असं म्हटलं जातं की लोकांच्या हृदयापर्यंतचा प्रवास पोटातून सुरु होतो. म्हणजे ज्याचे मन आपल्याला जिंकायचे आहे त्याला चांगले, त्यांच्या पसंतीचे पदार्थ बनवून खायला घाला. उच्चपदस्थ, राष्ट्राध्यक्ष यांच्यात चाललेलीdinner diplomacyहेच तर दर्शवते. पूर्वी नवविवाहितेला सांगण्यात यायचे की बाई ग नवऱ्याला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो.
पण माझा स्वतःचा प्रवास मात्र हृदयापासून सुरू होऊन पोटाकडे गेला. म्हणजे त्याचं असं झालं की मी माझं शिक्षण संपताच डॉक्टर माधव साने , माझा भाऊ अतुल भिडे आणि वहिनी डॉक्टर मधुरा भिडे या तिघांच्याबरोबर वैद्य साने आयुर्वेद लॅब ही कंपनी सुरू केली होती. कालांतराने डॉक्टर रोहीत साने आम्हाला सामिल झाला आणि मग त्याच्याबरोबर 'माधवबाग' ही हृदयावर आयुर्वेदीक पद्धतीने विना-शस्त्रक्रिया उपचार करणारी १२० क्लिनिक आणि २ हॉस्पिटल्सची चेन आम्ही विकसित केली. आजही लाखो हृदयरोग्यांवर त्या माध्यमातून उपचार केले जातात. अगदी अलिकडे म्हणजे २०१५ च्या जानेवारीत मी शेफ सनी पावसकर बरोबर 'मेतकूट' हे मराठी पदार्थाचे रेस्टॉरंट सुरु केलं. म्हणून म्हटलं की माझा प्रवास हृदयाकडून पोटाकडे झालाय.
असो, माझं शिक्षण इंजिनिअरिंगचं. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेलच की मला हृदयविकारात जसं ओ की ठो कळत नव्हतं तोच प्रकार रेस्टॉरंटच्या बाबतीत. पण म्हणतात ना पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतो. तसा मी ही शिकलो. पण त्या आधी नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरण्याचे प्रसंग याही प्रवासात आले. पण पोहायला शिकलेला माणूस जसं त्याकडे गम्मत म्हणून बघतो तशीच गम्मत मला आमचे सुरुवातीचे दिवस आठवले की वाटते. इतके दिवस 'गिऱ्हाईक' म्हणून हॉटेलकडे पाहणाऱ्या मला अचानक हॉटेलच्या आतल्या जगाचा साक्षात्कार झाला. कृष्णाचे जगावेगळे रूप पाहून अर्जुनाची भावावस्था काय झाली माहित नाही पण मी मात्र हॉटेलचे हे 'अंतरंग' पाहून बावचळलो, गुदमरलो. गिऱ्हाईक म्हणून हॉटेलवाल्यांना विविध प्रसंगी घातलेल्या शिव्या आठवल्या. हॉटेलवाल्यांच्या नजरेने ते सगळे प्रसंग अनुभवले. टिका करणं आणि प्रत्यक्ष त्यावर काम करणं यातला जमीन आसमानाचा फरक जाणवला. आणि मग मी सगळ्या उडप्याना, पंजाब्याना मनोमन हात जोडले. सगळ्या काणे, तांबे, टेंबे, लिमये, सरजोशी, जोगळेकर, पणशीकरांना दंडवत घातला.
मंडळी, येत्या काही लेखांमधे हेच माझे काही अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहे. हॉटेलचे 'अंतरंग' तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. कदाचित तुमचीही नजर बदलेल हॉटेलवाल्यांकडे बघण्याची कारण तोपर्यंत माझ्यासारखे तुम्हीही म्हणायला लागले असाल ''हॉटेल चालवणे म्हणजे खायचे काम नाही''.
नवीन सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
सभासद होण्यासाठी
सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
Install on your iPhone : tap and then add to homescreen
Install on your iPad : tap and then add to homescreen