माजी कुलगुरू डॉ. निगवेकर ह्यांनी सांगितलेला एक किस्सा आठवतो. मी औरंगाबादला आल्यावर सुरुवातीलाच एका कार्यक्रमात आमची भेट झाली. तेव्हा मला शुभेच्छा देतांना ते म्हणाले – “कुलगुरुपदाच्या संदर्भात मला वऱ्हाडी माणसं ह्या नाटकातील एक संवाद आठवतो. त्यातील सासरा नव्याने घरात आलेल्या आपल्या सुनेला म्हणतो – बाई ग, तुझ्या पदरात जळते निखारे आहेत. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. निखारे तर विझू द्यायचे नाहीत अन् पदरदेखील जळू द्यायचा नाही!”
खरेच, कुलगुरुपद म्हणजे तशीच तारेवरची कसरत आहे. २८ मार्च २०१४ रोजी माझ्या ६५व्या वाढदिवशी मी ह्या पदावरून कार्यकाळ संपल्याने निवृत्त झालो. माझा वाढदिवस पहिल्यांदाच माझ्या कार्यकर्तृत्वाच्या आड आला! पण माणसाला कुठे ना कुठे थांबायचे असते. कुणी कुणाला जन्मभर पुरत नाही हेही तितकेच खरे.
कुरुगुरुपदाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणे, त्या काळातील आत्मचरित्राचे एखादे प्रकरण लिहिणे हा या लेखनाचा उद्देश नाही. उलट मी निवृत्त होतच अंतर्नादच्याच संपादकांनी सुचविल्याप्रमाणे त्या अनुभवांवर आधारित नव्या पिढीला, तरुणांना प्रोत्साहक, प्रेरणादायी ठरणारे लेखन करावे हा उद्देश आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात नकारात्मक भूमिकेतून केली, सगळ्या समस्यांकडे निराशावादाच्या भूमिकेतून पाहिले तर हाती काहीच लागत नाही. ‘असाध्य ते साध्य, करिता सायास’ ह्या उक्तीप्रमाणे आपला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास असला तर सुरुवातीला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्यतेकडे झुकू शकतात हा माझा अनुभव.
माझा प्रवास अनेक बाबतीत वरून खाली असाच झालाय. प्रारंभीची दहा वर्षे आय.आय.टी. खरगपूर सारख्या नामांकित उच्चशिक्षण संस्थेत आणि नंतर साधारण तीन दशके उस्मानिया विद्यापीठासारख्या स्टेट युनिव्हर्सिटीच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये घालविल्यानंतर कमावलेल्या शिक्षण-संशोधन क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा फायदा मराठवाड्यासारख्या मागासलेल्या मानल्या गेलेल्या भागातील विद्यापीठासाठी देता यावा ह्यासारखे सद्भाग्य नाही. त्यातही या विद्यापीठाला भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यासारख्या विद्वानाचे नाव दिलेले! माझ्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच एक विद्यापीठ होते! केवढा मोठा बहुमान! केवढी आव्हानात्मक संधी! आधी एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी. मराठवाड्याला ‘मागासलेला’ हे विशेषण मी लावलेले नाही. किंबहुना ते मला मान्यच नाही. कुणीही मागसलेला वगैरे नसतो. प्रत्येक व्यक्तीत, व्यक्तिसमूहात काही ना काही चांगली क्षमता असतेच. फक्त संधीची वाट पाहावी लागते. आधाराची, प्रोत्साहानाची गरज असते. मराठवाड्यासाठी मी तेच केले. विद्यार्थी असो, प्राध्यापक असो, कर्मचारी असो, अधिकारी वर्ग असो; त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून दिली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.