेशन (स्वार्थ साधून घ्यायला) पुष्कळ संधी असते आणि एक्सप्लोईटेशन करणं हा तर राजकारण्यांचा धंदाच आहे. - आदित्य बापट संदर्भ : १) 'विनोबा : अंतिम पर्व' - कुसुम देशपांडे, परंधाम प्रकाशन, पवनार आश्रम, वर्धा २) आचार्य विनोबा भावे (चरित्र) - डॉ. पराग चोळकर, माजी संपादक - परंधाम प्रकाशन, पवनार आश्रम, वर्धा

  6. kedar_joshirn

      6 वर्षांपूर्वी

    Too good



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen