करोनाकाळ आणि समाजमाध्यमांवरील भाषेची बदलती रूपे

भाषेचा चमत्कृतिपूर्ण, औपरोधिक, लक्षवेधक वापर हे समाजमाध्यमांवरील मीम्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर या मीम्समधील भाषेतून  त्या समाजाची संस्कृती, मानसिकता, विशिष्ट सवयी यांचंही दर्शन घडत असतं, इतकं की हे मीम्स त्या समाजाचा आरसाच ठरू पाहतायत. मुंबई विद्यापीठामधील मराठी विभागातील वैष्णवी, आश्लेषा आणि प्रणव सलगरकर या विद्यार्थ्यांचा करोनाकाळातील अशाच काही वैशिष्टपूर्ण मीम्समधील भाषेचा मागोवा घेणारा हा लेख –

—————————————————–

दर बारा कोसावर भाषा बदलते असं म्हटलं जातं. पण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होणारे मीम्स किंवा पोस्टस पाहिल्या तर दर एका घटनेने भाषा बदलते असं म्हणावं लागेल. निवडणुका, सण, राजकीय-सामाजिक घटना यांच्यावर आधारित समाजमाध्यमांवरील पोस्टस आठवून पाहा, म्हणजे तुम्हाला या विधानाची सत्यता लक्षात येईल. मात्र या सगळ्या घटना तात्पुरत्या असल्याने त्या भाषेचा समाजावर दीर्घकाळ प्रभाव राहत नाही. करोनाच्या साथीचं मात्र तसं झालं नाही. गेले चार महिने आपण टाळेबंदीत आहोत आणि ही टाळेबंदी  संपून सर्व जग करोनातून कधी मुक्त होईल हे आज तरी कोणालाही सांगता येत नाहीये. करोनावर अजून लस नाही की नेमके प्रतिबंधात्मक उपायही कोणाला गवसले नाहीत. मग खात्रीचा इलाज म्हणून बऱ्याच देशांनी टाळेबंदीचा मार्ग स्वीकारला. इंग्रजीतील ‘लॉकडाऊन’ या शब्दाला भाषाजागरूक प्रसारमाध्यमांनी ‘टाळेबंदी’ शब्द वापरायला सुरुवात केली, तरी सर्वसामान्य माणसाच्या तोंडीमात्र ‘लॉकडाऊन’ हा शब्दच रुळला. तेच क्वारंटाईन – विलगीकरण, आयसोलेशन, सोशल (फिजिकल) डिस्टसिंग  या शब्दाबद्दल म्हणता येईल. आधी एका विशिष्ट संदर्भात वापरल्या जाणाऱ्या या शब्दांना आता करोनाकाळाचा एक नवा संदर्भ प्राप्त झाला आहे.

हेही वाचा :-

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – दोन)

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – तीन)

पूर्वीच्या नेहमी खरे बोलावे, सकाळी लवकर उठावे या सुसवयीप्रमाणे हल्ली लोक एकमेकांना `घरी राहा – सुरक्षित राहा’ या सवयीचा अवलंब करायला सांगत आहेत. याचा सर्वात अधिक प्रत्यय सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअप स्टेटस पाहताना आपण सगळेच घेत आहोत. प्रेम हा विषय अनादी काळापासून कवींना साद घालत आला आहे, मीमर्सना म्हणजे मीम्सच्या निर्मात्यांनाही प्रेम हा विषय जिव्हाळ्याचा वाटला तर नवल नाही. काही लोकांमध्ये  करोनाचा संसर्ग होऊनही विशेष लक्षणे आढळून येत नाहीत हे पाहण्यात आल्यावर त्याची तुलना थेट प्रेमाशी केली गेली ती अशी – ह्या कोरोनाचंही प्रेमासारखंच आहे, होऊन जाईल आणि कळणारसुद्धा नाहीतसेच प्रेमावर दुवा अन्  दवा यांपैकी कशाचाच परिणाम होत नाही हे आपले चित्रपट आणि अनुभव वर्षानुवर्ष आपल्याला सांगत आलेत. प्रेमाविषयीचं हे चिरंतन भाष्य थेट करोनाशी जोडलेले मीम्सही तुमच्या  पाहण्यात आले असतील.

आपल्याकडे मार्चच्या ऐन मध्यावर करोनाचा कहर सुरू झाला आणि अचानक टाळेबंदी सुरू झाली. मार्च – एप्रिलचे हे दिवस म्हणजे सगळीकडे परीक्षांच्या धामधुमीचे दिवस! यंदा मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे मुलांच्या आनंदाला सीमा उरली नाही. खरं तर दरवर्षीच असं काही होऊन परीक्षा रद्द व्हाव्यात हे परीक्षांना कंटाळलेल्या मुलांचं दिवास्वप्न असतं. हे दिवास्वप्न पुढच्या वर्षीही खरं व्हावं असं वाटणाऱ्या मेंदूत मग पुढील विचार वळवळतात –

करोनामुळे परीक्षा रद्द झाल्या हा शिक्षणव्यवस्थेवर तातडीने झालेला परिणाम होता. पुढील काळात या करोनाचा मराठीच्या पेपरमध्ये निबंधाचे स्वरूप बदलण्यावर परिणाम होऊ शकेल.  पूर्वी शाळा – कॉलेजामध्ये मराठी विषयात ‘शाळा बंद पडल्यातर’, ‘परीक्षा नसत्या तर’ यासारखे निबंध दिले जायचे. करोनोत्तर काळात या विषयावर निबंध लिहिणं कल्पनात्मक राहिलेलं नाही. त्यामुळे त्याचं स्वरूप बदलून ते अनुभवपर निबंध होईल.उदा – शाळा बंद होत्या तेव्हा, लोकल बंद झाली तेव्हा असे विषय द्यावे लागतील.

हेही वाचाः-

हे बंध रेशमाचे!

शब्दांच्या पाऊलखुणा – चावीचा दगड (भाग – बारा)

पूर्वी घराच्या बाहेर पडताना अत्यावश्यक गोष्टींच्या लघुरूपाला उद्देशून ‘पेरूचा पापा’ (पेन,रूमाल,चावी,पाकीट,पास) म्हटलं जायचं. नंतरच्या काळाच पेनाची जागा मोबाइलने घेतली अन् नवे रूप झाले ‘मोरूचा पापा’. आता करोनाकाळात या रूपाची जागा ‘मोरूचा मासा’ (मोबाईल,रुमाल,चावी,मास्क,सॅनिटायझर) घेऊ पाहत आहे. शिवाय आत्ता एसएमएस  (Short Messege service) शब्दाचा अर्थ बदलून तो  एस- सॅनिटायझर, एम- मास्क , एस- सोशल डिंस्टन्सिंग होऊ घातल्याच्या काही पोस्टस तुम्ही पाहिल्या असतील.

मीम्स कल्पक तर असतातच, शिवाय त्यामध्ये सामाजिक – सांस्कृतिक वैशिष्ट्येही ठळकपणे दिसतात, इतकी की मीम्स हे त्या समाजाचा आरसाच वाटावीत. (‘साहित्य हे समाजाचा आरसा असते’ या चालीवर). हे विधान अतिरंजित वाटतंय का? मग काही मीम्सच पाहा ना –

सुनेला मनातून सासू – सासऱ्यांविषयी आदर नसला तरी सामाजिक रूढी म्हणून तिने त्यांच्या विषयी आदर दर्शवण्यासाठी डोक्यावर पदर घ्यायला हवा, ही आपली संस्कृती! त्या धर्तीवरचं पोलिसांविषयी आदरयुक्त भीती दाखवणारं हे मीम किती बोलकं आहे. करोनामुळे मृतांचा आकडा वाढायला लागल्यावर स्वर्ग – नरक या हिंदू धर्मातील मृत्यूनंतरच्या जगातील संकल्पना आणि यम ही मृत्यूदेवता यांची सांगड घालत बनवलेले हे मीम पाहा –

करोनाकाळात अनेक गोष्टींचे स्वरूप बदलले, तसे लग्नाचेंही बदलले. लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालून लग्ने पार पडू लागली. याविषयीच्या मीम्सनांही ऊत आला. लग्नात घेतल्या जाणाऱ्या उखाण्यांमध्ये पूर्वी सनई, चौघडा, हंडा, कळशी, परात, मंडप, दिवा, आशीर्वाद ह्या शब्दांची रेलचेल असायची. ती जागा चक्क मास्क, लॉकडाऊन, सॅनिटायझर या शब्दांनी घेतलेली दिसते. त्यासाठी हे एकच उदाहरण बोलकं ठरेल.

‘लॉकडाऊनच्या काळात लग्न करणं हा मोठा टास्क

जिलेबीचा घास भरवते तोंडावरून काढ तो मास्क’

मीम्समधून समाजाची विशिष्ट मानसिकता दर्शवणारी किती तरी उदाहरणे  सांगता येतील. संतोषी मातेच्या व्रताची थोरवी सांगण्यासाठी पूर्वी विशिष्ठ संख्येत पत्रके वाटण्याची पद्धत होती. अगदी त्याच चालीची धार्मिकता दर्शवणारे हे मीम पाहा –

एरवी मुलं मोबाइलवर खूप वेळ घालवतात म्हणून शिक्षक – पालक मुलांच्या मागे भुंगा लावायचे, पण आता करोनाने परिस्थिती  पुरती उलटवलीय. मोबाइलची उपयुक्तता मुलांबरोबर आता शिक्षक आणि पालकांनी नाइलाजाने का होईना मान्य केलेली दिसतेय. ‘सांग सांग भोलेनाथ पाऊस पडून शाळेभोवती तळं साचेल का?’ असा प्रश्न विचारणारे बालसवंगडी आता ‘सांग सांग भोलेनाथ पाऊस पडून इंटरनेट बंद होईल का? म्हणण्याची चाहूल या मीम्सनीच करून दिली.

करोनापूर्व काळात मुलं शाळेत न गेल्याबद्दल किंवा उशीर झाल्याबद्दल बरं नव्हतं इथपासून ट्रेन लेट होती, अमूक नातेवाईक गेले अशी मोठीच्या मोठी यादी तोंडपाठ करायचे. आता ऑनलाइन शाळा – कॉलेजेस् सुरू झाल्याने अर्थातच ही यादी कुचकामी ठरणार आहे. पण मीम्समधून लगेच नवी यादी तयारही झाली आहे. इंटरनेट स्लो होतं किंवा वायफाय बंद झालं, पीसी हॅन्ग झाला इ. शिवाय टाळेबंदी शिथिल होऊन शाळा सुरू झाल्या तर मुलांच्या तक्रारीचं स्वरूप काय असू शकेल याचं हे मजेशीर मीम पाहा –

यातून शाळेतल्या मुलांची वर्गातली भांडणं, त्याविषयी शिक्षकांकडे केल्या जाणाऱ्या तक्रारी यांचं विनोदी रूपातील हे चित्र  आधी मनात आणि मग गालावर फुलल्याशिवाय राहत नाही.

काही शहरांमध्ये सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यावर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसू लागताच पुन्हा कडक टाळेबंदी लागू करण्यात आली अन् तिथल्या नागरिकांचा दारुण हिरमोड झाला. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले मीम्स आपल्या सगळ्याला लहानपणीची आठवण करून देणारे आहे – लॉकडाऊनमधलं आयुष्य सापशिडी सारखं झालंय. जरा सगळं सुरळीत होतंय म्हंटलं की सरकार त्या सापासारखं परत आहे त्या जागेवर आणून ठेवतंय!

पुणेरी पाट्या हा पुणेकरांसाठी अभिमानाचा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी चेष्टेचा विषय असला तरी  करोनाच्या संबंधातल्या दोन पुणेकरांनी लिहिलेल्या या पाट्यातला हा विनोद खास आहे. अर्थात ही थट्टा ओघानेच अपुणेकराची असणार हे उघड आहे.

उधाऱ्या घेऊन त्या न चुकवता देणेकऱ्यांपासून तोंड लपवून फिरण्याच्या भारतीयांच्या मानसिकतेचा संबंध  थेट जागतिक आरोग्य संघटनेशी जोडून तयार केलेलं हे  मीम मोठं गमतीशीर तर आहेच, पण त्यातून भारतीयांचा स्वभावही अधोरेखित होतो.

टाळेबंदी अंशतः उठली. अत्यावश्यक सेवा ज्या आधी सुरूच होत्या, त्यात आणखी वाढ झाली. तीन महिने घरात राहून कंटाळलेले नागरिक फिरायला बाहेर पडले. मरीन ड्राइव्हवरील अशाप्रकारे फिरणाऱ्या माणसांच्या गर्दीचं दृश्य समाजमाध्यमांवर खूपच फिरलं.

त्यातल्या माणसांच्या गर्दीपेक्षा तो फोटो जास्त गर्दीपर्यंत पोहोचण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं, त्यावरचं ‘मरीन पण फिरीन’ हे वाक्य. मरीन ड्राइव्हच इतकं मजेशीर भाषांतर वाचून तुम्ही कितीही हातचं राखून हसणारे असलात, तरी गालातल्या गालात हसलाच असाल. नंतर तर या मीम्सचं इतकं सामान्यीकरण झालं की मरीन ड्राइव्ह या स्थळाची मर्यादा ओलांडून ते कोणत्याही शहरातल्या गर्दीसाठी वापरलं गेलं.

इथे उल्लेख केलेल्या मीम्सपेक्षा आणखी कितीतरी विविध प्रकारची मीम्स तुम्ही वाचली, पाहिली असतील किंवा स्वतःही बनवली असतील. तुम्हाला हा मीम्सचा प्रकार आवडतोय याचा अर्थ तुम्ही त्यातल्या भाषेच्या तिरकस वापराच्या प्रेमात आहात. या लेखाने तुमचे हे चमत्कृतिपूर्ण भाषाप्रेम वाढेल याची खात्री आहे…!

– वैष्णवी खोलम, ८४२५८५४४८३, kholamvaishnavi@gmail.com

– आश्लेषा बांदेकर, ७५०६०९४२४५,  ashleshab14yahoo.com

– प्रणव सलगरकर, ७३७८४०३५७१, pranav.salgarkar942@gmail.com

(तीनही लेखक मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचे विद्यार्थी आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 19 Comments

 1. Snehal Belekar

  खूपच सुंदर लेख आहे.
  छान वाटलं वाचून.
  फक्त कोरोनाच्या बातम्या ऐकून वाचून कंटाळलेल्या डोक्याला गंमतीशीर लेख वाचून छान विरंगुळा मिळाला.
  Keep it up.

 2. Rubiya

  Khup sunadar lekh ahe… 🙂🤗 keep going guy’s.

 3. Rupali gaikwad

  Nice … Corona vishai chya batmya sodun nvin kahi read krayla milale… Keep it up… 4 u r bright future…

 4. vilasrose

  लेख खूपच आवडला. करोनाच्या काळातील भाषा व विविध चित्रांचा खूपच चांगला आढावा लेखात घेतला आहे.

 5. asmitaphadke

  Very nice article !thanks !!

 6. dabhay

  अप्रतिम।
  Sms चा नवीन अर्थ कळला।
  Sanitizer, mask, social dist

Leave a Reply