महाराष्ट्राला दगडांच्या देशा म्हणतात कारण इथले अनेक सुळके आणि डोंगरमाथे आपापले दगडी देह उन्हात तापवत, पावसात भिजवत आणि हिवाळ्यात गोठवत साहसांना आव्हान देत असतात. खाचाखळग्यांतून वाटा धुंडाळत यांच्या माथ्यापर्यंत पोहचण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. काही पोहोचतात, काही माघार घेतात. परंतु प्रत्येकाचाच प्रयत्न थरारक असतो. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाल्मिकी आश्रमाच्या पोटाशी असलेला आजा पर्वत असाच डोंगरमार्गासाठी एक आकर्षण आहे. त्या माथ्यापर्यंत जाण्याच्या एका धाडसाची ही रंगतदार हकीकत लिहिली आहे आनंद पाळंदे यांनी. ********** अंक – श्रावण, मे १९९५ सह्य पर्वताच्या माथ्यावर कुशीत आणि पायथ्याशी अनेक स्थळं अशी आहेत की त्यांच्याशी धार्मिक कथा गुंफलेल्या आहेत. आदिवासी मानवाने त्या गाभाऱ्यातल्या देवतेप्रमाणे श्रद्धेने जपलेल्या आहेत. अशा स्थळांच्या वाटा धुंडाळताना आधुनिक जगाचा वारा दूर गेल्याचा आभास होतो आणि आधीच निसर्गरम्य असलेल्या या स्थानांच्या गहिरेपणात मिथक कथांच्या स्मरणाने गूढ रंग भरला, की यात्रेला अधिकच मौज येते. आजा पर्वताचा परिसर असाच आहे. रामायणातील उत्तरकांडाचा विषय याच्याशी निगडीत आहे. ‘आजा’ म्हणजे रामराजाचा आजोबा – वाल्मिकी ऋषी. यांचा आश्रम येथे होता आणि सीता लव-कुशांना घेऊन येथे राहिली होती, अशी कथा सांगतात. नगर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरील हा पर्वत दूरवरूनही लक्षवेधी आहे. मध्य रेल्वेवरील कल्याणमार्गे लोकलने आसनगावला उतरून आम्ही शहापूरची एस.टी. अक्षरशः पकडली. शहापूरच्या अस्वच्छ स्थानकावर गर्दीचा महापूर होता. पाट्या नसलेल्या असंख्या एस्ट्यांची येजा असल्यामुळे आम्हाला हव्याशा डोळखांब-डेहेणे एस्टीला चपळतेने हुडकून आत घुसावे लागले. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
श्रावण
, प्रवासवर्णन
, अनुभव कथन
, स्थल विशेष