घरातली शाळा

सध्या शिक्षण व्यवस्था नवनव्या अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञान यामुळे ढवळून निघताना आपण पाहत आहोत. ज्ञानरचनावाद, मुक्त अध्यापन,  अवलंबले जात आहे. त्यातच होम स्कूलिंग या पर्यायाचाही बरेच पालक विचार करताना दिसतायत. दहा वर्षांपूर्वी हा पर्याय निवडलेल्या नीलिमा देशपांडे पालक म्हणून आलेले अनुभव मांडतायत –

——————————————————————————-

होम स्कूलिंग आजही आपल्यासाठी एक आश्चर्य किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी मी याचा विचार केला तेव्हा तर आपल्याकडे याबद्दल पुरेशी माहितीसुद्धा उपलब्ध नव्हती.

आपली मुलं, पुढची पिढी, देशाचे आधारस्तंभ या अनुषंगाने त्यांच्यात विचारांची जोपासना व्हावी म्हणून  मी ठाम होते. सहसा आपल्याकडे असं म्हंटल जातं की, आम्हाला जे मिळालं नाही ते मुलांना मिळायला हवं. यात काही चूक नाही, परंतु माझ्या दृष्टीने याचा पूर्वार्ध असा आहे की – मला जे मिळालं ते सगळं मला माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. नाही मिळालं किंवा नाही मिळू शकलं, त्याबद्दल विचार करायला हवाच, पण मिळालेलं उत्तम वारशात पुढे जायला हवं म्हणजे हवंच. असा विचार करताना आधी आठवली माझी शाळा. घरचे संस्कार तर प्रत्येकाला मिळत असतात. आपल्या घडणावळीत मोठा वाटा असतो तो शाळेचा. मग मला माझ्या शाळेने जे जे देऊ केलं त्यातलं काय काय आपण आपल्या पाल्याला देऊ शकतो अशा शाळेचा शोध  सुरू झाला.

ऑल राऊंडर, सगळं काही येणारा विद्यार्थी/पाल्य घडवणे वगैरे खुळचट संकल्पना डोक्यात नसल्यामुळे साधी परंतु, शिक्षणावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष लक्ष देणारी शाळा आम्ही पाहत होतो. तशी मिळतीजुळती शाळा मिळालीसुद्धा. पण, जे रिझल्ट्स अपेक्षित होते ते आढळून येईनात. साहजिकच आहे, कारण एकावेळी इतकी मुलं शिकत असतात, एक शिक्षक सगळ्यांकडे तेवढं लक्ष कसं देऊ शकेल? यात पालकांनी सुद्धा आपला वाटा उचलायला हवा, या विचारातून मग आपणच घरी का शिकवू नये? असा विचार पुढे आला.

लेकीने शिकायचं म्हणजे नक्की काय आणि कसं शिकायचं, याविषयीची माझी मतं स्वच्छ होती. मुळात तिला अभ्यासाची – भाषा असो की गणित – संकल्पना समजणे आवश्यक होते. त्यांनतर तिला त्यावर विचार करता येण्यासाठी त्या संदर्भातील अधिक माहिती ,वाचन किंवा निरीक्षण असणे अभिप्रेत होते. आणि त्यानंतर तिला आपला स्वतःचा विचार मांडता येणे ही अंतिम पायरी. हे करत असताना विचार मांडता येण्यासाठी, बोलण्यासाठी आवश्यक शब्दसंपदा, आपला मुद्दा पटवून देताना बाळगला जाणारा संयम आणि व्यक्त होताना संदर्भाने व्यक्त होण्याची सवय – हे शिकवणे आवश्यक होते. अशा सवयी मुलांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फायद्याच्या ठरतात.

एकदा का कसे शिकायचे हे लक्षात आले की, शिकणे सोपे जाते. आपली मातृभाषा यांत साहाय्यक ठरते. जर मातृभाषा उत्तम प्रकारे समजली तर त्याचा फायदा इतर भाषा शिकताना होतो. होम स्कूलिंगसाठी पाल्याहून अधिक तयारी पालकांची असावी असते. माझ्याही घरात विरोध झाला होता. इतका की, मलाही कधीतरी वाटायचं आपण चुकतोय का? घरच्यांच्यापेक्षा जास्त समाजातले, ओळखीचे, नातेवाईक यांनी तर मी तिच्या भवितव्याशी खेळतेय,असं जाहीर करून टाकलं होतं.

तरी मी डोळे झाकून होम स्कूलिंग करायला सुरू केलं होतं. कोणतीही विशेष माहिती समोर नव्हती, फक्त ध्येय माहीत होतं. स्वतःची वाट स्वतःच धुंडाळत होते. असं असलं तरी तिच्या बाबाने – ऋतुराजने मात्र बालमानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तो स्वतःसाठी काउन्सलिंग घेत होता. कारण, त्याचं असं ठाम मत होतं की, अनेक अडचणींचे मूळ आपण पालक असतो, ते बऱ्याच अंशी खरं आहे. माझ्या निर्णयाला (थोडासा नाईलाजानेच) पाठिंबा द्यायला हवा म्हणून माझ्या आईवडिलांनी त्यांच्या बाजूने पूर्ण सहकार्य केले. अशावेळी घरच्यांचे आपल्या सोबत असणे फार महत्त्वाचे ठरते.

हल्ली दोघेही नोकरी-व्यवसाय करणारे पालक असतात. त्यांनी काय करायचं हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मला वाटतं, होम स्कूलिंगचा विशिष्ट  साचा नाही. त्याची गाईडलाईन मिळू शकते, पण आपले पाल्य आणि आपण यांनी मिळून आपला आपला साचा बनवायचा असतो. मुळात होम स्कूलिंग करताना पालकांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. मुलं चंचल असतात, आरडाओरडा करतात, हट्टी असतात. त्यांना दिवसरात्र सांभाळणं – तेही वाढत्या वयात, वाटतं तितकं सोपं नसतं. त्यामुळे ही  सगळी तयारी असेल तर आणि तरच होम स्कूलिंगचा निर्णय घ्यावा.

आपणच आई-वडील आणि आपणच शिक्षक असल्यामुळे या संज्ञा आपण आवर्जून लक्षात ठेवून आपले वागणे असायला हवे. आपल्यालाकडे  शिकवण्याची, समजून सांगण्याची आवड आणि हातोटी हवी. अर्थात, हे पूर्णतः होम स्कूलिंग करणाऱ्यांसाठी असून अंशतः करणाऱ्यांना यातून बरीच सूट मिळू शकते. मुळात आपले ध्येय हे पाल्याचे व्यक्तिमत्त्व उत्तम होण्यासाठी असल्यामुळे या गोष्टी आपोआप जमायला लागतात.

लेक लहान असताना वेळप्रसंगी कामाच्या ठिकाणी मी तिला घेऊन फिरले आहे. तिथे कसं वागायचं किंवा आईच काम कसं महत्त्वाचं आहे, याची तिला कल्पना दिलेली असायची. खरं सांगायचं तर, मुलं अतिशय समंजस असतात, आपल्याला फक्त त्यांना तसं समजावून सांगता आलं पाहिजे.

आमच्या बाजूने आम्ही शालेय अभ्यासाची पुस्तकं आणत होतो, परंतु अभ्यास मात्र बऱ्यापैकी ऑन फिल्ड चालायचा. गडकिल्ले बघत इतिहास, कविता – गोष्टी ऐकत भाषा, फिरायला गेलो की गावांची नावं – जिल्हे – सीमा असा भूगोल, अशा समग्र पद्धतीने अभ्यास व्हायचा. यातून घरातल्या लहानसहान गोष्टीत फिजिक्स, केमेस्ट्री कधी कळायला लागली कळलं सुद्धा नाही. पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून अभ्यास घेताना भाषा असेल तर वाचन, उच्चार, लेखन इत्यादी आणि गणित असेल तर पाल्याची समज बघून एकेका पायरीने शिकवत गेलो. वेळेचं म्हणजे वर्षांचं बंधनही ठेवलं नाही. कधी कधी पाचवीचे गणित आणि सातवीचे इतिहास एकाच वेळी सुरू असायचे. एकूण काय तर, आपली अभ्यासपद्धती आपण शोधून काढावी लागते.

याच बरोबरीने – खेळायला जाणे, शिबिरांना जाणे, जमेल त्या स्पर्धेत भाग घेणे, पाठांतर, उच्चार, वाचन इत्यादींचा अभ्यास चालायचा. शिवाय, घरातली लहानसहान कामे करणे, आजीआजोबांकडून नवीन काही शिकताना त्यांना आपल्याला येत असणाऱ्या गोष्टी शिकवणे असा देवाणघेवाणीचा कार्यक्रम सुरू असायचा. आठवीपर्यंत अशा अवांतर पद्धतीने अभ्यास आणि त्यानंतर पुढे शैक्षणिक स्रोतात येण्याच्या दृष्टीने दहावीची तयारी म्हणून परीक्षा, मार्क्स असा उपक्रम सुरू केला होता. हा सगळा भाग तिच्या बाबांनी सांभाळला.

मुळात, शिक्षण ही एक अनंतकाळाची प्रक्रिया आहे आणि त्यात खूप मजाही आहे. तसेच परीक्षा ही कधीही, कुठेही असू शकते, होऊ शकते याची जाणीव – अर्थात, आपल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करायचे हे समजून आले की काहीही कठीण वाटत नाही. मला वाटतं, होमस्कूलिंगमध्ये आपल्या पाल्याला जबाबदारी पेलायला शिकवायचं आहे, तीही न कुरकुरता आनंदाने!

रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आहे. लहान मुलाला घेऊन त्याची आई त्यांच्याकडे आलेली असते. ती म्हणते – “महाराज, हा छोटा मुलगा येताजाता फार गूळ खातो. त्याला जरा समजावून सांगता का?” त्यावर रामकृष्ण तिला चार दिवसांनी यायला सांगतात. चार दिवसांनी ती आई मुलाला घेऊन येते. मग ते मुलाला जवळ बसवून म्हणतात, “बाळ, सारखा गूळ खाणं चांगलं नव्हे हं”  तो छोटा हो म्हणतो आणि मायलेक निघून जातात. बाजूला असलेल्या शिष्याला आश्चर्य वाटतं. ‘हेच सांगायचं होतं तर त्या दिवशी का नाही सांगितलं?’ त्याची प्रश्नार्थक मुद्रा लक्षात घेऊन रामकृष्ण त्याला उत्तर देतात – “अरे, आधी मी माझी ही सवय बंद केली. त्याशिवाय त्याला हे सांगण्याचा मला काय अधिकार?” थोडक्यात, आपल्याला आपली जबाबदारी आनंदाने घ्यायची आहे. म्हणजे मग आपला पाल्य त्याच्या भवितव्याची जबाबदारी उत्तमप्रकारे उचलू शकेल.

आम्ही मार्क्स किंवा बाहेर कुणाशी स्पर्धा/इर्षा न ठेवता आपला पाल्य त्याच्या कुवतीनुसार आणखी काय काय करू शकेल याकडे अधिक लक्ष दिलं. या प्रवासात त्रासही झाला, अडथळे आले. ते पार करत आता मागच्या वर्षी तिने दहावीची परीक्षा दिली. त्यात चांगल्या मार्कांनी ती पास झाली. मार्क्स हे गुणवत्तेचे मापन नसले तरी, मूळ शिक्षणस्रोतात येताना तिला परीक्षा देता येणं, पेपर लिहिता येणं, हे आवश्यक होतं आणि आहे.

मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करायचा आहे, होम स्कूलिंग म्हणजे शाळेला पर्याय किंवा शाळा पद्धतीला फाटा असं नसून शालेय अभ्यासपद्धती आणि आपली अभ्यासपद्धती यातून जे जे उत्तम आहे ते ते आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवणे. आपल्या पाल्याला एकाच वेळी स्विमिंग, गाणं, वक्तृत्व, नृत्य, अभिनय, चित्रकला, कराटे यावं अशी तद्दन वेडेपणाची अपेक्षा त्याच्यावर न लादता, त्याचा कल बघून त्याच्या कौशल्यांचा विकास करता येणं म्हणजे होम स्कूलिंग. वेळोवेळी मुलांशी चर्चा, त्याला कळो अथवा न कळो त्याचं मत विचारात घेणं, त्याला सामाजिक रीतीभाती समजावून सांगणं, मृत्यू किंवा घटस्फोट यांसारखे विषय बाऊ न करता समजावून सांगणं आवश्यक ठरतं. आपण त्यांच्यापासून एखादी गोष्ट जितकी लपवू तितके ते त्यांच्यासाठी पुढे घातक ठरू शकते.

मुलं बघून बघून जास्त शिकतात, त्यामुळे त्यावर भर द्यायला हवा. आमच्या होम स्कूलिंगच्या यशात मोठा वाटा लेकीचा आहे, कारण या अभिनव प्रयोगाला तिने चांगला प्रतिसाद दिला. मी आणि तिचा बाबा एकमेकांना सांभाळत पुढे जात होतो, पण तिच्या बाजूने ती पाल्य म्हणून एकटीच होती. तिला समजून घेताना, शिकवताना, समजावून सांगताना – तिच्याइतकेच आम्हीही समृद्ध होत गेलो. आणि अजून एक – आपण आईबाबा म्हणून मुलांच्या वयाचे असतो, त्यामुळे त्यातून येणारा मोकळेपणा जपता आला की सगळं सोपं होऊन जातं.

आता जान्हवी बारावीला गेली आहे. कोविड -१९ मुळे मुलांच्या अभ्यासाची झालेली अडचण पाहता – तिने मात्र परिस्थिती पटकन स्वीकारून स्वअध्ययनाला सुरुवात केली आहे. दहावीला ८४ टक्के गुण मिळवून पुढील अभ्यासासाठी तिने आर्टस् शाखा निवडली आहे. गणित आणि अर्थशास्त्र या आवडत्या विषयांसोबत तिने राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र हे नवीन विषय घेतले आहेत. परकीय भाषा फ्रेंच ती आधीपासून शिकत असल्याने त्याचीही निवड तिने केलेली आहे. भविष्यात काय व्हायचं याची रूपरेषा आखली असली तरी, आता फक्त त्या त्या वर्षीचा अभ्यास आणि इतर नवीन काही शिकत राहणे हे अग्रक्रमी आहे.

आम्ही आमचा साचा बनवला, त्यासाठी लागणारी साधने आपल्या सगळ्यांकडेच आहेत, आपल्या गरजेप्रमाणे आपला स्वतःचा साचा बनवा. मुलांचं भवितव्य त्यांना स्वतःच घडवू द्या.

–  नीलिमा देशपांडे

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

 1. Charusheela Kiran Bhamare

  खूपच धाडसी आणि यशस्वी प्रयोग निलीमा मँडम.. सुजाण पालकत्वासाठी अत्यंत मार्गदर्शक

 2. अक्षय गायकवाड

  खूप छान नीलिमा मॅडम. वाचून खूप भारी वाटलं.

 3. सौ नीता शेंबेकर

  सुंदर, कार्य पद्धती, नक्कीच वाचायला देईन व दुसर्यां पटवून देण्याचा प्रयत्न करीन , तसेचत्या काळात खूप धाडसी निर्णय होता तो छान दोघांइच्छां निभावून नेला व जानव्हिनेही खूप छान प्रतिशत व कृती केली, व हाही पर्याय यशस्वी होऊ शकतो ह्याचे छान ,यशस्वी ,उदाहरण तुमचे आहे ,तुम्हा उभयतांना व जांव्हील अनेक शुभ आशीर्वाद…… सौ . आई

 4. SMITA CHINTALE Cheketkar

  नीलिमा देशपांडे आपण केलेले धाडस करू इच्छित असतीलही परंतु तुम्ही आणि ऋतुराज यांनी घेतलेली मेहनत घेण्याची तयारी पालकांची असायला हवीट तरच हा निर्णय योग्य राहील

 5. vilasrose

  लेख आवडला.कोरोनाच्या साथीमुळे इंग्रजी शाळेतील मुलांचा Laptop/Mobile वर Online अभ्यास सुरू झाला आहे.

 6. rajushinde

  प्रयत्नपूर्वक परंतु आनंदाने होम स्कूलिंग चा घेतलेला आपल्या पाल्यासाठीचा निर्णय तेही १०पर्यंत सांभाळणे खरंच कठीण आहे, त्यामुळे पाल्याबरोबर पालकांचेही मनःपूर्वक अभिनंदन.

Leave a Reply