रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील भाषा सोहळा

नुकताच मराठी भाषा दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई, घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील या सोहळ्याचा सचित्र वृत्तांत –

——————————————————————

गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी विभाग व मराठी वाङमय मंडळातर्फे सेमिनार हॉल येथे ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर महाविद्यालयाच्या गानपथकाने गायन शिक्षक श्री. आदित्य खवणेकर यांच्या संगीत संयोजनांतर्गत मराठी अभिमानगीत सादर केले.

मराठी विभागप्रमुख डॉ. स्नेहा देऊस्कर यांनी भाषादिनानिमित्त आरंभलेल्या जागरामागची भूमिका विशद केली, तर प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन यांनी भाषेचे महत्त्व जागतिक संदर्भात स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. हिमांशू दावडा यांनी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांनी  ‘आविष्कार ’ या भित्तिपत्रकावर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित सादर केलेल्या रसास्वादपर लेखांच्या ‘गोष्ट एका साहित्यरत्नाची ’ या हस्तलिखिताचे प्रकाशन प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रिया वैद्य यांच्या  ‘समाधी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन  प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन यांच्या हस्ते उपस्थितांच्या साक्षीने झाले. ‘मातृभाषा : तत्त्वचिंतनपर काव्याची आंतरिक गरज’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना वैद्य यांनी मातृभाषेचे तत्त्वज्ञान व शिक्षणशास्त्र या विषयक्षेत्रातील महत्त्व स्पष्ट केले.

प्रा. अमेय आंबेरकर ( जीवशास्त्र विभाग) यांनी शांता शेळकेलिखित ‘जय शारदे वागेश्वरी’ या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तृतीय वर्ष, कलाशाखेच्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊंच्या साहित्यावर आधारित ‘गोष्ट एका साहित्यरत्नाची ’ हा कार्यक्रम सादर केला.

उपप्राचार्या प्रा. शुभांगी वर्तक (अर्थशास्त्र विभाग) यांनी मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्याची खात्री व्यक्त केली. डॉ.मिथिलेश शर्मा (हिंदी विभाग) यांनी इंदिरा संताच्या ‘पत्र लिही, पण…’ या  कवितेचे भावपूर्ण वाचन केले. प्रा. छाया पिंगे (संख्याशास्त्र विभाग) यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर कसा वाढविता येईल याचे सोदाहरण विवेचन केले. डॉ. अमिता वाल्मिकी (तत्त्वज्ञान विभाग) यांनी मराठी भाषेच्या बोलींचा आस्वाद व त्यांचा मालिकांमधील वापर यावर खुसखुशीत भाष्य केले. अण्णाभाऊ साठे यांचे पुतणे श्री. अनिल विष्णू साठे यांनी ‘अण्णाभाऊंचे जीवन, कर्तृत्व व थोरवी खऱ्या अर्थाने साकार करणारा कार्यक्रम’ असे या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि या महाविद्यालयात अण्णाभाऊंविषयी आपलेपणा खरोखरीच जाणवला, असे सांगितले.

मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ. नीलांबरी कुलकर्णी व डॉ. लतिका भानुशाली कार्यक्रमाच्या संयोजनात सहभागी झाल्या होत्या. ‘जागतिकीकरण व मराठी भाषेसमोरील आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी  निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची तसेच मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित काव्य सादरीकरण, निबंध लेखन, पुस्तकगप्पा या उपक्रमांची तसेच युनिकोड कार्यशाळा आणि युनिकोड मराठी संगणकीय टंकलेखन आणि अक्षरजुळणी या कौशल्य विकसन अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे प्रदर्शनही महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या सहकार्याने भरविण्यात आले होते.

– डॉ. नीलांबरी कुलकर्णी

(मुंबई, घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply