पहिले ते मराठीकारण – महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होणार?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला काही वेळा उपरोधाने सोनिया काँग्रेस म्हणण्याची पद्धत आहे. या पक्षाबद्दल आज मी बोलणार आहे. गेल काही वर्षे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि संघ परिवाराचे लोक हा देश काँग्रेसमुक्त झाला पाहिजे, अशा पद्धतीची विधानं करताना आपल्याला दिसतात. ज्या पद्धतीचं यश किंवा यशाचा अभाव काँग्रेस पक्षाच्या बाबतीत २०१४ मध्ये आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसला, तो पाहता भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांना काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या प्रक्रियेत यश येतंय की काय अशा प्रकारची शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते. पण माझ्यासमोरचा आजचा खरा प्रश्न तो नाहीय, माझ्यासमोरचा खरा प्रश्न हा आहे की, काँग्रेसमुक्त भारतासाठी किंबहुना आता महाराष्ट्रपुरतं बोलायचं तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी काँग्रेस स्वतःच प्रयत्न करतोय की काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये येते. हे विधान मी का करतो? तर २०१९ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, तिच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा चालू आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेले वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पातळीवरील अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. याबद्दल आपल्याला तक्रार करता येऊ शकते की, या माणसांनी महाराष्ट्रामध्ये येऊन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतं का मागावीत? पण आज त्या पक्षाकडे सत्ता आहे, त्या पक्षाकडे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये माणसं आहेत आणि त्यांना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर लढू द्यायची नाही. कारण महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर ही निवडणूक तुम्ही लढायला घेतलीत की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, अवर्षणाचा प्रश्न इथपासून ते मुंबईतल्या आरेतली झाडं रात्री का तोडली गेली? इथपर्यंतच्या प्रश्नांवर भरातीय जनता पक्षाला बोलावं लागेल. आणि ते बोलावं लागू नये म्हणून कलम ३७०, बालाकोट, पुलवामा, काश्मीरमधील परिस्थिती, अशा प्रकारच्या तथाकथित राष्ट्रीय म्हणजे अतिरिक्त राष्ट्रवादी (हायपर नॅशनालिस्टिक) मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढवतो आहे.

पण याबद्दल सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला आणि मला वाईट वाटून उपयोग नाही. ज्यांना वाईट वाटायला पाहिजे आणि ज्यांनी त्याला विरोध केला पाहिजे असे लोक म्हणजे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतले असायला हवेत. या दोन पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये किमान थोडा फार जीव आहे. स्वतः शरद पवार महाराष्ट्रभर फिरतायत. आणि कधी नव्हे ती या पक्षाची सूज उतरल्यामुळे तरुण कार्यकर्त्यांचा संच सभांमधून या पक्षाच्या अवतीभवती दिसतो आहे. शरद पवारांच्या सभांना प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या पातळीवर काँग्रेस काय करतेय? तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडून द्यायचं आहे, अशा प्रकारचा त्रागा सुरू केला आणि गेली चार – साडेचार महिने राहुल गांधी हे विजनवासामध्ये आहेत. ज्या प्रमाणात राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केले, भारतीय जनता पक्षाच्या ट्रोल आर्मीने ज्या पद्धतीनं त्यांना पप्पू म्हणून हिणवलं, त्यातनं बाहेर पडून त्यांनी एक समर्थ विरोधक म्हणून आपल्या पक्षाचा प्रचार केला. त्यांना जर काँग्रेस पक्षातल्या देशभरातल्या संस्थानिकांनी मदत केली असती तर २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची इतकी वाईट अवस्था झाली नसती. त्यामुळे आपण काम करतो, पक्षांमधली नवी माणसं काम करतात, पण वर्षानुवर्षं जागा बळकावून बसलेले काँग्रेस पक्षातले ठग, संस्थानिक मंडळी मात्र कोणत्याही प्रकारचे बदल करायला इच्छुक नाहीत; हे पाहून राहुल गांधीसारख्या माणसाने आपल्याला पक्षाध्यक्ष पद नको, असं म्हटलं तर त्याबद्दल फारसं आश्चर्य बाळगण्याचं कारण नाही.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मध्ये चार – साडेचार महिन्यांचा कालावधी गेला. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर महाराष्ट्रातले या पक्षाचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा प्रचार करत होते. दुसऱ्या कोणत्याही पक्षात हे घडलं असतं तर त्यांची तात्काळ त्या पक्षातून हकालपट्टी झाली असती. पण काँग्रेस पक्ष इतका लकवा मारलेला आणि गलितगात्र पक्ष होता की, या पक्षाने कोणत्याही प्रकारची कारवाई राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली नाही. त्यामुळे अनेकांची भीड चेपली आणि मे  ते ऑक्टोबर या काळात अनेक नेते भारतीय जनता पक्षात किंवा शिवसेना या पक्षांमध्ये सामील झाले. राधाकृष्ण विखे गेल्यानंतर बाळासाहेब थोरातांची नेममूक झाली. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या काँग्रेस पक्षाच्या दोन प्रमुख व्यक्ती मानल्या जातात. सुशीलकुमार शिंदे ज्यांचं संपूर्ण राजकारण सतत हसत राहण्यावर अवलंबून आहे, अशी मला अनेकदा सार्थ शंका वाटते, या माणसाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात किती धावपळ केली? म्हणजे अशोक चव्हाण त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर नाहीत, पृथ्वीराज चव्हाण जे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे गृहस्थ मानले जातात, त्यांनी सुद्धा हिंडूनफिरून या पक्षासाठी फार काही काम केल्याचं दिसत नाही. आणि सुशीलकुमार शिंद्यांचा सगळा भऱ आपली मुलगी निवडून येते की नाही याच्यावर होता. त्यामुळे आज महाराष्ट्रातला हा पक्ष निर्नायकी अवस्थेत  आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन पक्षाशी आघाडी केली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी जवळपास २६० च्या आसपास जागांवर निवडणुका लढवण्याचं ठरवलेलं आपल्याला दिसतं. अशा परिस्थितीमध्ये या पक्षांनी किती फिरून प्रचार केला पाहिजे? सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, स्वतः शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ असे नेते या पक्षाचा प्रचार करताना दिसतात. याचा अर्थ प्रचार केला, सभांना लोक उपस्थित राहिले, की निवडणुकांमध्ये यश मिळतं अशातला भाग नाही. पण किमान या पक्षामध्ये काहीएक हालचाल होताना दिसतेय. काँग्रेस पक्षामध्ये मात्र काहीच हालचाल दिसत नाही. सुदैवाने आता काही बरी माणसं काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर आली आहेत. समाजवादी चळवळीतून कार्य करणारा युवराज मोहितेसारखा कार्यकर्ता गोरेगावमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढतो आहे. तिथे ज्या विद्यमान आमदार आहेत विद्या ठाकूर, त्यांचा कामाच्या बाबतीत फार लौकिक नाही, पण होर्डिंग्जचा फार लौकिक आहे. अशा प्रकारच्या माणसाला बळ देण्यासाठी काँग्रेस पक्षाने खूप काम करण्याची गरज आहे. अशी वेगवेगळ्या क्षेत्रांतली माणसं, जी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला कंटाळून किंवा त्याला विरोध करण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आलेली आहेत, या माणसांना बळ देण ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे.

राहुल गांधींनी महाराष्ट्रात आता एक – दोन सभा घेतल्या, पण देशाचा पंतप्रधान जर दहाएक सभा घेऊ शकतो, देशातला सगळ्यात मोठ्या पक्षाचा प्रमुख जर वीसेक सभा घेऊ शकतो आणि घरोघरी भारतीय जनता पक्ष, संघ परिवारातले लोक वारंवार जाऊ शकतात; तर मग काँग्रेस पक्षाने आता त्यांची पाठ भिंतीला टेकलेली असताना या पद्धतीने प्रचार का करू नये? असा प्रश्न मला पडतो. मध्यंतरी आमच्या एका मित्राने असं विनोदाने म्हटलं होतं की, खरं तर लोकांनी आता ‘काँग्रेस साहाय्य संघा’ची स्थापना केली पाहिजे, कारण काँग्रेस स्वतःच्या बळावर काही करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती दिसत नाही. महाराष्ट्रातल्या काँग्रेसने १९९९ ते २०१४ या काळामध्ये कमालीची माती खाल्लेली आहे. काही मोजक्या लोकांच्या हाती सत्ता केंद्रित झाल्यामुळे, काही मोजक्या घराण्यांमध्ये सगळी व्यवस्था गेलेली असल्यामुळे आणि त्यांना नागर महाराष्ट्राचं, शहरी भागातल्या महाराष्ट्राचं अजिबात भान नसल्यामुळे काँग्रेस पक्ष जवळपास महाराष्ट्रातल्या राजकारणातून बेदखल झालेला आहे, असं आपल्याला दिसतं. ही पोकळी भारतीय जनता पक्षाने भरून काढली. ही पोकळी काही प्रमाणात शिवसेना पक्ष भरून काढताना आपल्याला दिसतंय. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने शाहणपणाने अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलासुद्धा सोबत घ्यायला पाहिजे होतं. पण या पक्षामध्ये संजय निरूपम यांच्यासारखी काही उठवळ मंडळी होती, जे स्वतः शिवसेनेतून या पक्षामध्ये आले आणि ज्यांनी फारसं काही काम केलं नाही. केवळ दिल्लीतल्या माणसांचे व्यवहार सांभाळण्याच्या बळावर कृपाशंकर सिंह आणि संजय निरूपम यांची मुंबई काँग्रेसमध्ये वारंवार बढती झाल्याचं आपल्याला दिसतं. कृपाशंकर सिंह यांच्यावर कमालीच्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे, वर्षानुवर्षं काँग्रेस  पक्षाने यांना बांधून ठेवलं, कधीही हकालपट्टीची ताकद दाखवली नाही. या कृपाशंकर सिंहाना मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे असं वाटलं. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना गुदमरल्याची जाणीव झाली. संजय निरूपम यांनी मल्लिकार्जुन खर्गे हे आपलं ऐकत नाहीत, हे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. एवढंच नव्हे तर राफेल विमानाच्या चाकांशी लिंबू – मिरची ठेवल्याबद्दल राजनाथ सिंह यांच्यावर देशभरातून टीका होत असताना संजय निरूपम यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका करून हे नास्तिक आहेत, अशा प्रकारचं मूर्ख विधान केलं. ज्या पक्षामध्ये अशा प्रकारचे उठवळ कार्यकर्ते आहेत, त्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये काही भवितव्य आहे असं मला वाटत नाही.

महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या राजकारणाला कंटाळलेले, विशेषतः भाजपच्या दडपशाहीच्या आणि लोकांना चेपवून टाकण्याच्या वृत्तीला कंटाळलेले असे अनेक लोक आहेत, की ज्यांना काँग्रेस जगावी असं वाटतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मात्र असं वाटतं की, काँग्रेस जगवणं हे काँग्रेसवाल्यांचं काम आहे. महाराष्ट्रातल्या बिगरभाजप, बिगरसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेस जगवण्याच्या नादामध्ये स्वतःमधली राजकीय सर्जनशीलता वाया घालवता कामा नये. आज  महाराष्ट्रामध्ये उदारमतवादी (left of the center ) राजकारणाची पोकळी निर्माण झालेली आहे, मराठीवादी अशा राजकारणाची पोकळी निर्माण झालेली आहे; ही पोकळी भरून काढण्यासाठी जर काँग्रेस पक्ष काम करणार नसेल तर काँग्रेसचं मढं पुन्हा उचलून बसवून त्याच्यात जीव घालण्यापेक्षा नव्या राजकीय पर्यायांचा आपण आग्रहाने विचार केला पाहिजे. काँग्रेसने स्वतःच्या बळावर मेहनत करून हा पक्षा टिकला तर चांगलीच गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये काहीएक विरोध करण्याची क्षमता या पक्षामध्ये आहे. पण सौम्य (सॉफ्ट) हिंदुत्वाचा आधार घेऊन आणि अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करून काँग्रेस पक्ष अजिबात टिकू शकणार नाही. किंबहुना काँग्रेस पक्षाने कधी अल्पसंख्याकांचं, कधी बहुसंख्याकांच लांगुलचालन करूनच स्वतःला गाळात नेलेलं आहे. त्यामुळे हा पक्ष जर टिकायला हवा असेल तर या पक्षामधल्या निवडणुकांच्या काळात गोळा होणाऱ्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे वावरणाऱ्या अशा भूछत्र वृत्तीच्या कार्यकर्त्यांपासून दूर जाऊन खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. ते कार्यकर्ते प्रशिक्षित असायला पाहिजेत, ते नुसते निवडणुकीपुरते झुंडीने येणारे कार्यकर्ते असता कामा नयेत, एवढं शाहणपण काँग्रेस पक्षामध्ये असेल तर ते लोकांच्या मतदानामधून दिसेल. आणि तेवढं शहाणपण काँग्रेस पक्षामध्ये नसेल तर हा पक्ष रसातळाला जाईल. त्याच्या रसातळाला जाण्याबद्दल आणि मृत्यूबद्दल फार सुतक मनाला लावून घेण्याचं कारण नाही. राजकारणामध्ये पोकळी चालत नाही. या नंतरच्या काळामध्ये नवे पर्याय भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांच्या राजकारणाला तोंड देणारे आणि त्यातही मराठीवादाचा आग्रह धरणारे निश्चितपणाने उभे राहतील असा मला विश्वास वाटतो.

(सदर लेख ‘लोकसत्ता ऑनलाईन’वर १८ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या व्हीडिओवरून शब्दांकित करण्यात आलेला आहे.  व्हीडिओ पाहण्यासाठी लिंक https://www.youtube.com/watch?v=pK86EREbZMg&feature=youtu.be)

 

–  डॉ. दीपक पवार

(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. vilasrose

    लेख आवडला.काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीचे नेमके वर्णन या लेखात केले आहे.

Leave a Reply