संपादकीय – धर्मकारण की भाषाकारण?

आज मराठी भाषा संकटात आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईतील मराठी शाळा बंद पडत आहेत. ह्या परिस्थितीला एकटी शिवसेना जबाबदार नसली तरी ही परिस्थिती बदलण्यासाठी जिच्याकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाऊ शकते ती शिवसेनाच आहे. मराठी शाळाच टिकल्या नाहीत तर मराठी संस्कृतीचे काय होणार हा प्रश्नच आहे. राज्याचे मराठीपणच टिकणार नसेल तर हे राज्य मराठी आहे असे म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे धर्माचे राजकारण सोडून भाषेच्या राजकारणाकडे शिवसेनेने वळण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीकारणाचा आजवर दुर्लक्षित राहिलेला मुद्दा पुन्हा हाती घेण्याची गरज आहे. शिवसेनेने हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडचिट्ठी देऊन मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या राजकारणाकडे वळायला हवे हे अनेक शिवसैनिकांना इतक्या वर्षांच्या सवयीनंतर रुचणार नाही. पण शिवसेनेच्या स्थापनेचा  इतिहास पाहिला तर तोच शिवसेनेसाठी स्वाभाविक कार्यादेश आहे.

——————————————————————————————-

शिवसेना राजकीय पक्ष म्हणून आज एका नवीन वळणावर उभी आहे. पारंपरिक मित्रपक्षाला सोडून काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षांशी महाआघाडी करून शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांआधी असे काही सत्तासमीकरण महाराष्ट्रात आकाराला येईल याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे आणि स्वतः मा. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे हे सर्व राज्याच्या जनतेच्या हिताचे आणि राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेच्या स्थित्यंतराचे असले तरी अचंबित करणारे आहे. शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असेल याची काही एक कल्पना करता आली तरी येणाऱ्या काळात नक्की काय काय  घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणत्या कारणांमुळे आणि कोणत्या परिस्थितीत मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले याची सर्वांना कल्पना आहे. एक मात्र खरे की,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेल्या शिवसेनेला आता आपल्या मूळ कार्यक्रमाकडे वळण्याची संधी नव्या सत्तासमीकरणामुळे चालून आली आहे. त्याचे सूतोवाच मा. उद्धवजींच्या एका वक्तव्यावरून झालेले आहे. धर्म आणि राजकारण यांची गल्लत शिवसेनेकडून झाल्याची खंत मा. उद्धवजींनी व्यक्त केली आहे. मधल्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून शिवसेनेचा कल मराठीकारणापेक्षा हिंदुत्वाकडे झुकला होता. खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणात बेदखल असलेल्या भाजपला शिवसेनेनेच सत्ता आणि जनाधार मिळवून दिला आहे. एरव्ही, विकासाच्या आडून धर्माचे राजकारण करणाऱ्या ह्या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणात बस्तान बसवणे अवघड होते. असे असूनही केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीशी महाआघाडी करून सरकार स्थापन केले म्हणून भाजपच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे. सत्ता गमवावी लागल्यामुळे आलेल्या नैराश्यातून शिवसेनेला सतत टीकेचे लक्ष्य केले जात आहे. ह्या टीकेचा मुख्य मुद्दा शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात आहे हा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वापासून काही काळ तरी दूर जावे लागत असेल किंवा भविष्यात हिंदुत्वाच्या राजकारणाचा त्याग करून मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवून प्रदेशसीमित राजकारण करायचे असेल तर ते भाजपाच्या नसले तरी महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने शिवसेनेच्या हिताचेच असणार आहे. त्यामुळे बदललेले सत्तासमीकरण ही आपत्ती नसून इष्टापत्तीच आहे. आपत्ती असलीच तर ती देशाच्या विविधतेशी, धर्मनिरपेक्षतेशी फारकत घेऊन हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपसाठी आहे. शिवसेनेने ह्या दुष्कर्मात सहभागी होण्याचे नाकारल्यामुळे भविष्यात भाजपवर राष्ट्रीय स्तरावरही सत्ता आणि प्रतिष्ठा गमावण्याची वेळ आली तर त्याचे आश्चर्य वाटू नये. झारखंडमधील सत्तांतराने याची सुरुवात झालेलीच आहे. तेव्हा हिंदुत्वापासून दूर जावे लागत असल्याबद्दल शिवसेनेने खेद वा खंत करण्याचे काहीच कारण नाही. शिवसेनेने आजवर कधीच जातिपातीचे राजकारण केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तळागाळातील सामान्य कुटुंबातील बिनचेहऱ्याच्या माणसांना शिवसेनेनेच प्रथम सत्तेच्या प्रवाहात आणले. मात्र प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसनेने धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपला अनावश्यकपणे मोठे केले. आता महाराष्ट्राच्या हिताचे मराठीकारण करण्याची  अभूतपूर्व संधी शिवसेनेकडे चालून आली आहे. ही संधी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांसाठीही आहे. हिंदुत्वाला विरोध करण्याचा नादात अल्पसंख्याकांचा अनुनय आणि प्रादेशिक अस्मितेकडे दुर्लक्ष केल्याची  जनमानसातील आपली प्रतिमा बदलण्याची संधी या दोन्ही पक्षांना प्राप्त झाली आहे. युती तुटण्याचा सर्वाधिक फटका भाजपला असून शिवसेनेला आता आपल्या मनाप्रमाणे राज्याच्या हिताचे राजकारण करता येईल आणि भविष्यात स्वबळावर सत्ताही प्राप्त करता येईल.

शिवसेना हा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला असला तरी हा पक्ष आजवर भारतातील इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे स्वबळावर सरकार स्थापन करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. तमिळनाडूमध्ये करुणानिधी, जयललिता, उत्तरेत मायावती, प. बंगालमध्ये ममता, तेलंगणात के चंद्रशेखर राव, आंध्रात चंद्राबाबू नायडू, जगनमोहन रेड्डी यांना आपापल्या राज्यांत एकहाती सत्ता मिळवता आली पण  बाळासाहेबांसारखा करिष्मा असलेला लोकनेता असूनही शिवसेना स्वबळावर सत्ता मिळवू शकली नाही हे कटू वास्तव आहे आणि ते आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. राज्याच्या राजकारणात दूरान्वयाने संबंध असलेले हिंदुत्व, भारत-पाकिस्तान संबंध, आक्रमक राष्ट्रवाद, अयोध्येत राममंदिर हे मुद्दे घेऊन शिवसेनेने राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला बळ दिले असले तरी प्रादेशिक पक्ष म्हणून स्वतःचे नुकसान करून घेतले. युतीमध्ये सत्तेत असतानाही भाजपने शिवसेनेला सतत दुय्यम व अपमानास्पद वागणूक दिलेली आहे.’मराठी मना तुझ्यासाठी शिवसेना’ असे म्हणणारी शिवसेना भाजपच्या नादी लागून ‘हिंदू भडकला भगवा फडकला’ असे म्हणू लागली तेव्हा शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठीच्या राजकारणासाठी शिवसेनेची सोबत करणारा एक मोठा वर्ग शिवसेनेपासून दुरावला. हा वर्ग आता शिवसेनेशी जोडला जाईल. ब्राम्हणी वर्चस्वातून हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपचा पारंपरिक मतदार हा युतिधर्म म्हणून शिवसेनेला मतदान करीत असला तरी तो मनाने कधीही शिवसेनेसोबत नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. त्याची पाळेमुळे संघाच्या शाखांमधून रुजलेली आहेत. बाळासाहेबांना मिळालेली  ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी ह्या वर्गाने केवळ मतलब साधण्यासाठी आपद्धर्म म्हणून नाइलाजाने स्वीकारली

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. vilasrose

    शिवसेनेचे काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाणे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मानणार्या बहुसंख्य लोकांना आवडलेले नाही.येणारा काळच त्याचे उत्तर देईल.
    शिवसेनेने पुन्हा जोमाने मराठी भाषा व संस्कृतीच्या संवंर्धनासाठी प्रयत्न करावेत.

  2. jgajanan

    छान

Leave a Reply