संपादकीय – भाषा आणि धर्म

सुमारे अकरा कोटी मराठी भाषक असलेल्या महाराष्ट्रात मराठीच्या प्रश्नांवर शंभर माणसे संघटित करतानाही दमछाक होते आणि जातिधर्माच्या मुद्द्यावर साधी शिट्टी मारली तरी हजारो लोक आपल्या प्रतीकांसह स्वयंप्रेरणेने एका झेंड्याखाली येतात हा कुठला महाराऱष्ट्र आहे? महाराष्ट्रात चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून इतके धर्मसुधारक आणि फुले, आंबेडकरांपासून इतके समाजसुधारक होऊन गेले तरी त्यांच्यापासून आपण काहीच शिकलो नाही? कोठून आला हा जात्यभिमान आणि धर्माभिमान? याचा परिणाम म्हणा किंवा परिणती म्हणा भाषेचे राजकारण करणारे राजकीय पक्षही आज जातिधर्माच्या वळचणीला गेलेले दिसतात. भाषेच्या प्रश्नावर मते मिळत नाहीत किंवा ती जातही नाहीत असा त्यांचा अनुभव आहे. आपल्या देशात मराठी भाषकांपेक्षा हिंदूंची संख्या अधिक आहे आणि त्यांच्या ध्रुवीकरणातून निवडणुका जिंकता येतात असा आत्मनिश्वास निर्माण झाल्यानंतर शिवसेनेसारख्या मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षानेही मराठीचा हात सोडून हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला हे आपण पाहतोच आहोत. राज्यात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ, किंवा मुंबईत मराठीसाठी भाषा भवन निर्माण होण्यापेक्षा अयोध्येत राममंदिर निर्माण होणे हा शिवसेनेचा अग्रक्रम बनतो आणि मराठी भाषक हिंदूंचा त्याला पाठिंबा मिळतो हा या पक्षाचा दोष नाही तर तो स्वतःची भाषिक ओळख विसरलेल्या मराठी समाजाचा आहे… 

——————————————————————————

९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. साहित्य महामंडळाच्या निवड समितीने मराठी साहित्यिक म्हणून त्यांची एकमताने निवड केली असली तरी ते ख्रिश्चन आणि त्यातही धर्मप्रचारक असल्यामुळे त्यांना हा बहुमान मिळणे काहींना आवडलेले नाही. म्हणजे ह्या दोन गोष्टी एकत्र कशा काय असू शकतात असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आतापर्यंत झालेले संमेलनाध्यक्ष बहुसंख्येने हिंदू होते. त्यांच्यापैकी कोणीही धर्मप्रचारक नव्हते. महानुभाव व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण हे मुस्लिम धर्मीय संमेलनाध्यक्ष होते. पण त्यांच्यावेळीही धर्मावरून वाद निर्माण झाल्याचे आठवत नाही. अध्यक्षपदाच्या निवडीविषयी मतभेद असायला आणि ते सनदशीर मार्गांनी व्यक्त करायला काहीच हरकत नाही. दिब्रिटोंचे बहुतेक वाङ्‍मय धार्मिक आहे आणि ते अन्य संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत ललित लेखक किंवा समीक्षक म्हणून कमी  पडतात अशीही टीका होत आहे आणि तिला आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु, ते ख्रिश्नन धर्माचे प्रचारक असल्याचे आणि तज्जन्य अन्य कारणे पुढे करून त्यांच्या निवडीला आक्षेप घेणे आणि मुख्य म्हणजे कोणत्याही धर्माला मान्य होणार नाही अशा असहिष्णु पद्धतीने आक्षेप घेणे, विरोध करणे हे उचित नाही. हा विरोध भाषा, साहित्य यांच्यापेक्षा धर्मनिष्ठेला प्राधान्य देऊन किंबहुना, धार्मिक कट्टरतेतून होत आहे असे म्हणायला वाव आहे.

साहित्यचर्चा हे ‘मराठी प्रथम’चे उद्दिष्ट नसले तरी ह्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाषा आणि धर्म यांच्या समाजातील नात्याची, परस्परसंबंधांची आणि प्रभावाची चर्चा करणे प्रस्तुत ठरेल. समाजातील जातिभेद आणि धर्मभेद यांपेक्षा भाषाभेद आधिक वैध व महत्त्वाचे असून ते परस्परांच्या भाषांचा आदर ठेवून सांभाळण्यातच समाजाचे हित आहे अशी मराठी प्रथमची भूमिका आहे. ह्या उलट आपल्या समाजातील माणुसकीला लांच्छन असलेल्या विषमतामूलक जातिभेदांचे इतिहास आणि परंपरेच्या नावाखाली गौरवीकरण न करता युद्धपातळीवर निर्मूलन केले पाहिजे. उपासना पद्धती ह्या मर्यादित अर्थाने धर्म ही खासगी बाब आहे आणि ती घर आणि प्रार्थनास्थळ यांपुरतीच सीमित राहिली पाहिजे. सार्वजनिक जीवनात भाषेला जशी भूमिका आहे तशी धर्माला नाही. परस्परांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर आवश्यक आहे तसा धर्म अनिवार्य नाही. फार तर परस्परांशी माणुसकीने वागण्यासाठी धर्म आवश्यक आहे असे म्हणता येईल. एखाद्याचे आस्तिक किंवा नास्तिक असणे, मूर्तिपूजक असणे किंवा नसणे आदींना सार्वजनिक जीवनात काहीच महत्त्व नाही. नीतियुक्त आचरण ह्या अर्थाने जगात माणुसकी हाच एक धर्म असून सर्व धर्म माणुसकीचीच शिकवण देतात.त्यामुळे समाजात धार्मिक संघर्षाला खरे तर वावच असता कामा नये. पण धर्माच्या आडून जगात जितका हिंसाचार होतो तितका क्वचितच कोणत्या कारणावरून होत असेल. याचे कारण वृत्तीने ‘अधार्मिक’ असलेले लोकच धर्माचा कब्जा घेतात आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकतात. धर्माच्या आडून मूलतत्त्ववाद जोपासतात, चिकित्सेला नाकारत आपल्याच समाजातील दुर्बल घटकांचे शोषण करतात आणि धार्मिक वर्चस्ववादातून अन्य धर्मीयांबाबत शत्रुत्वभाव  निर्माण करतात. सत्य, अहिंसा, करूणा यांवर श्रद्धा आणि विश्वास असलेला वर्ग यांपासून दूर असला तरी संकुचित आणि वर्चस्ववादी धर्मजाणिवेचा एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. तो अशिक्षित, सुशिक्षित आणि उच्च शिक्षितही आहे. शिक्षणाने माणूस शहाणा होतोच असे नाही हे आजवर सिद्ध झालेले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर समाजातील धार्मिक संघर्ष संपून सलोखा निर्माण होईल अशी आशा बाळगण्यात अर्थ नाही.

हेही वाचाः-

संपादकीय – ओळख भाषेची, मराठी महाराष्ट्राची!

संपादकीय – धर्मकारण की भाषाकारण?

म्हणूनच मराठी अभ्यास केंद्राने सुरुवातीपासून धर्मभेदापेक्षा भाषाभेदातून निर्माण झालेल्या सामाजिक ओळखीला, अनन्यतेला प्राधान्य दिलेले आहे. कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या मराठी अभिमानगीतातील ‘धर्म, जात, पंथ एक मानतो मराठी’ ही ओळ सर्वच समाजांसाठी अनुकरणीय संदेश देणारी आहे. इतरांचे सोडा, आपला समाजच यापासून शतयोजने दूर आहे. कारण त्याला आपल्या भाषिक ओळखीपेक्षा जातीय किंवा धार्मिक ओळख अधिक महत्त्वाची वाटते. स्वभाषेविषयी सार्थ अभिमान आणि आस्था असलेला मराठी भाषक समाज असा काही प्रकारच आता महाराष्ट्रात उरलेला नाही. जात आणि धर्म यांच्या वर्चस्ववादी जाणिवांमुळे  मराठी भाषक समाजाचे इतके विघटन झाले आहे की त्याला भाषेच्या आधारे उभा करणे, ओळख देणे हे अवघड बनले आहे. धार्मिक कट्टरता ही जशी वाईट तशी भाषिक कट्टरताही निषिद्ध.  हे खरे असले तरी आज मराठी समाजाच्या भाषिक जाणिवा इतक्या बोथट झालेल्या आहेत की त्याला आपल्या भाषेवर झालेल्या अन्यायाचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही. मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषेच्या विविध प्रश्नांवर लोकशाही मार्गांनी  केलेल्या अनेक आंदोलनातून हा अनुभव घेतलेला आहे. सुमारे अकरा कोटी मराठी भाषकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठीच्या प्रश्नावर शंभर माणसे संघटित करतानाही दमछाक होते आणि जातिधर्माच्या मुद्द्यावर साधी शिट्टी मारली तरी हजारो लोक आपल्या प्रतीकांसह स्वयंप्रेरणेने एका झेंड्याखाली येतात हा कुठला महाराष्ट्र आहे? महाराष्ट्रात चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून इतके धर्मसुधारक; आणि फुले, आंबेडकरांपासून इतके समाजसुधारक होऊन गेले तरी त्यांच्यापासून आपण काहीच शिकलो नाही? कोठून आला हा जात्यभिमान आणि धर्माभिमान? याचा परिणाम म्हणा किंवा परिणती म्हणा भाषेचे राजकारण करणारे राजकीय पक्षही आज जातिधर्माच्या वळचणीला गेलेले दिसतात. भाषेच्या प्रश्नावर मते मिळत नाहीत किंवा ती जातही नाहीत असा त्यांचा अनुभव आहे. आपल्या देशात मराठी भाषकांपेक्षा हिंदूंची संख्या अधिक आहे आणि त्यांच्या ध्रुवीकरणातून निवडणुका जिंकता येतात असा आत्मनिश्वास निर्माण झाल्यानंतर शिवसेनेसारख्या मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षानेही मराठीचा हात सोडून हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला हे आपण पाहतोच आहोत. राज्यात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ, किंवा मुंबईत मराठीसाठी भाषा भवन निर्माण होण्यापेक्षा अयोध्येत राममंदिर निर्माण होणे हा शिवसेनेचा अग्रक्रम बनतो आणि मराठी भाषक हिंदूंचा त्याला पाठिंबा मिळतो हा या पक्षाचा दोष नाही तर तो स्वतःची भाषिक ओळख विसरलेल्या  मराठी समाजाचा आहे. राजकीय पक्ष हे प्रायः संधिसाधू असतात. ते वारा येईल तशी पाठ फिरवतात. स्वभाषेऐवजी स्वतःची विशिष्ट जात आणि धर्म  हेच मराठी समाजाच्या जगण्याचे केंद्र बनल्यामुळे जातिधर्मकेंद्री राजकारण करून राजकीय पक्ष त्याचा फायदा उठवतात. समाजाच्या भाषाजाणिवा जागृत असत्या आणि जातिधर्म ह्या गोष्टी परिघाबाहेर ठेवल्या असत्या तर राजकीय पक्षांची ही हिंमत झाली नसती.

आता पुन्हा साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीच्या वादाकडे येऊ. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी भाषक आणि मराठी साहित्यिक आहेत. ते कोणत्या जातीचे, धर्माचे आहेत हे मुद्दे गैरलागू आहेत. त्यांच्या लेखनाच्या साहित्यिक दर्जाविषयी व मराठी भाषेवरील निष्ठेविषयी काही आक्षेप असतील तर ते नक्की विचारात घेता येतील. परंतु, सामाजिक भान असलेले आणि लोकहिताच्या चळवळींशी जोडून घेणारे दिब्रिटो इतर अनेक मराठी साहित्यिकांपेक्षा मराठीसाठी अधिकच आग्रही राहिलेले आहेत. त्यांच्या वैचारिक लेखनात त्यांनी नेहमीच मराठीचा पक्ष घेऊन मराठीच्या संवर्धनाची हाक दिलेली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनात बिगरहिंदू धर्मियांचा आणि विशेषकरून ख्रिस्ती मिशनऱ्यांचा फार पूर्वी पासून सहभाग राहिलेला आहे. मराठीचे पहिले व्याकरण (इंग्रजीत) १८०५साली विल्यम कॅरे याने लिहिलेले आहे. मराठीतील उल्लेखनीय असा पहिला मोठा मराठी शब्दकोश अनेक वर्षे परिश्रम करून मोल्सवर्थने तयार केला. मराठी भाषेला विरामचिन्हांचा परिचय मेजर कँडीने करून दिला. मराठी भाषेच्या आद्य प्रमाणीकरणाचे श्रेयही कँडीलाच द्यावे लागते. कँडीचे मराठी भाषेसाठी असलेले योगदान फार मोठे आहे. ‘मला मराठी लिहिण्यास मेजर क्यांडी साहेबांनी शिकवले’ असे ‘बालबोध’कार विनायक कोंडदेव ओक यांनी लिहून ठेवले आहे. मराठी साहित्यसेवेसाठी फादर स्टिफन्स, शेख महंमद, रेव्ह. टिळक यांची नावे तर आपण आदराने घेतो. अन्य धर्मियांची मराठीची ही सेवा पुढेही चालू राहिली कारण भाषा आणि साहित्यव्यवहारात धर्माने लुडबूड केली नाही. जात, धर्म कोणताही असला तरी सर्जनाच्या भाषेने त्यांना एकत्र आणले होते. आज हा भाषाधर्म बाजूला पडून धर्माची भाषा बोलली जात आहे ती गैर आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि भाषा हा विविध धर्माच्या लोकांना जोडणारा पूल असेल तर तो आपण अधिक मजबूत करायला हवा. दिब्रिटोंना झालेला विरोध हा धर्मसापेक्ष आणि भाषानिरपेक्ष जाणिवेतून झालेला आहे असे म्हणता येईल. पण भारतीय संघराज्याची निर्मिती धर्मवार झालेली नसून भाषावार झालेली आहे. समाजात भेदाभेदच कारायचा असेल तर तो न्याय्य चौकटीत भाषेच्या आधारावर करता येईल; धर्माच्या नव्हे. मात्र भाषेपेक्षा धर्म हीच आपली सामाजिक ओळख मानणाऱ्या आणि धार्मिक वर्चस्वावादाच्या व उन्मादाच्या आहारी गेलेल्या लोकांना आपली भाषेची ओळख दखलपात्र वाटत नाही. भाषा मेली तरी चालेल पण धर्म टिकला पाहिजे. वाढला पाहिजे. किंबहुना, आपल्या धर्माची सत्ता आली पाहिजे. ही शत्रुकेंद्री विकारसरणी विनाशाकडे घेऊन जाणारी आहे.

जात, धर्म, पंथ, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन ‘मराठी भाषक’ म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत?

 – डॉ. प्रकाश परब

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 7 Comments

 1. Rdesai

  मार्मिक माहितीपूर्ण लेख

 2. jspalnitkar

  अत्यन्त संतुलित आणि प्रभावी लेख. दिब्रिटो प्रकरणाचा संदर्भ घेऊन एका अतिशय महत्त्वाच्या पण चिंताजनक सामाजिक वास्तवावर अचूक भाष्य केलं आहे.
  धन्यवाद परब साहेब आणि धन्यवाद बहुविध!!

 3. Attam

  खुपच छान….माहितीपूर्ण..
  विरोध करणारांनी नक्की वाचावा…

 4. उन्मेष

  संमेलन मराठी साहित्याचे आहे की हिंदू धर्माचे आहे?

 5. संजय रत्नपारखी

  सध्याचा दिब्रोटा यांना होणारा विरोध साहित्यिक पातळीवर कमी आणि धार्मिक पातळीवर अधिक आहे. डॉ. परब यांनी ऐतिहासिक दाखले देत इतर धर्मियांचे मराठीसाठीचे योगदान मांडले आहे. लेख चांगला असून अनेकां पर्यंत तो जावा.

 6. Aarti Nitin Gawade

  मराठी भाषेसाठी योगदान करणारे सर्वच सन्मानास प्रात्र आहेत.
  ते कुठल्याही धर्माचे असो. भाषा विकासात धर्म येता कामा नये.

 7. मनोज देशमुख

  अत्यंत मार्मिक …

Leave a Reply