पहिले ते मराठीकारण – मनसेचं इंजिन नेमकं अडलं कुठे?

“…राज ठाकरे सतत असं म्हणत असतात की, ‘मला एकहाती सत्ता द्या.’ त्यांच्यासारख्या शहाण्या माणसाला हे कळलं पाहिजे की, भाजपसारख्या प्रचंड प्रबळ पक्षालासुद्धा महाराष्ट्रावर एकहाती राज्य करता येत नाही. मग मनसेसारख्या परिघाबाहेर फेकलेल्या गेलेल्या पक्षाला एकहाती राज्य करायला मिळण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणून राज ठाकरेंनी तळापासून म्हणजे ग्रामसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत समविचारी मित्र, समविचारी राजकीय पक्ष जोडले पाहिजेत. राज ठाकरेंनी किंवा शिवसेनेने मराठीचं जे राजकारण उभं केलेलं आहे ते सुहास पळशीकरांच्या शब्दांत सांगायचं तर प्रतिक्रियात्मक, प्रतीकात्मक आणि शत्रूकेंद्री आहे. कोणी उत्तर भारतीय शत्रू म्हणून निवडला तर कोणी दक्षिण भारतीय  शत्रू म्हणून निवडला. पण या शत्रूंच्या पलीकडे जाऊन मराठीच्या खऱ्या प्रश्नांना भिडणारं राजकारण त्यांनी केलं नाही. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतायत, सरकार प्रशासनामध्ये मराठीचा वापर करत नाही, न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करत नाही, तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर करत नाही किंवा मराठी भाषा विभाग सक्षम होत नाही, मराठी भाषा भवन बांधलं जात नाही. मराठी विद्यापीठ स्थापन केलं जात नाही, या सगळ्याला परप्रांतीय लोक जबाबदार नाहीत, या सगळ्याला आपलेच लोक जबाबदार आहेत. या प्रकारचं मराठीचं राजकारण करण्याची राज ठाकरे यांची इच्छा आणि क्षमता आहे का याबद्दल मला प्रश्न आहेत…” मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा मनसेच्या आजवरच्या राजकारणाची चिकित्सा करणारा हा परखड लेख – 

———————————————————————————————————————————————————————————–

राज ठाकरे हा महाराष्ट्रातील अभ्यासकांचा, कार्यकर्त्यांचा, पत्रकारांचा अतिशय आवडीचा विषय आहे – प्रेमाने बोलण्यासाठी आणि टीका करण्यासाठीही. २००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. ही स्थापना करत असताना मराठी माणसाला चांगले दिवस यावेत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी पहिल्या मेळाव्यात जाहीर केली. राजकारणात एखादा नवा पक्ष येतो तेव्हा तो पक्ष स्थापन करणाऱ्या माणसाला आधीच्या पक्षात पुरेशी ताकद मिळालेली नसते किंवा नेतृत्वाची संधी नसते. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार? हा वादाचा मुद्दा होता. यामध्ये असं दिसतं की, बहुतांश संघटना, कार्यकर्ते, स्वतः बाळासाहेब यांचं मत उद्धव ठाकरे यांच्या बाजूचं आहे असं राज ठाकरेंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे’ अशा प्रकारचं भावनिक आवाहन करत वेगळा पक्ष काढला. या पक्षाने महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारच्या आशा – आकांक्षा निर्माण केल्या होत्या. हा पक्ष निर्माण झाल्यानंतर तो विकासाची भाषा बोलायला लागला. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचं राज ठाकरे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी ‘मला जीन्स घातलेला शेतकरी पाहायचाय’ असं विधान केलं होतं. शेतकऱ्याने जीन्स घातली काय किंवा हाफ पँट घातली काय त्याच्या शेतीत उत्पन्न होतं की नाही, त्याला हमी भाव मिळतो की नाही आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतात की नाहीत हा खरा प्रश्न आहे. पण जेव्हा शहरी बाजाचा राजकारणी शेती आणि इतर ग्रामीण भागाचा विचार करतो, तेव्हा काही वेळा अशाच प्रकारचं उथळ विश्लेषण होतं. पण किमान राज ठाकरे यांचा हेतू स्वच्छ होता,  असा आपण त्यांना संशयाचा फायदा देऊ शकू.

२००९ सालच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार विधानसभेला – लोकसभेला उतरवले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्याचा फटका बसला. त्या निवडणुकीत राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले. एखादा पक्ष स्थापन झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश आजवर महाराष्ट्रात इतर कोणत्या पक्षाला मिळालेलं नव्हतं. राज ठाकरे यांचा त्या वेळेचा आविर्भाव पाहता आणि मराठी वृत्तवाहिन्या ज्या प्रकारे त्यांच्या प्रेमात पडलेल्या होत्या, यावरून जणू काही राज ठाकरे यांच्या भाषणावरच सगळा टीआरपी आहे, अशा प्रकारची धारणा वृत्तवाहिन्यांच्या संपादकांची आणि राज ठाकरे यांची स्वतःचीही होती, हे मी प्रत्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलताना अनुभवलेलं आहे. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही – वृत्तवाहिन्या अत्यंत निर्दयी आणि क्रूर असतात. जोपर्यंत एखाद्या नेत्याच्या भाषणाला बातमीमूल्य किंवा टीआरपीमूल्य आहे तोपर्यंतच त्या नेत्याचा उदोउदो करणं ही वृत्तवाहिन्यांची सवय आहे. एकदा का तो टीआरपी घसरायला लागला की त्या नेत्याला कुणीही विचारत नाही. राज ठाकरे या सगळ्या प्रवासातून जाऊन आलेले आहेत. अगदी अलीकडे धवल कुलकर्णी यांचं ‘द कझिन्स ठाकरेज्’ हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यामध्ये या दोन भावांधील संघर्ष आणि सुरुवातीला राज ठाकरे यांचं पारडं कसं जड होतं आणि हळूहळू उद्धव ठाकरे यांचं पारडं कसं जड होत गेलं, हे अतिशय तपशीलवारपणे नोंदवलेलं आहे.

राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या टप्प्यावर आपले फासे अगदी व्यवस्थित टाकले. ते स्वतःला टायमिंगचे बादशहा समजतात. त्यांचे भक्त, त्यांचे समर्थक, प्रसारमाध्यमातील त्यांचे मित्रही तसंच समजतात. पण फक्त टायमिंग चांगलं असून चालत नाही, तुम्हाला कष्टही खूप करावे लागतात. शरद पवारांसारखा माणूस वयाच्या ८० व्या वर्षी मुंबईवरून किंवा मुंब्र्यावरून एखादी सभा करून जुन्नरला जातो आणि त्या दिवशी रात्री सातारला सभा घेतो. दिवसाला दोन – तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रचार दौरे हे सगळं प्रकृतीची तमा न बाळगता केलं जातं. राज ठाकरेंसारखा नेता वयाच्या पन्नाशीतही संपूर्ण निवडणुकीत दहा – पंधराच्या वर सभा घेत नाही, हे मला  राजकीय आळशीपणाचं उदाहरण वाटतं. शरद पवार यांनी अगदी सुरुवातीला याबाबत राज ठाकरे यांना टोमणाही मारला होता, तेव्हा त्यांचे संबंध तितकेसे बरे नव्हते. ‘राजकारण करायचं तर लवकर उठावं लागतं आणि उशिरापर्यंत जागावं लागतं’, असं शरद पवार म्हणाले होते. त्याचा राज ठाकरे आणि त्यांच्या भक्तांनाही खूप राग आला होता. पण जर आज शरद पवार वयाच्या ऐंशीव्या वर्षी सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत निवडणुकीच्या प्रचारात गुंतत असतील, तर तुलनेने  तरुण पिढीतील असणाऱ्या राज ठाकरे यांनी अधिक कष्ट घेतले पाहिजेत, असं मला भाषिक चळवळीचा एक अभ्यासक म्हणून निश्चितपणे वाटतं.

राज ठाकरे यांनी २००९ ते २०१२ या काळात महाराष्ट्रात खूप आश्वासक चित्र निर्माण केलं. त्यांचे १३ आमदार विधिमंडळात होते. त्यातले दोन आमदार म्हणजे राम कदम आणि रमेश वांजळे. यांचा सगळ्यात मोठा लौकिक म्हणजे त्यांनी अबू आझमीच्या थोबाडात मारली. आझमींनी ज्या पोडियमसमोर इंग्रजीत शपथ घेतली ते पोडियम वांजळेंनी उचलून खाली आणलं आणि राम कदम यांनी आझमींच्या थोबाडात मारली. हेच त्यांचं त्या काळातलं अतिशय मोठं कर्तृत्व आहे. यातनं मराठी माणसाचा, मराठी भाषेचा आणि मराठी शाळेचा अजेंडा किंवा कार्यक्रमपत्रिका पुढे गेली का, हे राज ठाकरेंना कळलं होतं की नाही मला माहीत नाही. पण ती निश्चितपणाने पुढे गेलेली नाही, असं एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मला वाटतं. राज ठाकरे यांच्या १३ आमदारांनी विधिमंडळामध्ये मराठी भाषेचे, मराठी संस्कृतीचे, भाषेच्या विकासाचे, मराठी भाषेला पोटाची भाषा करण्याचे कोणते प्रश्न विचारले, याची एकदा माहितीच्या अधिकारात नीट खातरजमा करण्याची गरज आहे. पण आता तीही खातरजमा करण्याची गरज नाही, कारण २०१४ मध्ये राज ठाकरे १३ आमदारांवरून एका आमदारांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, तो आमदारही नंतरच्या काळात शिवसेनेला जाऊन मिळालेला आहे.

हे सगळं कशामुळे घडलं? तर हे सगळं राज ठाकरेंच्या मोदींवरील एकतर्फी प्रेमामुळे घडलं. २०१२ साली मोदींचा भारतीय जनता पक्षामध्ये अनभिषिक्त सम्राट म्हणून उदय होत होता. तेव्हा मोदींनी स्वतःची जितकी जाहिरात केली नसेल, इतकी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोदींची जाहिरात केली. मोदींकडे बघा, मोदींचं राजकारण बघा, मोदींचं अर्थकारण बघा, मोदींनी केलेला विकास बघा, मोदींचं मॉडेल पाहा, गुजरात मॉडेल विकसित करणाऱ्या माणसाचे पाय धुऊन पाणी प्या, अशा प्रकारची भाषा राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये वापरली. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हीडिओ’ नावाची सीरिज सगळ्या भाषणांमध्ये दाखवली. मोदींचे व्हीडिओ जसे उपलब्ध आहेत तसे राज ठाकरे यांचे व्हीडिओ सुद्धा लोकांना उपलब्ध होते. २०१२ ते २०१४ या काळातील राज ठाकरेंनी मोदींचे गुणगाण केलेले सगळे व्हीडिओ भारतीय जनता पक्षाने लोकांच्या समोर आणले. राज ठाकरे काही साधेसुधे गृहस्थ नाहीत. ते अतिशय चाणाक्ष, धूर्त, ज्याला इंग्रजीत shrewd म्हणतो अशा प्रकारचे राजकारणी आहेत. त्यांना असं कुठे तरी वाटत होतं की, एका टप्प्याला भारतीय जनता पक्ष आणि मोदी शिवसेनेला सोडून देतील आणि महाराष्ट्र नमनिर्माण सेनेबरोबर युती करतील. त्यातून मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांची मैत्री होऊ शकेल. पण हे सगळं एकतर्फी प्रेमप्रकरण होतं. भाजप हा राज ठाकरे यांना वाटतो त्यापेक्षा अधिक धूर्त पक्ष होता आणि आहे. त्यांनी शिवसेनेला सोबत ठेवून खच्ची करण्याचा प्रयत्न केला आणि मनसेला अनुल्लेखाने मारलं. या सगळ्यांमुळे २०१४ नंतर आणि विशेषतः २०१५ नंतर राज ठाकरे नरेंद्र मोदींचे कडवे विरोधक बनलेले दिसतात. नोटबंदीच्या वेळी त्यांनी विरोध केला. जीएसटीच्या वेळी त्यांनी विरोध केला. पुलवामा आणि बालाकोटच्या वेळी निर्माण झालेल्या अतिरिक्त राष्ट्रवादावर (हायपर नॅशनॅलिझम) राज ठाकरे यांनी टीका केली. पण हे सगळं करत असताना राज ठाकरेंना मराठीचं राजकारण आणि हिंदुत्वाचं राजकारण या दोन स्वतंत्र, परस्परविरोधी आणि व्यावर्तक गोष्टी आहेत याचं भान नाही. त्यामुळे अजूनही मधूनमधून त्यांना हिंदुत्वाचं राजकारण करण्याचा झटका येतो. राम मंदिराचं राजकारण हा लोकांना भ्रमिष्ट बनवणारा भाग आहे, हे राज ठाकरेंच्या लक्षात येत नाही. राज ठाकरे अतिशय स्पष्टपणाने ‘मी सर्वधर्मीय, सर्वजातीय, सर्व प्रांतामधील मराठी माणसांचा अजेंडा पुढे  नेतो आहे’, असं ठामपणाने आणि सातत्याने लोकांपुढे बोलताना दिसत नाहीत.

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी फडणवीस, मोदी, अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काही प्रमाणात फायदा झाला असेल. पण त्यावेळी त्यांचं एक महत्त्वाचं गणित चुकलं, ते म्हणजे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अप्रत्यक्षपणे प्रचार केला. अतिशय अनुदारपणाने भाजपच्या ट्रोल आर्मीने ‘मनसेने आपला नेता काँग्रेस – राष्ट्रवादीला भाड्याने दिला आहे’, अशा टीका केली. पण राज ठाकरेंनी स्वतःचे पाच – दहा लोक निवडणुकीसाठी उभे करायला हवे होते. कदाचित मोदींच्या लाटेत ते पडले असते. पण राज ठाकरेंच्या भाषणांचा त्या उमेदवारांना फायदा होऊ शकला असता. मला असं वाटतं की, ही एक गंभीर चूक आहे. राज ठाकरेंनी राजकीय सभांचं चरित्र बदललं. नुसती भाषणबाजी करण्याऐवजी ‘लाव रे तो व्हीडिओ’ पद्धतीने दृक्श्राव्य माध्यमातून अनेक नवनव्या गोष्टी राजकीय प्रेक्षकांपुढे, राजकीय श्रोत्यांपुढे, राजकीय कार्यकर्त्यांपुढे आणून ठेवल्या. पण पक्षाचा उमेदवार त्यांनी उभा न केल्यामुळे ते सगळं मुसळ केरात गेलं असं मला वाटतं.

त्या नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाली आणि सगळीकडे याची चर्चा झाली की, ईडीकडून चौकशी झाल्यामुळे राज ठाकरे आता गप्प बसलेले आहेत. ते गप्प बसलेले आहेत की नाहीत हे त्यांच्या ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सभांमधून कळेल. पण जर त्यांनी यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली नसती तर मनसे हा पक्ष नेस्तनाबूत झाला असता, असं म्हणायला वाव आहे. उशिरा का होईना राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकलं, याबद्दल राज ठाकरेंच कौतुक केलं पाहिजे. त्यांनी शंभर – सव्वाशे जागांवर त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. या उमेदवारीचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादीला होतो, वंचितला होतो की भाजपला होतो, हे प्रत्यक्षात मतदान कसं घडेल यावर अवलंबून आहे. पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते आले ही महत्त्वाची गोष्ट आहे. जसं शिवसेनेने आदित्य ठाकरे या तरुण नेत्याला वरळीमधून उभं केलं, तशाच पद्धतीने राज ठाकरे यांनी स्वतःच २००९ साली विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी स्वःला ‘रिमोट कंट्रोल’ म्हटलं आणि ते निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिले. त्या प्रकारची चैन ठाकरे बंधूंना परवडणारी नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल म्हणून न वावरता प्रत्यक्ष राजकारण करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण तो मार्ग राज ठाकरे फारसा पत्करतायत असं दिसत नाही.

राज ठाकरेंनी शरद पवारांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनासुद्धा अशा प्रकारचा एक नवीन सहकारी हवा होता. पुण्यामध्ये जागतिक मराठी अकादमीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत पाहून एक ज्येष्ठ नेता आणि एक तरुण नेता यांचं साटंलोटं घडतंय की काय असं वाटतं होतं. तरीसुद्धा आताच्या आघाडीमध्ये राज ठाकरे नाहीत. तरी असं दिसतं की, अंतर्गत काहीएक अडजस्टमेंट झालीय. कोथरूड मतदारसंघामध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस – राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारची मतदारसंघनिहाय काहीएक तडजोड घडली असण्याची शक्यता आहे.

मला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो मनसेच्या ब्लू प्रिंटचा आहे. मागच्या आठवड्यात एका पत्रकाराने राज ठाकरे यांना विचारलं की, ‘तुमच्या ब्लू फिल्मचं काय झालं?’ त्यावर राज ठाकरेंनी हसत म्हटलं की, ‘मी ब्लू फिल्म काढत नाही, माझ्या पक्षाची ब्लू प्रिंट काढलेली आहे.’ महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये जी ब्लू प्रिंट काढली तो एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. पण टायमिंगचे बादशहा असलेल्या राज ठाकरे यांचं टायमिंग पूर्णतः चुकलं. ज्या दिवशी सेना – भाजप आणि काँग्रेस – राष्ट्रवादी या दोन आघाड्या आणि युत्यांमध्ये भंग झाला, त्यांच्यात घटस्फोट घडला, त्या दिवशी राज ठाकरेंनी आपली ब्लू प्रिंट आणली. तेव्हा त्या ब्लू प्रिंटकडे ढुंकूनही बघायला राजकीय पक्षांकडे वेळ नव्हता. मला असं वाटतं की, गेल्या पाच वर्षांमध्ये ‘माझी ब्लू प्रिंट काय आहे आणि मला महाराष्ट्राचा विकास कसा हवाय?’ हे सांगत राज ठाकरेंनी तालुक्या- तालुक्यांमध्ये जाऊन लोकांशी बोलायला पाहिजे होतं. पण त्या प्रकारचं सक्रिय राजकारण राज ठाकरे करताना दिसत नाहीत. ते काहीसं शिवाजी पार्ककेंद्री आणि शिवाजी पार्क हाच महाराष्ट्र आहे, असं मानून केलेलं राजकारण आहे. या प्रकारच्या शहरी, नागर चेहऱ्याच्या राजकारणाला कितीही मोठी लाट आली तरी महाराष्ट्रामध्ये यश मिळेल असं वाटत नाही.

राज ठाकरे सतत असं म्हणत असतात की, ‘मला एकहाती सत्ता द्या.’ त्यांच्यासारख्या शहाण्या माणसाला हे कळलं पाहिजे की, भाजपसारख्या प्रचंड प्रबळ पक्षालासुद्धा महाराष्ट्रावर एकहाती राज्य करता येत नाही. मग मनसेसारख्या परिघाबाहेर फेकलेल्या गेलेल्या पक्षाला एकहाती राज्य करायला मिळण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणून राज ठाकरेंनी तळापासून म्हणजे ग्रामसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत समविचारी मित्र, समविचारी राजकीय पक्ष जोडले पाहिजेत. राज ठाकरेंनी किंवा शिवसेनेने मराठीचं जे राजकारण उभं केलेलं आहे ते सुहास पळशीकरांच्या शब्दांत सांगायचं तर प्रतिक्रियात्मक, प्रतीकात्मक आणि शत्रूकेंद्री आहे. कोणी उत्तर भारतीय शत्रू म्हणून निवडला तर कोणी दक्षिण भारतीय शत्रू म्हणून निवडला. पण या शत्रूंच्या पलीकडे जाऊन मराठीच्या खऱ्या प्रश्नांना भिडणारं राजकारण त्यांनी केलं नाही. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतायत, सरकार प्रशासनामध्ये मराठीचा वापर करत नाही, न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करत नाही, तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर करत नाही किंवा मराठी भाषा विभाग सक्षम होत नाही, मराठी भाषा भवन बांधलं जात नाही. मराठी विद्यापीठ स्थापन केलं जात नाही, या सगळ्याला परप्रांतीय लोक जबाबदार नाहीत, या सगळ्याला आपलेच लोक जबाबदार आहेत. या प्रकारचं मराठीचं राजकारण करण्याची राज ठाकरे यांची इच्छा आणि क्षमता आहे का याबद्दल मला प्रश्न आहेत.

आज शिवसेना हिंदुत्वाकडे वळलेली असताना आणि मनसे अत्यंत कोपऱ्यात पडलेली असताना या प्रकारच्या नव्या राजकारणाला वाव आहे, ज्याला मी ‘मराठीकारण’ असं म्हणतो. जे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांचं राजकारण, संस्कृतीकारण आणि अर्थकारण आहे; जे सकारात्मक, रचनात्मक, विधायक आहे; असं राजकारण उभं राहिलं पाहिजे. राज ठाकरेंच्या एका तपातल्या यशापयशाचा अर्थ जर काही असेल, शिवसेनेच्या पन्नास वर्षातल्या यशापयशाचा अर्थ जर काही असेल तर या दोन सेनांच्या राजकारणापलीकडे जाऊन मराठीचं नवं राजकारण उभं केलं पाहिजे हा आहे. ही पोकळी आपण कधी आणि कशी भरणार हा प्रश्न माझ्या दृष्टीने राज ठाकरेंचं काय होणार याच्याइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.

(सदर लेख १० ऑक्टोबर २०१९ रोजी लोकसत्ता ऑनलाईनवर प्रकाशित करण्यात आलेल्या व्हीडिओवरून शब्दांकित करण्यात आलेला आहे. व्हीडिओ पाहण्यासाठी लिंक https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/raj-thackeray-dr-deepak-pawar-equations-between-raj-thackeray-and-bjp-and-narendra-modi-1989864/)

 

  • डॉ. दीपक पवार

(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. vilasrose

    लेख अतिशय आवडला.मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरे यांच्या राजकारणाचा साद्यंत आढावा सविस्तर मांडला आहे.

  2. Mukund Gajanan Korde

    Raj Thackeray or for that matter any Maharashtra based party should endeavour to bring about economic prosperity to the people of this state. to give just a small example,many new towers are being constructed in Mumbai and Pine. Each tower requires services like milkbdelivery, newspaper delivery, car washing. Car driving laundry services. Maid serviced. cook services. darning services. plumbing services, electrical fitting services, painting services etc etc. The parties should concentrate on capturing these services for the local people butter find that north zindians have established a monopoly on these services. Let’s start from the bottom.

Leave a Reply