नाही नेट, तरी शिक्षण थेट

टाळेबंदीमध्ये अनेक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र दुर्गम भागांमध्ये असे शिक्षण सुरू करायला अनेक अडचणी येतायत. ठाणे, बदलापूर, आघाणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या अडचणींवर मात करत मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहचवले जात आहे, याविषयी सांगतायत तिथल्या मुख्याध्यापक चारुशीला भामरे –

——————————————————

करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पहिला प्रतिबंधात्मक निर्णय म्हणून १७ मार्च २०२० पासून महाराष्ट्रात टाळेबंदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे ऐन तोंडावर असलेल्या परीक्षा शाळाशाळांमधून रद्द करण्यात आल्या. तसेच आमच्या आघाणवाडी (ता.अंबरनाथ,जि.ठाणे) जिल्हापरिषदेच्या शाळेतही सगळ्या मुलांना सुट्टी देण्यात आली. मात्र ३० मार्च २०२० पर्यंतचा  कालावधी लक्षात घेऊन वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात आला. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात शाळेच्या पालक समूहावर आणि वैयक्तिकही व्हॉट्सअपद्वारे ऑनलाइन शिक्षण कसे देता येईल याबाबत प्रयत्न सुरू झाले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नव्हते त्यांच्या पालकांच्या साध्या मोबाइलवर संपर्क साधून वेळोवेळी सुट्टीमध्ये करायला दिलेला गृहपाठ विद्यार्थी करतात की नाही, याची चौकशी वर्गशिक्षकाद्वारे व मुख्याध्यापकाद्वारे करण्यात आली. घरच्या घरी करता येतील अशा भाषा, गणित विषयांच्या काही कृतीही विद्यार्थ्यांना दिल्या. परंतु जसजसा टाळेबंदीचा कालावधी आणि करोनाचा प्रसार वाढत होता, तसतसे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यासंदर्भातल्या आमच्या अडचणीतही भर पडत होती.  नेट रिचार्ज, पालकांची आर्थिक परिस्थिती,नेटवर्कचा लहरीपणा या साऱ्यामुळे ऑनलाइन शिक्षण पुरविण्याबाबत आम्ही आखलेल्या सर्व संकल्पना कागदावरच उरतात की काय असे आम्हाला वाटू लागले होते.

आघाणवाडीच्या या शाळेत मी जून २०१९ मध्ये रुजू झाले होते. विद्यार्थ्यांची, गावाची आणि तिथल्या लोकांची ओळख होऊन त्यांच्याशी जुळवून घेता – घेता दोन-तीन महीने सहज निघून गेले. त्यानंतर सहकारी शिक्षिकेच्या मदतीने पालकभेटी व सभा घेऊन विविध शालेय उपक्रम राबवून शैक्षणिक वातावरण आनंददायी होण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या शैक्षणिक वर्षांत थोडा फार जम बसतोय न बसतोय तोच करोना महामारीमुळे अचानक देशभरात आणि ठाणे जिल्ह्यातही टाळेबंदी जाहीर झाली आणि माझ्या प्रयत्नांनाही खीळ बसली.

ऑनलाइन शिक्षणाबाबत इतर ठिकाणी केले जाणारे सर्व प्रयोग व वारंवार केले जाणारे सर्व आग्रह आदिवासी – ग्रामीण भागातील शाळांमध्ये पूर्णत: अपयशी ठरत आहेत. कारण या दुर्गम भागांत हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या पालकांकडेच स्मार्टफोन आहेत, त्यात इंटरनेटच्या अडचणीही आहेत. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे इंटरनेट वापरण्यासाठी पुरेसा डेटा आणि वेग मिळू शकत नाही. म्हणूनच,आपल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण प्रवाहात आणता येईल का,असा विचार मनात आला आणि त्यादृष्टीने  आम्ही प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा :-

लीलाताई : प्रयोगशील शिक्षणाचा प्रेरणास्रोत

हे बंध रेशमाचे!

मुलांना त्यांच्या आयुष्यात परिस्थिनुरूप येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी हाच तर शिक्षणाचा उद्देश असतो. शिक्षक शिक्षणातून तशा क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत असतो. अशा कसोटीच्या प्रसंगांमधूनच कळते की आपण येणाऱ्या परिस्थितीतून कसा मार्ग काढणार आहोत. आणि आता कसोटी होती विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसं पोचवायचं, या प्रश्नावर उत्तर शोधण्याची. उत्तर शोधण्याचा पहिला टप्पा समस्या ओळखण्याचा असतो आणि समस्या आम्ही ओळखली होती. आमच्या मोजक्या पालकांकडे स्मार्ट फोन होते, पण ते वापरायला गावात इंटरनेट नव्हतं. हे लक्षात घेऊन पूर्वीपासूनच शाळेला विविध उपक्रमाद्वारे सहकार्य करत असलेल्या ‘कारुण्य ट्रस्ट’च्या कार्यकर्त्यांशी मी संपर्क साधला. गावातील माजी विद्यार्थिनी अर्चना खांडवी हिची ‘स्वयंसेविका’ म्हणून नेमणूक करण्याबाबत चर्चा केली व त्याला यश मिळाले. यापूर्वीही हीच विद्यार्थिनी स्वयंसेविका  म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी जास्तीचा एक तास अध्यापन करत असे, परंतु करोनाकाळात शाळाच बंद असल्याने तो सरावही थांबला होता. (मी या आधी काकोळे जिल्हा परिषद शाळेत तीन वर्षे एकटीच शिक्षक होते, तिथेही गावातील माजी विद्यार्थिनीला स्वतः मानधन देऊन स्वयंसेविका नेमण्याचा उपक्रम राबवला होता.) ‘कारुण्य ट्रस्ट’चे कार्यकर्ते विष्णूभाऊ यांच्याशी झालेल्या चर्चेअंती अर्चनाला देत असलेल्या मानधनात मुख्याध्यापक म्हणून आपणही खारीचा वाटा उचलून तिला आर्थिक सहकार्य करावे असे ठरवण्यात आले. मानधनासोबतच स्वयंसेविकेकडे आधीच असलेल्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली. स्मार्ट फोन असणाऱ्या पालकांशी संपर्क ठेवण्यासाठी ही सोय करणं आवश्यक होतं.

मात्र हा उपक्रम सुरू करण्याआधी, हे ‘ऑफलाइन  शिक्षण’ असल्याने गावातील ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष – सदस्य, सर्व मातापालक, ग्रामस्थ यांची सोशल डिस्टंसिंग (शारीरिक अंतर) ठेवून सभा घेतली. त्यासाठी त्यांना फोनवरून संपर्क करून विचारणा करण्यात आली. या सभेत ऑफलाइन शिक्षणाबाबत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे स्वरूप समजावून देण्यात आले.

दिनांक १६ जुलै, २०२० पासून स्वयंसेविका अर्चना खांडवी आणि शाळेतील दोन शिक्षक यांच्या मदतीने दररोज एका इयत्तेतील विद्यार्थ्यांना दोन तास ऑफलाइन शिक्षण देण्यात येत आहे. या दोन तासांत दोन विषयाचे अध्यापन केले जाते. एका आठवड्यात प्रत्येक वर्गाला अशा दोन तासिका मिळतील असे स्वरूप ठरवून अध्यापन केले जाते. त्यासाठी विषय व घटकानुसार आवश्यक व्हिडीओ, पीडीएफ,  शैक्षणिक साहित्यनिर्मितीबाबत मार्गदर्शन  व साधनांची उपलब्धता यांबद्दल शाळेतील दोन्ही शिक्षक वर्गनिहाय मार्गदर्शन करून देत आहेत. त्यामुळे इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन – अध्ययन अनुभव  देता येत असल्याचा आनंद होत आहे. पुढील कालावधीत इयत्ता  पहिलीलाही या उपक्रमात जोडून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.

त्या दृष्टीने दुसरी ते पाचवीचे विषय व वार वाटून स्वयंसेविकेला वेळापत्रक तयार करून देण्यात आले. दररोज १०.३० ते १२.३० असे २ तास वर्ग भरवण्यात येतात.

सोमवार – चौथी – मराठी व गणित

मंगळवार- पाचवी/दुसरी – मराठी व गणित

बुधवार – तिसरी – मराठी व गणित

गुरूवार – चौथी – इंग्रजी व परिसर अभ्यास

शुक्रवार – पाचवी/दुसरी  -हिंदी/इंग्रजी/परिसर अभ्यास

गर्दी होऊ नये, सुरक्षित अंतर राखता यावे व आलेल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावे यासाठी वरील वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना गावातील समाज हाँलमध्ये दररोज बोलवण्यात येते. दिलेल्या वेळापत्रकानुसार आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा त्याच दिवशी स. १० वाजेपर्यंत विषय व घटकावर आधारित विविध व्हिडीओ, पीडीएफ,लिंक्स आणि शासनाने तयार केलेली डिजिटल मार्गदर्शिका इ. स्वयंसेविकेच्या मोबाइलवर पाठवण्यात येते. मी माझ्याकडील वर्गांचे(३री/४थी/६वी) आणि सहकारी शिक्षिका त्यांच्या वर्गाचे (२री/५वी) असे वरीलप्रमाणे साहित्य व स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडीओ आपापल्या वारी स्वयंसेविकेला पाठवतो. ते पाहून, वाचून, समजून घेऊन स्वयंसेविका हॉलमध्ये विद्यार्थ्यांना दररोज शिकवते. व्हिडीओ दाखवून मुलांना संकल्पना अधिक स्पष्ट होतातआणि न समजलेले, चुकलेले तिथेच समजावून सांगितले जाते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कृतीही करून घेतल्या जातात. उदा. कोन शिकवण्यासाठी आधी कोन म्हणजे काय? यासाठी संकल्पना – स्पष्टीकरण, स्वतः आकृतीत कोन शोधणे, कागदाच्या घड्या घालून झालेले कोन मोजणे इ. आणि गृहपाठासाठी – घरातील वस्तूंचे निरीक्षण करून कोन आढळणाऱ्या जागांची, वस्तूंची नावे लिहा, कोनांची चित्रे काढा याप्रमाणे अभ्यास देण्यात येतो. त्यामुळे त्याचा घरीही सराव होतो. सुशिक्षित पालक घरी विद्यार्थ्यांचा गृहपाठ करून घेतात. मोबाइल असलेल्या पालकांना वैयक्तिक व वर्गांच्या ‘ऑनलाइन शिक्षण’ समूहावर हाच अभ्यास व इतर व्हिडीओ पाठवण्यात येतात,जेणेकरून त्या दिवशी आपला वार नसल्याने, घरी असलेले विद्यार्थी घरीच पाहून, ऐकून आणि कृती करून शिक्षणाच्या प्रवाहात राहतात.  त्याचप्रमाणे दर शनिवारी ‘छान छान गोष्टीतून हसत खेळत अभ्यास’ हा उपक्रम राबवला जातो. मी स्वतः सर्वांना समजेल अशी एक गोष्ट निवडून त्याचे कथाकथन ध्वनिमुद्रित करून ‘ऑनलाइन शिक्षण’ या पालकांच्या समूहावर व स्वयंसेविकेला व्हॉट्सअपद्वारे पाठवते. गोष्टीवर आधारित काही वैचारिक, ज्ञानात्मक, कृतियुक्त,आनंददायी प्रश्नही सोबत पाठवते. लहान विद्यार्थी गोष्ट ऐकून तोंडी उत्तरे देतात, तर मोठ्या वर्गातील लिहितात.

तीन ठिकाणच्या वस्तीतील विद्यार्थी आघाणवाडी शाळेत येत असल्याने नियोजनात थोडासा बदल करून प्रवासाची सोय व सोबत यासाठी माजी विद्यार्थ्यांना – पाचवी उत्तीर्ण होऊन दुसऱ्या शाळेत सहावीत दाखल झालेल्या – सामावून घेण्यात आलेले आहे. त्यांनाही या उपक्रमात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृहपाठाबाबत थोडी समस्या आहे. पण पालकांना फोन करून, मुलांनी केलेल्या गृहपाठाचे समूहावर फोटो पाठवून, अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे समूहावर टाळ्या, पुष्पगुच्छ, चॉकलेट इ. इमोजी आणि ऑडिओ क्लिप याद्वारे अभिनंदन केले जाते, प्रोत्साहन देण्यात येते. त्यामुळे हळूहळू गृहपाठ पूर्ण करणाऱ्यांची संख्या वाढेल अशी आशा आहे. त्याहीपेक्षा विद्यार्थी शालेय वातावरणात  परत येत आहेत, जुळवून घेत आहेत, निदान ऐकून – पाहून, कृतियुक्त तरी शिकतच आहेत याचे समाधान जास्त आहे.

त्याचप्रमाणे गावातील शाळेतूनच पास होऊन सहावीत गेलेल्या आणि काही अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या १ली ते ५वीच्या विद्यार्थ्यांना देखील या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे. त्यासाठी पालकांच्या भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात व या उपक्रमात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या उपक्रमाला पालक व विद्यार्थी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विद्यार्थी रोज नियोजनाप्रमाणे तासाला हजर राहतायत. पालकांच्या व्हॉट्स्अप गटावर पालकही घरी घेतलेल्या अभ्यासाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवून सहभागी होत आहेत. त्या निमित्ताने मोबाइल तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक  वापराबाबत जागृती निर्माण होतेय. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ८० टक्के विद्यार्थी शिक्षण प्रवाहात सहभागी झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेऊन त्यावरही आम्ही नक्कीच उत्तर शोधून काढू.

या प्रकारे विद्यार्थ्यांचे शिक्षण  सुरू करण्यासाठी आघाणवाडीतील ग्रामस्थ – पालक यांचे सहकार्य मोलाचे आहे. तसेच स्वयंसेविकेच्या मानधनात ‘कारुण्य ट्रस्ट’ने वाटा उचलल्यामुळे तिलाही मदत करता आल्याचे समाधान आहे. करोनाकाळात सुरक्षितता बाळगून मुलांना  शिक्षण-प्रवाहात ठेवण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न सुरू आहे.

– चारुशीला भामरे.

(लेखिका ठाणे, बदलापूर, आघाणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 10 Comments

 1. Neha

  Bhamre Madam, we have made some educational videos in marathi, if you wish we would like to share them with your children. Thank you !

 2. Anonymous

  छान उपक्रम आहे.

 3. संगीता जगतराव काकड

  खूपच स्तुत्य मॅम या संकटातही घाबरून न जाता वेळ काढून मुलांना शिकवणाऱ्या स्वयंसेवक तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन

 4. kakash

  खूप छान प्रयत्न आहे.आम्ही पण आता हा कार्यक्रम राबवितो.धन्यवाद

  1. साधना गोरे

   आकाश सर, जरूर राबवा आणि तुमचा प्रयत्न आम्हालाही कळवा. तो आणखी कुणाला तरी प्रेरणादायक ठरू शकेल.

 5. VinayakP

  ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपले आणि आपल्या टीमचे मनापासून अभिनंदन भामरे मॅडम. तसेच ह्या प्रयत्नांची योग्य दखल घेऊन त्याची माहिती पुनःश्च द्वारे पोहोचवल्याबद्दल पुनःश्चचेही आभार.

 6. dabhay

  खूपच स्तुत्य उपक्रम।
  अभिनंदन चारुशीला भामरे जी

  1. Arjun Jagadhane

   खूप छान मॅडम… संकटात हतबुद्ध होऊन बसण्यापेक्षा सकारात्मक कृती करणं महत्त्वाचं. अभिनंदन.

 7. भाग्यश्री तेंडोलकर

  खूपच स्तुत्य प्रयत्न. चारूशीला मँडम व सर्व संबंधितांचे अभिनंदन.

 8. चारुशीला भामरे

  धन्यवाद! साधना मँडम ..आमच्या प्रयत्नांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल

Leave a Reply