fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

माझी भाषा परिक्रमा

“…असाच जीवघेणा वाटावा असा प्रसंग नागालँडमध्ये घडला. दिमापूरला उतरल्यानंतर कोहिमात प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी तिथल्या न्यायालयात गेलो होतो. अर्ज दिल्यानंतर थोडा वेळ थांबावं लागणार होतं. म्हणूनच जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं अचानक एक व्यक्ती आली. माझी चौकशी करू लागली. मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी कोणासाठी काम करतो, माझ्याकडे काय सामान आहे, असे प्रश्न विचारले. माझं ओळखपत्र तपासलं. आणि अचानक स्वतःचं टीशर्ट वर करून त्याने त्याच्या जीन्समध्ये खोचलेली बंदूक बाहेर काढली. माझ्या दिशेने रोखली आणि विचारलं ‘ऐसा कुछ सामान तो आपके बॅग में नहीं है ना?’ आता मी घाबरलो होतो हे वेगळं सांगायला नको. मी त्याला माझं सगळं सामान दाखवलं. त्यानंतर मात्र तो माझ्याशी एखाद्या मित्रासारखा वागला. रात्रीचा बाहेर पडू नकोस, काम संपल्यावर शांतीनं निघून जा असे प्रेमळ सल्लेही दिले. एकच सांगेन, सिनेमात किंवा पोलिसांच्या कंबरेला खोचलेली बंदूक पाहणं आणि प्रत्यक्ष तुमच्यावर रोखलेली बंदूक पाहणं हे दोन्ही सारखं नाही. पहिल्यात थरार असू शकेल, पण दुसरं जीवघेणं भीतीदायक आहे. हा प्रसंग मी लागलीच दीपक पवारांना फोनवरून कळवला आणि नेमकं त्यानंतरच माझं नेटवर्क काही काळासाठी गेलं. ते जसं आलं तसा पहिला फोन दीपक पवारांचाच होता, मी सुखरूप होतो की नाही हे समजून घेण्यासाठी. माझं नेटवर्क जाणं ते परत येणं या काळात त्यांना काय वाटलं असावं हे खरंच त्यांनाच ठाऊक. मी माझ्या घरातल्या कोणालाही हा प्रसंग सांगितला नव्हता. फक्त सनीला फोन करून कळवलं. ‘दादा मी आज घोडा पाहिला.’ त्यानं विचारलं, ‘पांढरा होता का?’ मी एवढंच म्हटलं, ‘चार पायांचा घोडा नाही, घोडा म्हणजे चाप असलेली बंदूक.’ मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते तुषार पवार यांनी भारतातल्या विविध राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या स्थितिगतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. इथे ते आपल्या याच भाषा परिक्रमाबद्दल सांगत आहेत – 

———————————————————————————-

सामान्यतः कोणत्याही पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाचं मनोगत असतंच. पण हा नियम पाळायलाच हवा म्हणून काही मी हे मनोगत लिहिलेलं नाही. खरं तर रुढार्थानं मी लेखकच नाही. हा मराठी अभ्यास केंद्रानं हाती घेतलेल्या एका प्रकल्पाचा अहवाल आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझी होती, म्हणून तो मी मांडतोय इतकंच. हा अहवाल कोणत्याही सांख्यिकीऐवजी अनुभव, वक्तव्य आणि वैचारिक मतं यावर आधारलेला आहे. त्यामुळेच मला हा अहवाल टक्केवारीच्या किंवा कोणत्याही पद्धतीनं प्रमाण मांडू शकेल अशा स्वरूपात मांडता येणं शक्यच नव्हतं. या अपरिहार्यतेमुळे कदाचित नेहमीच्या अहवालांच्या चौकटीपलीकडचं म्हणून हे पुस्तक हाही एक भाग आहेच. साहजिकच पुस्तक आहे म्हणून मी त्याचा लेखक आहे. पण त्याही पलीकडे या अहवालवजा पुस्तकाच्या निर्मितीचीही काहीएक गोष्ट आहे, या गोष्टीचाही एक प्रवास आहे. जो माझ्यासारख्या सामान्य मुलाला रोचक – रंजक वाटतो. या प्रवासाला भावनिक, विचारविश्व समृद्ध करणाऱ्या, सुन्न करणाऱ्या आठवणींची किनार आहे. हे पुस्तक समोर येत असताना हे सगळं मला आठवतंय, म्हणून ते मला मांडावंसं वाटतंय. या पुस्तकातल्या मजकूर आणि आशयाला तुम्ही अनेक कसोटींवर नक्कीच तपासून पाहाल; पण पुस्तक येण्यापर्यंतचा प्रवास हा ‘मी भारत फिरलो आणि अमुक तमुक अनुभवलं’ हे जितकं सहज लिहिलं तितका सहज नक्कीच नव्हता. मग तो कसा होता, हे मी सांगितल्याशिवाय नक्कीच कळणार नाही, समजणार नाही. तो खरंच मी म्हणतोय तसा रोचक रंजक आहे का? हे ही ठरवता येणार नाही. म्हणून हा प्रवास कसा होता हे सांगणं ही माझीच जबाबदारी, आणि त्यासाठीच हा मनोगतचा प्रपंच.

खरं तर मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेला मी एक सामान्य मराठी भाषक माणूस. माझ्या या इच्छेवरच्या निष्ठेनं आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काय करायला हवं याबाबत मराठी अभ्यास केंद्राकडे असेलेल्या वैचारिक भूमिकेतल्या स्पष्टतेनंच माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकाला मराठीच्या चळवळीतला एक कार्यकर्ता केलं. आता चळवळीला कार्यकर्ता तर मिळाला, पण आपल्या कार्यकर्त्याकडून आपल्याला काय हवंय, ज्यामुळे चळवळ ठोसपणे पुढे जात राहील, याची समज असणारं नेतृत्व गरजेचं असतं. डॉ. दीपक पवारांच्या रूपात मराठी अभ्यास केंद्राला ते लाभलंय. आणि असं नेतृत्व तुमच्याकडे असलं की काय होतं ते म्हणजे मराठी अभ्यास केंद्रानं आजवर हाती घेतलेले वेगवेगळे प्रकल्प. हा प्रकल्पही त्यापैकीच एक. संस्थेसाठी काम करणारा कार्यकर्ता संस्थेचं कार्यालय सांभाळण्यापुरता राहू नये आणि अशा कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी इतरांनी केलेली आर्थिक मदतही काहीएका ठोस कामासाठी उपयोगात आणायला हवी हीच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच दीपक सर या प्रकल्पासाठी दिवंगत शशिकलाताई काकोडकरांकडून आर्थिक सहकार्य मिळवू शकले.

या प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर तो कशा रीतीनं पूर्ण करणार आहोत याबद्दलची ढोबळ रूपरेषा आम्ही ठरवली होतीच. मात्र प्रत्यक्ष प्रकल्प पूर्ण करताना विचार करणं जेवढं सोपं होतं,  तेवढाच तो तडीस नेणं आव्हानात्मक होतं. कारण भारताच्या नकाशावर ओळखीच्या वाटणाऱ्या मात्र प्रत्यक्षात अनोळखी असलेल्या राज्यांचा प्रवास करायचा होता. या प्रवासाचं, तिथे राहण्या – खाण्याचं नियोजन आम्हाला पर्यायानं स्वतःला करायचं होतं. ओळख नसलेल्या माणसांची भेट घ्यायची होती. मुळात ज्यांच्याकडून माहिती मिळू शकेल अशा माणसांचा शोध घेण्यापासूनच सुरुवात करायची होती. आणि प्रत्यक्षात हे सगळं मला पार पाडायचं होतं. साहजिकच त्याचं दडपण आणि ताण होताच. कारण मी जसं वर म्हटलं तसं मी सामान्य मराठी भाषक. माझी मराठी भाषेच्या विकासाबाबत स्वतःची अशी काही भूमिकाच नव्हती. होतं ते केवळ मराठी भाषेवरचं प्रेम. मराठी अभ्यास केंद्राशी जोडला गेल्यानंतरच केवळ मराठीच्याच नाही तर एकूणच भाषाविकासाच्या प्रक्रियेबद्दलचं माझं आकलन वाढत गेलं आणि त्यातूनच माझी याबद्दलची भूमिकाही आकाराला येत गेली. साहजिकच मी या संपूर्ण प्रक्रियेतला नवा माणूस, ज्याचा यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी काहीही संबंध आला नव्हता. त्यामुळेच हा इतका मोठा प्रकल्प तडीस नेण्याचं दडपण माझ्यावर आलं होतं हे मी नाकारूच शकत नाही. पण अशाच प्रकारचं काहीतरी करण्यासाठी मी नोकरी सोडून अभ्यास केंद्रात आलो होतो. आणि हा प्रकल्प त्या दृष्टीनं मिळालेली मोठी संधी होती हे मला मान्य करावं लागेल. त्याच विश्वासानं या प्रकल्पाकडे मी पाहिलं आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते आज आलेलं पुस्तक अशा टप्प्याटप्प्यानं तो पूर्ण करू शकलो.

प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर लगेचच क्षेत्रभेटी सुरु केल्या नाहीत. देशातल्या प्रत्येक राज्यांमधल्या राजभाषा, त्यासाठी तिथे केलेले राजभाषा कायदे, तिथल्या भाषिक चळवळी आणि कार्यकर्ते, तिथल्या भाषांच्या स्थितिगतीविषयी काहीएक परिस्थिती मांडणारे लेख असा काही मजकूर इंटरनेटवरून मिळवता येतो का हे सुरुवातीला पाहिलं. जेणेकरून प्रत्यक्ष क्षेत्रभेटींत काय करायचं याबद्दल काहीतरी ठरवता येईल असं वाटलं होतं. पण काही राज्यांतले राजभाषा कायदे सोडले तर इंटरनेटवरून हाती फारसं काही गवसलंच नाही.  प्रत्येक राज्यात मला किमान एक माणूस किंवा एक संस्था अशी शोधायची होती, जी त्या राज्यातल्या माझ्या दौऱ्याची दिशा ठरवण्यात मदत करू शकेल. मग त्यासाठी पत्रकार, लेखक, साहित्यिक संस्था, विद्यापीठांतले भाषेचे शिक्षक असा एक गाळणी लावलेला शोध मला सुरू करावा लागला. पण तोही प्रत्येक ठिकाणी लागू पडला नाही. मुंबईत बसून अशाप्रकारची माहिती केवळ दक्षिणेकडच्या राज्यांबद्दल उपलब्ध होत होती. मात्र इतर राज्यांमधलं फारसं काही हाती लागलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रभेटींनंतरच ठोस माहिती  मिळू शकेल आणि त्या त्या राज्यात जाऊन काय करायचंय हे प्रत्यक्ष तिथेच जाऊन ठरवावं लागेल याची आम्हा सगळ्यांनाच स्पष्टता आली. आणि हेच माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.

क्षेत्रभेटींना सुरुवात करताना आधी कोणत्या राज्यापासून सुरुवात करावी हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. कारण सगळीच राज्यं अनोळखी आणि मला कोणाच्याही सोबतीशिवाय एकट्याला प्रवास करायचा होता. दक्षिण भारत, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि गुजरातसह मध्य आणि पूर्वेकडची राज्ये अशी दौऱ्यासाठी राज्यांची विभागणी करायचं निश्चित झालं. यातली सोपी आणि खडतर राज्य कोणती याबद्दलही आमच्यामध्ये चर्चा होत होती आणि खरं सांगावं तर या

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. फारच वेगळा अनुभव. लेख आवडला

  2. Amzing!!!!

Leave a Reply

Close Menu