fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

कृषी प्रदर्शनात भरली ‘मराठी शाळा’

मराठी शाळांसाठी शासन काही करो अथवा न करो, गावोगावच्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांनी मात्र स्वेच्छेने मराठी शाळांसाठी वाहून घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नुकत्याच भरलेल्या कृषी प्रदर्शनामधील मराठी शाळांचे दालन हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. असे प्रयत्न प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात व्हायला हवेत असेच कुणालाही वाटेल. मराठी शाळांतील आपल्या शिक्षकबांधवाच्या अशाच एका उपक्रमाविषयी सांगतायत जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक भाऊसाहेब चासकर – 

—————————————————————————————–

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये राबवलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक उपक्रम समाजासमोर आणण्यासाठी अकोले तालुक्यातील शिक्षकांनी तेथील कृषी प्रदर्शनात ‘आपली शाळा – मराठी शाळा’ हे दालन सजवले होते. डिजिटल साधनांच्या मदतीने शिक्षकांनी आपल्या शाळांमधल्या विविधांगी उपक्रमांचे मोठ्या पडद्यावर व्हिडीओ डॉक्युमेंटरीज, मुलाखती, इंग्रजी शिकवण्यासाठी सुरू असलेले प्रयोग दाखवत लक्षवेधक सादरीकरण केले. ‘मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण’ अशा आशयाची प्रचार पत्रके चर्चेचा विषय ठरला.  चार दिवसांत सुमारे दोन लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. मराठी शाळांच्या या दालनास भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

गेल्या काही काळात मराठी शाळा आणि शिक्षकांची प्रतिमा वादविषय ठरली आहे. जन्मदर कमी झाल्याने पटसंख्या कमी होत गेली. शिक्षणाच्या माध्यमाबाबत साक्षरता नसल्याने, भपकेबाज वातावरणाला भुलून, कोणाचे तरी अनुकरण करत, आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालणाऱ्या पालकांची संख्या मोठी आहे. कारणं अनेक असली तरी पटसंख्या कमी होण्याला केवळ शिक्षकांना जबाबदार धरले गेले. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील शिक्षकांनी गेल्या दोन वर्षांपासून ‘आपली शाळा मराठी शाळा’ ही प्रचार मोहीम हाती घेतली. ‘मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण अशी टॅगलाईन असलेली मोहीम शिक्षक नेटाने राबवत आहेत. बदललेल्या मराठी शाळांमधले विविध उपक्रमांची माहिती सांगून पालकांना आश्वस्त करणे, माध्यमसाक्षर करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे. शाळेत चांगले काम करणे पुरेसे नसून, केलेले काम समाजासमोर ठेवायची गरज लक्षात घेऊन तालुक्यातील धडपड्या वृत्तीच्या उपक्रमशील शिक्षकांनी ही चळवळ सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मराठी शाळांचा प्रचाररथ तालुक्यातील गावोगावी फिरला. त्यातून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून २४९ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले.

अकोले तालुक्यातील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात प्रामुख्याने शेतीशी संबंधित उद्योग, कंपन्या, प्रयोगशील शेतकरी, बचत गट, व्यापारी यांची दालने असतात. मागील वर्षीपासून या प्रदर्शनात आपली शाळा, मराठी शाळा’ या दालनात मराठी शाळांचा जागर आणि गजर सुरू झाला आहे. या दालनात मोठ्या पडद्यावर तालुक्यातील ५०हून अधिक शाळांमधल्या विशेष उपक्रमांचा समावेश असलेल्या, बदललेल्या जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक उपक्रमांच्या ध्वनीचित्रफिती दिवसभर दाखवल्या जात होत्या. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मराठी शाळेत शिकताना खाडखाड इंग्रजी वाचणाऱ्या मुलांचे व्हिडीओ बघून नागरिकांनी शिक्षकांचे कौतुक केले. सगळ्या शाळांमध्ये असे घडावे, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. याखेरीज छापील प्रचारपत्रके वाटली जात होती. जिल्हा परिषदेने केलेल्या ‘काव्यरंग’सह मुलांचे बाल कवितासंग्रह, हस्तलिखिते, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील वह्या ठेवलेल्या होत्या. शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी प्रसिद्ध उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब आरोटे यांनी स्वत: तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती नागरिक घेत होते. मातृभाषेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या तालुक्यातील मान्यवरांचे फोटो फ्लेक्सवर झळकत होते. मातृभाषेतून शिक्षणाचा शिक्षणशास्रीय विचार सांगणारे हे दालन लक्षवेधी ठरले. नगरचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाचा खर्च आजी-माजी शिक्षकांनी केला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दालनाचे उदघाटन झाले. हा उपक्रम महत्त्वाचा असून याचे राज्यात अनुकरण होण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. बीजमाता राहिबाई पोपेरे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे सरव्यवस्थापक अमित रानडे, नगर विकास विभागातील अवरसचिव विजय चौधरी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू अप्पासाहेब ढूस, सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, महाउर्जाचे जोशी, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, शुभांगी जोंधळे, अन्वर शेख, वकील के. डी. धुमाळ, उद्योजक नितीन गोडसे, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, राजेश पावसे, जालिंदर खताळ, शंकर गाडेकर, बबन निघूते, गावोगावचे सरपंच, शालेय व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष आदींनी दालनाला भेटी दिल्या. उद्घाटन समारंभात वीरगाव, हिवरगाव आंबरे आणि कळस येथील जिल्हा शाळांची झांज आणि लेझीम पथके लक्ष वेधत होती.

– भाऊसाहेब चासकर

(लेखक अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक व शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. Nice

  2. अतिशय सुत्य उपक्रम आहे.

  3. खूपच प्रेरणादायी आणि प्रभावी कार्य..असे धाडस मराठी शाळांसाठी केलेच पाहिजे

Leave a Reply

Close Menu