बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओंजळ’

करोनाच्या संकटामुळे शाळा – महाविद्यालये अजूनही ठप्प आहेत. ती कधी सुरू होतील हेही सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षकांनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन अनेकविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्यांनी एकत्र येऊन इयत्ता बारावीच्या मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲपची निर्मिती केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही उपयोगी ठरणाऱ्या या ॲपविषयी सांगतायत मुंबई येथील क. जे. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयामधील मराठीच्या शिक्षक आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्य सुचेता नलावडे. या ॲपनिर्मितीतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे –

——————————————–

करोना संकटातही आपण दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करत आहोत. गणपतीबाप्पा ही बुद्धीची, कलेची देवता! यंदा  प्रत्येकाच्या मनात हीच इच्छा आहे की विघ्नहर्त्या गणेशाने करोनाचे संकट कायमचे दूर करावे आणि पूर्वीचा जीवनप्रवास पुन्हा एकदा सुरू व्हावा. सध्या वर्क फ्रॉम होम तर कधी प्रत्यक्ष नोकरी – कार्यालयाच्या ठिकाणी जाणे असा दिनक्रम हळूहळू चालू झाला आहे, पण शिक्षणाचे काय? विद्यार्थ्यांचे काय? असा विचार शिक्षकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. बारावीचे वर्ष म्हणजे करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वर्ष.  प्रत्येक विषयाचा समग्र अभ्यास करायचा तर थांबून चालणार नाही. तेव्हा शिक्षक-विद्यार्थी-पालक या सर्वांची गरज ओळखून ‘ओंजळ’ हे ॲप तयार करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदलला आहे.  नवीन अभ्यासक्रम व टाळेबंदी अशी दोन्ही आव्हाने समोर असताना ‘बालभारती’च्या बारावीच्या पाठ्यपुस्तक अभ्यासगटातील आम्ही सहा शिक्षक एकत्र आलो व विद्यार्थ्यांसाठी काहीतरी छान करू या, अशा एकमताने टाळेबंदीच्या काळात कामाचा शुभारंभ केला. सेवाभाव, प्रामाणिक प्रयत्न, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक योगदान व विश्वसनीयता या निकषांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांसाठी सकस व चिरकाल टिकणारेअसे काही द्यावे या ध्येयाने प्रेरित झालेल्या आम्हांला ही अभ्यासपूर्ण ‘ओंजळ’पुढे करताना मनस्वी आनंद होत आहे. ह्या ओंजळीत सतत काही ना काही सकस येतच राहणार आहे.

हेही वाचलंत का?

नाही नेट, तरी शिक्षण थेट

संपादकीय – नवे शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा

डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद, सुचेता नलावडे, रेणू तारे आणि आरती देशपांडे या सहा शिक्षकांच्या स्वयंस्फूर्त प्रयत्नांतून ही भाषेची ओंजळ साकारली आहे. ‘शाळा नाही, शिक्षण सुरू’ हे या शैक्षणिक वर्षाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. काही ठिकाणी ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करते.  ‘कालाय तस्मै नम:’ या उक्तीनुसार भाषेच्या शिक्षकांनी तंत्रस्नेही होऊन विद्यार्थ्यांना भाषेने जोडत आपली मराठी अधिकाधिक समृद्ध करावी ही प्रामाणिक अपेक्षा आहे. ह्या ॲपद्वारे आम्ही साहित्य व तंत्रज्ञान यांचा सुमेळ साधाण्याचा प्रयत्न केला आहे.

मन, मस्तिष्क व मनगट या त्रयींना चालना देणारे बारावीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित हे पहिले ॲप आहे, पुढे जाऊन असेही म्हणावेसे वाटते की, फक्त बारावीचे मराठीचे विद्यार्थीच नाही तर सर्वांसाठीच ॲपचे द्वार स्वागतशील आहे. ह्या ॲपचे महत्त्वाचे विशेष पुढीलप्रमाणे सांगता येतील –

 • पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकावर अभ्यासपूर्ण विवेचन
 • पीपीटी, कृती आणि ध्वनिचित्रफिती (व्हिडिओ)
 • त्या त्या क्षेत्रांतील निवडक तज्ज्ञांच्या ध्वनिचित्रफिती
 • पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक यांच्यावर अभ्यासपूर्ण टिपणे
 • एखाद्या पाठाचा विचार कसा करावा आणि तो स्वत:च्या भाषेत अभिव्यक्त कसा करावा यांवर आधारित टिपणे
 • प्रत्येक पीडीएफमध्ये आकर्षक चित्र – प्रतिमांचा वापर
 • ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून ही ‘ओंजळ’ फक्त ऑनलाइन न ठेवता त्यातील पीडीएफ डाऊनलोड करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • ही ओंजळ विद्यार्थ्यांना स्वयंअध्यय करण्यासाठी उपयुक्त आहेच, शिवाय शिक्षकांनाही आपले अध्यापन प्रभावी करण्यासाठी उपयोगी आहे.
 • इतर विषयांच्या तुलनेत मराठी भाषेसंबंधी इ-साहित्याची मर्यादा जाणवत होती, ती उणीव या ॲपमुळे पूर्ण होते.

या ॲपमधील काही दृक्-श्राव्यफितींची निर्मिती पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्यांनी केली आहे, तर काही त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी, मान्यवरांनी आपली एक ‘ओंजळ’ भेट म्हणून दिली आहे. त्यांना आवश्यक तिथे तबल्याच्या तालातील संगीताची सुरेख साथही लाभली आहे. पाठ्यपुस्तकातील कवी वसंत आबाजी डहाके, लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले व कवयित्री हिरा बनसोडे या मान्यवरांच्या टिपणांचा यामध्ये समावेश आहे. या दृक्-श्राव्यफितींचा थोडक्यात आढावा –

मुखपृष्ठ वाचनाच्या दृक्-श्राव्यफितीमध्ये आपल्याला मुखपृष्ठाचे समग्र आकलन होते. काव्यानंदाच्या फितीमध्ये तोंडी परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल अशा गीतांचे सादरीकरण ऐकता येईल. कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘रोज मातीत’ ह्या कवितेतील शब्दचित्रांमध्ये आपलं मन रममाण होऊन जाईल. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांना कविता अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील.

साहित्यिक शिवराज गोर्ले यांच्या ‘आयुष्य…आनंदाचा उत्सव’ ह्या पाठाची दृक्-श्राव्यफीत तरुणाईला भावेल अशीच तयार करण्यात आली आहे. ‘पद्मश्री’ सन्मानित बा.भ. बोरकर यांच्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेवरील फितीमध्ये निसर्गसौंदर्य व बोरकरांची संपन्नप्रतिभा प्रत्ययाला येते.गझलकार सुरेश भट यांच्या ‘रंग माझा वेगळा’ भायावरील फितीमध्ये अनेकविध गीतांचा नजराणा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

संतवाङ्‍मयाच्या वारीचे दर्शन करताना संत एकनाथांच्या भारुडाची महती ‘विंचू चावला’ या फितीतून कळते, तर साहित्यिक डॉ. यू.म.पठाण यांच्या ‘रेशीमबंध’ या ललितगद्याच्या फितीमध्ये वृक्ष-वेली, निसर्ग व आपले युगानुयुगाचे नाते उलगडले आहे. वसंत आबाजी डहाके यांच्या ‘समुद्र कोंडून पडलाय’ ह्या कवितेवरील फितीमध्ये समुद्राच्या रूपाचे अनोखे दर्शन घडते, तर कवयित्री हिरा बनसोडे यांच्या ‘आरशातील स्त्री’ ह्या फितीमध्ये स्रीवादी साहित्याचा मागोवा अभ्यासता येईल.

कथेच्या दालनात डोकावताना ‘कथाकथनाची कथा’ या फितीतून ‘डॉ. राजेश सामंत’ यांनी कथाकथनाची खासियत सांगितली आहे, तर डॉ. वंदना बोकील यांच्या फितीमध्ये कथाकथनाची झलक व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभेल. उपयोजित मराठीच्या भागात‘मुलाखती’वरील फितीमध्ये महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार चिंतामण पत्की यांनी मुलाखतीचे तंत्र विशद केले आहे.‘माहितीपत्रका’ च्या फितीमध्ये ‘पब्लिक रिलेशन एजन्सी’ च्या वर्षा मराठे यांनी माहितीपत्रकाचे महत्त्व सांगितले आहे. ‘अहवाला’च्या फितीत ‘भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रसाद देवधरांनी अहवालाचे नेमके स्वरूप स्पष्ट केले आहे, तर वृत्तलेखाच्या फितीमध्ये पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांनी ‘फिचर्स’ विषयी उपयुक्त माहिती दिली आहे. थोडक्यात, मुलांना आणि शिक्षकांना ह्या रंगसंगतीयुक्त तसेच संगीतमय दृक-श्राव्यफिती आवडतील असा विश्वास आहे.

एखाद्या पाठाचा अथवा घटकाचा विचार कसा करावा आणि तो स्वत:च्या भाषेत अभिव्यक्त कसा करावा,  फक्त परीक्षार्थी न राहता ‘विद्यार्थी’ कसे होता येईल याचा विचार करून बनवलेली ही ‘ओंजळ’ विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही आवडेल अशी आहे. ‘स्वप्रयत्नांसाठी समर्थ’ असं बोधवाक्य असलेल्या या ‘ओंजळी’तून आम्ही सर्जनाचे अंकुर देत आहोत, विद्यार्थी त्याची मशागत करून स्वप्रयत्नांतून ते रुजवतील असा सार्थ विश्वास आहे.

प्ले स्टोअरवर ‘ओंजळ – स्वप्रयत्नांसाठी समर्थ’ असे लिहून तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करता येईल. या ॲपची लिंक-

https://play.google.com/store/apps/details?id=com.online.book.hscmarathi&hl=en

– सुचेता नलावडे

(लेखिका मुंबई येथील क. जे. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठीच्या शिक्षक आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्य आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

 1. कुमारी धनश्री विजय फाळके .

  खूप छान उपक्रम आहे. सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमा-मार्फत योग्य मराठी विषयाचे ज्ञान मिळो . सर्वांना शुभेच्छा👍👍 . उपक्रम आयोजित कर्त्यांचे मनस्वी आभार .☺️

 2. Anonymous

  खूपच छान उपक्रम!!

Leave a Reply