fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मराठी अभ्यास केंद्राचा भाषा पुरस्कार सोहळा

गतवर्षापासून मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी राजभाषा दिनी भाषा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मराठी भाषा आग्रही’ पुरस्कार दिला जातो, तर मराठीच्या चळवळीतील कार्यकर्ते जयवंत चुनेकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रयोगशील मराठी शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाच्या भाषा पुरस्कार सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत आणि पुरस्कार मानकऱ्यांवरील चित्रफिती – 

———————————————————————————

आदिवासी बोलीच नव्हे तर प्रमाण भाषांचेही अस्तित्व धोक्यात – न्या. हेमंत गोखले

आपली भाषा टिकवणे आपल्याच हाती असले तरी  इंग्रजी भाषेने भारतीय भाषांसमोर निर्माण केलेले आव्हान मोठे आहे. आज आदिवासी बोलीच केवळ असुरक्षित नसून  समाजाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या भारतीय प्रमाण भाषादेखील असुरक्षित आहेत. एके काळी वैद्यकीय शिक्षणही उर्दूसारख्या भाषेतून दिल्याची उदाहरणे आहेत. मराठी भाषेतूनही वैद्यकीय शिक्षण देण्याचा प्रयत्न ब्रिटिश राजवटीत झाला. पण आज सर्व व्यवहारात इंग्रजीचे प्राबल्य वाढले असून तालुक्यातालुक्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे आणि तिथे चांगले इंग्रजी शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही नाहीत असे चित्र असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांनी मराठी अभ्यास केंद्राच्या भाषापुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

मराठी अभ्यास केंद्र आणि क.जे. सोमय्या महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे अध्यक्ष म्हणून न्या. हेमंत गोखले उपस्थित होते. ‘मराठीच्या चळवळीची सद्यःस्थिती आणि आव्हाने’ ह्या विषयावरील परिसंवाद आणि भाषा पुरस्कारांचे वितरण अशा दोन सत्रांत हा कार्यक्रम पार पडला. न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू राहिलेल्या अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा मराठी भाषा आग्रही पुरस्कार यंदा ज्येष्ठ भाषाभ्यासक प्र.ना.परांजपे यांना प्रदान करण्यात आला, तर जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्काराने भूगोल विषयाचे अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांना सन्मानित करण्यात आले.

न्यायव्यवहारातील मराठीच्या वापरावर भाष्य करताना न्या. गोखले म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयांतून लोकांना समजणाऱ्या भाषांतून व्यवहार करणे शक्य असले तरी आपल्या देशातील भाषावैविध्य आणि संघराज्यपद्धती यांमुळे उच्च न्यायालयांत इंग्रजीच्या वापरालाच अधिक पसंती मिळत आहे. मात्र न्यायव्यवहार लोकांच्या भाषेत होणे आणि पारदर्शकता हेही कळीचे प्रश्न आहेत. तामिळनाडूत प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात तमिळ गीताने होते, तसे महाराष्ट्रात दिसत नाही. यंदा महाराष्ट्र शासनाने ज्या दिमाखात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला त्याचे कौतुक करून न्या. गोखले यांनी तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने व्हावी यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

अधिवक्ता शांताराम दातार मराठी भाषा आग्रही पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ भाषाभ्यासक प्रा. प्र. ना. परांजपे म्हणाले की, मराठीसाठी आपण केवळ अभिमानापोटी नाही तर अंतःप्रेरणेतून काम केले. मराठीसाठी काम करताना आक्रस्तळेपणाऐवजी संमजसपणाची अधिक गरज आहे. भाषा ही केवळ साहित्यव्यवहारापुरती सीमित नसून संपूर्ण जीवनाला व्यापलेली असते. त्यामुळे भाषेच्या विकासाच्या  प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. मात्र शासकीय संस्थांवर भाषेची समज असलेली व्यक्ती नसेल तर भाषेची कामेही होत नाहीत आणि पैशाचाही अपव्यय होतो असे निरीक्षण नोंदवताना प्रा. परांजपे म्हणाले की,  डॉ. अशोक केळकरांसारखी भाषावैज्ञानिक जाण असलेली व्यक्ती राज्य मराठी विकास संस्थेवर नेमली गेली असती तर आज मराठीचे चित्र वेगळे दिसले असते. जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार मिळालेले भूगोल विषयाचे अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांनी आपण हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक स्वीकारत असल्याचे सांगून ह्या पुरस्काराने शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन काही करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि सत्तरच्या दशकात मुंबई विद्यापीठात मराठीच्या चळवळीचे नेतृत्व करणारे डॉ. दत्ता पवार यांच्या सन्मानार्थ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ‘मराठीच्या चळवळीची सद्यःस्थिती व आव्हाने’ ह्या विषयावरील परिसंवादात दत्ता बाळसराफ, प्रा. अनघा मांडवकर आणि मयूर घोडे सहभागी झाले होते. डॉ. प्रकाश परब यांनी  परिसंवादाचे प्रास्ताविक केले. समाजमाध्यमातून ‘मराठी बोला’ चळवळ चालवणारे मयूर घोडे म्हणाले की, दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेच्या वापराबाबत आपण आग्रही असल्याशिवाय भाषेची प्रगती होणार नाही. समाजमाध्यमांवरील चळवळीमुळे मराठी समाजाचे भाषाभान वाढताना दिसते आहे. आजवर मराठीच्या वापराबाबतच्या  शासकीय नियमांची मराठी समाजाला फारशी जाणीव नव्हती व त्याबाबत खंतही नव्हती, पण माहितीच्या अधिकाराचा व समाजमाध्यमांचा वापर करून भाषाकार्यकर्ते मराठीच्या वापराबाबत जाणीवजागृती करत असून त्याचा परिणाम भाषाव्यवहारात दिसू लागला आहे. प्रा. अनघा मांडवकर यांनी मराठीच्या उच्च शिक्षणाच्या अंगाने भाषाचळवळीची मांडणी केली. मराठी भाषेपुढील आव्हानांसंदर्भात बोलताना  मराठीच्या चळवळीला निजभाषकांचाच  पाठिंबा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मराठी समाजाने  मराठीच्या वास्तव समस्यांबाबत झोपेचे सोंग घेतले असून त्याला जागे करण्याची गरज आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ यांनी मराठीच्या चळवळीची व्यापकता स्पष्ट करून केवळ सरकारला विरोध किंवा सरकारी धोरणांवर टीका करून मराठीचा विकास होणार नाही, तर त्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता ग्रंथालीसारख्या संस्थेप्रमाणे भाषेच्या प्रत्येक क्षेत्रात काम करावे लागेल. भाषाविवेक ठेवून आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आदर करून सरकारशी समन्वय साधूनच मराठी भाषेचे प्रश्न मार्गी लावता येतील, असे  मत त्यांनी व्यक्त केले. या सत्रात मराठीच्या चळवळीतील कार्यकर्ते दत्ता पवार यांचा सोमय्याचे प्रोव्होस्ट व्ही. एन. राजशेखरन पिल्लै यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीताचे गायन केले आणि विद्यार्थ्यांच्या ‘आशय’ हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मराठी प्रबोधनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गौरी पाताडे आणि अस्मिता सावंत या विद्यार्थिंनीचा सत्कार करण्यात आला. दिनकर गांगल, मीना गोखले, सोमय्याचे प्रोव्होस्ट व्ही. एन. राजशेखरन पिल्लै इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ह्या मराठी भाषा गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक सोमय्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकर यांनी केले तर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी आभार मानले. प्रतीक्षा रणदिवे आणि ऐश्वर्या धनवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

भाषाभ्यासक प्रा. प्र. ना. परांजपे यांच्यावरील चित्रफीत

 

प्राध्यापक विद्याधर अमृते यांच्यावरील चित्रफीत

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. उत्कृष्ट!!

  2. खूप सुरेख कार्यक्रम झाला…!
    धन्यवाद

  3. मराठी चळवळ उभी करणाऱ्या आणि तिला गती देणाऱ्या, सातत्याने काम करणाऱ्या लोकांचं मोल शब्दांत पकडता येणं शक्य नाही.
    अशा कार्यक्रमांत तरुणांचा सहभाग असण्याची गरज आहे…..

Leave a Reply

Close Menu