संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि शाहीर अमर शेख


स्वातंत्र्यानंतर भारतात भाषा हा निकष आधारभूत मानून घटक राज्यांची निर्मिती झाली. मात्र मराठी भाषकांचे राज्य स्थापन करणे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी सोपी ठरली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारावा लागला. समाजवादी नेते, पत्रकार, कामगार हे या लढ्यात आघाडीवर होते. या सर्वांना लढण्याचं बळ दिलं ते शाहिरांनी! इतकंच नव्हे, आपल्या पहाडी आवाजात त्यांनी हा लढा महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लोकशाहीर अमर शेखांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख - 

-------------------------------------

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावात मुनेरबीच्या पोटी २० ऑक्टोबर १९१६ साली अमर शेख (महेबूब) यांचा जन्म झाला. आपल्या पदरात असलेले हे बाळ संगीताने लोकमनावर राज्य करेल हे मुनेरबीला माहीत नव्हते, परंतु काव्यरचनेचे संस्कार त्या बाळावर मुनेरबीकडूनच होत होते. अमर शेख यांची आई - मुनेरबी ही दखनी उर्दुमिश्रित मराठीमध्ये ओव्या व काव्यरचना करत असे. अमर शेखांनी काव्याचा वारसा आपल्या आईकडूनच घेतला. मुनेरबीने शाळा पाहिली नव्हती, पण जगाच्या शाळेत ती खूप शिकली होती. आणि म्हणूनच तिने लहानग्या महेबूबला शाळेची वाट दाखविली. तो शाळेत रंगून जात होता खरा, पण आतून अस्वस्थ होता. गरिबीमुळे आईला करावे लागणारे कष्ट पाहून मनात दुखावत होता. अशीच जिवाची घालमेल सुरू असताना नेमका त्याला कंठ फुटला. निसर्गाने त्याच्या कंठात फार मोठी संपत्ती दिली होती. पहाडी स्वर त्याला प्राप्त झाला होता. लहानपणापासूनच त्याला गाण्याचे वेड होते. पेटी, तबला, तंबोरा यांत त्याचे मन रमत असे.

हेही वाचलंत का?

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

संपादकीय – मराठी राज्याची साठोत्तरी कहाणी

नेमक्या याच काळात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. स्वातंत्र्य चळवळीत काम करून आपली गायन शक्ती खऱ्या अर्थाने सत्कारणी लावायची असे अमर शेखांनी ठरवले. आणि मग ही सुरावट खेड्यापाड्यांत पोहचू लागली, लोकजागृती करू लागली. याच वातावरणात त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यातूनच त्यांचे शब्दसामर्थ्य वाढले. आपण दुसऱ्याची भाषा बोलतो, दुसऱ्याच्या भाषेत विचार मांडतो; पण आपण आपली भाषा तयार करायला हवी असे त्यांना वाटू लागले. मराठीतले कितीतरी कवी त्यांच्या कंठात रुळले. कुसुमाग्रजांची ‘गर्जा जयजयकार’ ही कविता  त्यांच्या हाती आल्यावर तिला त्यांनी स्वतःची चाल दिली. मेळ्यांतून त्यांचे गाणे दूरवर पसरले. त्यांचा आवाज पहाडी होता, परंतु आपल्या गायनाला शिस्त लागावी म्हणून त्यांनी कृष्णराव पंडितांचे शिष्य नारायण भट यांच्याकडे काही काळ गाण्याचं शिक्षण घेतलं.

१९३८ साली बार्शीतील एका संपात अमर शेखांची कॉ. रघुनाथ कऱ्हाडकरांशी भेट झाली. त्यांना मार्क्सवादाची दीक्षा कऱ्हाडकरांनीच दिली आणि कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीत ओढलं. अमरशेख सातवीपर्यंतच शिकलेले होते. कधी शेतमजुरी करणे, कधी वर्तमानपत्रे विकणे, बसमध्ये क्लिनरचं काम करणे, कधी गिरणीच्या साच्यावर काम करणे, असं जगत असताना त्यांनी मार्क्सवादाचा स्वीकार केला. मार्क्सवादामुळे आपली दृष्टी व्यापक झाली आणि समोरच्या विविधरूपी प्रेक्षकांची नाडी ओळखण्याची क्षमता आपल्यात आली, असं त्याचं मत होतं. सोलापुरात शेतकऱ्यांच्या मोर्च्यात सामील झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे ते कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सामील झाले.

१९४४ मध्ये टिटवाळा इथे झालेल्या शेतकरी परिषदेत अमर शेख सहभागी झाले. या परिषदेत त्यांच्या बरोबर अण्णाभाऊ, द. ना. गव्हाणकर इ. कलावंतही होते. या परिषदेत उदयाला आलेले 'लाल बावटा' कलापथक नावारूपाला आणण्यात अमरशेखांचा मोठा वाटा होता. ते या पथकातील प्रमुख गायक व कलाकार होते. लिहिण्याचे काम अण्णाभाऊ व गवाणकर करत. अण्णाभाऊंच्या लिखाणातील जनतेच्या सुखदुःखाशी सहसंबंध दाखवणारा आशय आणि लोकांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी अमरशेखांची गायकी, यांमुळे लालबावटा हे त्या काळचं सर्वात लोकप्रिय कलापथक होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात याच अण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्या कलापथकांन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून लोकांमध्ये प्रचंड जागृती केली. अमर शेखांनी ‘अकलेची गोष्ट’ इ. वग वेगळया पद्धतीने सादर करून नव्या तमाशांना जन्म दिला.

दिनांक १६ व १७ ऑक्टोबर १९४८ रोजी दार आयोगाची मुंबई भेट निश्चित झाली होती. त्यानिमित्ताने मुंबईमधील शिवाजीपार्क इथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आले होते. या अधिवेशनासाठी अण्णाभाऊ साठे यांनी ‘मुंबई कोणाची?’ हा वग लिहिला होता. या अधिवेशनासाठी अमर शेखही उपस्थित होते. या अधिवेशनात अमर शेख यांनी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेला महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. हा पोवाडा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदीच ठरली. अमर शेखांनी या संबंधीची नोंदही आपल्या रोजनिशीत केली आहे – ‘१८ ऑक्टोबर, आज तर आमच्या कार्यक्रमानेच संयुक्त महाराष्ट्र परिषद गाजली. अण्णाभाऊंच्या पोवाड्याने सबंध जनसागर हेलावला.’ या लोकनाट्यात अमर शेखांनी अत्यंत प्रभावी भूमिका साकारली होती. ती अत्यंत गाजली. या संबंधीची नोंद संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक शिलेदार आचार्य अत्रे यांनीही आपल्या ‘झालाच पाहिजे!’ या संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील ग्रंथात केली आहे.

अमर शेखांनी स्वतःस संयुक्त महाराष्ट्र चळवळीस वाहून घेतले होते. खेडोपाडी व शहरातील गल्लोगल्ली होणाऱ्या कार्यक्रमांसाठी २०-२५ हजार लोक जमत. मुंबईतील चौपाटी व शिवाजी पार्क इथं तीन-तीन लाखांच्या सभा होत. ‘जय जय महाराष्ट्र’, ‘जाग मराठा जाग’, ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ इ. गाणी सगळयांच्या तोंडी झाली होती.

आपल्या कलापथकाच्या माध्यमातून मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव या भागात अमर शेख यांनी अक्षरशः रान उठविले होते. द्विभाषिक राज्यास प्रखर विरोध झाल्यामुळे सरकारला तो तोडगा मागे घेणे भाग पडले. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नेहरूंनी त्रिराज्य योजना जाहीर केली. या त्रिराज्य योजनेचा त्रिफळा उडवण्यासाठी मुंबईत कामगार, कष्टकरी व सामान्य जनतेचा विराट मोर्चा निघाला होता. त्या मोर्च्यात पोलिसांनी बेछूट गोळीबार केला, पण संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी जमावाला शांत केले. आणि लगोलग मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले.

जाग मराठा आम जमाना बदलेगा

उठा है तुफान, है जो तुफान

वो आखिर बम्बई लेकर रहेगा

अमर शेखांनी कवी शैलेंद्र यांचे हे गीत या सभेत आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या झंझावती क्रांतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमविले.

१० ऑक्टोबर १९५५ रोजी राज्यपुनर्रचना आयोगाचा अहवाल जाहीर झाला. या अहवालाने महाराष्ट्राची निराशा केली. लोक प्रचंड संतापले. यासंबंधीची एक घटना समाजवादी नेते व वरिष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितली आहे, ती अशी-

१५ ऑगस्ट १९५५ ला मी गोव्यात होतो. गोवा मुक्ती संग्राम शिगेला पोहोचला होता. १५ ऑगस्टला गोव्यात गोळीबार झाला, त्याचे पडसाद मुंबईत १६ तारखेस उमटले. १६ ऑक्टोबरला एक मेळावा घेण्याचे ठरले. मेळावाल्या जेमतेम ३०० लोकांची अपेक्षा होती. आता १३,००० नावे आली. ताबडतोब निर्णय घ्यायला हवा होता. शिवाजी पार्क बूक करायचे ठरले. माझा एक मित्र मंडप कॉन्ट्रक्टर होता. त्याला विचारलं, पैशांचं काय करायच?” तो म्हणाला, मेळाव्याच्या आधी सगळे पैसे चुकते करतील.” बरं म्हणण्यावाचून गत्यंतर नव्हते. पैसे तर अजिबातच नव्हते. दुसऱ्या दिवशी दणक्यात सुरुवात झाली. अधिवेशनाला एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, सेनापती बापट या सगळ्यांना बोलावलं होतं. संयुक्त महाराष्ट्रासाठी जन आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी (अमर शेखांनी) मला पाहिले. माझ्याकडे येऊन म्हणाले, अधिवेशनाला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय, पण तू असा दुःखी का दिसतोयस?” मी म्हटलं, “मोठा प्रॉब्लेम आहे.”  “कसला” त्यांनी विचारलं. म्हटलं. “सभासदांना वर्गणी म्हणून दोन आणे द्यायला सांगितले आहेत. पण मंडपवाल्याला एक हजार रुपये दयायचे आहेत.” अमर शेख म्हणाले, “असं आहे काय”

ते देखील स्वागत कमिटीत होते. सगळ्यांचं भाषण संपल्यावर ते उभे राहिले आणि म्हणाले,  "एवढा प्रचंड प्रतिसाद आहे याचा अर्थ या प्रश्नावर सर्वजण एकत्र आले आहेत, पण आपला खर्चही निघाला नाही. मी आता तुम्हा सर्वांपुढे माझा डफ घेऊन फिरणार आहे. ज्याला जी मदत शक्य होईल ती करावी." अमर शेख एवढं बोलून स्टेजवरून खाली उतरले. आपला प्रसिद्ध डफ त्यांनी उलटा केला. ते स्वतः श्रोत्यांमधून फिरले आणि पैसे जमा करू लागले. एक हजार रुपये जमलेसुद्धा! असा हा प्रतिसाद होता.”

यावरून स्पष्ट होते की, अमर शेखांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सहभाग किती मोलाचा होता. महाराष्ट्राप्रती त्यांची कमालीची तळमळ आणि निष्ठाही दिसून येते. याच अधिवेशनात त्यांनी तमाम मुंबईसह महाराष्ट्रवासीयांना एकीने लढण्याची हाक दिली.

अमर शेखांच्या या अत्यंत प्रभावी अदाकारीबाबत आचार्य अत्रे म्हणत- “अमर शेख म्हणजे आग, रग, धुंदी, बेहोशी यांची जिवंत बेरीज... अमर शेख यांनी महाराष्ट्राची जी सेवा केली आहे, ती महाराष्ट्राला सुवर्णाक्षरांनी लिहावी लागेल.” अमर शेखांचं गाण्याचं कौशल्य उच्च दर्जाचं होतं. कुसुमाग्रजांचं ‘गर्जा जयजयकार’ हे गीत अमर शेखांसारखं कुणालाही गाता आलं नाही, याची कबुली खुद्द कुसुमाग्रजांनी दिली आहे. कष्टकरी वर्गातून आलेल्या अमर शेखांना सर्वसामान्यांच्या सुखदुःखांची, शोषणाची तीव्र जाणीव होती. अमर शेख गाण्याच्या अर्थाशी समरसून जात आणि लोकही त्यांच्या गाण्याशी समरस होत. कित्येक गाणी गाताना त्यातील आशयाचा आवेग ते थांबवू शकत नसत. त्यांच्या व श्रोत्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत. अमर शेखांनी कायम प्रेक्षकांशी, सर्वसामान्य जनतेशी बांधीलकी मानली. समोर बसलेली जनता हीच माझ्या कलेची कसोटी आहे; म्हणून मी जनतेबरोबर राहणार, असं ते म्हणत.

दलित, शोषित, कष्टकरी जनतेच्या मुक्तीच्या लढ्यातील कार्यकर्ता, जनतेच्या सुख-दुःखाशी भिडणारा एक सहृदय कवी व बुलंद, धारदार आवाज आणि लोकांच्या अंतःकरणाला भिडणारा गायक, असे तिन्ही पैलू अमर शेखांमध्ये असल्याने त्यांनी लोकप्रियतेची अफाट उंची मिळवली. संयुक्त महाराष्ट्राच्या या विराट संघर्षात त्यांना सामील करण्याचे सामर्थ्य अमर शेखांच्या शाहिरीने अभूतपपूर्वपणे केले. म्हणूनच संयुक्त महराष्ट्राच्या इतिहासातील अमर शेखांचे कार्य हे एक सुवर्णपानच म्हणावे लागेल.

- प्रतीक्षा रणदिवे (लेखिका कोणगाव, भिवंडी येथील आर. एन शाळेत शिक्षक आहेत) संपर्क – ७२०८००८९८२, pratiksharandive95@gmail.com


मराठी अभ्यास केंद्र , संयुक्त महाराष्ट्र चळवळ , प्रतीक्षा रणदिवे , शाहीर अमर शेख , मराठी शाहीर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.