देवमाणूस


सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त सर्वात अधिक वेळ घालवायला मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध वेशभूषाकार दीपक सावंत. गेल्या पाच दशकांपासून ते अमिताभ बच्चन यांचा वेशभूषाकार म्हणून काम पाहत आहेत. बच्चन यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं दीपक सावंत यांची ही विशेष मुलाखत. नुकतीच ती नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाली होती. 

देवमाणूस

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त सर्वात अधिक वेळ घालवायला मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध वेशभूषाकार दीपक सावंत. गेल्या पाच दशकांपासून ते अमिताभ बच्चन यांचा वेशभूषाकार म्हणून काम पाहत आहेत. बच्चन यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं दीपक सावंत यांची ही विशेष मुलाखत. नुकतीच ती नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाली होती. ः भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार बच्चनजींना जाहीर झाला आहे. या निवडीनंतर तुमच्या मनात कोणत्या भावना आल्या -    साहजिकच खूपच आनंद झालाय. कारण हा पुरस्कार कारकीर्दीच्या योगदानासाठी दिला जातो. मी पन्नासहून अधिक वर्षं अमितजींबरोबर काम करतोय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशिवाय त्यांना सर्वाधिक जवळून ओळखण्याची संधी मला मिळालीय. पडद्यावर त्यांनी उत्तम काम केलंच आहे. परंतु, पडद्याबाहेरही त्यांनी आपलं नायकत्व जपलं. भारतामधील भल्या भल्या उद्योजकांना विपरीत परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना जी मदत करता आली नाहीय, ती अमितजींनी केलीय. मी हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यांचा एक वेशभूषाकार म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाहीय. त्यांच्या स्वभावाचे खूप वेगळे पैलू मी पाहिले आहेत. त्यामुळे दादासाहेब फाळकेंच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. परंतु, अमितजींचं कर्तृत्व भारतरत्न पुरस्कार मिळण्याएवढं आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठीही भारत सरकारनं त्यांचा विचार करावा असं मला वाटतं. ः अमिताभ बच्चन यांच्यासमवेत तुम्ही गेली पाच दशकं काम करताय. परंतु, त्यांच्याबरोबरचे अगदी सुरुवातीचे दिवस तुमच्या लक्षात आहेत का? - 1972-73चा काळ असेल. ‘रास्ते का पत्थर’ चित्रपटासाठी मी ‘असिस्टंट’ म्हणून काम करीत होतो. मात्र माझ्याकडे मेकअपची जबाबदारी नव्हती. एके दिवशी काहीतरी अडचण आली आणि अमितजींनी मला बोलावलं नि विचारलं, “दीपक तू मेकअप कर सकता है क्या?” मी प्रयत्न करतो असं उत्तर दिलं. तेव्हा त्यांनी माझ्याकडून त्यांचा मेकअप करून घेतला. माझं काम बहुधा त्यांना आवडलं असावं. ते मला म्हणाले, “तू एवढं काम करतोस तर मग पाठीमागे का राहतोस?” तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, “आपल्या वरिष्ठांना आदर द्यायचा असतो. म्हणून मग त्यांनी सांगेपर्यंत मला उगीच पुढं पुढं करायला आवडणार नाही.” त्यावेळी माझ्याकडे भरपूर वेळ असायचा. त्यामुळे ड्रेसिंग टेबल खूप छान सजवायचो. मेकअपचं सामान मी क्रीमनं धुवून स्वच्छ पुसून घ्यायचो. मग हे सर्व सामान मी छान लायनीत लावून ठेवायचो. अशाप्रकारचं काम त्या काळात कोणी करत नसे. त्यामुळे आपल्या मेकअपरूममध्ये अमितजी आले की, त्यांचं सर्वप्रथम लक्ष ड्रेसिंग टेबलकडे जाई. ही सजावट आणि माझं काम बहुधा त्यांना आवडलं असावं. म्हणून मग ते या चित्रपटासाठी दररोज माझ्याकडूनच मेकअप करायला लागले. ः अमितजींचा ‘पर्सनल मेकअपमन’ म्हणून तुमची कशी काय निवड झाली ? - एके दिवशी अमितजींच्या गाडीचा चालक माझ्याकडे आला नि म्हणाला, “साहेब, तुझ्याबद्दल खूप चांगलं बोलत असतात. तू त्यांचा पर्सनल मेकअपमन म्हणून काम का करीत नाहीस?” मला ही कल्पना आवडली. त्यानंतर मी अमितजींना म्हणालो, “मला तुमचा स्वभाव आवडतो. तुमच्याबरोबर काम करायला मला आवडेल.” त्यावर अमितजींनी “ठीक है । करेंगे।” असं उत्तर दिलं. मात्र त्यांच्या सेक्रेटरीनं मला अमितजींकडून कामासाठी नकार दिल्याचं कळलं. मला थोडं आश्चर्य वाटलं. मात्र त्यामागचं कारण विचारलं असता असं कळलं की निर्माता अमितजींना म्हणाला होता, “तुम्हारी पिक्चर नहीं चलती है । तुम पर्सनल मेकअपमन मत रखो।’ त्यामुळे अमितजींनी मला कळवलं होतं, “जेव्हा कधी मी स्वतःचा मेकअपमन ठेवेन, तेव्हा मी तुलाच बोलावेन.” पुढे ‘रास्ते का पत्थर’चं शूटिंग संपलं. मात्र त्यानंतर आणखी दोन चित्रपटांमुळे मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ‘मजबूर’ आणि ‘जमीर’ हे ते दोन चित्रपट. याच सुमारास ‘जंजीर’ प्रदर्शित झाला नि सुपरडुपर हिट ठरला. त्यावेळी मग अमितजींनी मला त्यांचा ‘पर्सनल मेकअपमन’ म्हणून काम करण्यास सांगितलं. त्यावेळी अमितजींचं स्वतःचं घर नव्हतं. ते जुहू येथील आठ नंबर भागात एक भाड्याचं घर घेऊन राहात होते. एके दिवशी त्यांनी मला घरी बोलावलं. मी घरी पोचल्यानंतर त्यांनी ‘जयाजी’ अशी मोठ्यांदा हाक मारली. त्या आल्यानंतर अमितजी म्हणाले, “हा दीपक. माझा मेकअप आर्टिस्ट आहे. तो आता माझं काम बघणार आहे.” त्यावर जयाजींनी उत्तर दिलं, “आपको पसंद है तो आप इन्हें रख लिजीए।”  कालांतरानं मला कळलं की जयाजींचा मेकअप आर्टिस्ट अमितजींचं काम मिळावं म्हणून प्रयत्न करत होता. अशापद्धतीनं माझं अमितजींबरोबर काम सुरू झालं आणि पुढं दशकभर आम्ही एकत्र काम केलं. ः अमितजींपासून काही काळासाठी फारकत घेण्यामागं काय कारण घडलं होतं? - अमितजींचा राजकारणात प्रवेश होईपर्यंत म्हणजेच 1982-83 पर्यंत मी त्यांच्यासोबतच होतो. अमितजी राजकारणात गेल्यामुळे साहजिकच मला त्यांच्याकडचं काम थांबवावं लागलं. कालांतरानं मी प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचं काम पाहू लागलो. ः पुन्हा अमितजींबरोबर काम करण्याचा लगेचच योग कसा काय आला? - अमितजी स्मिताजींबरोबर ‘शक्ती’ आणि ‘नमक हलाल’ असे दोन चित्रपट करीत होते. या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग असलं की निर्मात्यांकडील मेकअपमन अमितजींचा मेकअप करायचे नि मी स्मिताजींचा मेकअप करायचो. स्मिताजींचा मी मेकअप करीत असताना अमितजी पाठीमागून माझं काम बघायचे. मात्र ते मला न दिसता स्मिताजींना आरशातून दिसायचं. एकदा आमचं मद्रासला शूटिंग सुरू होतं. त्यावेळी अमितजींना भेटण्याची माझी इच्छा झाली. मी त्यांना भेटायलाही गेलो. मात्र त्यावेळी अमितजींसाठी काम करणार्‍या एका ‘बॉय’नं मला त्यांना काही भेटू दिलं नाही. साहजिकच मी खूप नाराज झालो नि मला रागही आला. ही गोष्ट मी स्मिताजींच्या कानावर घातली. तेव्हा भलतंच घडलं. माझ्यावरून स्मिताजी आणि अमितजींमध्ये वाद झाला. स्मिताजींचा मी मेकअप करीत असताना अमितजींनी माझ्याकडे टक लावून पाहणं त्यांना पसंत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की, अमितजी पुन्हा मला त्यांच्याकडे बोलावतात की काय... म्हणूनच ‘दीपकला पुन्हा स्वतःकडे बोलावण्याचा प्रयत्न करू नका...’ असं स्मिताजी अमितजींना म्हणाल्या. हे मला कळल्यानंतर मग मीच स्मिताजींना मी त्यांचं काम कधीही सोडणार नसल्याचं सांगितलं. मात्र दुर्दैवानं स्मिताजींचं निधन झालं. मी त्यांना दिलेला शब्द पाळला होता. त्यांच्या पार्थिवालाही मेकअप करण्याची वेळ माझ्यावर आली. विशेष म्हणजे अमितजी त्यावेळी माझ्या बाजूलाच होते. त्यानंतर दोन-तीन महिन्यांचा काळ उलटला. अमितजींनी एके दिवशी मला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांचं ‘जादूगर’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. अमितजी या चित्रपटामध्ये दाढीच्या लुकमध्ये होते. मात्र दाढीला हात लावला की त्यामध्ये गाठी होत असत. त्यामुळे या गाठींमुळे ते अगदी त्रस्त झाले होते. तेव्हा मला गाठींमागचं कारण कळल्यानंतर दाढीला हात न लावण्याबद्दल मी त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे मग दाढीत गाठी झाल्या नाहीत. मी केलेला मेकअप त्यांच्या चेहर्‍याला ‘सूट’ होत असल्याचं त्यांचं स्वतःचं मत होतं. म्हणून त्यांनी मला पुन्हा बोलावलं. ः अमितजींचा वेशभूषाकार या नात्यानं तुम्हालाही तुमचं कौशल्य पणाला लावावं लागलं असेल... - हो नक्कीच. माझ्या कामाची पद्धत म्हणजे, मी ‘सीन’प्रमाणे कलाकाराचा मेकअप करतो. एखाद्या प्रसंगाची काय मागणी आहे, त्याप्रमाणे मी कलाकाराचा चेहरा सजवतो. ज्या दिवशी अमितजींचं शूटिंग असायचं, शक्यतो त्याच्या आदल्या दिवशी मी उद्या शूट होणारा प्रसंग वाचायचो. त्यामुळे सेटवर जाण्यापूर्वीच मी तयार असायचो. मेकअप, कपडे आणि केस यांचा योग्य तो समन्वय झाला तरच कलाकाराची ‘स्क्रीन’वरील उपस्थिती प्रेक्षकांच्या नजरेत भरते. अमितजींची ‘अँग्री यंग मॅन’ची इमेज प्रेक्षकांवर ठसण्यात मेकअपच्या दृष्टीनंही मी बराच विचार केला होता. अमितजींचे 1973 ते 1983 या काळातील सगळे चित्रपट आठवा. या चित्रपटांमधील विविध प्रसंगांमध्ये त्यांच्या मेकअपमधील बदल अगदी ठळकपणे जाणवेल. खुद्द अमितजींनीदेखील याबद्दल माझ्याकडे भाष्य केलं आहे. या काळात त्यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यांवर त्यांचा चेहरा एकदम टवटवीत दिसतो. ः अमितजींचा वेशभूषाकार या नात्याखेरीज तुम्ही निर्मिलेल्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. हे कसं काय शक्य झालं? - 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात अमितजींनी काही वर्षांसाठी विश्रांती घेतली. त्यावेळी मात्र मी दुसर्‍या कोणाकडे कामासाठी गेलो नाही. या काळात मी ‘अक्का’ नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर अमितजींनी मला सांगितलं की त्यांना या चित्रपटामध्ये काम करायचं आहे म्हणून. चित्रपट तर पूर्ण झाला होता. म्हणून शेवटी आम्ही मग अमितजी-जयाजींवर एक गाणं आणि एक प्रसंग चित्रीत करून तो चित्रपटात घातला. या चित्रपटाच्या निर्मितीमुळे मला स्वतःला स्वतंत्र ओळख मिळाली. एकदा मी त्यांना भोजपुरी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला तसं करण्यास नकार दिला. या नकारामागचं कारण म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी निर्मितीमध्ये व्यग्र झाल्यानंतर त्यांच्याकडचं काम सोडून जाईन. परंतु, मी त्यांच्याकडचं काम न सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी माझ्या ‘गंगा’, ‘गंगोत्री’, ‘गंगादेवी’ चित्रपटांमध्ये काम केलं. ः गेल्या पाच दशकांमध्ये आलेल्या कठीण प्रसंगांमध्ये अमितजींची तुम्हाला खूप मदत झाली आहे. त्याबद्दल काय सांगाल? - माझा भाऊ जितेंद्र सावंत याच्या अपघातावेळी अमितजींची मला खूप मदत झाली. जितेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, शस्त्रक्रियेनंतरही त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. यावेळी अमितजींचे वडील आणि प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन, आई तेजी बच्चन मला भेटायला आले होते. भावाची प्रकृती ठीक झाल्यानंतर मी रुग्णालयाचं बिल भरायला गेलो तेव्हा कळलं की बिलाची सगळी रक्कम अमितजींनी चुकती केली होती. वास्तविक अमितजींसारखी उत्तम आर्थिक स्थिती असलेले अनेक समुद्र आपल्या देशात आहेत. परंतु, या समुद्रातून चार तांबे पाणी काढून देणारेही हल्ली सापडत नाहीत. परंतु, अमितजी त्याला अपवाद आहेत. तसेच मगाशी मी वर उल्लेखिलेल्या माझ्या तीन चित्रपटांमधील आपल्या कामासाठी अमितजींनी एक रुपयादेखील मानधन घेतलं नाही. तसेच आजारपणातून उठल्यानंतर अनेक मोठमोठ्या बॅनर्सच्या चित्रपटांचं काम खोळंबलं असताना त्यांना पहिल्यांदा मला चित्रीकरणासाठी डेट्स दिल्या. यामागची त्यांची भावना होती, ‘दीपकका नुकसान हो जाएगा । उसकी पिक्चर पहले करते है।’ ‘गंगादेवी’ चित्रपटाच्या वेळी तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया ठरली होती. मात्र माझ्या चित्रपटाचं काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रियेचा दिवस दोन-तीन दिवसांनी पुढं ढकलला. आजच्या घडीला कोणताही मालक आपल्याकडे काम करणार्‍याबद्दल एवढा जिव्हाळ्यानं वागत असेल असं मला वाटत नाही. केवळ अमिजतीच नव्हे तर जयाजी, अभिषेकजी, ऐश्वर्याजी, श्वेताजी यांनी मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच मानलं आहे. त्यांचं हे माझ्यावरचं ऋण मी आयुष्यभर विसरू तसेच फेडूही शकणार नाही. माझ्या घरातील कौटुंबिक कार्यक्रमांनाही चार-पाच वेळा ते उपस्थित राहिले आहेत. ज्यावेळी त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली तेव्हा त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना सांगून ठेवलं होतं की दीपकचा सल्ला घ्या. ‘दीपक अच्छी पिक्चरे कम पैसेमें बनाता है ।’ मात्र त्यांच्याकडे काम करणारी मंडळी अतिउच्चशिक्षीत असल्यामुळे कदाचित त्यांना माझा सल्ला घेणं योग्य वाटलं नसावं. अर्थात माझा सल्ला कोणी घेतला नाही याची खंत वाटून घेण्यापेक्षा अमितजींनी माझा सल्ला घ्या, असं म्हणणं हीच माझ्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. ः अमितजींच्या दैनंदिन संपर्कात असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या अफाट एनर्जीबद्दल काय सांगाल? - अमितजींनी आता ७७ वर्षांचा टप्पा गाठला आहे. तरीदेखील वय त्यांच्या उत्साहाला रोखू शकलेलं नाही. अमितजींवरील आतापर्यंत किमान सात-आठ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीदेखील त्यांनी स्वतःला एकदम फिट ठेवलेलं आहे. ते दररोज व्यायाम करतात. त्यांचा दिवस सकाळी सहाला सुरू होतो. सात ते नऊ ते व्यायाम करतात. नंतरचा दोन तासांचा वेळ ते डबिंगसाठी देतात. मग शूटिंगस्थळी जातात. तिथून सायंकाळी घरी परतल्यानंतर थोडा वेळ सोशल मीडियावरील आपल्या लेखनासाठी देतात. रात्री एखाद्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावतात. पुन्हा रात्री उशीरा घरी आल्यानंतर लॅपटॉपवर त्यांचं काम सुरूच असतं. एवढं सगळं करून त्यांना झोपायला रात्रीचे तीन वाजतात. अमितजी खूप चांगले संगीत दिग्दर्शक आहेत. ते स्वतः गीतांना चाली देतात. मात्र प्रत्यक्षात या चालींना नावं दुसर्‍यांचीच असतात. अमितजी पूर्णतः शाकाहारी आहेत. मद्य, सिगारेटला ते स्पर्शही करीत नाहीत. भेंडीची भाजी त्यांना सर्वात जास्त आवडते. एखाद्या विशीतल्या तरुणासारखे आजही ते नुसते पळत असतात. आणि जेव्हा ते खरोखरीच चालत असतात तेव्हा त्यांच्याबरोबरच्या सुरक्षा यंत्रणेवर पळायची वेळ येते. आपल्याकडे एखादी व्यक्ती 40-45 वर्षांची झाली की स्वतःला म्हातारे समजायला लागते आणि आपला सगळा भार मग ते आपल्या कोवळ्या वयातील मुला-मुलींवर टाकून देतात. अशा सर्व लोकांचा अमितजी हे आदर्श आहेत. असा देवमाणूस मला लाभल्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. - मंदार जोशी

व्यक्तिविशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.