मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये


आज काळ बराच पुढे सरकला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, माध्यम, लैंगिक अशा अनेक स्तरांवर कमालीचे बदल होत गेले. दरम्यान अधेमधे अशी काही 'मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये ' अथवा अंगप्रदर्शन अशा गोष्टी गाजल्या. काही पटकन मागे सरकल्या तर काही तारकाना खरोखरच मानसिक त्रास झाला.

 

मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये,

------------------------------------   कसं आहे की, काही  स्टारच्या प्रतिमा अगदी फिट्ट बसलेल्या असतात आणि त्याच स्टारने काही वेगळे केले की तो सांस्कृतिक धक्का असतो... ताजे उदाहरण अर्थातच प्रिया बापटचे. आजच्या डिजिटल युगात 'सिटी ऑफ ड्रीम्स 'मधील तिचे गीतिका त्यागीसोबतचे प्रणय दृश्य 'बघता बघता ' व्हायरल झाले. तसे होणार अशा पूर्वअंदाजानेच जणू प्रियाने 'एक दिवस मुलाखती'चा असे मानतच सर्वच उपग्रह वाहिन्याना मुलाखत दिली. त्यात तिने आपली भूमिका मांडली. पण अशा दृश्यावरुन सर्वप्रथम उडालेला धुरळा आवर्जून सांगावासा वाटतो. तब्बल ९१ वर्षांपूर्वीचा हा कल्चरल शाॅक आहे. सिनेमा नुकताच बोलू लागला होता. आणि अशातच हंस चित्र या बॅनरचा मा. विनायक दिग्दर्शित 'ब्रह्मचारी ' ( १९३८) या चित्रपटात  मीनाक्षी शिरोडकर ( नम्रता आणि शिल्पा शिरोडकरच्या आजी) यांनी  चक्क 'यमुना जळी खेळू खेळ कन्हय्या का.... ' या गाण्यात बेदिंग सूट परिधान केला होता. आणि तेव्हाच्या शांत संयमित समाजात प्रचंड खळबळ उडाली. आज ते गाणे पाहतांना अजिबात वावगे वाटणार नाही, पण ते दिवस खूपच वेगळे होते. हा चित्रपट प्रदर्शित झालेल्या गिरगावातील मॅजेस्टीक थिएटरवर तात्कालिक संस्कृती रक्षकांनी जोरदार निदर्शने केली. आज काळ बराच पुढे सरकला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, माध्यम, लैंगिक अशा अनेक स्तरांवर कमालीचे बदल होत गेले. दरम्यान अधेमधे अशी काही 'मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये ' अथवा अंगप्रदर्शन अशा गोष्टी गाजल्या. काही पटकन मागे सरकल्या तर काही तारकाना खरोखरच मानसिक त्रास झाला. कारण एकदा का अशा पठडीतील दृश्य दिले की सामाजिक जीवनात ती अभिनेत्री कुठेही गेली तरी तिला खूप विचित्र काॅमेन्ट्स, शेरेबाजी, टवाळी ऐकायची कदाचित दुर्दैवाने वेळ येऊ शकते. अशा प्रेक्षकांची मानसिकता कायमच घायकुतीला असते. ते असे एकादे धाडसी दृश्य डोक्यात ठेवून राहतात आणि कधी संधी मिळताच आपल्या शेरेबाजीतून विकृत आनंद मिळवतात. ते पचवणं कठीण जातं. एक वेळ सोशल मिडियातील ट्रोलिंग टाळता येईल, पण अशा बघ्यांच्या नजरा चुकवणे अवघड जाते. थीमची गरज म्हणून अशी दृश्ये देतांना कलाकार अनेक गोष्टींचा सारासार विचार करीत असतोच वा असावा. खरं तर अशी दृश्ये देतांना कलाकाराला बरीच मानसिक तयारी करावी लागते याकडे कायमच दुर्लक्ष होतेय. तशी आणखीन एक  वस्तुस्थितीच आहे, पण जणू ते एक कोडेच झाले आहे, आजच्या ग्लोबल युगातील मराठी अभिनेत्री चित्रपट असो वा वेबसिरिज धाडसी दृश्ये कमालीच्या आत्मविश्वासाने देतात, आपण त्यात कन्फर्ट कशा राहिलोय हेही सांगतात, अगदी आपल्या पालकांनाही याबाबत विश्वासात घेतले असेही सांगतात, यु ट्यूबवर अशी असंख्य धाडसी दृश्ये सहज दिसतात असेही म्हणतील, थीमची गरज म्हणून हे दृश्य दिले असे तर आठवणीने सांगतील. कधीही अशा निमित्ताने दिलेल्या मुलाखती आवर्जून पहा. अशीच भाषा आणि मानसिकता असते.  पण अशी दृश्ये त्या अमहाराष्ट्रीय दिग्दर्शकाकडे कशा बरे साकारतात? म्हटलंत तर हा ट्वीस्ट आहे.. प्रिया बापटचा 'सिटी ऑफ ड्रीम्स 'या बेवसिरीजचा दिग्दर्शक आहे  नागेश कुकुनर. म्हणजेच दक्षिणेकडील आहे तो. नेहा महाजनने संतोष बाबुसेनन आणि सतीश बाबुसेनन दिग्दर्शित 'द पेन्टेड हाऊस ' या मल्याळम चित्रपटात लेखकाची कल्पना म्हणून नग्न दृश्य दिले. ते कुठेही बिभत्स वाटत नाही. पण दिग्दर्शक दक्षिण भारतीय. यावेळी मराठीत बरीच दबक्या आवाजात चर्चा झाली. या चित्रपटाचा नेहाला करियरसाठी भरपूर उपयोग व्हायला हवा होता. सई ताह्मणकरचे 'हंटर ' या चित्रपटातील एक प्रणयाचे एक दृश्य गाजले. या चित्रपटाचा दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी असला तरी तो हिंदी चित्रपटसृष्टीतील आहे. या चित्रपटानंतर सईला अगदी अशाच स्वरुपाच्या भूमिकेसाठी ऑफर आल्या. सईकडील टॅलंटचा मोठ्या प्रमाणात दिग्दर्शक विचार कधी करणार हा प्रश्नच राहिलाय. मराठी दिग्दर्शक मराठी अभिनेत्रींकडून अशी दृश्ये चित्रीत करु शकत नाहीत का? त्यांना तसा आत्मविश्वास देऊ शकत नाहीत का? की मानधनाची समस्या आहे. कदाचित असेलही. याचीच 'दुसरी बाजू ', तीही महत्वाची गोष्ट आहे. मराठी चित्रपटात थीमनुसार  अशी काही दृश्ये असली तरी दिग्दर्शकांना मात्र अमहाराष्ट्रीय नटीची निवड करावी लागलीय. असे प्रकर्षाने दिसून येते. ती मोठीच वस्तुस्थिती होत आहे.  दिग्दर्शक राजू पार्सेकरला 'सत ना गत 'साठी काही मराठी अभिनेत्रींनी नकार दिला म्हणून त्याला पाखी हेगडे या भोजपुरी नटीची निवड करावी लागली. दिग्दर्शक विजू मानेला नेमके तेच 'शिकारी 'च्या वेळेस नेहा खानची निवड करुन करावे लागले. अशा वेळी मराठी चित्रपटात भोजपुरी मसाला आला की काय अशी जोरदार शोरदार टीकाही झाली. ती तर होणारच. अशा वेळी तर त्याला उलटसुलट गती आणि रंग येतोच. रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड 'मधील कल्याणी मुळे आणि छाया कदम यांची थीमनुसारची दृश्ये कमालीची संयमित होती आणि त्याची चर्चा चुकीच्या पद्धतीने वाहवत गेली नाही हे आवर्जून सांगावेसे वाटते. म्हणून या चित्रपटाचा विषय उत्तम वठला. आता यातील कोणता भाग महत्वाचा हा प्रश्नच आहे, अमहाराष्ट्रीय दिग्दर्शकाकडे ग्लॅमरस बोल्ड दृश्य देण्याची मराठी अभिनेत्रींची व्यावसायिकता महत्वाची की मराठी चित्रपटातील धाडसी दृश्याना अमहाराष्ट्रीय तारकेची निवड करणे योग्य? एकात एक अनेक विषय गुंतलेले असू शकतात हेच यातलं स्पष्ट होतेय. हे सगळे व्यावसायिक यशापयश आहे. प्रिया बापटच्या एका वादळी दृश्याने अनेक गोष्टींचा विचार करायला भाग पडलयं हे खरेच..   -    दिलीप ठाकूर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.