fbpx

बदलापूरमधील योगी श्री अरविंद गुरुकुलमध्ये मराठी शाळांचा जागर ! पण…

श्रीकांत देशपांडे यांना विनम्र आदरांजली

मराठी अभ्यास केंद्राच्या स्थापनेपासूनच मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत अशी केंद्राची  भूमिका आहे. त्या दृष्टीने भाषेचे काम करताना केंद्राने मराठी शाळांचे काम प्राधान्याने केले, करत आहे. याच कामाचा विस्तार म्हणजे गेली तीन वर्षं आयोजित करत असलेले मराठीप्रेमी पालक महासंमेलन. डिसेंबर २०१९च्या मुंबईतील परळ येथील आर. एम भट शाळेत आयोजित केलेल्या पालक संमेलनातील प्रयोगशील शाळांच्या दालनात बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरुकुल या  शाळेचे दालन होते. या दालनाच्या अनुषंगाने गुरुकुलचे संस्थापक आणि कार्यवाह श्रीकांत देशपांडे यांच्याशी संवादाला सुरुवात झाली. खरं तर त्यांच्याशी मराठी अभ्यास केंद्राची जुनी ओळख होतीच, पण या दालनाच्या निमित्ताने संवाद पुन्हा सुरू झाला.

परळ येथील संमेलनातील  गुरुकुलच्या दालनातून शाळेच्या प्रयोगशीलतेची प्रचीती येतच होती, पण ते तेवढंच नव्हतं. दालनासाठी आलेले गुरुकुलचे अनेक शिक्षक तिथल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतही सहभागी झाले होते, त्यातल्या प्रिया यादव यांना वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिकही मिळाले. पुढे श्रीकांत देशपांडे यांनी ‘आमच्याही शाळेत पालक संमेलन घ्यायचं आहे’ म्हटलं आणि ९ फेब्रुवारी २०२० ही तारीख ठरली गेली. डिसेंबर ते ९ फेब्रुवारीपर्यंत संमेलनाची आखणी करण्यासाठी, त्यातील सत्रे, वक्त्यांची नावे, पत्रकांचे स्वरूप ठरवण्यासाठी गुरुकुलचे शिक्षक आणि देशपांडे सर यांच्या केंद्रातल्या कार्यकर्त्यांशी अनेकदा भेटी झाल्या. कधी फोनवर तर कधी मेसेजवर  संवाद झाला.

९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायं ७ वाजेपर्यंत गुरुकुलमधील संमेलन ठरल्याप्रमाणे साजरे झाले. गुरुकुलमधील शिक्षकांनी अवघ्या महिन्या दीड महिन्यात केलेले कष्ट संमेलनात दिसत होते. म्हणून तर बदलापूर परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आणि पालक यांची संमेलनातील उपस्थिती लक्षणीय होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी संमेलनाचा वृत्तांत आणि फोटोच्या संदर्भात केंद्राच्या कार्यकर्त्याचा देशपांडे सरांशी संवाद होतो. आणि दुसऱ्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी कळतं की, देशपांडे सरांचं हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झालं. कुणासाठीही अशी बातमी चटका लावणारी आहे, विशेषतः अशावेळी जेव्हा आपण आदला सबंध दिवस त्या व्यक्तीसोबत घालवला असेल, मराठी भाषेसंबंधी – शाळेसंबंधी जिव्हाळ्याने पुढील वाटचालीसंबंधी चर्चा केली असेल…

गेली १५ वर्षे मराठी भाषेचे काम करताना मराठी अभ्यास केंद्र विविध संस्थांशी, शाळांशी, तिथल्या व्यक्तींशी जोडले गेले. श्रीकांत देशपांडे  केंद्राच्या या गोतावळ्यातलेच एक, मराठी अभ्यास केंद्र त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करत आहे. त्यांचे कुटुंबीय, गुरुकुलमधील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांना हे दुःख पेलण्याची शक्ती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना  करत आहे. अर्थात या औपचारिक आदरांजलीच्या पलीकडे जाऊन गुरुकुलमधील उपक्रमशीलतेशी जोडून घेऊन मराठी शाळांसाठी कार्य करणे हा  मराठी अभ्यास केंद्राचा प्राधान्यक्रम असेल.

————————————————

मातृभाषा ज्ञानसंपादनाची भाषा झाली पाहिजे! – चिन्मयी सुमीत

मराठी शाळांनी प्रयोगशील व्हायला हवे! – श्रीकांत देशपांडे

‘आपल्या परसातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ‘इंटरनॅशनल’कडे धावत सुटायचं, यातून काहीच हाती लागणार नाही. मराठी शाळांच्या बाबतीत आज हेच घडताना दिसत आहे. खरं तर  मातृभाषा ही शिकण्यासाठी सहज भाषा असल्याने ती ज्ञानसंपादनाचीही भाषा असते. इंग्रजी माध्यमातून शिकणं आणि इंग्रजी शिकणं याबाबतीत प्रगत देशांत अजिबात गल्लत होत नाही. मग ती आपल्याकडेच का होते?’ असा प्रश्न विचारून  अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत पुढे  म्हणाल्या की, ‘आता तर लग्नाचे आमंत्रण द्यायला येणाऱ्यांनाही मी ‘मुलं झाल्यावर मराठी शाळेतच पाठवायची!’ असं सांगत असते.’ मराठी अभ्यास केंद्र आणि योगी श्री अरविंद गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बदलापूर येथील मराठीप्रेमी पालक संमेलनात त्या बोलत होत्या.

या मराठीप्रेमी पालक संमेलनाचे उद्घाटन चिन्मयी सुमीत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार उपस्थित होते. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उद्घाटना सत्रात सर्व  उपस्थितांसमोर मल्लखांबाचे प्रात्यक्षिके करून उपस्थितांना भारावून टाकले.

उद्धघाटनानंतरच्या ‘मी माझ्या पाल्याला मराठी शाळेत का घातले?’  या सत्रात मारुती येंदे, श्रद्धा सोमण, उषा फिरके, स्वाती झाडगांवकर, चारुशीला भामरे या पालकांनी मुलांना शिकण्यासाठी मराठी माध्यमच कसे आनंददायी आहे याची अनेक उदाहरणे दिली. पालक माध्यमांविषयी जागरूक नसल्याने एकमेकांचे अनुकरण म्हणून इंग्रजी माध्यमाची निवड केली जाते. मात्र यामध्ये मुलांच्या आनंदाचा अजिबात विचार केलेला नसतो, असे मत उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.  प्रा. केतन भोसले यांनी या सत्रांतील वक्त्यांशी संवाद साधला.

‘मराठी शाळांचे वैभव पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काय करणार?’ या शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. हे सत्र जाणीवपूर्व खुले ठेवल्याने बदलापूर परिसरातील अनेक शिक्षकांनी आपल्या शाळेत राबवत असलेल्या नवनव्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीही त्यांच्या शाळांमधील उपक्रमाची माहिती सांगितली. आज मराठी शाळेत अनेक अडचणी असतील, पण त्या सर्वांवर मात करण्याची ठाम इच्छाशक्ती या सर्व शिक्षकांच्या मनोगतातून व्यक्त झाली. या सत्राचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी मराठी शाळांचे वैभव पुन्हा येण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. त्यासाठी थोडा अधिकचा वेळ शाळेसाठी देण्याची शिक्षकांची तयारी हवी, असे म्हटले.

त्यानंतरच्या यशवंतांच्या सत्रामध्ये मराठी शाळेमध्ये शिकून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेले यशवंत सहभागी झाले होते. या सत्रात नेत्रतज्ज्ञ अजित कुलकर्णी, शास्त्रज्ञ विक्रांत कुरगुडे, अधिवक्ता अमेय बाक्रे, व्यावसायिक अपूर्वा राऊत, अभियंता अभय काजारे या यशवंतांचा सहभाग होता. या सर्व यशवंतांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाले तरी महाविद्यालयात आणि पुढे करिअरमध्ये भाषेचा कुठेच अडसर आला नाही, किंबहुना फायदाच झाला. विशेष म्हणजे मराठी माध्यमामुळे अनुभवाचा पट खूप व्यापक झाला, असे सर्व यशवंतांनी म्हणणे होते. या सत्रातील संवादकाची जबाबदारी चैतन्य जोशी यांनी पार पाडली.

समारोपाच्या सत्रात डॉ. वीणा सानेकर, श्रीकांत पाटील उपस्थित होते. बदलापूर परिसरातील विविध मराठी शाळांधील सुजाण व सजग पालक तसेच उपक्रमशील शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी पालक संमेलने भरवण्यात मराठी शाळांनी पुढाकार घेऊन पालकांना जागरूक केले पाहिजे, असे मत डॉ. वीणा सानेकर यांनी व्यक्त केले. बदलापूर परिससरातील विविध उपक्रमशील शाळांच्या दालनांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. संमेलनाला बदलापूर परिसरातील मराठीप्रेमी, पालक आणि शिक्षक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

– मराठी अभ्यास केंद्र

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. देशपांडे सरांचंजाण चटका लावतय.संमेलन उत्कृष्ट

Leave a Reply

Close Menu