"दाग "च्या पूर्वप्रसिध्दीतील चातुर्य कथा......


चित्रस्मृती
"दाग "च्या पूर्वप्रसिध्दीतील चातुर्य कथा......
         त्याचं काय झालं की, सुपर स्टार राजेश खन्नाची शर्मिला टागोरशी   'आराधना ' ( १९६९) पासूनच छान जोडी जमली आणि मग 'सफर', 'छोटी बहू ',  'अमर प्रेम ', 'मलिक ', 'राजा रानी ', 'त्याग ',  'आविष्कार ' अशा चित्रपटात भूमिका साकारताना त्यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री छानच जमली, अशा वेळी 'दाग 'साठी रोमॅन्टीक दृश्याचा अभिनय करताना अधिकच सहजता येणे अगदी स्वाभाविक आहे ना? आणि तसे जर आहेच तर सेटवर आवश्यक तेवढेच तंत्रज्ञ असावेत, पाहुण्यांना अजिबात प्रवेश नकोच असे मॅडमना वाटणे गरजेचे होतेच. यशाने अनेक गोष्टींचा अधिकार येतोच.  एवढ्यावरच मॅडमचा हट्ट थांबला नाही, तिने राजेश खन्ना व राखी यांच्या प्रणय दृश्यांवर अघोषित सेन्सॉरशीप आणली, त्या दृश्यांना जास्त फुटेज मिळू नये असे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याकडे धरलेला हट्टदेखिल मान्य झाला.....
       आज या गोष्टीत कदाचित फारसे थ्रील वाटण्याची शक्यता फार कमी आहे. पण १९७३ साली ही अतिशय खमंग, कुरकुरीत, चुरचुरीत, तिखट मीठ हळद जीरे असे टाकलेली मोठीच 'टेस्टी स्टोरी ' होती. बरीच चवदार आणि बहुचर्चित ठरली.
       दोन तीन प्रख्यात गाॅसिप्स मॅगझिनमधून ती आली आणि 'वाचता वाचता ' हिंदी तसेच मराठी, गुजराती वगैरे भाषिक प्रसार माध्यमातून पसरलीदेखिल. गाॅसिप्स मॅगझिनना प्रख्यात म्हटल्याने कदाचित काहीना 'कल्चर शाॅक ' बसलाही असेल. पण तेव्हा 'सिनेपत्रकारीतेत त्याची स्पेस ' वाढत होती. आणि अन्यभाषिक मिडियात त्याला जागा मिळू लागली होती.
      आता या स्टोरीमागचा हेतू अगदी स्पष्ट होता,
     'दाग 'च्या पूर्वप्रसिध्दीत रंगत संगत, चमक धमक यावी. चित्रपटात अशी दृश्ये कधी आणि कशी पाह्यला मिळताहेत याबाबतचे कुतूहल वाढावे. हा प्रेम त्रिकोण काही वेगळाच आहे अशी प्रतिमा अथवा अपेक्षा निर्माण व्हावी...
     हा हेतू खरंच साध्य झाला आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच सिनेमा हिट झाला. सिनेमाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही आणि ती जर अशी मिळतेय तर का नको?
     पब्लिसिटी गिमिक, मिडिया हाईप अशा शब्दांचा जन्म होण्यापूर्वीचा हा काळ होता. पब्लिसिटी स्टंट असे मात्र म्हटले जात होते तरी 'हे सगळे खरेखुरे आहे, अस्सेच घडले ' असा विश्वास या चातुर्यातून निर्माण करण्यात यश मिळवले होते.
       आज हिंदी तर झालेच पण अगदी मराठी चित्रपटाच्या पब्लिसिटीचे बजेट वाढलयं, मास मिडियाची उच्चशिक्षित पदवी घेणारे 'ब्रेकिंग न्यूज ', 'भारी स्टोरी ' वगैरे जन्माला घालतात, पण एक तर त्या आभासी वाटतात आणि दुसरे म्हणजे अनेकदा त्या अळणी असतात..
    यश चोप्रांचे दिग्दर्शनीय मेरीट, राजेश खन्ना , शर्मिला टागोर व राखी यांचे ग्लॅमर , स्टाईल, अभिनय व स्टारडम आणि साहिरच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे सुपर हिट  संगीत ( मेरे दिल मे आज क्या है....) या गुणांवरही हा चित्रपट हिट होऊन मेन थिएटर मिनर्व्हात सिल्हर ज्युबिली हिट होऊ शकला असता...
     पण सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत जे काही बदल होत गेले त्यात अशा पब्लिसिटी चातुर्याचाही एक रंग होताच. तो 'दाग 'ला गोड फळला ...
                ---     दिलीप ठाकूर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.