खानोलकर यांच्या (तेंव्हा) अप्रकाशित कविता


अंक : सत्यकथा, ऑगस्ट १९७६ 

चिं.त्र्यं.खानोलकर उर्फ आरती प्रभू आज हयात असते तर ९० वर्षाचे असते. वय मनुष्याला असतं, कवितेला, साहित्याला नसतं. त्यांची कविता अशा अनेक नव्वदींनंतरही तेवढीच तरुण, अर्थगर्भ आणि अनवटतेचं सौंदर्य लेवून तेजाळत राहणार आहे.  ८ मार्च १९३० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ले तालुक्यातील, बागलांची राई, तेंडोली येथे त्यांचा जन्म झाला. 'सत्यकथे'त छापून आलेल्या  'शून्य शृंगारतें' या कवितेने त्यांच्या अफाट प्रतिभेची ग्वाही दिली. कविता, नाटक आणि कादंबरी या तिन्ही प्रांतात खानोलकर स्वतःचा म्हणून एक ठसा उमटवून गेले. अगदी शीर्षकांपासून तर आशयापर्यंत त्यात खानोलकरी स्पर्शाची जादू सर्वत्र भरुन राहिलेली दिसते. त्यांच्या कवितांची गाणी करणं हे महाकर्मकठीण!  ‘ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणीते, जाताना फुले मागते’ अशी ओळींची आवर्तने स्वरांत बांधणारा हृदयनाथ मंगेशकरांसारखा संगीतकार त्यांना लाभला हे रसिकांचेच भाग्य. त्यांच्या बऱ्याच कविता प्रकाशित झाल्या होत्या, परंतु २६ एप्रिल १९७६ रोजी ते गेले तेंव्हा काही कविता अप्रकाशितही होत्या. ऑगस्ट १९७६ च्या अंकात ‘सत्यकथा’ या मासिकात त्यातील चार कविता प्रथमच प्रसिद्ध झाल्या होत्या... त्याच या कविता!

मूळ शिर्षक - खानोलकर यांच्या अप्रकाशित कविता

(१)

ते जेव्हा निघून जातात तेव्हा

ते जेव्हा निघून जातात तेव्हा ते स्वतःचे नसतात

ते असतात केवळ होकार-नकाराच्या पलिकडील सूर्यास्तासारखे.

त्यांच्या होड्यांना गती मिळते एखाद्या देवालयांतली घंटाध्वनींतून त्यांच्या घोड्यांना खिंकाळता येतें तें केवळ अवघड घाटांच्या वळणावर.

ते स्वतःच दान देत देत भरून येतात आषाढघनाप्रमाणे. असे हे वाटा हुडकणारे.

एखाद्या मौनव्रतासारखे मध्यरात्रीच्या आकाशाप्रमाणे ते जेव्हा बोलतात एखादा शब्द तेव्हा स्फोट व्हायला उशीर नसतो

तरीसुद्धा ते बोलणार नाहीत अखेरपर्यंत ते फक्त वाहत राहतात धीरगंभीर प्रवाहाप्रमाणे.

  तेव्हा पाखरांची भिरीं आपल्या पंखांवरील रंग सूर्यास्तकालीन त्यांना अर्पण करतात घरट्यांकडे परततांना.

  ते स्वतःचे नाहीतच वस्त्रहीन सावलीप्रमाणे

आणि त्यांच्या सावल्यासुद्धा त्यांच्या स्वतःच्या नसतात नग्नतेप्रमाणे.

 त्यांची गती पाऱ्याप्रमाणे त्यांची त्यांनाच धरतां येत नाही

तरीही एखादी चांदणी त्यांचीही असते तेंच तर त्यांचे दूरस्थ देवालय. तरीही ते तेच असतात जशाचे तसे.

नमस्कार करणार नाहीत चुकूनसुद्धा तेच तर त्यांचे अलंकार अलंकारहीन साजशृंगारासारखे.

  ते इतके मनस्वी असूनसुद्धा ते आहेत जशाचे तसे अजूनसुद्धा.

एखाद्या विशिष्ट शब्दांतून संवेदना निसर्गकालीन शून्यमनस्क जपणारे ते जशाचे तसे आहेत

म्हणून तर आम्ही आहोंत, तुम्ही आहांत, सगळेच आहेत.

   (२)

         ती आहे म्हणून... ती आहे म्हणून तर आम्ही आहोंत.

        झाडाचे कोवळें पान त्याचे लालसर चंचल बहाणे वाऱ्याबरोबर वाहाणे हे सगळें त्या इवल्याशा पानाप्रमाणे तिचें असतें म्हणून तर आम्ही आहोंत.  

   एखादी खार येते झुपकेदार बसते एकटक पाहात ती मुळीसुद्धा स्वतःची नाही राहात ती तंतुवाद्याप्रमाणे अवघड होते

   वाऱ्याला सांगते, “वाऱ्या रे वाऱ्या! तूं तुझ्यापुढे वाहा! वाहात राहा!”

   तुला गुच्छ बांधता आले तर बांध तिला वाहाण्यासाठी कारण तूं स्वतःचा नाहीस मुळीसुद्धा; हे सगळे चित्र आहे म्हणून तर आम्ही आहोंत.

   सूर्य ढळतो तेव्हा आत्मा भरून येतो शयनमंदिरांतील केशरी दिव्याप्रमाणे.

तो दिवा मालवूं नकोस पुन्हा सूर्य उगवेपर्यंत कारण हा दिवा तर ‘तुझाच’ आहे म्हणून तर आम्ही आहोंत   अशी ही कोण आहे?

दार बंद असतांना बाहेरील घनगर्द निसर्गाप्रमाणे बर्फाच्छादित— तिला नांव नाही.

तरीसुद्धा ही सगळी आवर्तने तिचींच आहेत वस्ती उठून गेलेल्या गावाप्रमाणे

म्हणून तर आम्ही आहोंत.  

(३)

गुलाबाच्या फुला शरम नाही वाटत तुला  

हे हट्ट थोडे हळवे, थोडे कळलावे थोडे लाजरे-निलाजरे कुणासाठी मिटून मिटून डवरला आहेस कोण येणार आहे या बागेंत?

पक्ष्यांची शीळ येते तेव्हा एखादी पाकळी उचलून मिटलेला. उन्हें कोवळी असतात तेव्हा एखादी पाकळी दुमडून मिटलेला.

वारा पानापानांतून कारंजें करतो दवाचें तेव्हा एखादी पाकळी उलगडून मिटलेला.

ढगावरचे रंग निमतात मावळतात तेव्हा सबंध मिटलेला. दाटून बसलेला गंध कुणासाठी राखून ठेवलायस?

त्या गंधभारानेच पाकळ्या झडून जातील ना! एक चमकीलें निळें पीस उन्हावर तरंगतेंय पक्षी कुठे अंतराळांत झेपावतोय त्याची शीळ.  

(४)

त्या आर्त डोळ्यांच्या पापण्यांचे कांठ भुकेच्या वणव्याने करपून बेचिराख झालेत

मातीच्या कणाकणांतून विझून गेलेत सृजनाचे स्फुल्लिंग

माती जेव्हा गरीब होते तेव्हा तेव्हा माणूस होतो भिकारी

आणि त्वचेची होतात शुष्क वल्कले वल्कलें भिक्षांदेही हाडांच्या सापळ्यावरील.

रस्त्यांची संपते ये-जा समारंभांची त्यावरून सुरू होते दुबळ्या देहांची कुतरओढीची आशाळभूत स्मशानयात्रा  

गुलाबाच्या फुला शरम नाही वाटत तुला

तुझ्या रमणीय पाकळ्यांची मला शरम वाटते

दुष्काळग्रस्तावर कविता लिहिण्याची अन्नान्नदशा झालेल्या कफल्लक माणसा!

तुझ्या थुंकीहूनही कोरडे आहेत आमचे शब्द क्षमस्व,

हे जर्जर माणसा तुझ्या भुकेपुढे कंगाल आहेत आमचे शब्द.

**********

कवी - (आरती प्रभू) चिंतामणी त्र्यंबक खानोलकर अधिकचे दुवे : 

  • अश्रू झाला आहे खोल -  पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आरती प्रभूंबद्दल लिहिलेला पुनश्चच्या संग्रहातील हा लेख अवश्य वाचा.

बाह्य दुवे -

Google Key Words - C.T. Khanolkar,  Aarti Prabhu,  Khanolkar's Unpublished verses

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , सत्यकथा , प्रासंगिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen