संपादकीय


भेदून तम विनाशकारी
अमेरिकेतून भारतात येऊन इथल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीचा अभ्यास करत इथेच स्थायिक झालेल्या गेल ऑम्व्हेट यांच्या व्यक्तिचित्राने यावेळच्या ‘वसा’ दिवाळी अंकाची सुरुवात केली आहे. गेल यांचं वैचारिक योगदान मोठं आहे. एकीकडे त्या वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंडाची दखल घेतात, त्याचप्रमाणे भारतातील बौद्ध धम्माच्या वाटचालीचाही मागोवा घेतात. अंकाचा शेवट बालविवाहाला नकार देणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या लेखाने केला आहे. या देशात किशोरवयीन मुलींचं जगणं किती भयग्रस्त आहे, हे आपल्याला हाथरससारख्या घटना सांगत आहेत. घराबाहेर मोकळा श्वास घेण्याची मुभा या मुलींना नाही. आईवडिलांनाही मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचं भय असतं. गावात एखादी घटना घडते आणि त्याचा परिणाम मुलींच्या शाळागळतीत आणि बालविवाहात होतो. शाळागळती, बालविवाह, लैंगिक अत्याचार, शरीरविक्रयाच्या बाजारासाठी होणारी मानवी वाहतूक अशा विविध समस्यांच्या सापळ्यात या देशातील किशोरवयीन मुली अडकलेल्या आहेत. त्यामुळेच या मुलींचा छोटासा नकारही खूप आशादायी आहे. 
अर्थात सगळंच चित्रं असं आशादायी नाही. म. गांधींना गोळ्या घालणाऱ्या गोडसेप्रवृत्ती सध्या देशात वेगवेगळ्या सत्तास्थानांवर आहेत. धार्मिक, सांस्कृतिक कट्टरतावाद वाढतोय. गांधीच्या मारेकऱ्याची जयंती या देशात साजरी होऊ लागली आहे, ती साजरी करताना कट्टरतावादी विचारांचं प्रदर्शन करत गांधींच्या चित्राला गोळ्या घातल्या जातात आणि समाजमाध्यमांवर या पोस्ट फिरवल्या जातात. ज्या मनुस्मृतीने चातुर्वर्ण्यावर आधारित विषमतावादी समाजरचनेचा पुरस्कार केला, तिला शास्त्रार्थाचा आधार दिला आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिचं दहन केलं, त्या मनुस्मृतीची आता उघड भलामण केली जात आहे, तिचा निषेध करणाऱ्यांना विरोध केला जात आहे. मनुस्मृती आणि तिच्यासारख्या इतर शास्त्रग्रंथांनी ब्राह्मणी श्रेष्ठत्वावर आधारित समाजव्यवस्थेचा पुरस्कार करताना शूद्र आणि स्त्रियांना हीन लेखत त्यांचे मानवी अधिकार नाकारले, त्यांचा आत्मसन्मान विद्ध करत त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं. सामाजिक दास्यत्वाला धर्माचं अधिष्ठान दिलं. परशुरामाने पृथ्वी एकवीसवेळा निःक्षत्रीय केली असे सांगत कलियुगात ब्राह्मण वगळता सगळे जातसमुह शूद्र आहेत, असे इथल्या ब्राह्मणी विचारधारेने सांगितले. यातूनच खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व नाकारत, त्यांना शूद्र ठरवत त्यांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वर्गाने नकार दिला. महाराजांना काशीहून गागाभट्टांना बोलवावे लागले. हाच नकार छत्रपती शाहूंच्या बाबतीतही कायम राहिला. छत्रपतींना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही, असे सांगत छत्रपतींचे विधी पुराणोक्त मंत्रानेच होणार, असे इथल्या ब्राह्मण वर्गाने सांगितले. या इतिहासाचे पुन्हा स्मरण करुन देण्याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा हा पुराणमतवाद जोर धरत आहे. त्याला धार्मिक कट्टरतेची जोड मिळत आहे. लव जिहादचा कल्पित भयगंड निर्माण करुन धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या अशा स्थिती स्वातंत्र्य-समता-बंधुता या आधुनिक मूल्यत्रयीचा पुरस्कार करणारं देशाचं संविधान खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज निर्माण झाली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या सुधारणावादी चळवळीने, विसाव्या शतकातल्या स्वातंत्र्य चळवळीने तसेच या काळातल्या शूद्रातिशूद्रांच्या आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीने देशात एक पुरोगामी अवकाश निर्माण केला. त्यामुळेच स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियाही मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या. या पुरोगामी अवकाशाला राज्यघटनेचा आधार मिळाला. राज्यघटनेने सर्व प्रकारच्या भेदभावांना नकार देत व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जपणूक करणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. मात्र आज सर्वसामान्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत देशातला पुरोगामी अवकाश संकुचित केला जात आहे. पुरोगामी या शब्दाला कट्टरतावादी मंडळींनी शिवीचे स्वरुप दिले आहे. यात इथले-तिथले दोन्हीकडचे कट्टरतावादी आहेत. म्हणूनच वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन संविधान सांगणं हा एक आवश्यक असा प्रयोग आहे. हा असा प्रयोग करणाऱ्या सुरेश सावंत यांचा लेख अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे. 
धार्मिक ध्रुवीकरणाच्या या काळात एका हिंदू महिलेने उर्दू भाषा शिकणं, ही प्रक्रियाही साधीसरळ राहात नाही. मी या भूमीत तयार झालेली भाषा शिकतेय, असं जेव्हा कामाक्षी भाटे सांगतात तेव्हा उर्दूला असलेला या मातीचा गंध नव्याने समजून घेण्याची गरज निर्माण होते. श्यामल गरुड यांचा लेखही याच द्दष्टीने महत्त्वाचा आहे. तमाशा या लोककलेतील मुस्लिम कलावंतांची पिढी हळूहळू संपतेय. किमान अशावेळी तरी त्यांचे योगदान लोकांपर्यंत पोहचावे, असे त्यांना वाटते. इथल्या लोककला या सर्वधर्मीय मागास जातसमुहांनी जपल्या. इथली लोकसंस्कृती ही सर्वधर्मीय बहुजनांची आहे. अभिजनवादाच्या आधारे धार्मिक कट्टरता वाढत असताना सर्वसमावेशक लोकसंस्कृती जपणं, हाच एक सम्यक मार्ग आहे.
देशात जेव्हा कट्टरता वाढते तेव्हा सगळ्यात आधी मिडिआच्या स्वातंत्र्याचा बळी जातो. एकदा तो गेला की आपल्याला नको असणाऱ्या माणसांसाठी मिडिआ ट्रायल करणे सोपे जाते. कट्टरतावादाच्या, साम्राज्यवादाच्या साथीने काम करणाऱ्या मिडिआचा भेसूर चेहरा एखादा सिमेमाही किती समर्थपणे चितारु शकतो, हे उदय कुलकर्णींच्या लेखामधून सामोरे येते. या अशा वेळी पर्यायी माध्यमं असणं किती गरजेचं आहे आणि त्यांचं काम किती मोलाचं आहे, हे राजन गवस यांच्या लेखातून वाचकांपर्यंत पोहोचेल.
कोरोनाच्या वैश्विक साथीने तर सगळ्यांनाच खडबडून जागे केले आहे. कोरोनाच्या संदर्भात अंकामध्ये प्रसाद कुमठेकर आणि सई पवार यांचे लेख तसेच विजय तांबे यांची कथा आहे. कोरोनाने केवळ तोंडावर फडकी गुंडाळली नाहीत, तर चेहऱ्यांसमोर आरसाही धरला. या आरशात विद्रूपच अधिक दिसलं. देशाच्या नेतृत्त्वाने टाळेबंदी जाहीर केली, त्यावेळी जागोजागी हातावर पोट असणारे मजूर या काळात काय करतील, याचा कोणताही विचार केला गेला नाही. टाळेबंदीचा कौतुकाचा बंदिवास वेगवेगळ्या रेसिपींसह साजरा करणाऱ्या मध्यमवर्गालाही, कष्टकरी वर्गाचं काय, हा प्रश्न पडला नाही. मजूर शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालत निघाले तरी अनेकांच्या पोटातलं पाणीही ढवळलं नाही. खरं तर आपण जगतो त्यात आपल्या गरजा किती आणि आपली हाव किती, असा अगदी मुलभूत प्रश्न कोरोना काळाने लोकांसमोर निर्माण केला. एक वेगळी वैचारिक घुसळण या काळात अभिप्रेत होती. पण बातम्यांमधून एक वेगळीच घुसळण समोर आली. या काळात कुटुंबांतर्गत स्त्रियांचं शोषण वाढलंय, पतीकडून वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केली जाते, कुटुंबांतर्गत बलात्कार होण्याचे प्रकार घडत आहेत, अशा बातम्या येऊ लागल्या. म्हणजे मिळालेल्या मोकळ्या वेळातही स्त्रीपुरुष संबंधांमध्ये अधिक हळुवार, अधिक उन्नत असे काही घडले नाही. एका मोकळ्या अवकाशात स्त्रीपुरुष नात्याला नवे आयाम देता येणं शक्य होतं. पण केवळ झोंबीचीच पिकं फैलावली. कारण इथे प्रत्येकजण आत्ममग्न आहे. सुखाचा आस्वाद घेण्याऐवजी सुख ओरबाडण्याची, सुखावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्याची वृत्ती तयार झाली आहे. या अशा स्थितीत विकासाच्या आधुनिक संकल्पनांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करत धनगरांसारखा भटका समाज आपल्या स्थलांतराच्या नव्या वाटा शोधतो आहे.
 व्यक्तिकेंद्री विकास, स्पर्धा, अधिकाधिक हवंची हाव, नातेसंबंधांमध्ये उतरलेला व्यवहार, पैशाचं मध्यवर्ती स्थान या सगळ्या गलबल्यात माणूस नावाचं बेट अधिकाधिक एकाकी होत जात आहे. त्याची नाव लाटांमध्येच हिंदकळत राहते. तिला किनारा सापडतच नाही. मरणाचे गाणे पोटातून ओठात येता येता घशातच अडकते आणि श्वास कोंडतो. माणूस नावाच्या या अंधाऱ्या बोगद्यात रुपाली शिवलकर डोकावून बघत आहेत. 
हा अंधारा बोगदा भेदता आला तर बाहेर हिरवं गाणं दिसू शकतं. पक्ष्यांची शीळ मनाला उभारी देऊ शकते. त्यांच्या इवल्याशा पंखातलं बळ जगण्याचे नवे मार्ग दाखवू शकतं. अर्थोत्पादनासाठी मैलोन् मैल उभारलेल्या बागा आणि नैसर्गिक जंगल यातील भेद पक्ष्यांशिवाय आणखी कोणाला माहीत असणार. विकासाची नवी वाट भूमी आणि आभाळ या दोघांशी नातं सांगणाऱ्या पक्षालाच आता विचारावी लागणार आहे. आशेचे नवे मार्ग आता निसर्गातल्या आपल्या या  आप्तांच्या सोबतीनेच शोधायला हवेत. श्रीकृष्ण मगदूम यांचा लेख आणि मुखपृष्ठावरील फोटो या दोन्हीतून आपल्याला आपल्या या आप्तांचं दर्शन घडतं. 
जयंत पवार, मीनाक्षी पाटील, विवेक कुडू, विजय तांबे, सूरज कोल्हापुरे यांच्या कथा आणि श्रीकांत ढेरंगे व कविता मोरवणकर यांच्या कविता हेही अंकाचे वैशिष्ट्य आहे. अंकात चीनच्या अंतरंगाचं दर्शन घडविणारा स्वतंत्र विभाग आहे.
‘वसा’च्या वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतानाच हाथरसमधल्या आणि तिच्यासारख्या अनेक बळी मुलींच्या स्मृतीला अभिवादन करणं आवश्यक आहे. पुरुषसत्ता आणि जातसत्ता एकत्र आल्या की किती निर्घृण होतात, याचं उदाहरण म्हणजे हाथरसमधील बळी. कोरोनाची महासाथ काही काळाने आटोक्यात येईल पण बलात्काराची महामारी अशी संपणारी नाही. ज्या ज्या वेळी समाजात कट्टरतावाद फैलावतो त्या त्या वेळी पुरुषी आक्रमण अधिक वाढतं. त्याला जात-धर्माची जोड मिळाली की त्याचा चेहरा अधिक निर्मम होतो. सध्या पुरुषश्रेष्ठत्वावर आधारित विषमतावादी जातव्यवस्थेचा पुरस्कार करणारी सनातनी विचारधारा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. एकीकडे सनातनी मनोधारणा फोफावत असताना दुसरीकडे बाजारकेंद्री चंगळवाद विळखा घालत आहे. विकृत हिंसाचारापासून ते पोर्नपर्यंत सारं काही मोबाईलच्या माध्यमातून तरुणांच्या मुठीत आले आहे. सेक्स आणि व्हायोलन्सच्या गारुडातच नव्या पिढ्या तरुण होत आहेत. सत्ताकेंद्री मुख्यप्रवाही राजकारणाने कार्यकर्त्यांच्या नावाखाली गुंड तयार केले आहेत. स्थानिक पातळीवर या गुंडांची दहशत आणि मनमानी असते. त्याला राज्यकर्त्यांचा वरद्हस्त असतो. या पार्श्वभूमीवर समाजात स्त्रियांचं आणि त्यातही किशोरवयीन मुलींचं जगणं अधिकाधिक असुरक्षित होत आहे. कोणताही प्रतिकार करु न शकणाऱ्या किशोरवयीन मुली या सहजसोपं भक्ष्य बनल्या आहेत. या अशा बलात्कारांविरुद्ध तात्कालिक क्षोभ उसळतो, फाशीची वगैरे मागणी होते, पण मुळात आपल्या देशात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, तपासाच्या प्रक्रियेत पुरावे गहाळ केले जातात, नीट नोंदवले जात नाहीत आणि आरोपींची कालांतराने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते, या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. जिच्यावर बलात्कार झाला आहे त्या मुलीलाच कलंकित, चारित्र्यहीन ठरवलं जातं. पुरुषश्रेष्ठत्वाच्या बलात्कारकेंद्री विचारधारेचे हे परिणाम आहेत.
जिथे बलात्कारित स्त्री सन्मानाने जगू शकेल आणि बलात्कार करणारा पुरुष समाजनजरेत आरोपी असेल, असे सांस्कृतिक रचित आपण निर्माण करायला हवे.  मातृसत्तेचा, निर्ऋतीचा वारसा पुन्हा एकदा पुनर्जिवित करायला हवा, वामनकपटाला नकार देत बळीला सांगावा धाडायला हवा. कोरोनाच्या वैश्विक साथीने निर्माण केलेल्या जीवनविषयक मुल्यांपासून ते बलात्कारापर्यंत, पर्यावरणापासून ते भटक्या-विमुक्त जगण्यापर्यंत, प्रत्येक बाबतीत, मुद्दा हा अखेरीस कोणते सांस्कृतिक रचित तुम्हाला हवे आहे, हाच आहे. 
समतावादी, बंधुतावादी सांस्कृतिक रचित निर्माण व्हावे, यासाठी ‘वसा’च्या वाचकांना, हितचिंतकांना शुभेच्छा.  
- mebO³ee vejs-heJeej
sandhyanarepawar@gmail.com


...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वसा दिवाळी अंक’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.