fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला

नाटक, दिवाळी अंक ही महाराष्ट्रीय समाजमनाची, मराठी साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. मराठी समाजाचा आणखी एक अनन्य विशेष म्हणजे इथल्या व्याख्यानमाला. एकोणिसाव्या शतकापासून विविध व्याख्यानमालांनी इथल्या समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा हातभार लावलेला आहे. आजच्या माहितीच्या महापुरात तिची विश्वासर्हता हा कळीचा मुद्दा ठरत असताना अशा व्याख्यानमालांना विशेष महत्त्व आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हटले जाते. मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयामध्ये दरवर्षी ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात येते. यंदाच्या ४७ व्या व्याख्यानमालेचा हा सविस्तर वृत्तांत –

——————————————————————————————

दरवर्षीप्रमाणे रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा येथे दिनांक २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला’ संपन्न झाली. १९७४ साली कविवर्य वसंत बापट यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे यंदाचे ४७ वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या व्याख्यानमालेस श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या तीन दिवसीय व्याख्यानमालेत सामाजिक कार्यकर्ते आणि रेमन मॅगसेस पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग, लोकविज्ञान चळवळीच्या आरोग्य समितीचे डॉ. अनंत फडके आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक यांची व्याख्याने झाली.

दिनांक २३ जानेवारी रोजी डॉ. राजेंद्र सिंग यांनी ‘जलवायू परिवर्तन अनुकुलन और उन्मुलन में हम विश्वशिक्षक बन सकते है’ या विषयावर हिंदी भाषेमधून आपले विचार मांडले. भारतीय माणसाकडे फार प्राचीन काळापासून जलसंधारणाचे ज्ञान आहे. म्हणूनच राजस्थानच्या वालुकामय प्रदेशामध्ये गोड्या पाण्याची अत्यंत कमी उपलब्धता असतानाही मानवी जीवन उत्तम तऱ्हेने तग धरून राहिलेले दिसते. आपल्याकडे असलेल्या या पारंपरिक ज्ञानाचा प्रभावी वापर भारतीयांनी करणे कसे गरजेचे आहे; एवढेच नव्हे, तर याबाबतीत संपूर्ण जगापुढे आपला आदर्श भारत ठेवू शकतो असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २४ जानेवारी रोजी डॉ. अनंत फडके यांनी ‘सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य-सेवा? होय शक्य आहे!’ या विषयावर बोलताना ब्रँड नावांऐवजी जेनेरिक नावाने औषधे उपलब्ध होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. औषधांच्या किमतीवर सरकारी नियंत्रण येऊ शकले, तर औषधाच्या किमती कमी होऊन सर्वांसाठी आरोग्यसुविधा कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात, याविषयी त्यांनी विवेचन केले. औषध कंपन्यांचे अर्थकारण आणि राजकारण यावर त्यांनी नेमका प्रकाश टाकला.

दिनांक २५ जानेवारी रोजी इस्रोमध्ये ३० वर्षे कार्यरत असलेले आणि इस्रोच्या अंतराळ यान व उपग्रह प्रक्षेपण मोहिमांचे नुसते साक्षीदार नाही, तर त्यात क्रियाशील सहभाग असलेले माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक हे वक्ते म्हणून लाभले होते. ‘इस्रोच्या विश्वविक्रमी मोहिमां’विषयी बोलताना त्यांनी चंद्रयान १ व २, मंगलयान आणि इतर अनेक यशस्वी उपग्रह प्रक्षेपण योजनांविषयी माहिती दिली. हे प्रक्षेपण कसे केले जाते, त्यामागील तंत्रज्ञान, अर्थकारण आणि याबाबतीतील भारताची प्रगती, स्वयंपूर्णता यावर त्यांनी भाष्य केले. प्रभावी पॉवरपॉईंट सादरीकरण, विवेचनातील सुसूत्रता आणि मराठी भाषेवरील उत्तम प्रभुत्व यामुळे त्यांच्या व्याख्यानाने जनमानसाला आकर्षून घेतले. लोकांना आदर व अभिमान वाटणाऱ्या मोहिमांविषयी तपशीलवार माहिती त्यांच्या व्याख्यानात असल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाभिमानाची एक लहर श्रोत्यांमध्ये सळसळून गेली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेचे प्रास्ताविक मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक शिल्पा नेवे यांनी केले. तसेच डॉ.अनंत फडके यांचा परिचयही करून दिला. महाविद्यालयातील वाणिज्य विषयाच्या विभागप्रमुख डॉ. उर्मिला मून यांनी डॉ. राजेंद्र सिंग यांचा, तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि खगोलमंडळाच्या अध्यक्ष डॉ. वर्षा शुक्ल यांनी डॉ. सुरेश नाईक यांचा परिचय करून दिला. या व्याख्यानमालेच्या आयोजनास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनुश्री लोकुर यांचे प्रोत्साहक सहकार्य लाभले. तसेच उपप्राचार्य डॉ. मनिष हाटे व्याख्यानमालेस आवर्जून उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्ष डॉ. लीना केदारे यांनी सर्व वक्ते, श्रोते आणि सहकाऱ्यांचे हार्दिक आभार मानले. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील डॉ. रणजित, तसेच माजी विद्यार्थी अनघा पेंडसे आणि मुकुंद पाबळे यांची व्याख्यानमालेच्या आयोजनात मोलाची मदत झाली. प्रतीक पवार आणि भक्ती सोहनी या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मनोगत सादर करून वक्त्यांचे आभार मानले.

–  शिल्पा नेवे

(रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा, मुंबई)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu