भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ३


सारसबाग

***

काल शार्दूलला भेटून आल्यावर ओवी अतिशय अस्वस्थ होती. शार्दूलच्या घरी जायचं या कल्पनेने तिला घाम फुटला होता. खरंतर त्यात इतकं घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. शार्दूलची आई आणि ओवी यांच्यात मैत्रिणीसारखं नातं होतं. अनेकदा त्या दोघी कुठे कुठे शॉपिंगला जात असत. ओवीची चॉईस शार्दूलच्या आईला फार आवडायची. त्याच पोरीने आपल्या पोराला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे याचीही शार्दूलच्या आईला कल्पना होती. पण पोरं हवेत जाऊ नये म्हणून ती आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दाखवायची नाही.

ओवी घरी आली तेव्हा घरात थोडेफार पाहुणे होते. ऋषीपंचमीची ऋषीची भाजी तिला फार आवडायची. पण आज तिला ती जास्त रुचली नाही. तिने ती कशीतरी पोटात ढकलली आणि आपल्या खोलीत गेली. खोलीचे लाईट बंद केले आणि नुसती पडून राहिली. दुरून 'गणराज रंगी नाचतो' चे पुसटशे स्वर तिला ऐकू येत होते. यावर्षीच्या गणपतीत इतकं काही घडत होतं. पण ओवी आणि शार्दूलच्या पहिल्या भेटीलाही गणपतीच जबाबदार होता.

आठवीपर्यंत साताऱ्याला शिकलेला शार्दूल नववीत पुण्याला आला होता. त्याच्या वडिलांना एका आयटी कंपनीत नोकरी मिळाली होती. शार्दूल लहानपणापासून हुशार होताच पण अतिशय संवेदनशील मनाचा होता. त्याच्या वागण्यात ते अजिबात दिसत नसलं तरीही आयुष्यात पुढे काय करायचं याची त्याला स्पष्ट माहिती आणि जाणीव होती.

ओवी ही अगदी पुणेकर मुलगी होती. प्रभात रोडला घर, वडिलांचा मोठा उद्योग, अभिनव शाळेत पहिलीपासून शिक्षण, कथ्थकची आवड, सवाई गंधर्वला नियमित हजेरी अशा गोष्टी तिने लहानपणापासून केल्या होत्या. दहावीनंतर तिने फर्ग्युसनमध्ये प्रवेश घेतला. बारावीनंतर तिने समाजशास्त्रात बीए केलं होतं. तिला लिहायचीही खूप आवड होती. माहेर, मेनका मासिकात तिच्या कथा येत असत. शार्दूल नववीत आला तेव्हा पहिल्या भेटीत तो तिच्यात नजरेत भरला.

पण मुलांशी स्वत:हून बोलायला ओवी कधीच तयार नसायची. शार्दूलला ती दिसली तेव्हा त्या वयात शरीरात चमकत असलेल्या विजांचा हा परिणाम असावा असं त्याला वाटलं. मात्र तिच्यात काहीतरी वेगळं आहे हे त्याला कळलं होतं. एकदा शार्दूल सारसबागेत गेला होता. मित्रांबरोबर असाच फिरत असताना त्याला ओवी दिसली. एकटीच सारसबागेत फिरत होती. आपल्याच धुंदीत फिरत असलेल्या ओवीला पाहून तिच्याशी बोलायची ही नामी संधी आहे हे त्याला कळलं.

ती गणपतीचं दर्शन घ्यायला निघाली तेव्हा हाही तिच्या मागे निघाला. तिच्या बरोबर प्रदक्षिणाही घातल्या. अगदी 'जोशी-शिरोडकर' सारखा सीन होतोय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो स्वत:शीच हसला. शेवटी चपल्यांच्या स्टँडपाशी शार्दूलने ओवीला गाठलंच.

“मटकी भेळ खाणार का?” शार्दूलने विचारलं.

“एक्सक्युज मी?” ओवी दचकली.

“अगं मला ओळखलं नाही शार्दूल इनामदार. आपण एकाच वर्गात आहोत.”

“हो. ते माहिती आहे. पण ही काही विचारायची पद्धत आहे का आणि तू इथे काय करतोय?”

“मी दर चतुर्थीला इथे येतो. दर्शन घेतो, मटकी भेळ खातो आणि घरी जातो. आज तू दिसली म्हणून तुला विचारतोय.” ओवी काहीच बोलली नाही.

“अगं पैसे मी देतो वाटलं तर..”

“एक मिनिटं माझ्या बाबांची फॅक्टरी आहे कळलं ना पैसे देतो म्हणे.”

“अगं पण आत्ता पैसे नसतील तर पैसे घ्यायला काय फॅक्टरीत जाणार आहेस का?”

“आहेत पैसे.”

“मग चल की. वाटलं तर तू माझेही पैसे दे.”

“तू जरा जास्तच अगाऊ आहे असं नाही वाटत का?”

“आहे तसा. जरा जास्तच झालं नाही? बरं येतेस का? चल ना मजा येईल. शाळेत आपण कुठे बोलतो तसंही.”

“तू कोणाला सांगणार नाहीस ना?”

“घरी सांगितलंय. कारण कुकर लावायच्या आधी घरी संध्याकाळी जेवणार की नाही हे सांगायचं असतं.”

या वाक्यावर ओवी जोरात हसली आणि विरघळलीही. नंतर दोघांमध्ये किमान दोन माणसाचं अंतर ठेवून दोघांनी भेळ खाल्ली. मध्ये तिला मिर्ची लागली आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिचा चेहरा लालबुंद झाला. काही मुली कधीही गोड कशा दिसू शकतात हे कोडं इयत्ता नववीतल्या शार्दूलला पडलं. त्याने लगेच बॅगमधून पाण्याची बाटली काढली.

“उष्टी असेल ना?” ओवी हाशहुश करत म्हणाली.

“अगं तुला इतकं तिखट लागतंय आणि उष्ट्या पाष्ट्याचं काय घेऊन बसली आहेस? हे घे पी.” शार्दूल गुरकावला.

ओवी गटागटा पाणी प्यायली; मैत्रीच्या नात्याचं उष्टावण झालं होतं.

(क्रमशः)

**********

लेखक - रोहन नामजोशी   


समाजकारण , कथा , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

  1. Santkabir

      6 वर्षांपूर्वी

    हा लेख नसुन ही एक प्रेमकथा आहे. कथा पूर्ण झाल्यानंतर अभिप्राय नोंदविणे योग्य ठरेल.

  2. rambhide

      6 वर्षांपूर्वी

    आयटी कंपनीत नोकरी व सारसबागेजवळ मटकी भेळ म्हणजे १९९० चा सुमार. तेव्हाची नववीतली प्रभातरोडला राहणारी कारखानदाराची मुलगी पुढे समाजशास्त्रात बीए होते व माहेर मेनकात कथा लिहिते येवढे सोडले तर बाकी भट्टी जमलीये.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen