एक प्रकल्प कविता रसग्रहणाचा!

कवितेद्वारा विद्यार्थ्यांना भाषेची, शब्दांची गोडी लागावी असं एका शिक्षिकेला नुसतं वाटतच नाही, तर त्यासाठी त्या मुलांना पाठ्यपुस्तकाबाहेरील कवितांपर्यंत घेऊन जातात, निवडलेल्या कवीची शाळेतील आणि शाळेबाहेरूनही सर्व पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या कविता निवडीपासून ते त्याच्या रसग्रहणाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होतात. कविता रसग्रहणाच्या  या प्रकल्पाबद्दल सविस्तर सांगतायत पुणे येथील अक्षरनंदन शाळेतील शिक्षिका जयश्री काटीकर – 

———————————————————————

रसग्रहण म्हणजे कवितेचा सारांश सांगणे नव्हे. कवितेची शब्दकाळा, शैली यांची माहीतगार चिकित्सा करणे. लेखकाचे जास्तीत जास्त साहित्य वाचणे. कवितेला त्या संपूर्ण साहित्याच्या संदर्भात बघणे. लेखकाची वौशिष्ट्ये समजून घेणे. निवडलेली कविता, कवीच्या जीवनदृष्टीशी ताडून बघणे. शक्य असेल तर समकालीन लेखंकाशी तुलना कारणे. कवितेचा भावार्थ समकालीन विषयांशी जोडून पाहणे. हे सगळं करण्यासाठी एक शिस्त लागते. शिक्षकांनीही हे लक्षात ठेवणे गरजेचं असतं. त्यामुळे नववी, दहावीच्या टप्प्यावर रसग्रहण ही घटना राहत नाही तर प्रकल्प बनतो.

रसग्रहण प्रकल्पाला निमित्त ठरली कुसुमाग्रजांची ‘अहि-नकुल’ ही कविता. कुठलीही कविता शिकताना, त्यातले शब्द, त्याचे अर्थ जाणून घेता घेताच विद्यार्थ्याची कवितेची जाण अर्थाच्या पलीकडे जायला हवी; हे मनात पक्कं होतं. ‘अहि-नकुल’ कवितेतसुद्धा शब्द-अर्थाच्या पलीकडे जात कवितेत समोर घडणारं जिवंत प्रसंग-नाट्य कल्पनेच्या पातळीवर समजणं, अनुभवता येणं ही किती मोठी झेप! यातूनच कवितेचा आस्वाद घेता घेताच कविता वाचल्यावर मला काय वाटतंय, किंबहुना मला काही वाटतंय की नाही; हे समजून – जाणून घेणं महत्त्वाचं वाटलं. म्हणूनच या कवितेच्या निमित्ताने कविता रसग्रहणाची कल्पना पुढे आली. कुसुमाग्रजांची जी कुठली कविता आवडेल, भावेल ती निवडून त्यावर  रसग्रहण करायचे असे ठरले.

रसग्रहण प्रकल्पाचा उद्देश

 • एका सशक्त कवीला, त्याच्या साहित्याला भिडण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देता यावी.
 • आपली आवड-निवड, रुची याबद्दल मुलांमध्ये जागरूकता यावी.
 • आपल्याला आवडणाऱ्या, भावणाऱ्या कवितेची निवड करता यावी.
 • कवितांची पुस्तकं त्यानिमित्ताने चाळली जावीत. थोडं संदर्भशोधन व्हावं.
 • मुलांची अभिरुची घडावी.
 • कवितेतील शब्द, प्रतिमा, कवितेची लय, ताल यांना मुलांना भिडता यावं.
 • कवितेतले ऐतिहासिक, सांस्कृतिक इ. संदर्भ समजून घेता यावेत.
 • आपल्याला जे वाटतं/जाणवतं/ कळतं ते मुद्देसुदपणे, संवेदनशीलतेने अभिव्यक्त करता यावं.

पार्श्वभूमी

इयत्ता नववीसाठी अभ्यासक्रमात नसलेली, पाठ्यपुस्तकाबाहेरची अशी ‘अहि-नकुल’ कविता पुरक अभ्यासासाठी निवडली होती. त्याची कारणे पुढीलप्रमाणे-

 • ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकाशी, त्याच्या कवितांशी या निमित्ताने मुलांचा परिचय व्हावा.
 • वृत्तात बांधलेल्या कवितेची लय, त्यातले नादमाधुर्य मुलांना आवडते, भावते. तशी कविता, तिच्यातली शब्दकळा, प्रतिमासृष्टी यातले सौंदर्य मुलांपर्यत पोचावे.
 • ती कविता पाठ करण्यातली मौज मुलांना अनुभवता यावी.
 • दीर्घ कवितेतून उलगडणारे नाट्य पाहण्याची सवय मुलांना व्हावी.
 • साप-मुंगसाच्या खेळींकरता कवी उपमा कशा – किती – कोणत्या वापरतो यावर चर्चा करता यावी. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक अशा शब्दांशीही ओळख व्हावी.
 • कविता अभ्यासताना त्या कवितेवर/कवीवर आजूबाजूच्या परिस्थितीचा, काळाचाही प्रभाव असतो. ही कविता कुठल्या काळात लिहिली गेली, त्यावेळच्या एकूण सामाजिक – राजकीय परिस्थितीचा त्या कवितेवर काय प्रभाव / परिणाम झाला ते जाणून घेता यावे.

रसग्रहण प्रकल्पाबद्धल सविस्तर

रसग्रहण प्रकल्पाचे मूल्यमापन अर्थातच दोन पातळ्यावर करावे लागणार होते. त्यासंबंधी थोडेसे

 • कोणत्या कविता मुलांना आपल्याशा वाटतायत, त्यावर विचार करावा – लिहावंस वाटतंय ते जाणून घेणे.
 • मुलांचं वय, मानसिकता, स्वभाव इ. गोष्टी लक्षात घेता त्यांची कवितांची निवड पाहणं, हा एक प्रगल्भ करणारा अनुभव ठरला.
 • अर्थाच्या पलीकडे जाऊन त्यातल्या प्रतिमा कवितेत लपलेला(ले) अर्थ कितपत समजलाय, किती प्रभावीपणे त्याची मांडणी होतेय ते बघणे
 • तुकड्या- तुकड्यातून कवितेच्या एकसंध अनुभवाकडे नेणे.

.पूर्वतयारी

रसग्रहण प्रकल्पाबद्दल मुलांशी बोलणं केलं. रसग्रहण म्हणजे काय याबद्दल चर्चा केली. रसग्रहण म्हणजे कवितेचा आस्वाद, अर्थ कवितेची वौशिष्ट्ये इ. गोष्टी मुलांना माहीत होत्या. त्याची फळ्यावर यादी केली. शिवाय कवितेतील इतर संदर्भ, कवीची/कवितेची वौशिष्ट्ये, कवीची शैली याबद्दलही मुलांशी बोलणं केलं.

कुसुमाग्रजांचे काही कवितासंग्रह शाळेत होते, तर काही उपलब्ध करून दिले. प्रस्तावना, कवीबद्दलची माहीती, रसग्रहण असे उपक्रमाचे भाग होते. काही रसग्रहणं मुलांना वर्गात वाचून दाखवली. यात काही मुलांनी लिहिलेल्या रसग्रहणाचाही समावेश होता.

एक मुलगी लाडाची – कवयित्री श्यामला वनारसे, रसास्वाद – ज्योती सुभाष

मी मुक्तामधला मुक्त – कवी मनमोहन, रसास्वाद – जयश्री काटीकर

डोळा वाटुली संपेना – कवयित्री इंदीरा संत, रसास्वाद – मुक्ता बाम (माजी विद्यार्थिनी)

बंदिवान – कवी कुसुमाग्रज, रसास्वाद – इंदवी पंडित (माजी विद्यार्थिनी)

शिवाय काही रसग्रहणं मुलांना वाचायला उपलब्ध करून दिली. पुन्हा रसग्रहणावर चर्चा केली. काही मुद्दे राहिलेत का याबद्दलही बोलणं केलं. कविता कशी हातात पडली, कविता वाचून मनाला काय वाटले इ. मुद्दे समोर आले. प्रकल्पासाठी १५ दिवसांची मुदत होती. कच्चं लेखन – पक्कं लेखन याबद्दलही वर्गात बोलणं झालं होतं.

प्रत्यक्ष रसग्रहण प्रकल्पाबद्दलची काही निरीक्षणे

१. प्रस्तावना

मुलांच्या प्रस्तावना अर्थातच अतिशय बोलक्या, प्रामाणिक होत्या. प्रकल्पामुळे जी संधी मुलांना मिळाली, त्याचा जसा  काहींच्या प्रस्तावनेत उल्लेख होता; त्याचप्रमाणे प्रकल्प करताना कंटाळा आल्याचाही उल्लेख काही प्रस्तावनेत होता. बऱ्याचजणांनी एका कवितेची निवड करणं अवघड गेल्याचं स्पष्ट केलं. मुलांच्या प्रस्तावनेतील काही नोंदी –

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply