माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम (भाग २)

१४ – १५  डिसेंबर २०१९ रोजी परळ – मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि आर.एम. भट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत शिक्षकांसाठी ‘माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील निवडक निबंध ‘मराठी प्रथम’वर प्रकाशित करण्यात येत आहेत. आघाणवाडी, बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका चारुशीला भामरे यांचा या निबंधमालेतील हा दुसरा निबंध –

———————————————————————————   

सान थोरा देते, सन्मान मराठी

           भावभावनांचा पदर, मखमली मराठी

           जात ,धर्म, वेश ,भाषा गुंफते मराठी

           आम्हा अभिमान, आम्ही बोलतो मराठी!

अशा सुंदर, मधाळ मराठी भाषेत शिक्षण घेऊन मराठी जिल्हा परिषद शाळेत मला नोकरी लागली. जिल्हा परिषद शाळा म्हणजे काय, याची पुसटशी सुद्धा कल्पना शाळेत हजर होण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मला नव्हती. पंचायत समितीतून ऑर्डर घेऊन तीन-चार किलोमीटर पायी प्रवास करून वडिलांसोबत शाळेत पोहोचले आणि शिक्षक होऊन वर्गात छान-छान शिकवण्याचे मनसुबे क्षणार्धात कोसळले. एका आडवळणाच्या गावात असलेली एकच वर्गखोली, मोठी वाटत असली तरी भरलेली दिसत होती. सगळी मुले एकाच वर्गात बसलेली, आधी पहिलीची रांग ,मग दुसरीची रांग, त्याच्या बाजूला तिसरी आणि मग शेवटी चौथी. अशी शाळा मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. बाप रे! कसे शिकवायचे यांना एकाच वर्गात? किती ही अस्वच्छ मुले! असा विचार पटकन मनाला शिवून गेला. अशा वातावरणाने मन पुरतं गोंधळलेलं असतानाच मुख्याध्यापकांनी ” मॅडम, या मुलांना शब्द द्या” अशी आज्ञा दिली आणि डोक्यावर आघात झाल्यासारखे वाटले. एरवी हुशारीनं सगळीकडे पुढाकार घेणारी मी, त्या क्षणी एकदम मठ्ठ झाल्यासारखी वाटू लागली. शब्दही आता माझी फिरकी घेऊ लागले होते. अशी झाली मराठीच्या शब्दांची आणि माझ्या नोकरीची पहिली ओळख!

हळूहळू शाळेतलं वातावरण समजत गेलं. शाळेतलं प्रत्यक्ष काम आणि डी.एड. चं शिक्षण यांच्यात काहीच ताळमेळ नाही, हे लक्षात येत गेलं. त्यामुळे आता आपल्याच पद्धतीने, नव्या कल्पकतेने ही सगळी परिस्थिती हाताळावी लागणार याची समज आली. त्यामुळे अध्ययन – अध्यापनामध्ये मी छोटे-छोटे प्रयोग करू लागले. युक्त्या वापरून, विनोद करून, गाणी – कविता सुस्वर चालीत गाऊन, विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून शिकवू लागले. मला पहिल्यापासून गायनाची आवड असल्याने आणि त्यातल्या त्यात आवाज बऱ्यापैकी असल्याने, नवीन बाईंचे गाणे/कविता आणि त्यामुळे अध्यापन मुलांना आवडू लागले. यातूनच मराठी भाषेची आवड निर्माण झाली. मुले आवडीने कविता/ गाणी साभिनय व तालासुरात गाऊ लागली, पाठांतर करू लागली. मराठीची गोडी लावण्याचे पहिले काम तर फत्ते झाले, याचं समाधान वाटलं.

आता दुसरा मुख्य टप्पा होता मूलभूत क्षमता पूर्ततेचा. सगळी मुले वाचती – लिहिती व्हावीत यासाठी बाराखडीवर आधारित वेगवेगळे वाचन तक्ते, बाराखडीचक्र, शब्दचक्र, घडीचित्रे, शब्दपट्ट्या, चित्र वाचन यासाठी विविध कात्रणे, चित्रे संग्रहित करून स्वतः वेगवेगळे साहित्य तयार करून त्याचा अध्यापनात वापर करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना आवडेल, हाताळता येईल आणि खेळातून शिक्षण मिळेल अशा प्रकारे विचार करून विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे हा सुरुवातीचा उपक्रम. यामुळे अध्ययन – अध्यापनात खूप फायदा झाला .

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, शारीरिक विकासासाठी यांसारखे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू केला. या विविध उपक्रमांमध्ये पटनोंदणी पंधरवडा व प्रवेशोत्सव कार्यक्रम, विविध थोर नेत्यांच्या जयंत्या – पुण्यतिथ्या साजऱ्या करणे, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, वृक्षारोपण दिन, श्रमदान व शाळा सजावट, स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम, परिसर भेटींचे आयोजन, हळदीकुंकू समारंभ, वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन, विविध गुणदर्शन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, योगदिन, बेटी बचावो – बेटी पढाओ दिन, टाकाऊपासून टिकाऊ साहित्यनिर्मिती व सजावट, ग्रामस्वच्छता अभियान, रक्षाबंधन, राख्या तयार करणे, ज्ञानरचनावादी विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे, अपंग दिन/विज्ञान दिन इत्यादी विविध दिनांच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबवता आले. त्याद्वारे विद्यार्थ्यांना संभाषण, प्रत्यक्ष कृती यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देता आल्या. या सगळ्यातून मला अपेक्षित असणारा परिणाम म्हणजे मुलं वाचती – लिहिती होताना दिसू लागली.

भाषिक उपक्रम

तरीही या विविध उपक्रमात माझ्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरले असे काही नावीन्यपूर्ण उपक्रमांचा तपशिलात उल्लेख करते. यामध्ये ‘चारोळी लेखन व काव्यलेखन कार्यशाळा’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांमधील खऱ्या कलागुणांना उमलण्याची संधी मिळाली. तिसरी ते पाचवीच्या मुलांनी छान चारोळ्या तयार केल्या, कविता लिहिल्या. एका जिल्हा परिषद शाळेसाठी ही खूप आनंदाची गोष्ट होती. त्याचप्रमाणे २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले जिल्हा परिषद शाळेतील पहिलेच ‘बाल कवी संमेलन’ हेही माझ्या उपक्रमातील आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच खऱ्याखुर्‍या काव्य संमेलनाचा अनुभव आणि आस्वाद यासोबतच नवनिर्मितीचा आनंद घेता आला.

भाषेशी संबंधित आणखी एक उपक्रम राबवायला सुरुवात केली, तो म्हणजे दररोज वेगवेगळ्या भाषेत एकाच आशयाचं  वाक्य कसं बोललं जातं, याची प्रात्यक्षिके व सराव घेतला गेला. विविध भाषांची ओळख या ‘भाषा संगम’ उपक्रमाद्वारे करून देता आली. यांमुळे बंधूता निर्माण झाली, सर्वधर्मसमभावास खतपाणी मिळाले. मुलं गुजराती, इंग्रजी ,पंजाबी, हिंदी, तमिळ इत्यादी विविध भाषांशी व भारतातील वैविध्यपूर्ण सौंदर्याशी नकळत जोडली गेली.

पर्यावरणप्रेम

या सगळ्या उपक्रमांमधील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘स्वतःच्या वाढदिवशी शाळेत कागदी पिशव्या बनवणे’. त्या पिशव्या आपल्या गावातील, शहरातील दुकानांना ‘प्लास्टिक बंदी’विषयी जनजागृती व्हावी म्हणून मोफत दिल्या. त्यामुळे श्रमप्रतिष्ठा, विज्ञाननिष्ठा, पर्यावरणप्रेम याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

ध्वजमुक्त ध्वजदिन

 माझ्या शाळेतील या उपक्रमांपैकी आणखी एक नाव विसरून चालणार नाही. हा उपक्रम ‘ध्वजमुक्त ध्वजदिन’ या नावाने राबवण्यात आला. गेल्या वीस वर्षांपासून मी हा उपक्रम राबवत असल्याने  शाळेतील एकही विद्यार्थी, पालक प्लास्टिकचे झेंडे किंवा कागदी झेंडे घेऊन ध्वजवंदनासाठी येत नाहीत. त्यामुळे दुकानातही त्याची विक्री होत नाही व नकळत होणारा झेंड्याचा अपमान टाळला जाऊन एकप्रकारे देशभक्ती वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

शैक्षणिक जत्रा

हा उपक्रम विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव देऊन जातो. यामध्ये समारंभप्रमाणेच मंडप वगैरे टाकून आठवडाभर आधी बनवलेले विविध गणितीय, विज्ञान, इंग्रजी, मराठी या विषयांवर आधारित शैक्षणिक साहित्य, प्रयोग यांची मांडणी करून प्रदर्शन भरवण्यात येते. या सगळ्यात मुलं रमतात. नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सादरीकरण, सभाधीटपणा इत्यादी कौशल्येही शिकतात.

गावातील माजी विद्यार्थिनीस मी दरमहा एक हजार रुपये मानधन देऊन सतत तीन – चार वर्षे केलेले ‘उपचारात्मक अध्यापन’ अतिशय मोलाचे ठरले. कारण त्या तीन वर्षात पहिली ते पाचवी या वर्गांवर मी एकच शिक्षिका असल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊ शकला असता. या उपक्रमामुळे मला तो टाळता आला आणि विद्यार्थ्यांना समूह गायन स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत नेता आले.

याव्यतिरिक्त जलसप्ताह दिंडी, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत परिसरातील अग्निशामक विभागाच्या समन्वयाने घेतलेली कार्यशाळा यांसारख्या उपक्रमातून आगीपासून संरक्षणाची  माहिती आणि प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना अनुभवता आले. त्याचप्रमाणे अत्याधुनिक अग्निशामक गाडीचा  थरार पाहता आला, इंद्रधनुष्य कसे तयार होते यामागचे विज्ञान जाणता आले.

समजपूर्वक वाचन प्रकल्प

अशाच अनेक उपक्रमांमध्ये मागील वर्षी घेतलेला अत्यंत महत्त्वाचा आणि मराठी विषयाशी संबंधित असलेला उपक्रम म्हणजे ‘समजपूर्वक वाचन प्रकल्प’. यासाठी दिवाळीच्या सुट्टीत पुणे येथे सदर विषयावर’ टी. पी. आय. एफ ‘या संस्थेद्वारा आठ दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेतले आणि ते वर्षभर विविध अध्यापनपद्धती आणि उपक्रमांद्वारे शाळेत राबविले. या उपक्रमामुळे माझ्या जिल्हा परिषद शाळेतील लाजऱ्याबुजऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांच्या अंगीभूत कौशल्यांना, भाषा समजून घेण्याच्या क्षमतेला एक वेगळीच दिशा मिळाली. या प्रयत्नाचे फलित म्हणजे आमच्या जिल्हा परिषद शाळा काकोळेमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची टि.पीआय.एफ.अंतर्गत व्हिडिओनिर्मितीसाठी निवड झाली. तो व्हिडिओ आता त्यांच्या संकेतस्थळासाठीही निवडला गेला आहे. ही गोष्ट जिल्हा परिषद शाळा काकोळेसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय मानाची होती. हा सर्व उपक्रमातील अतिशय यशस्वी व शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा उपक्रम ठरला. या उपक्रमाद्वारे संपूर्ण गावाला, पालकांना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांची, क्षमतांची नवीन ओळख मिळाली.

प्रश्ननिर्मिती कौशल्य

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याचे कौशल्य अतिशय चांगल्या प्रकारे विकसित करता आले. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली, चिकित्सक विचार, निर्णयक्षमता, समजपूर्वक वाचन इत्यादी अनेक कौशल्यांचा विकास करता आला.

या आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या कल्पना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे मला यशस्वीपणे राबवता आल्या आणि त्याचे फलित विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या यशाच्या रूपाने माझ्या पदरात नेहमीच पडत राहिले. विद्यार्थ्यांचंच हे यश म्हणजे माझ्या उपक्रमाचंच यश आहे असं मला वाटतं.

 – चारुशीला किरण भामरे

(लेखिका आघाणवाडी, बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 8 Comments

 1. Charusheela Kiran Bhamare

  धन्यवाद सर

 2. Anonymous

  खूपच प्रेरणादायी कार्य …मॅडम सलाम तुम्हाला

  1. Anonymous

   धन्यवाद

 3. प्रविण कदम

  खुप छान मँँडम
  असेच नाविन्यपुृर्न उपक्रँम आपल्या शाळेेत राबवित रहा
  पुढील वाटचालीस शुभेच्छा

  1. Charusheela Kiran Bhamare

   धन्यवाद सर

 4. Subhash-Suryavanshi

  खुपच छान लेख, मुलांना वेळेवर योग्य समज यावी, इतरांपेक्षा मागे पडु नयेत यासाठी अशा शिक्षकांची गरज आहे. माहीतीबद्दल बहुविधचाआभारी आहे.

 5. अक्षय अंकुश गायकवाड (कराड )

  खूप छान निबंध चारुशिला मॅडम.
  तुमच्या सारख्या उपक्रमशील शिक्षकांची गरज आहे आपल्या मराठी शाळेला.
  तुम्ही ज्या प्रकारे निबंध लिहिला आहात तो वाचून खूप छान वाटले. तुमचं मराठी भाषेवर जे प्रेम आहे, आपुलकी आहे याचा आनंद खूप वाटतो…
  असंच मराठी भाषेवर व विद्यार्थ्यांवर प्रेम करत राहा.
  तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

  1. Charusheela Kiran Bhamare

   धन्यवाद सर

Leave a Reply