संपेल का कधीही, हा खेळ बावळ्यांचा?


आता सुरु होतील फोन वर फोन, आयांचे लेकींना, सास्वांचे सुनांना, जावांचे नणंदांना वगैरे, वगैरे.. फोन असतील मुख्यत्वे शुभेच्छांचे, आपलेपणानी, आठवणीनी, वेळात वेळ काढून केलेले. सगळ्यांचा मतीतार्थ एकच,

‘जप गं बाई, या दिवसात...त्या अमकीचं तमकं झालं...ऐकलस ना...; सगळं सुखरूप पार पडलं की मी सुटले...आणि तू ही!!...कारण रात्र वैऱ्याची आहे. पोर्णिमा आलीच आहे आणि या वेळी ग्रहण आहे. ग्रहण पाळलं नाही तर काय होतं हे माहीतच आहे. तेव्हा, असशील जास्त शिकलेली तरी तुझा नेहमीचा आगाऊपणा जरा बाजूला ठेव. मोठी माणसं सांगतात ते उगीच नाही.’ ‘विषाची परीक्षा कशाला? राहीलं एखाद दिवशी घरात तर काsssही बिघडत नाही. तोटा तर काही होत नाही, झाला तर फायदाच आहे!’ ‘विषाची परीक्षा कशाला?’ हा खूपच डेंजरस युक्तिवाद आहे. मुळात ग्रहणकाळात पथ्य न पाळणं हे गर्भ-घातक आहे असा कोणताही पुरावा नाही.

ओठ का फाटतात हे ही माहीत नाही आणि ग्रहणं का होतात हे ही माहीत नाही; अशा काळात जोडलेला हा बादरायण संबंध. गर्भारपणात कुणाला ना कुणाला, कधी ना कधीतरी, काही ना काहीतरी घोटाळा होणारच. ओठ फाटणे, बोट जुळणे, पाठीचा कणा दुभंगलेला असणे याची प्रत्येकाची कारणं अनेकविध आणि वेगवेगळी आहेत. होईल त्या प्रत्येक दोषाला ग्रहणाचं कारण चिकटवणं हास्यास्पद आहे. शिवाय एकदा कारण चिकटवलं की शोध थांबतो. कारणांचा शोध थांबला, भरकटला की उपायांचा शोधही थांबला, भरकटलाच म्हणायचा. सव्यंग मूल हवंय कुणाला? सगळ्यांना चांगली धडधाकट, नाकी डोळी नीटस मूलंच हवीत की. पण मूल होणं ही एक जैविक प्रक्रीया आहे. त्यात डावं-उजवं होणारच. एखाद्या अत्याधुनिक कारखान्यातून माणूस एकापाठोपाठ एक, लाखो गाड्या बिनचुक निर्माण करू शकतो. पण निसर्गात असं नसतं. पेरलेलं सगळंच उगवत नाही. उगवलेलं सगळंच निर्मळ नसतं.

जो नियम पाना-फुलांना, किड्या-मुंगीला तोच आपल्याला. ही दृष्टी जीवशास्त्र देतं आपल्याला. सुद्धृढ संतती हवी असेल तर वैद्यकशास्त्रानी अनेक यम-नियम सांगितले आहेत. गर्भधारणेपूर्वी रुबेलाची लस, फोलिक अॅसिडच्या गोळ्या, मधुमेह व त्या सदृश अन्य आजार नियंत्रणात असणं, पुढे गरोदरपणात तपासण्या वगैरे वगैरे. हे न करता कुठल्याश्या खगोलीय घटिताला विषाचं लेबल लावणं शहाणपणाचं नाही. वर्षभरात ४ ग्रहणं होतातच होतात, कधी कधी सातही होतात. आपल्याकडे दिसणं न दिसणं वगैरे जमेस धरून, गर्भावस्थी ग्रहण ना पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?, असंच विचारता येईल. पण एवढ्या ग्रहणछायाग्रस्तांच्या मानानी ग्रहणबाधा क्वचितच दिसते म्हणायचं. ज्या मुलुखात असलं काही पाळत नाहीत तिथे तर वेडीविद्री मुल अगदी लक्षणीय संख्येत आढळायला हवीत. तसंही दिसत नाही. मुलाची रचना तिसऱ्या महिन्याअखेर सिद्ध होते. रचनेतले दोष (ओठ फाटणे, बोटे जुळणे, मणका उघडा असणे) या वेळेपर्यंत गर्भात उतरलेले असतात. त्या मुळे तिसऱ्यानंतर ग्रहण पाळून, या बाबतीतला फायदा शून्य.

मुळात पूर्ण दिवसांची असतील तर ९६% बाळं चांगलीच निपजतात. सुमारे ४% बाळांमध्येच व्यंग असतात. त्यामुळे ग्रहण पाळणं वगैरेसारख्या कुठल्याही रीतीभातीला ९६% यश निश्चित आहे. म्हणूनच ह्या समजुती चालू रहातात, वाढतात. ग्रहण न पाळणे ही विषाची परीक्षा नसून ग्रहण पाळणं हीच विषाची परीक्षा आहे. ग्रहण पाळणाऱ्या त्या माउलीला काय काय सोसावं लागतं, जरा कल्पना करा. वेध लागल्यापासून ते ग्रहण पूर्ण सुटेपर्यंत त्या बाईनं म्हणे एका जागी बसायचं. झोपायचं नाही. टक्क जाग रहायचं. अन्न-पाणी वर्ज्य. किती भयंकर आहे हे. हिने भाजी चिरली की मुलाचा ओठ फाटणार, हिने बोट जुळवली की गर्भाची जुळणार. केवढं टेन्शन येत असेल त्या बाईला? जिची ह्या सगळ्यावर नितांत श्रद्धा आहे तिच्या काळजाची केवढी कालवाकालव होत असेल.

आपल्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे जन्मभर आपल मूल पंगू होणार. दोष आपला , शिक्षा बाळाला. काळजाचा थरकाप उडवणारी कल्पना आहे ही . ही उराशी कुरवाळत त्या बाईनी ते आकाशस्थ ग्रहगोलांचे सावल्यांचे खेळ संपेपर्यंत जीव मुठीत धरून बसायचं. काहीही, कधीही, कोणत्याही कारणानी बिघडलं की सर्व मंडळी त्या बाईला बोल लावायला मोकळे.... ‘तूच नीट पाळलं नसशील.’ तद्दन फालतूपणा आहे हा. बाईनी भाजी चिरण्याचा आणि ओठ फाटण्याचा दुरान्वयानेही संबंध नाही. ग्रहण पाळण्याचे थेट तोटेही अनेक आहेत. गर्भारशीला भूक मुळी सहनच होत नाही. गर्भाला तर त्याहून नाही. इतका इतका वेळ उपास केला की रक्तातली साखर उतरते. चक्कर येते. थकवा येतो. गर्भाच्या रक्तातली साखर ही थेट आईच्या शुगरलेव्हल वर अवलंबून असते. त्यालाही बिच्याऱ्याला उपास घडतो. भुकेनी कळवळतं पोर ते. खूप कमी साखर , पुन्हा पुरेपूर साखर असे शुगर लेव्हलचे हेलकावे तर अजिबात सोसत नाहीत गर्भाला. पण याची तमा न बाळगता त्या पोटूशीने तोंड बंद ठेवायचं. का?, तर बाळाचं भलं आहे त्यात म्हणून.

एखाद्या कृतीचं समर्थन करायला निव्वळ त्या मागचा हेतू चांगला आणि उदात्त आहे एवढंच कारण पुरेसं नसतं. एका जागी बसून बसून रक्तपुरवठा मंदावतो. रक्ताचा वेग मंदावला की त्याच्या गुठळ्या होतात. क्वचित कधीतरी हे फारच धोक्याचं ठरू शकतं. पाणी वर्ज्य केलं की लघवी कमी होते. आपल्या मुत्राशयात जंतू असतातच. लघवी करताना, त्यांची सदोदित वाढणारी प्रजा, वेळोवेळी फ्लश केली जाते. लघवी कमी झाली की हे जंतू मूळ धरतात. मूत्रमार्गाचे इन्फेक्शन ही एक अत्यंत त्रासदायक बाब आहे. हे विकतचं दुखणं कशाला हवंय तुम्हाला? शिवाय तुम्ही काय करताय हे पुढली पिढी बघत असते. बघून बघून शिकत असते. ग्रहणाला असं-असं घाबरायचं हे संस्कार त्यांच्यावर नकळत घडत जातात. शाळेतलं शाळेत, विज्ञानाच्या पुस्तकातलं विज्ञानाच्या पुस्तकात.

घरचं शास्त्र वेगळं, दारचं वेगळं. कितीही यडच्याप कल्पना असली, वाईट असली, त्याज्य असली, आपल्याला पटली नाही तरी डोकं चालवायचं नाही. मेंदू बंद ठेवायचा. हे संस्कार संक्रमित होतात. हा तर मोठाच तोटा आहे. विष हे आहे. तुम्ही जेव्हा ग्रहण पाळता तेव्हा हे हलाहल पाजत असता पुढच्या पिढीला. माणसाच्या टीचभर मेंदूने ग्रहणाबद्दल काय काय कल्पना लढवल्या आहेत हे पाहून आपण थक्क होतो. कोणी चंद्र-सूर्याला कुत्र्याच्या तोंडी दिलं तर कोणी अस्वलाच्या; कोणी त्यांच्यात भांडणं लावून चंद्र-सूर्याला आळीपाळीनं रुसायला लावलं, तर कोणी त्यांना आळीपाळीनं शापभ्रष्ट आणि शापमुक्त केलं. चंद्र-सूर्यावर ताव मारणारे राक्षस तर अनेक जमातीत आहेत. यातल्या प्रत्येक कल्पनेला त्या त्या टोळीच्या धर्मशास्त्राचा भरभक्कम पाठींबा आहे. कुठल्याश्या कोरियन  कथेमध्ये ते कुत्रं डायरेक्ट सूर्याचे लचके तोडायचं, आणि मग ह्यांनी इथे ओलेत्याने, सातत्याने ढोल पिटले की तिकडे ते कुत्रं सूर्याला सोडून, शेपूट पायात घालून, मुकाट बाजूला व्हायचं. पुन्हा आपला सूर्य उगवायला आणि मावळायला मोकळा.

आणखी एका अरबी कथेत तर ग्रहणकाळात काळ्या बुरख्यात वाळूत गडाबडा लोळतात म्हणे. अशाने पुण्य वाढते. शिवाय थोडी वाळू आकाशात भिरकावतात. रोज उगवल्या आणि मावळल्या बद्दल सूर्याला आणि चंद्राला ‘थ्यांक्यु’ , म्हणायची ही अनोखी पद्धत आहे. इटलीत मात्र ग्रहणकाळात खास फुलझाडं लावतात. अशा फुलांचे रंग अधिक खुलतात म्हणे! कुठे सूर्य, कुठे चंद्र, कुठे ते त्यांचे अवकाशात चालणारे सावल्यांचे खेळ आणि कुठे माणूस! या कथा रचल्या सर्व संस्कृतींनी. प्रतिभेच्या, कल्पनांच्या उंचच ऊंच भराऱ्या या. अचंबित करणाऱ्या. पण या मागचं विज्ञान; ते तर याहीपेक्षा कितीतरी सरस आहे, काव्यात्म आहे, रंजक आहे, नेमकं आहे. माणसाला या विश्वाच्या पसाऱ्यात कस्पटा एवढेही स्थान नाही हे लक्षात आणून देणारं आहे. मनुष्यमात्रांचा अहंभाव निखळून पाडणारं आहे. विश्वाच्या पसाऱ्याप्रती विस्मय वाढवणारं आहे. आधी हे ग्रहगोल अवकाशात आधाराविना तरंगत आहेत हे मान्य करायचं. शेष, कासव, अॅटलास वगैरेंना चक्क रिटायर करायचं! मग चांगला रोज डोळ्यादेखत इकडून तिकडे जाताना दिसणारा सूर्य स्थिर आहे असं समजावून घ्यायचं. मग पृथ्वीला-चंद्राला स्वतःभोवती आणि परस्परांभोवती फिरवायचं. मग त्यांची गती, मग कोन, मग सावल्या... भन्नाटच आहे हे.

पण ह्या दृष्टीत एक विशेष आहे. इथे ग्रहण पुन्हा कधी होणार हे सांगता येतं, पूर्वी कधी झालं होतं हे सांगता येतं, वेध, वेळ, खंडग्रास, खग्रास, कुठून दिसणार, कुठून नाही हे सगळं सगळं सांगता येतं. ढोल बडवायची गरज नाही. अस्वलाला नैवेद्याची गरज नाही. सूर्याला थ्यांक्यू वगैरे भानगड नाही. ग्रहण सुटणार म्हणजे सुटणार. ढगाची सावली पडली मैदानावर तर ढग सरकला की पुन्हा सूर्यदर्शन होणारच की. त्या साठी ओलेत्यानी पूजा कशाला? इतकं साधं आहे हे. पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार (चंद्रग्रहण) किंवा चंद्राची पृथ्वीवर (सूर्यग्रहण). शाळेतला मुलगाही सांगतो आता हे. वर दोन बॉल आणि टॉर्च घेऊन करूनही दाखवतो. खूप ऊन आहे म्हणून छत्री घेऊन फिरता ना तुम्ही; किंवा यस्टीच्या ष्टांडावर शेड खाली सरकून उभे रहाता नं तुम्ही, तेव्हा सुद्धा ग्रहणंच लागलेले असतं तुम्हाला. त्या शेडची सावली पडतेच की अंगावर. घरात घराच्या छताची पडते, झाडाखाली झाडाची पडते. तशीच कधी कधी चंद्राची पृथ्वीवर म्हणजे पर्यायनं आपल्यावर पडते (सूर्यग्रहण). सावलीला काय घाबरायचं?

जशी चंद्राची पृथ्वीवर पडते, तशी बैलाची सावली बैलाशेजारच्या गाभण शेळीवर पडू शकते, शेळीची कोंबडीच्या खुराड्यावर पडू शकते. शेळीला काय फाटक्या ओठाची करडं होतील म्हणून काळजी करत बसता काय तुम्ही? का कोंबडीचा ‘अंडपात’ होणार म्हणून वैतागता? प्रार्थना करता? माणसाची सावली माणसावर पडणे हे अशुभ मानता का तुम्ही? नाही नं? मग चंद्र सूर्यांनी काय घोडं मारलंय? आपल्याला दोन डोकी असतात. त्या जुन्या मुमताज वगैरेंच्या सिनेमात त्यांची हेअर स्टाईल कशी असते, डोक्याला डोकं चीकटवल्यासारखी, तशी. एक डोकं शाळा, कॉलेज, शिक्षण, संशोधन वगैरे साठी आणि दुसरं दैनंदिन व्यवहारांसाठी. एकाचा दुसऱ्याशी संबंध आला की आपली गोची होते, प्रचंड गोची. यातल्या एका डोक्याचा शिरच्छेद करून एकच डोकं ठेवावं लागेल. ज्ञान सूर्याला लागलेलं ग्रहण सुटावंच लागेल. ह्या ग्रहणाला दान मागायचं ते एवढंच. नाहीतर आ चंद्रसूर्य नांदो , हा खेळ बावळ्यांचा चालूच राहील, चालूच राहील.

लेखक- डॉ.शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक, वाई, जि.सातारा मो.क्र. ९८२२० १०३४९


सोशल मिडीया

प्रतिक्रिया

  1. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख !

  2. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख.अनेक कल्पना कशा खोट्या असतात हेस्षष्ट करणारा लेख .

  3. upd

      7 वर्षांपूर्वी

    पटतंय.पटतंय की, विडंबनात्मक करून सांगितल्याशिवाय अशी गोष्ट परिणामकारक ठरतच नाही. त्यामुळे लेखनातून विषय खूपच चांगल्याप्रकारे पोहोचला आहे. --ऊर्मिला देवधर

  4. Aashokain

      7 वर्षांपूर्वी

    झकास लेख! डॉक्टर वैज्ञानिक भाषेतही रंगत आणलीत आपण! धन्यवाद!

  5. sharadnaik

      7 वर्षांपूर्वी

    मस्त लेख!

  6. Rajrashmi

      7 वर्षांपूर्वी

    हे सर्व खर असल तरीही, पृथ्वी, चंद्र व सुर्य एका रेषेत आल्यावर पृथ्वीवर काही तरी परीणाम हा होणारच ,भरती ओहटीचा आपण अनुभव घेत आहोतच, मल तर ह्या गोष्टीची जीज्ञाशा आहे की, जेव्हां ग्रह ता,ऱ्याचा अभ्यास होवू लागला तेव्हा ऐवढ प्रगत विज्ञान नव्हत त्यांनी ह्या सर्व बाबींचा कसा अभ्यास केला असेल, कसे हे निर्णय घेतले असतील, पण ह्याविश्वात माणसाला काही किंमत नाही ह्या मताशी मी सहमत नाही, माणसावर खगोलीय गोष्टी चा परिणाम हा होतोच .काही गोष्टी हेसुद्धा करतात, पण त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे चुकीचे आहे

  7. anudeep

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख ...सहज आणि सोप्या भाषेत

  8. aradhanakulkarni

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान

  9. Vasant

      7 वर्षांपूर्वी

    डॉ अभ्यंकर नेहमी प्रमाणे सोप्या भाषेत व सहज समजेल असा

  10. ajaywadke

      7 वर्षांपूर्वी

    फार छान लेख. आपल्या राज्यघटनेनुसार विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगणे हे प्रत्येकाचे मुलभूत कर्तव्य आहे पण हल्ली ते फक्त परिक्षेतल्या 2 मार्कांपुरतेच उरलंय..

  11. sanjay

      7 वर्षांपूर्वी

    उत्तम

  12. asmita

      7 वर्षांपूर्वी

    Real scientific article ! We really need to spread this.

  13. [email protected]

      7 वर्षांपूर्वी

    अभ्यंकरसाहेब झकास.

  14. Deovarsha

      7 वर्षांपूर्वी

    Nicely written



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen