fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

तरुणाईच्या मनातले शिवाजी महाराज आणि शंभुराजे

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबरोबर आपल्या ऐतिहासिक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या यांचे ‘सोहळे’ सुरू झाले. या सोहळ्यांचं इतकं पीक आलंय की त्यांची सुगी संपायचं नावच घेईना. या ‘सोहळ्या’च्या दिवशी समाजमाध्यमांवर पोष्टींचा पाऊस पाडला की आपली जबाबदारी संपली, हा संस्कार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजताना दिसतो आहे. आजच्या छत्रपती शंभुराजांच्या जयंतीनिमित्ताने तरुणाईच्या या अंतरंगाचा वेध घेतला आहे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रदीप जानकर या विद्यार्थ्याने –

——————————————————————————

दुर्गपती, गज-अश्वपती, भूपती प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्टप्रधानवेष्टीत, न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनीतिधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजी महाराजांच्या नावापुढे लावण्यात येणाऱ्या ह्या केवळ बिरुदावल्या ऐकून अनेकांच्या अंगावर शहारा येतो, मग त्यांचा खरा पराक्रम समजून घेण्याची गरज उरत नाही. अशा बिरुदावल्यांमधून आपण महाराजांना एक प्रकारचं देवत्व बहाल करत जातो आणि दुसरीकडे आपल्यावरची जबाबदारी कमीकमी करत जातो असं प्रकर्षाने वाटतं. जी गोष्ट शिवाजी महाराजांची, तीच शंभुराजे किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबाबत म्हणता यईल. १७व्या शतकातील शिवाजी महाराज, शंभुराजे यांचा काळ हा सरंजामशाहीचा होता. आताच्या तुलनेत परिस्थिती बरीच वेगळी होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या शाह्या जणू आक्रमण करण्यासाठी सज्ज होत्या. आज आपण त्यावेळची स्थिती कशी असेल याबद्दल केवळ कल्पनाच करू शकतो. आजच्या लोकशाहीत शिवशाही राबवण्यासाठी वेगळ्या तंत्रांचा विचार करण्याची गरज तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे.

मात्र आजचा तरुण  पुरेशा प्रगल्भपणे शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांच्या राजकारणाचा विचार करतोय का, हा खरा प्रश्न आहे. नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे या प्रश्नाच्या उत्तराच्याही दोन बाजू आहेत. आजचे तरुण आंदोलन, मोर्चे यांमधून दिसतायत, मराठी भाषेची चळवळही नवी पिढी पुढे नेऊ पाहतेय. पण त्यातली दुसरी बाजू सारं काही आलबेल नसल्याचे जणू संकेत देतेय. शिवजयंतीला मोठ्या संख्येने रायगडावर जाणं, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून प्रदर्शन करणं हेही सारं आजची तरुणाई करतेय. पण तेच गडकिल्ले स्वराज्याचं प्रतीक होते; त्या गडकिल्ल्यांच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला ना शासनाला वेळ आहे, ना तरुणांना! आधीच्या राज्य सरकारने गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. पण त्याची अंमलबजावणी झालेली आज इतक्या वर्षांनंतरही दिसत नाही. त्याच सरकारने गडकिल्ले खासगी कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा अनाठायी निर्णय घेतला होता. माहितीच्या अधिकारासारखं भक्कम हत्यार असताना त्यामार्फत यासंदर्भात माहिती मिळवून पाठपुरावा करण्याची तरुणांची मानसिकता असलेली दिसत नाही. केवळ शिवभक्त, मावळा, शिवकन्या असे भारदस्त शब्द आपल्या नावापुढे लावून, हातात भगवा झेंडा घेऊन आणि कपाळाला चंद्रकोर लावून नुसतं मिरवण्यात कसला अभिमान? ‘छत्रपती शिवाजी महाराज की… म्हणाल्यावर ज्याच्या तोंडी आपसूकच ‘जय’ येतं तो मराठा’; असं म्हणणं आजच्या ‘मराठा’ शब्दाला प्राप्त झालेल्या जातिवाचक अर्थाच्या पार्श्वभूमीवर सपशेल चूक आहे. शिवाजी महाराजांनी धर्म, जातीचा भेद न बाळगता समानतेची कास धरली, त्यांच्याच राज्यात असं काही घडावं, हे दुर्दैवी आहे. त्यांच्याकडे केवळ ‘हिंदूंचा राजा’ म्हणून पाहणं अयोग्य आहे. इतिहासाचा विपर्यास तर अगदी सोयीनुसार केला जातो. केवळ आपल्या स्वार्थी हेतूसाठी इतिहासाची अशी बोळवण केली जात असेल तर ते न पटण्यासारखे आहे. कसलाही विचार न करता बेधडक वक्तव्य केल्यामुळे शूरपणा सिद्ध करण्याचा अयशस्वी प्रयत्न काही तरुणांकडून केला जातो. पूर्वीच्या काळी राजा हा देवाचा अंश आहे, असा गैरसमज होता. दुर्दैवाने आजही तसंच काहीसं घडताना दिसतंय. ते म्हणजे, शिवाजी महाराजांना ईश्वरी अवतार मानण्याची घोडचूक आजची तरुणाई करताना दिसतेय.

गोविंद पानसरे यांनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात या प्रकारच्या समाजमनाचा अत्यंत खरपूस समाचार घेतला आहे आणि तो आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू होतो. ते म्हणतात –

“शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. “शिवाजीसारखं वागा”, “रयतेला सतावू नका”, “बलात्कार करणारांना पाठीशी घालू नका”, “रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका”, “स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका” असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं, ‘तो शिवाजी कुठं ? आपण कुठं ? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार ? आपण आपलं असंच वागायचं.’ देव असल्यामुळे वर्षातून एकदा ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची. जमलं तर थोडी खर्चायची अन् जास्त खायची. कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं. शिवभक्त म्हणवून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजीसारखं वागायची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजीनं रयतेला मदत केली. आता त्याच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा अन् शिवाजीचा फोटो लावायचा अन् काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीचा गैरवापर आहे. शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे. भोंदू कोण अन् भक्त कोण हे तरुण पिढीने नीट ओळखून शिवाजीराजे अभ्यासायला हवेत.”

आज समाजात खरे शिवाजी महाराज, खरे शंभुराजे अन् खोटे भक्त अशी दयनीय अवस्था  निर्माण झालेली दिसते. शिवजयंती तिथीनुसार की तारखेनुसार साजरी करायची या वादात  शिवजयंती जयंती न राहता त्याचा ‘इव्हेंट’ झालाय एवढं मात्र नक्की! हे सगळं तात्पुरत्या आनंदासाठी, मजेशीर अनुभवासाठी  हवंसं वाटू शकतं. परंतु अविवेकाच्या मार्गावरून जाता जाता विवेकी कृतीला तिलांजली देण्याचं काम काही तरुण करत आहेत ते थांबायला हवं. शिवाजी महाराज जसे होते तसे पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचे आहेत. मात्र त्यासाठी गरज आहे ती जाणीवपूर्वक विचार करण्याची. आणि जर वैचारिक पाया भक्कम असेल तर योग्य कृती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता आपणच ठरवायला हवं की, शिवाजी महाराजांना केवळ देवत्व बहाल करून त्यांचा जयजयकार करायचा की त्यांना आपल्या कृतीत उतरवायचं?

या विषयावर माझ्याच वयाच्या तरुणांशी संवाद साधल्यावर आलेले अभिप्राय इथे त्यांच्याच शब्दांत देत आहे –

प्रश्न – साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून राज्यव्यवहार कोश करून घेतला होता, परंतु सद्यःस्थितीत मराठी शाळांची बिकट अवस्था बघता त्यात टोकाची तफावत जाणवते. याबाबत काय वाटतं?
उत्तर – इंग्रजी गरजेचं आहे. काळानुसार बदल करणं आवश्यक आहे. मराठी शाळेतील इंग्रजीच्या अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठी जगवण्याची जबाबदारी शासनाची तसेच इथल्या प्रत्येक नागरिकाची आहे.

– अक्षय चव्हाण – विद्यार्थी,  मॉडर्न महाविद्यालयल, पुणे.

प्रश्न – स्त्रियांची अब्रू हा मुद्दा महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र सद्यःस्थितीत स्त्रियांची अब्रू लुटण्याची अनेक उदाहरणे घडताहेत, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
उत्तर – खरंतर या मुद्द्यावर स्त्रियांचा पोशाख कधीच कारणीभूत ठरत नाही. लोकांची दृष्टी निरोगी असणं गरजेचं आहे. बलात्काराच्या घटनांचे निकाल जलदगतीने सोडवले गेले पाहिजेत, जेणेकरून परिस्थितीवर वचक बसू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे मुलींसोबत मुलांनादेखील वेळेचं बंधन घालणं जरुरीचे आहे.

– अश्विनी काळे – विद्यार्थी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई

प्रश्न – धर्म आणि जात यांपलीकडे जाऊन राज्यकारभार करण्याबाबत काय वाटतं? तत्त्वांना मध्यवर्ती स्थान देऊन ते आजही शक्य आहे?
उत्तर –  मनात आणलं तर सर्व काही शक्य आहे, मात्र गरज आहे ती इच्छाशक्तीची! सध्याच्या राज्यकारभारात तत्त्वांना कितपत स्थान आहे हा प्रश्नच आहे. परंतु गुणात्मक राज्यकारभार करायचा असल्यास तत्त्वांना महत्त्व देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो.

– विशाल चव्हाण – विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ, मुंबई

प्रश्न – शासन आणि जनता यांतले नाते भावनिकदृष्ट्या पुन्हा एकदा मजबूत बनू शकते का? शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा पुन्हा होईल?
उत्तर – शासन आणि जनतेतलं नातं भावनिकरित्या जोडलं गेलेलं असेल तर ते टिकण्याची शक्यता अधिक असते.  शिवाजी महाराजांच्या काळातील आदर्श राज्य पुन्हा प्रस्थापित करता येऊ शकतं, परंतु लोकशाही व्यवस्थेत त्यासाठी वेगळी तंत्रे अवलंबवावी लागतील.

– शालिनी शिरसाट – विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ, मुंबई

विचारलेल्या प्रश्नांवरील या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होत्या. मुळात शिवकालीन परिस्थिती आणि सध्याच्या वास्तवात खूप तफावत आहे. परंतु त्यातही ‘आशेचा किरण’ म्हणता येतील असे काही जण समाजात वावरताना दिसताहेत, ज्यांना जाण आहे शिवाजी महाराजांच्या शौर्याची, त्यागाची अन् मराठी मातीच्या रक्षणाची. परंतु कधीकधी कळपाच्या मागे जाण्याच्या मनोवृत्तीमुळे तरुण भरकटताना दिसतोय. अशावेळी गरज आहे ती इतिहासाचा योग्य अर्थ लावत वर्तमानकालीन संदर्भ तपासण्याची आणि बदलत्या परिस्थितीत नवा इतिहास  घडवण्याची! आपली ही कृतीच  शिवाजी महाराजांसाठी, शंभुराजांसाठी खराखुरा मानाचा मुजरा ठरेल. मग काय गरज त्या ढोलताशांची अन् मोठमोठाल्या पुतळ्यांची?

प्रदीप जानकर

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 8 Comments

 1. या लेखातून एक प्रकर्षाने जाणवतं कि महाराजांना देव मानणारी युवा पिढी त्यांचे अनमोल विचार आपल्यात सामावून घेत नाही. याचीच खंत वाटते.
  शिवभक्त आणि शंभूभक्त याच्यामध्ये 80%युवक व्यसनाधीन आहेत.
  यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख चालत नाही. मग महाराज्यांच्या विचारांचा, संस्कारांचा त्यांना कसा काय रुजतो याचा विचार सारखा मनात घोळत असतो.

 2. लेख आवडला.

 3. आपण तारतम्य राखून योग्य मांडणी केलेली आहे, विचार करायला हा लेख प्रवृत्त करतो.

 4. तरूण पिढीसाठी अंजनच आहे हा लेख.

  1. धन्यवाद सर !

 5. हा लेख सर्व युवा पिढी समोर यायला हवा. केवळ मराठी प्रथम पुरता मर्यादित नको असे अवश्य वाटते

  1. तुमच्याप्रमाणेच आम्हालाही वाटलं, म्हणून हा लेख आधीच खुला ठेवण्यात आला आहे.

 6. अप्रतिम !

Leave a Reply

Close Menu