fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

करोनाकाळ आणि आमची शाळा (भाग एक)

करोनोच्या या काळात देशभरातील शाळा बंद आहेत. काही शाळा आपल्या मुलांकडून ऑनलाईन उजळणी करून घेतायत, तर काही पुढील अभ्यासाचे धडे देतायत. मुंबई येथील अ. भि. गोरेगावकर शाळेतील प्राथमिक विभाग – डोसीबाई जीजीभॉयमधील शिक्षक आणि मुलं चिठ्ठ्या, पत्रे आणि कलाकुसर यांच्या माध्यमातून  संवाद साधतायत. यात विशेष आहे ती साईराज नावाच्या दुसरीच्या विद्यार्थ्याने आपल्या नर्स असणाऱ्या आईला लिहिलेली ही चिठ्ठी – 

——————————————————————————————-

सध्या करोना विषाणूमुळे पूर्ण जग थांबलंय आणि आपापल्या परीने या विषाणूशी सामना करतंय. आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत शनिवारी १४ मार्चला आम्ही इयत्ता १ ली ते ४ थीची पालकसभा घेतली. पालकांना कोरोना व्हायरसबाबत कोणती काळजी घ्यावी याविषयी सांगितले. तसेच तोंडी व लेखी मूल्यमापनाची (परीक्षा) माहिती दिली. त्या दिवशी शाळेत मुलं, पालक भेटले. पण तेव्हा पुसटशी देखील कल्पना नव्हती की, ही आमची या शैक्षणिक वर्षातील शेवटची भेट असेल; कारण सोमवारपासून शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. हळूहळू संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं.

मुलांना अनपेक्षितपणे मिळालेली ही मोठी सुट्टी.  अर्थात पालक त्यांच्यासोबत होतेच. सुरुवातीला मजा करण्यात, खेळण्यात मुलांनी काही दिवस घालवले खरे; परंतु जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, मुलं कंटाळू लागली. १० बाय १० च्या खोलीत मुलांना असं बांधून ठेवणं अजिबातच शक्य नाही. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गातील मुलांच्या पालकांचा एक व्हॉटस्अपचा गट आहे. त्यात वर्गताईही आहेत. काही निरोप, वर्गात चालणाऱ्या काही कृतींचे फोटो पाठवण्यासाठी त्या गटाचा उपयोग आम्ही करतो. काही मुलांनी या सुट्टीत घरी करत असलेल्या कृतींचे फोटो या गटावर पाठवायला सुरूवात केली. लॉकडाऊनची मुदत वाढवली आणि मुलांना व्यस्त ठेवणं पालकांना दिवसेंदिवस कठीण होत गेलं. मग आम्ही सर्व ताईंनी एखाद्या विषयावर लिहिणं, चित्र काढून चित्राविषयी लिहिणं, कविता रचणं, भाषिक खेळ, कलेच्या वस्तू तयार करणं अशा कृती मुलांना देऊ लागलो. मुलांनी केलेल्या कृतींचे फोटो काढून पालक गटावर पाठवू लागले. आम्ही ताई  ते तपासू लागलो, मुलांना शाबासकी देऊ लागलो. यामुळे झालं काय तर इतर मुलांनाही यात सहभागी व्हावं असं वाटू लागलं. जे पालक या गटात नव्हते त्यांना याची माहिती मिळताच आता तेही या गटात सहभागी झाले आहेत.

मुलांना काही कृती करायला देणं, त्या तपासणं इतक्यापुरतंच हे मर्यादित नाहीये. मुलांना,  पालकांना शाळेबद्दल असलेला विश्वास, प्रेम, आपल्या ताईंसोबत असलेले भावनिक बंध अधिक घट्ट होण्याचे हे एक निमित्त आहे. यामुळे मुलं आणि पालकही आश्वस्त होतायत. त्यांना धीर मिळतोय. मुलांनी घरी काय काय केलं याचे प्रतिसाद तर इतके मस्त आहेत की, आजूबाजूला नकारात्मक वातावरण असताना देखील आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळतेय. मुलांनी  स्वयंपाकघरातील वस्तूंपासून आकृतिबंध तयार केलेत, पाण्याचे प्रयोग केलेत, यमक जुळणाऱ्या कविता लिहिल्यात,  रुग्णवाहिका तयार केलीय, घडीकाम करून वस्तू बनवल्या आहेत. उपलब्ध साहित्यापासून सुंदर कलाकृती केल्या आहेत कारण याचं बाळकडू त्यांना शाळेतूनच मिळालं आहे.

मुलांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सूचना तयार केल्यात, या आजाराविषयी त्यांना काय वाटतंय, कोरोनाला संपवण्यासाठी आपलं वागणं कसं असावं हेही लिहिलंय. किती आशादायक आहे मुलांचं हे लेखन! ही सकारात्मकता, ही संवेदनशीलता कुठून आली मुलांमध्ये? ती असतेच त्यांच्यामध्ये. आमच्या शाळेत आम्ही फक्त तिला खतपाणी देण्याचं काम करतो. कोणताही विशेष दिन अथवा नैसर्गिक आपत्ती असू दे, प्रत्येक वेळी मुलांशी बोललं जातं. काही गोष्टींबाबत ठरवून चर्चा केली जाते, तर काही वेळा अचानक घडलेल्या प्रसंगावरूनही बोललं जातं. हे बोलणं एकतर्फी नसतं, कारण तेव्हा मुलंदेखील त्यांचं मत मांडत असतात. ही विचार करण्याची सवय असल्यानेच ते सध्या घडणाऱ्या घटनांचा विचार करतायत, आपली मत मांडतायत; आम्ही त्यांच्यापासून लांब असलो तरीही.

साईराज सावंत,  इयत्ता दुसरीत शिकणारा मुलगा. योग्य वेळी आवश्यक तेवढंच बोलणारा, कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा.  आपल्या छोट्या भावाबद्दल भरभरून बोलणारा आणि वर्गात सर्वांचा लाडका. त्याची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्सचे काम करते.  बाबा छोटासा व्यवसाय करता करता छोट्या बाळाला आणि  साईराजला सांभाळतात. आई बाबा दोघेही समजूतदार. अतिशय आनंदी असं हे कुटुंब. सध्या साईराज व त्याचा ९ महिन्यांचा भाऊ बाबासोबत गावी आहेत आणि आई इथे मुंबईत आपले नर्सचे कर्तव्य पार पाडतेय. कोरोना झालेल्या रुग्णांची शुश्रूषा करतेय.

इयत्ता दुसरीत आम्ही मुलांना चिठ्ठी लिहायला शिकवतो. सध्याच्या काळात पत्र,  चिठ्ठी पार कालबाह्य झाली आहेत. साईराजने शाळेत शिकवलेल्या गोष्टीचा उपयोग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी केलाय. त्याने आपल्या आईला चिठ्ठी लिहिलीय.  साईराजला जितकी आईची काळजी वाटतेय तितकाच तिच्या कामाबद्दल अभिमानही आहे.  किती तळमळीने लिहिलंय त्याने! आपलेही डोळे पाणावतात ही चिठ्ठी वाचून.

प्रिय आई,

आई तू दवाखान्यामधून आल्यावर काळजी घेत जा. तुझ्या दवाखान्यात कोरोनाचे पेशंट असतात. तू हात स्वच्छ धूत जा. तोंडाला मास्क वापरत जा.

देवराजला व मला गावी सोडून पंधरा दिवस झाले. आम्ही सर्वजण काळजी करत आहोत. तू देशासाठी चांगलं काम करत आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. आपला देवराज नऊ महिन्यांचा असूनसुद्धा तू कामावर जातेस. पप्पा व मी देवराजची काळजी घेतो. मी पण अभ्यास करतो. तुझ्यासारखे मी पण देशासाठी काम करेन.

तू तुझी काळजी घे.

 तुझाच,

साईराज

करोनाविषयी काय वाटतंय याविषयी इयत्ता तिसरीची स्वानंदी तिच्या चिठ्ठीतून सांगतेय –

कोरोना हा एक वायरस आहे. कोरोना वायरस चीन या देशामधून आला आहे. या वायरसमुळे कोणालाही बाहेर पडता येईनासे झाले आहे. कारण नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन ठेवला आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो आपल्या घशात जाऊन फुफ्फुसात जातो. याची लक्षणं डॉक्टरांना १०-१२ दिवसांनी कळतात. अशा लक्षणांमुळे खूप जणांचा मृत्यू झाला आहे. आपण कुठेही बाहेर म्हणजे बाजारात जाताना मास्क किंवा रुमाल बांधून जावे. तिथून आल्यानंतर हात साबणाने किंवा डेटॉलने स्वच्छ करावेत आणि घालून गेलेले कपडे धुवायला टाकावेत. ज्यांना सर्दी – खोकला आहे त्यांनी घरात मास्क लावून बसावे. कोणालाही हात लावू नये. जर हात लावलाच तर हात स्वच्छ धुवावेत. कुठेही जाताना गर्दी करून बसायचे नाही. एका हाताचे अंतर ठेवून बसायचे. कोरोनापासून खूप दूर राहावे. त्यासाठी आपली स्वतःची काळजी घ्यावी. डॉक्टर, नर्स स्वतःची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्थितरित्या काळजी घेत आहेत. मेडीकल सुविधा पुरवून कोरोनाग्रस्तांना उपचारादरम्यान बरे करत आहेत. महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारीदेखील आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

धन्यवाद!

स्वानंदी मोहिते (इ. 3री)

तिसरीतील नंदिना करोनाविषयी म्हणतेय –

आत्तापर्यंत आपल्या देशावर खूप संकटे आली आहेत. त्या सर्व संकटांना आपण तोंड दिले आहे, पण हे संकट वणव्यासारखे पसरत आहे. काही हरकत नाही. आपण सर्वजण घरात राहून सतत हात धुऊन, बाहेर जाताना मास्कचा वापर करून, मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांचे म्हणणे ऐकून, आपल्या पोलीस काकांची, सफाई कामगारांची व नर्स, डॉक्टर यांची घरात राहून मदत करू. आज या परिस्थितीत कोणी गरीब नाही व कोणी श्रीमंत नाही. आपण सर्व एकत्र आहोत. हे सुंदर जग बघण्यासाठी आपण नऊ महिने आईच्या पोटात होतो व पुढचे जग बघण्यासाठी अजून काही महिने घरात का राहू शकत नाही? कोरोना व्हायरसला हरवू शकत नाही का? सहा महिने अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता, पण सहा महिने शिवाजी महाराज गडावर शांत बसले होते. त्यांनी संयम राखला, योजना केली आणि मग मोठ्या शिताफिने अफजल खानाचा वध केला. याला म्हणतात गनिमी कावा. एक लक्षात ठेवा, आपण याच मातीत जन्म घेतला आहे. आज आपण त्याच भूमिकेत आहोत. शत्रू दाराशी आलेला आहे, म्हणजेच कोरोना व्हायरस. तो आपण बाहेर निघण्याची वाट बघत आहे. परंतु आता आपली परीक्षा आहे, संयमाची व गनिमी काव्याची. आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा. जास्त गडबड करू नका. शांत डोक्याने विचार करा. घाबरू नका. या शत्रूसोबत आपण नक्कीच लढूया आणि मा. पंतप्रधान मोदीजींचे म्हणणे ऐकून घरात राहूया व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया. सुरक्षित राहूया.

आपल्या कुटुंबाची काळजी न घेता २४ तास आपल्यासाठी झटणाऱ्या पोलीस काकांचे म्हणणे ऐकूया. विनाकारण रस्त्यावर नको फिरूया. घराच्या बाहेर नको पडूया. घरात राहू. सुरक्षित राहू.

कोरोनाचा अर्थ :

को – कोणी

रो – रोडवर

ना – नका फिरू

धन्यवाद!

 – नंदिनी सुरवसे (इ. तिसरी )

कोरोनापासून सर्व जग मुक्त होईलच, परिस्थिती बदलेलच. या काळात मुलांचं हे आनंदी असणं, आपापला आनंद शोधणं, जबाबदारीने वागणं आपल्याला केवढं तरी बळ देऊन जातंय एवढं मात्र नक्की!

– संकलन – शिक्षक टीम, डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा, गोरेगाव

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

 1. करोनाकाळातील चीनच्या अमित वाईकर यांचा अनुभव -https://www.thinkmaharashtra.org/2020/04/shanghai-resident-tells-wuhan-experience.html

 2. Respected Sadhana Mam, i am blessed to have Best Guide and supporter like you behind me. Through you i get such intelligent articles which are preaching me how to deal with any situation
  Coming back to above article of A.BGoregsonkar…D.Jijibhoy school, teachers & letters written by junior students are heart touching. Efforts of school team to cultivate student with proper culture and advise is beyond words.
  First letter represents family bonding and mutual understanding. How the son opens his mind towards his parents sacrifice, especially, his mother’s devotion and dedication towards our Nation is beautifully narrated in his letter.
  Second lok letter depicts about the guidelines to be adhered during this rampage of monstor virus period.
  Third letter, describes about how entire network of country including PM, CM, Doctors, nurses, housekeeping staff etc are equally putting their full efforts to serve and save people. So message is clearly given in this letter about the duty of people, to respond to the advised given by authorities. Example of our Ch.Shuvaji Maharaj perfectly fits to guide how our emotions and feelings should be kept in control. Like every person takes period of 9 months in mother’s womb, and see this beautiful world thereafter , so in this critical situation it is everyone’s duty to Stay at Home and Stay Safe.
  I think how these students are developed by School, through very simple but strong bond of intimacy that they use their brain at proper direction and avoid depression, and lead to creative and constructive future for themselves and ultimately for our Nation.
  I from my bottom of heart Congratulate the entire team of School and of course, loving children who are under right roof leading to right path .

 3. खूपचच छान उपक्रम. मुलांच्या अभिव्यक्ती साठी उपयुक्त

 4. एक उत्तम कृती. लहान मुलांच्या संवेदनशील तेचे अप्रतिम प्रत्यंतर.

 5. वा ….आपल्या शाळेचे नेहेमीच काहीतरी हट के उपक्रम असतात……खूपच छान ….मुलांचे पत्रलेखन अतिशय सुंदर….

 6. Very superb

Leave a Reply

Close Menu