सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, संपादक, समीक्षक प्रा. डॉ. स. गं. मालशे. त्यांचा जन्म २४ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणा-या मालशे यांनी फादर स्टिफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि मुंबई साहित्य संघाचे अध्यक्ष असणा-या स. गं. मालशे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने ‘समग्र महात्मा फुले’ ग्रथांचे संपादन केले. याबरोबरच ‘आहे आणि नाही’, ‘जर-तर’ हे ललित लेखसंग्रह आणि ‘नाटय़ परमार्थ’,‘साहित्य सिद्धान्त’ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
आपल्या संशोधनपर लेखनामुळे साहित्यप्रांतात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी विशेष ठसा उमटवला. कीर्ती महाविद्यालयाचेही काही काळ मराठी विभाग प्रमुख असलेल्या मालशेंचा 'ॠणानुबंधाच्या गाठी' हा व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह गाजला. संतर्पण हा संतसाहित्यावरील लेखांचा संग्रह, आगळं-वेगळं हा आगळ्या वेगळ्या पुस्तकांवरचा लेखांचा संग्रह. नीरक्षीर, आवडनिवड हे समीक्षात्मक लेखसंग्रह. हे ग्रंथ त्यांची रसज्ञ आणि मर्मग्राही वृत्ती दर्शवणारे आहेत.
सावरकरांच्या अप्रसिद्ध कवितांचे हस्तलिखित, झेंडूची फुले, महात्मा फुले समग्र वाङमय, स्त्री-पुरुष तुलना ही त्यांची संपादने महत्वाची ठरली आहेत. १९व्या शतकाचा विशेष अभ्यास करून त्यांनी संशोधनात्मक लिखाण केले. गतशतक शोधिताना, विधवा विवाह चळवळ (सहलेखिका नंदा आपटे) तारतम्य ही पुस्तके याची साक्ष पटवतात.
बालसाहित्यात उसघरातील गुरगुऱ्या, काझीचा न्याय, जादूचे स्वप्न, विलक्षण तंटे, चतुराईच्या गोष्टी यासारखी पुस्तके लिहून त्यांनी मोलाची भर टाकली आहे. साहित्य सिद्धांत (थिअरी ऑफ लिटरेचर, ले. वेलेक व वॉरेन), सुखाचा शोध (स्ट्रेंज इंटरल्युड ले. युजीन ओलीन), श्रीमंत सयाजीराव गायकवाड (ले. चावडा), कलेची मूलतत्वे (प्रिन्सिपल्स ऑफ आर्ट ले. कोलिंगवुड) या ग्रंथांचे अनुवादही त्यांनी केले आहेत.
इतक्या बहुविध विषयांत प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या सखाराम गंगाधर मालशे यांचा देहांत ७ जून १९९२ रोजी झाला. त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास पुनश्च चा मानाचा मुजरा.
[ सदर लेख हा ज्योत्स्ना प्रकाशन व दैनिक प्रहार यांच्या डिजिटल मिडीयातील लेखांच्या सौजन्याने साकारला आहे.]
सोशल मिडीया
, ज्योत्स्ना प्रकाशन
, दैनिक प्रहार
, स. गं. मालशे
ssal
7 वर्षांपूर्वीश्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या वरचा लेख वाचायला आवडेल.
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीफारचं छान स ग मालशे ना आपण साफ विसरून गेलो होतो असेच विस्मृतीत गेलेल्या लोकांना बाहेर काढा मनपुर्वक धन्यवाद