दुहेरी योगाच्या योगे

संपादकीय    संपादकीय    2020-08-02 10:00:16   

कालच्या एक ऑगस्टचा योग दुहेरी होता. गांधीजींनी नेतृत्व केलेल्या स्वातंत्र्य लढ्याचे अधिष्ठान ज्यांच्या अचाट कार्याच्या पायावर उभे होते त्या लोकमान्य टिळकांच्या मृत्यूला शंभर वर्षे पूर्ण झाली, तर समाजाचा तळ ढवळून टाकणाऱ्या चळवळी, लोकसाहित्य यांतून सामाजिक अभिसरण घडवून आणणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माला त्याच दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली. १९२० नंतरच्या शंभर वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर प्रगतीचे सहस्त्र दरवाजे आपण उघडले आहेत, तर त्याचवेळी अधोगतीचीही सहस्त्रावधी दारे खुली केली आहेत हे आपल्या लक्षात येते. मुळात गेल्या शंभर वर्षात आपण सामाजिकदृष्ट्या काय साध्य केले असेल तर प्रगती आणि अधोगती यांतील सीमारेषाच अस्पष्ट करुन टाकली आहे. नैतिक-अनैतिकतेची व्याख्या नव्याने लिहिली आहे. ज्या पांढरपेशा, मध्यमवर्गीयांच्या खांद्यावर बसून संस्कृती शतकांचा प्रवास करत आली आहे, तोच वर्ग देशी भाषा, देशी संगीत, देशी साहित्य, देशी खाद्यसंस्कृती यांना खालच्या दर्जाचे मानू लागला आहे. स्वातंत्र्यानंतरची तीन-चार दशके ही मध्यमवर्गीय मूल्ये टिकून होती. १९७५ नंतर व्यावहारिक हुशारीला वलय प्राप्त झाले आणि त्यात ही मूल्ये शहीद झाली. प्रामाणिकपणाला बावळटपणाचे मूल्य प्राप्त झाले आणि देशभक्ती ही अंगी बाणवायची वृत्ती नसून केवळ दाखवण्याची, मिरवायची बाब आहे, असे समजले जाऊ लागले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे स्खलनही सुरु होते, तसेच होऊन गेल्या काही वर्षात संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. ‘पुनश्च’ ही त्यातलीच एक सांस्कृतिक कडी आहे. ज्या ‘बहुविध डॉट कॉंम’च्या व्यासपीठावरुन ‘पुनश्च’ आपल्यापर्यंत येते, त्या व्यासपीठावरील मराठी प्रथम, वयम्, रूपवाणी हे सर्वच विभाग संस्कृतीच्या त्या संपन्न पालखीचे भोई आहेत आणि मूल्य, अभिरूची यांची जपणूक करण्याची यशस्वी दौड करीत आहेत. गेले चार महिने संपूर्ण जग आणि देश अनिश्चित अशा वातावरणात आहे, अस्वस्थ मनःस्थितीत आहे, तरीही ‘पुनश्च’ला मिळणारा प्रतिसाद कायम आहे. लेख वाचले जात आहेत, त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. बुद्धिमत्तापूर्ण सकारात्मकतेचा प्रसार व्हावा आणि विचारपूर्वक मतप्रदर्शनाची सवय लागावी यासाठीचा हा उपक्रम रूजतो आहे याची साक्ष यातून मिळते. संस्कृतीच्या पुनरूज्जीवनाची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे जे वर म्हटलेले आहे त्याची साक्ष आपल्याला इतरत्रही मिळते. उदाहरणार्थ पंजाबी पदार्थांचा अतिरेक झाला, पिझ्झा बर्गरला चांगले दिवस आले आणि त्यानंतर गेल्या काही वर्षात अनेक जण पुन्हा मराठी पदार्थांकडे वळले आहेत. ‘डाएट’ म्हणून ज्वारीची भाकर आहारात मस्ट झाली. ‘जेवताना लसणाची एक पाकळी खावी’ हे आज डाएट स्टेटमेंट असते. त्यामुळे स्वैपाकघरातून पसार झालेली लसून चटणी, लसून ठेचा आता पुढच्या दाराने किचनमध्ये आले आहेत. सोशल मिडियावरील खाद्यविषयक चर्चा पाहिल्या, ऐकल्या, वाचल्या तर विदर्भातील शेंगोळे, मराठवाड्यातील चिकोल्या, कोकणातील पेज आणि सोलापुरची शेंगापोळी यांच्याविषयी नव्याने उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसते. मराठी कथा, कविता यांना सध्या जो ऑनलाइन बहर आला आहे, तो पाहता साहित्यातही पुनरूज्जीवनाची ही प्रक्रियाही फार दूर नाही याची खात्री पटते. लॉकडाऊनच्या गेल्या चार महिन्यात मराठी पुस्तकांची ऑनलाइन खरेदी वाढल्याची बातमी कालच प्रसिद्ध झाली आहे. सामान्य वातावरणात प्रयत्न करूनही इ साहित्य किंवा साहित्याची ऑनलाइन विक्री फार होत नव्हती, करोनाची आपत्ती ही त्याबाबतीत इष्टापत्ती ठरते आहे. कालच्या बुधवारी जाहीर झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणात विज्ञान आणि कला अशा दोन शाखांची सरमिसळ करुन विषय निवडण्याचे स्वातंत्र्य आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्यामुळे कला, साहित्य यांबाबतची अभिरूची तयार होण्यास मदत होणार आहे, आणि ती चांगली बाब आहे. विज्ञान-कला यांच्या फारकतीने आपल्या समाजाचे मोठेच सांस्कृतिक नुकसान गेल्या चाळीस वर्षात झाले आहे. डॉक्टर, अभियंता, बॅंकिग, फायनान्स या क्षेत्रात गेली काही वर्षे मोठ्या संधी आहेत. अशा क्षेत्रात चांगली पदे आणि पत मिळवणाऱ्या तरुणांवर कळत्या वयात कला-साहित्याचे संस्कार न झाल्यामुळे धर्म आणि राजकारण यांची गल्लत करणारा मोठा सुशिक्षित वर्ग तयार झाला आहे. हे होण्याची गतीही आता मंदावेल. करोनाचे संकट आज ना उद्या जाणारच आहे. त्याचे आर्थिक, मानसिक परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेतच. परंतु त्यात आपण एकटेच नसू, जगही आपल्या सोबत असेल. पुन्हा एकदा सामान्य जगणे सुरु होईल तेंव्हा संस्कृती पुनरूज्जीवनाची प्रक्रिया पुन्हा वेग घेईल. परिपक्व विचार, उत्तम साहित्य आणि दीर्घ वैचारिक मंथनातून तयार झालेली मूल्ये क्वचित पिछाडीवर गेली तरी ती लुप्त होत नाहीत याचा प्रत्यय आपल्याला येत राहील. बहुविध आणि पुनश्च हे त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून वाटचाल करत राहतील. टिळकांचे विचार आणि अण्णाभाऊंच्या सामाजिक जाणीवा या एका नाण्याच्या दोन बाजू नसून दोन्ही एकाच बाजूला, सोबतच आहेत याची जाणीव मनात ठेवून आपण पुढील प्रवास करणार आहोत. प्रगती आणि अधोगतीमधील सीमारेषा ठळक करणार आहोत.

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. asmitaphadke

    9 महिन्यांपूर्वी

  सुंदर लेख

 2. [email protected]

    10 महिन्यांपूर्वी

  लेख छान झाला आहे. त्यातील सकारात्मकता जास्त भावली. या संकटातून तावून सुलाखून बाहेर पडून समाज नक्कीच सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न होणार यात शंकाच नाही.

 3. Namrata

    11 महिन्यांपूर्वी

  संस्कृती च्या पुनरुज्जीवनाची नांदी ठरावा असा हा योग आणि त्यावरील भाष्य खूपच छान.

 4. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  Nice article with positive attitude.

 5. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  टिळकांची 100 रावी पुण्यतिथी हा शब्द प्रयोग जास्त योग्य. आम्ही सुद्धा लेख पाठवू शकतो काय

 6. bookworm

    11 महिन्यांपूर्वी

  या निमित्ताने या व्यासपीठास पुढील वाटचालीसाठी हार्दीक सदिच्छा!!!👌👍

 7. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  सद्यस्थितीची नोंद उत्तम प्रकारे घेतली असून लेख सकारात्मक असल्याने आपण कोठे जायचे आहे याची दिशा दिसून येते.

 8. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  Very nice

 9. atmaram-jagdale

    11 महिन्यांपूर्वी

  सुंदर ! ज्ञान- भान -आणि जाण !

 10. rajandaga

    11 महिन्यांपूर्वी

  Very true

 11. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  मराठवाड्यातील चकल्या असे म्हणायचे असावे चकल्या शंकरपाळे हे दिवाळीतील फराळाचे पदार्थ आहेत.बाकी लेख उत्तम जमला आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen