‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम अरविंद जगताप म्हणतात की…

“…कॅमेरामनला तो सीन घेऊन शूट करायचा असतो. मेकपमनला  चेहरा घेऊन रंगवायचा असतो. एडिटरला  फिल्म एडिट करायची असते. संगीतकाराला देखील सीन आणि वातावरण बघून त्या शब्दांना चाल लावायची असते. लेखकाकडे असं काहीच नसतं. त्याला ते सगळं नवीन तयार करायचं असतं. तो त्याच्या मनाचा खेळ असतो. त्याला ते त्यातून निर्माण करायचं असतं. त्याच्या मनातून ते सगळं येणार असतं. ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे, पण लोक तिला खूप सहज समजतात. तुमच्याकडे काही नसताना तुम्हाला काही तरी निर्माण करून दोन तास लोकांना खिळवून ठेवणारी एक गोष्ट बनवायची असते. त्यामुळे हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप अभ्यास आणि अनुभव महत्त्वाचा आहे…”

लेखक, पटकथाकार अरविंद जगताप या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना भाषेच्या कोणत्या  कौशल्याबाबत सांगतायत? बीएमएमचा विद्यार्थी रोहन गपाट याने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये वाचा –   

——————————————————————

प्र. उत्तम कथा व कसदार लेखन म्हणजे काय?

उत्तम कथा ही मराठी चित्रपटांची मुख्य ओळख आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्यासारख्या साहित्यिकांनी मराठी चित्रपटांसाठी लिखाण केलंय. राजन खान, आनंद यादव अशा कसदार लेखकांच्या कथांवर सिनेमे निघालेत. या कथा नवीन लेखकांना चित्रपट कथा कशी असावी हे समजण्यासाठी महत्वाच्या आहेत. ज्या ज्या कथांवरून चित्रपट बनले त्या कथा वाचणे, समजून घेणे चित्रपट लेखनासाठी एक उत्तम सराव आहे. प्रेमचंद आणि अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण आपल्या डोळ्यांसमोर सिनेमाच उभा करतं. या लेखकांची शैली बारकाईने अभ्यासली पाहिजे. चित्रपट दिग्दर्शन आणि लेखकाच्या रोजच्या जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या सिनेमाचा भाग असतात. असे सिनेमे जास्त सकसपणे उतरलेले असतात. गेल्या काही वर्षातल्या वळू, ७२ मैल, गार्भीचा पाऊस, फँड्री यासारख्या सिनेमांची कथा आपल्याला अगदी थोडक्यात सांगता येते. मोजक्या शब्दांत खूप काही सांगणाऱ्या या कथा आहेत. अर्थात तुम्ही जे लिहिताय ते तुम्ही जगलेले असाल, तो तुमचा चिंतनाचा विषय असेल तर लिखाणातून त्याचं जिवंत चित्रण येतं.

प्र. पटकथा म्हणजे काय?

पटकथेविषयी बोलताना किंवा लिहिताना लोक खूप तांत्रिक शब्द वापरतात, जड भाषा वापरतात. पटकथा समजून घेण्यासाठी विदेशी सिनेमांचे संदर्भ दिले जातात. त्यामुळे नवीन लेखकांना पटकथा हा प्रकार समजून घेण्यास विनाकारण खूप जास्त अवघड वाटू लागतो. जगभरातले महत्त्वाचे पटकथा लेखक आणि दिग्दर्शकांच्या मुलाखती ऐकल्या तर त्यांच्यात एक महत्त्वाचं साम्य आहे. यातल्या बहुतेकांना सिनेमा बघण्याचं वेड होतं. सिनेमा बघून बघून समज वाढते. आपल्या देशात खूप चांगली पटकथा असलेले अनेक सिनेमे आहेत. पटकथा खरं तर आजीच्या गोष्टीसारखी असते. नातवाला झोप आली असेल तर गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी असते. नातू टक्क जागा असेल तर तिची गोष्ट सांगण्याची पद्धत बदलते. अगदी गावोगाव रंगणारं कीर्तन, कथा ऐकल्या तरी त्यात शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट सांगायची प्रत्येकाची एक पद्धत असते. पटकथा म्हणजे काय हे माहीत नसताना सुरुवातीच्या सिनेमांचं लिखाण झालंय. प्रत्येक नवीन पद्धत ही कधी तरी कोणीतरी पहिल्यांदा सुरू करते.

प्र. आपण विद्यापीठातून जे शिक्षण घेतलंत. त्या अभ्यासक्रमाचा तुम्हाला  लिखाणासाठी काही फायदा झाला का?

मी बीए ला होतो. अन् सुदैवाने मी कॉलेजला असल्यापासूनच वर्तमानपत्रात लिहीत होतो. मला कामही मिळत होतं. त्यामुळे मला कोठून डीग्री घेण्याची गरज पडली नाही. मला  नोकरी करण्यासाठी शिक्षण घ्यायचं नव्हतं. मुळात मला नोकरी करायचीच नव्हती.

तसा काही बीएच्या अभ्यासक्रमाचा फायदा झाला नाही. खऱ्या अर्थाने लिखाणाला फायदा होतो, तो पुस्तकांपेक्षा आपल्या भोवतालचे मित्र, वातावरण यांचा.  आपले मित्र आपल्याला घडवत असतात किंवा भोवतालची माणसं घडवत असतात. आपण जे कोणी असतो, आपलं व्यक्तिमत्त्व जे काही असतं,  ते आपल्या भोवतालच्या माणसांचं प्रतिबिंब असतं. आपण कोणाच्या सोबत आहोत त्याप्रमाणे आपण घडत असतो. मुळात लेखकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण. मात्र नुसते डोळे उघडे ठेवून  चालत नाही, तर त्यात आपल्याला आपला अँगलही ठेवावा लागतो. म्हणजे

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. SubhashNaik

    कसदार लिखाणासाठी वाचन हा सगळ्यात मोठा रियाज! उत्तम मुलाखत.

Leave a Reply