के. एम. सी. महाविद्यालयातील भाषा जागर

नुकताच मराठी भाषा दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा झाला. खोपोली येथील के. एम. सी महाविद्यालयातील या सोहळ्याचा सचित्र वृत्तांत –

—————————————————————————

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

कवी सुरेश भट यांच्या प्रतिभेतून साकारलेले हे ‘मराठी भाषेचे गौरव गीत’ गात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ‘साहित्यिक कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर’ यांच्या २७ फेब्रुवारी जन्मदिनी ‘माय मराठीचा उत्सव खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एम.सी. महाविद्यालयात मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा केला.

मराठी भाषेला प्राचीन अशी प्रदीर्घ परंपरा आहे. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी’ ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा होय. बारा कोटीपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. पण त्याबरोबरच  लोकव्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, न्यायालयात, प्रसारमाध्यमात अशा सर्वच ठिकाणी प्राधान्याने मराठीचा वापर वाढला पाहिजे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे उत्तर रायगड- जिल्हाध्यक्ष साहित्यिक सुधाकर चव्हाण यांनी व्यक्त केला. ते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रभारी प्राचार्य डॉ. महेश खानविलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, दैनंदिन जीवनात भाषेचा वापर करताना अनेक चुका आपल्याकडून होतात. शुद्ध आणि नेमक्या स्वरूपात आपल्याला भाषा वापरता आली पाहिजे. त्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. उत्तम वाचन, श्रवण आणि लेखनाच्या माध्यमातून आपणाला समृद्ध होता येईल. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ‘ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना करून दिला आणि आपल्या काही निवडक कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची दाद मिळवली.

मराठी विभागाचे प्रमुख प्रा.मोहन बल्लाळ यांनी प्रास्ताविकातून मराठी विभाग सातत्याने विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी करीत असलेल्या कार्याची व उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. लेखन, वाचन, श्रवण आणि भाषण ही भाषिक कौशल्य महाविद्यालयीन पातळीवर विकसित होण्यासाठी विभागाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आठवडाभर घेतलेल्या  निबंधलेखन, सुंदर हस्ताक्षर लेखन, काव्यलेखन/ वाचन व भित्तीपत्रक स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  २६ विद्यार्थी – विद्यार्थीनींना मराठीतील काव्य, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र  या साहित्यप्रकारातील प्रेरणादायी पुस्तके व प्रमाणपत्र’ देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रभारी प्राचार्य, डॉ.महेश खानविलकर यांनी मराठी ही रोजगाराची भाषा झाली पाहिजे, त्यासाठी युवा वर्गाला सक्रीय होण्याचे आवाहन केले. आजचा युवा वर्ग समूह माध्यमावर सक्रीय आहे. नवनवीन वाचतो आहे. लेखनातून व्यक्तही होतो आहे. भाषेच्या मदतीने उत्तम साहित्यनिर्मितीही करतो आहे. मराठीबाबतचा न्यूनगंड कमी करून रोजगारक्षम असे पर्याय निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. ज्ञान – माहिती- तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात नव्या बदलांबरोबर जाताना मातृभाषेतून करिअर देणारे शिक्षणक्रम व कौशल्ये उपलब्ध करून देता येतील, असे ते आपल्या भाषणात म्हणाले. उपप्राचार्य, डॉ. बी. डी. बनसोडे, प्रा.जी. पी. मुळीक, डॉ.उत्तम गाढे, डॉ. डी. पी. गायकवाड, डॉ. विलास मगर, प्रा. सुनील वाघमारे, प्रा.विठ्ठल जाधव, विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी- विद्यार्थिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कु.पद्मा जोशी व सौ.योगिता ताटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कु. पूजा कोराळे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. बी.एम.नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नंदिनी खरे हिने उपस्थितांचे आभार मानले.

– डॉ. भाऊसाहेब नन्नवरे

(खोपोली येथील के. एम. सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply