रेस्टॉरन्ट मधील सेल्समन अर्थात वेटर्स


असं म्हणतात की तुम्ही रेस्टॉरन्टमधील वेटर्सशी जसे वागता, बोलता त्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व, संस्कार, संस्कृती दिसून येते. असेलही कदाचित. पण मला यात थोडा बदल करून म्हणावसं वाटतं की हॉटेलमधले वेटर्स गिर्‍हाइकांशी जसे वागतात त्यावरून हॉटेल मालकाचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती दिसून येते. हे लेखन मी ज्या डायरीत करतो आहे तिच्या प्रत्येक पानावर विविध मान्यवर, विचारवंतांचे एकेक विचार किंवा सुभाषिते छापली आहेत. योगायोग म्हणजे आज मी ज्या पानावर लिहितो आहे त्यावर छापलं आहे, ‘ The way you treat your employees determines the way they will treat your customers - John Moore ’                    

आता तुम्ही मनातल्या मनात उजळणी करायला लागा, तुम्हाला कुठल्या रेस्टॉरन्टमध्ये कसा कसा अनुभव आला आहे ते. बर्‍याच वेळा गल्ल्यावर बसलेल्या मालकाला रेस्टॉरन्टमध्ये कोण येतंय, कोण जातंय याचं काही देणंघेणं नसतं. तो ढिम्मपणे पेपर वाचत बसलेला असतो. पण वेटर्स मात्र चुटचुटीतपणे गिर्‍हाइकाला सेवा (सर्व्हिस) देण्यात मग्न असतात. काही ठिकाणी वेटर्समध्ये ‘समोरचा काही का खाईना...’ असा भाव दिसून येतो तर मालक मात्र एकदम दक्ष व अगत्यशील (अटेन्टिव्ह) असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती ! असो.                      सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मी बहुतेकदा ज्या हॉटेलांमध्ये जायचो तिथे टेबल पुसणे, ऑर्डर घेणे आणि पदार्थ वाढणे यासाठी एकच माणूस असे. मेतकूट सुरू करेपर्यंत मला हे माहीतच नव्हतं की ही तीन कामं वेगवेगळ्या तीन माणसांनी करायची असतात. मागच्या एका लेखामध्ये मी एपीसी या विषयी लिहिले होते. एपीसी म्हणजे अ‍ॅव्हरेज पर कस्टमर. अर्थात प्रती माणशी येणारे सरासरी बिल. ज्या हॉटेलांचा एपीसी 500 रुपयांहून अधिक असतो. तिथे साधारणपणे तुम्हाला ही तीन कामं तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेली दिसतील. त्याहून कमी एपीसी असणार्‍या हॉटेलांमध्ये, खर्च कमी करण्यासाठी वेटर्सनाच ऑर्डर घेणे व पदार्थ आणून वाढणे ही जबाबदारी सांभाळायची असते. टेबल स्वच्छ करण्यासाठी एक पोर्‍या असतो. हॉटेलच्या एचआर उतरंडीत सगळ्यात खालच्या पायरीवर असलेले काम करणारी व्यक्ती म्हणजे टेबल पुसणारा पोर्‍या. तोच टेबलची झाडलोट, काचा पुसणे वगैरे कामंही करतो. खरं तर त्याच्याशिवाय हॉटेल इतकं ओंगळ दिसेल, पण मान असतो तो मात्र गिर्‍हाइकाची ऑर्डर घेणार्‍या कॅप्टनला. (कॅप्टन बोटीवर असतो, सैन्यात असतो तसा हॉटेलमध्येही असतो. पण बोटीवर कॅप्टन सर्वोच्च स्थानावर असतो. सैन्यातील कॅप्टन एका तुकडीचा प्रमुख असतो. हॉटेलमधील कॅप्टन या पदावरील वेटर अनुभवी आणि गिर्‍हाइकांना चांगली सेवा देणारा असतो.) हा मान, तो मिळवत असलेल्या ‘बिझनेस’ वा धंद्यामुळे असतो. सर्वच व्यवसायांप्रमाणे येथेही विक्री (सेलिंग) करणारेच जास्त भाव खातात.                      

खरंतर आपल्या समाजात वेटर या नोकरीला सामाजिक प्रतिष्ठा नाही. एकीकडे आपण ऐकतो, वाचतो आणि प्रसंगी कौतुकही करतो की अमेरिकेत शिकणारी कितीतरी मुलं फावल्या वेळात (पार्ट टाईम) रेस्टॉरन्टमध्ये वेटरचे काम करतात. कारण त्या देशात श्रमाला प्रतिष्ठा आहे जी दुदैवाने आपल्या देशात फारशी नाही. हॉटेल व्यावसायिकांमध्येही या वेटरमंडळींबद्दल एक सार्वत्रिक तक्रार आढळते ती म्हणजे हे लोक एका नोकरीत फार टिकत नाहीत. सारख्या नोकर्‍या बदलतात. या अनुभवातून माझीही सुटका झाली नाही. पहिल्यांदा मेतकूटमधील वेटर्स टिकावेत म्हणून आम्ही काय काय प्रयत्न करायचो. पण नंतर आम्ही हे सत्य स्वीकारलं की जशा आपल्या शरीरातील पेशी ठरावीक काळानंतर नियमितपणे बदलतात आणि आपण ते सामान्य स्थिती म्हणून स्वीकारतो (किंबहुना जर पेशी बदलण्याची क्रिया मंदावली की म्हातारपण येऊ लागतं.) तसेच हे वेटर्सही बदलत राहणंही सामान्यच आहे. जर त्यांच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर त्यांचं वागणं समजू शकतं. हेच बघा ना, कोणी लहानपणापासून अशी महत्त्वाकांक्षा मनात धरून मोठं होत नाही की मला मोठं झाल्यावर वेटर व्हायचं आहे. वेटर होण हे त्या त्या व्यक्तीसाठी एक अपरिहार्य तडजोड असते. त्यामुळे स्वतःच्याच कामावर नाराज असणारा किंवा किमान खूष नसणारा हा माणूस नोकरीत स्थिर कसा होणार? कामाच्या विचित्र वेळा, सतत उभं राहण्याचं व धावपळीचं काम, स्वतःचे सर्व मानसिक व शारीरिक त्रास विसरून सतत ग्राहकांशी चोख तत्परतेने वागावे लागणे, पदार्थ वाढताना ग्राहकाच्या अंगावर सांडणार नाही याची दक्षता घेत पानात नेटकेपणानं वाढणं... ही  सर्व कामं मुळीच सोपी नाहीत हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगू शकतो. या शिवाय पगार कमी असणं, तो वेळेत न मिळणं, ज्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर रहायचे त्या ग्राहकांकडून हेटाळणी किंवा तुच्छतापूर्वक वागणूक मिळणं या गोष्टींनीही बहुतांश वेटर लोकं नक्कीच गांजलेले असतात. काही काही हॉटेलांमध्येतर मालकाच्या शिव्या (कधी कधी मारसुद्धा) खायला लागणं ही त्या कामाची एक नकारात्मक बाजू आहे. यामुळे बर्‍याचशा वेटर्समध्ये ग्राहकांनी दिलेली बक्षिसी (टिप) स्वतःच्याच खिशात घालणं (सर्वसाधारणपणे दिवसभर जमलेले बक्षिशीचे पैसे एकत्र जमा करून ते सर्व वेटर्समध्ये वाटून घेण्याची पद्धत असते.) बक्षिसी देणार्‍या ठरावीक गिर्‍हाइकांना चांगली सेवा देणं असल्या अपप्रवृत्ती वाढीला लागतात. कमी शिकल्याने बरेचजण ही नोकरी पत्करतात. ‘रहायला आणि खायला फुकट. पगाराव्यतिरिक्त बक्षिसीची वाढीव कमाई’ हे चित्र दुरून पाहताना आकर्षक वाटले तरी कामाला सुरुवात केल्यावर वास्तव बोचरे असल्याचे त्यांना जाणवते. घरापासून लांब रहावं लागतं. पैसे वाचवण्यासाठी मालक एका खोलीच खूप जणांना भरण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय ही मंडळी बर्‍याचदा असंघटित असतात. शिक्षणाचीही बाजू लंगडी असते. त्यामुळे मालकाविरुद्ध किंवा अन्यायाविषयी आवाज उठवू शकत नाहीत. याला जोडून व्यसनाधीनताही हळूहळू शिरकाव करते. मी अनेक वेटर्समध्ये दारूचं व्यसन असल्याचं बघितलं आहे. कामातील कष्ट, अपमान काही वेळ विसरण्यासाठी सुरू झालेली ही दारू नंतर त्यांचा घात करते. त्यांना गैरकृत्यांनाही भाग पाडते.                         ही काळवंडलेली बाजू असली तरी या बिकट परिस्थितीशी लढूनही उभे राहणारे खूप जण असतात. गावापासून लांब येऊन राहतात. कष्ट करून मिळालेले पैसे साठवून आईवडिलांना पाठवतात. भावंडांच्या शिक्षणाचा खर्च करतात. एखादा वेटर एकदोन वर्षं टिकला की त्याची कुवत बघून त्याच्यावर जबाबदारी वाढवली जाते. सुरुवातीला कॅप्टन मग काही वर्षांनी मॅनेजर अशी प्रगती होते. मग या लोकांचं आयुष्य खर्‍या अर्थाने मार्गाला लागतं. कित्येक हॉटेल्समध्ये वेटर्सनी मालकाचा एवढा विश्‍वास संपादन केलेला असतो की हॉटेल त्यांच्यावर टाकून मालक दुसरी कामं करायला मोकळे होतात. पदार्थ तयार व्हायला वेळ लागला, दिलेला पदार्थ ग्राहकाच्या पसंतीस उतरला नाही, ऑर्डरच चुकीची ऐकली गेली, पदार्थ येण्याचा क्रम चुकला (म्हणजे मेन कोर्स आधी व स्टार्टर्स नंतर), ग्राहकाने मागितलेला पदार्थ उपलब्ध नसला, वाढताना किंवा नंतर ग्राहकांकडून सांडासांड झाली, लहान मुलांची मस्ती व गडबड या सगळ्या गोंधळात हॉटेलची प्रतिष्ठा व ग्राहकाचा आत्मसन्मान (इगो) हे दोन्ही सांभाळताना स्वतःचा संयम न ढळू देणं हे खरोखरच योगी माणसाचं काम आहे. दिवसातील कामाच्या पहिल्या क्षणापासून काम संपेपर्यंत हे योग्यपणे करणार्‍या या वेटर्स नामक कर्मचार्‍याला माझा ग्रॅन्ड सॅल्युट !                          अशी आहे चकचकीत दुनियेतल्या कडक गणवेशातील वेटर्सची कहाणी. ही प्रत्येक कहाणी सुफळ संपूर्ण होवो ही मनोमन इच्छा !



अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    फारच कठिण जॅाब आहे हा. टिप कंपलसरी सर्वांनी वाटूनच घेतली पाहिजे. मालक व मॅनेजर यांचेकडून वेटर ला योग्य treatment मिळणे आवश्यक.

  2. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    फारच कठिण जॅाब आहे हा. टिप कंपलसरी सर्वांनी वाटूनच घेतली पाहिजे. मालक व मॅनेजर यांचेकडून वेटर ला योग्य treatment मिळणे आवश्यक.

  3. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    फारच कठिण जॅाब आहे हा. टिप कंपलसरी सर्वांनी वाटूनच घेतली पाहिजे. मालक व मॅनेजर यांचेकडून वेटर ला योग्य treatment मिळणे आवश्यक.

  4. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    फारच कठिण जॅाब आहे हा. टिप कंपलसरी सर्वांनी वाटूनच घेतली पाहिजे. मालक व मॅनेजर यांचेकडून वेटर ला योग्य treatment मिळणे आवश्यक.

  5. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    फारच कठिण जॅाब आहे हा. टिप कंपलसरी सर्वांनी वाटूनच घेतली पाहिजे. मालक व मॅनेजर यांचेकडून वेटर ला योग्य treatment मिळणे आवश्यक.

  6. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    फारच कठिण जॅाब आहे हा. टिप कंपलसरी सर्वांनी वाटूनच घेतली पाहिजे. मालक व मॅनेजर यांचेकडून वेटर ला योग्य treatment मिळणे आवश्यक.

  7. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    आता इथून पुढे कधीही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरशी आदरयुक्त वागायचे ठरवले आहे . एवढे बारिक सारिक आपण कधी पाहिलेले नसते ना . हार्ड जॉब आहे हा ! तरी सुद्धा बयाच हॉटेल ढाबा रॅस्टॉरन्ट मध्ये चांगली देखणी गोरटेली हिरो वाटावीत अशी मुले कशी असतात मला नवल वाटते .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen