लखनौ कॉंग्रेस : एक प्रवास


अंक - सह्याद्री, ऑगस्ट १९७६

लखनौ कॉंग्रेस म्हणजे लोकमान्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे परमोच्च शिखर. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने टिळक पक्षाचे प्रतिनिधी गेले होते. त्यांत साताऱ्याचे प्रख्यात वकील व त्या जिल्ह्यांतील टिळक पक्षाचे नामवंत नेते श्री. नारायण कृष्ण आगाशे हेही होते. श्री. आगाशे हे राजकारणी तसेच चांगले लेखकही होते. त्यांनी आपल्या खाजगी दैनंदिनीत लखनौच्या प्रवासाचे व अधिवेशनाच्या व्यवस्थेचे वर्णन केले आहे. अधिवेशनाचे हे अवांतर किस्से वाचकांना गमतीदार वाटतील.

जातावेळचा प्रवास सुखकर झाला व खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत. कारण रा. टिळक आमच्याबरोबर होते. परत येताना ते आमच्याबरोबर नव्हते. मग आमचा परामर्श कोण घेणार? सगळ्यांच्याबरोबर नेलेले डबे पालथे झाले. वाटेत जे काही मिळेल त्याच्यावरच गुजराण करणे भाग होते. त्यातल्या त्यात दि. ३१ ला भोपाळच्या स्टेशनवर रा. करंदीकरांच्या ओळखीच्या एका माणसाने, तारेने सूचना पाठविल्यावरून, भात-झुणक्याची व्यवस्था ठेवली होती. त्या वेळी ते पदार्थ किती चांगले लागले म्हणता? असो. परत येताना बहुतेक सर्व मंडळी कल्याणच्या स्टेशनवर उतरली व परभारे साताऱ्यास आली. सोमण, करंदीकर व मी असे तिघेजण मुंबईस गेलो व १ जानेवारीच्या रात्रीच्या गाडीने तिथून दुसऱ्या दिवशी दुपारी येथे दाखल झाली. तिकडे जातेवेळी प्रत्येक कंपार्टमेंटांत सात-आठ माणसे असत. परंतु परत येताना पाचापेक्षा जास्त नव्हती. कारण जाताना एकच स्पेशल होती. येताना ल. मो. आपटे, मंत्री, वकील, रँग्लर परांजपे, एक मद्रासी गृहस्थ व मी असे पाच आसामी होतो. रँग्लर साहेबांनी आपल्या पोटाचे मुळीच हाल होऊ दिले नाहीत. कारण रिफ्रेशमेंट रूममध्ये जाऊन ते खटपट करीत असत. त्यांच्या जोडीला बरीच ब्राह्मणमंडळीही असत. आमच्यासारख्या भटा-बामणांचे मात्र हाल झाले खरे. लखनौकडे जाताना आगगाडीत दि. २४ रोजी सकाळी माझी प्रकृती किंचित बिघडली. पोटात बारीक दुखू लागले व तीन-चार वेळा शौचाला जावे लागले. माझ्या कंपार्टातील एका गृहस्थाजवळ बडीशेप होती, ती चावून खाल्ली व त्यामुळे शौचाला जाणे दुपारी थांबले. शौचाला जाण्याने त्रास झाला. अशा स्थितीतच हुर्दा स्टेशन आले. तेथे जेवणाची व्यवस्था होती, परंतु थोड्याशा भातापलीकडे मी कशालाही बोट लावले नाही. बेत जिलबीचा होता. आकारावरून तरी त्या चांगल्याशा वाटल्या नाहीत त्याच दिवशी रात्री भोपाळ स्टेशनवर दूध, केळी, लाडू, चिवडा असा फराळ झाला. त्या वेळी प्रकृती बरी झाल्याने अल्पसा उपाहार केला. ही गोष्ट खेरीज करून प्रवासात किंवा मुक्कामाला प्रकृतीत कोणत्याही प्रकारचे वैगुण्य वाटले नाही. १८९९ साली लखनौस गेलो होतो. त्या वेळी ठिकाणावर पोचल्यानंतर असाच प्रकार झाला होता. या खेपेला वाटेने झाला. यावरून लखनौस कॉंग्रेस असली म्हणजे माझी प्रकृती शौचाच्या विकाराने बिघडावी, असा काही योगायोग आहे किंवा काय, कळत नाही. पहिलीनंतर ही कॉंग्रेस १७ वर्षांनी लखनौ येथे भरली. आता पुन्हा केव्हा भरेल व आम्ही त्यावेळी कोणत्या स्थितीत असू हे प्रश्न काळाच्या उदरात गडप झालेले आहेत.

रिसेप्शन कमिटीची व्यवस्था

लखनौस गावातच दक्षिणेकडील प्रतिनिधींकरिता दोन इमारती योजून ठेवल्या होत्या. १. धर्मशाळा (सराई), २. एक जुना व पडसर बंगला. पहिल्या इमारतीत टिळक वगैरे पुण्याची मंडळी माडीवर होती. आम्ही (Rank and file) तळमजल्यात होतो. या सराईत एक-एक खणाच्या खोल्या होत्या व त्या खोल्यात दोन खाटा-बाजली असत. सर्व व्यवहार त्या खाटल्यावर व खाटल्याखालच्या जागेत करावयाचा. खोल्यात खुंटी नाही की कोनाडा नाही. बाजारातून खिळे आणून जेव्हा भिंतीत ठोकले तेव्हा अंगावरचा सदरा तरी काढून ठेवता आला. रात्री तारेचे कंदील असत, ही तर रिसेप्शन कमिटीची मेहेरबानी होती. सराईत शौचकूप चारच होते पण ते (Flushing Apparatus) चे होते, यामुळे स्वच्छ असत. शौचाची अडचण भासली नाही. अलाहाबादेस शौचला जशा एकाशेजारी एक चुली असावयाच्या तशाच लखनौसही असतील असा धाक वाटला होता. परंतु तो निराधार ठरला ही फार आनंदाची गोष्ट झाली. नाही तर आमचे हाल कुत्रा खाता ना! याशिवाय भंगी स्टाफ हा तेथे अहोरात्र हजर असे व ती स्वच्छता ठेवण्याकडे चांगले लक्ष पुरवीत असे. पाण्याच्या तीन ठिकाणी चाव्या होत्या. परंतु त्यांना नियमितपणेच पाणी येत असल्याने बरीच गैरसोय भासत असे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून मोकळ्या हवेत जागजागी पाण्याचे रांजण भरून ठेवण्याची योजना केली होती. परंतु थंडीने हे पाणी अतिशय गार होत असे. शिवाय वाटेल त्याने यावे व वाटेल त्या प्रकारचे भांडे त्यात बुचकळावे असा कारभार चालू असल्याने चूळ वगैरे भरण्याच्या कामाला ते पाणी निरुपयोगी असे. आपल्याजवळचा तांब्या भरून ठेवावा आणि चूळबीळ भरावयाची झाली तर त्या पाण्याने भरावी हे बरे वाटत होते. आंघोळीची व धोतरे धुण्याची नंबर एकची सोय होती. आतापर्यंतचा आमचा अनुभव असा की कॉंग्रेसने ठेवलेल्या गड्यांनी, कशी का होईना, डेलिगेटांची धोतरे धुवावयाची. पण लखनौच्या रिसेप्शन कमिटीला डेलिगेटांनी इतक्या ऐदीपणाने वागावे हे बरे वाटले नाही आणि म्हणून त्यांना त्यांनी स्वत:चे धोतरे धुण्यास लावले. ते काम देखील आम्ही मोठ्या आनंदाने केले असते; पण इतक्या माणसात एक वारडी (बादली) दिलेली नव्हती. शिवाय चाव्या काय त्या तीनच! त्यांपैकी एक भंग्यांकरिता म्हणून होती. पण आम्ही तो विधिनिषेध बाळगलाच नाही. बारड्यांच्या अभावी आंघोळीला पाणी घ्यावे कशात, अथवा धोतरे खळबळावीत कशात? पण हीही अडचण आमच्या कमिटीने मोठ्या दक्षतेने दूर केली होती. मातीच्या कळशा ही संस्था तरी बेताचीच होती-होत्या. त्यापैकी एकीत ऊन पाणी घ्यावे व दुसरीत गार पाणी घ्यावे आणि कशी तरी आंघोळ करावी अथवा कसा तरी कावळा बुचकळून घ्यावा. आंघोळीची त्यातल्या त्यात काही तरी सोय व्हावी म्हणजे आंघोळीची जागा निदान मोकळी तरी सापडावी म्हणून मी पहाटे ४ अथवा ४.३० ला स्नान करीत असे. स्नान केल्यानंतर धोतरांना कसे तरी पाणी दाखवून वाळत टाकीत असे. यानंतरचा प्रकार चहाचा. पहिले दोन दिवस ब्रेड आणि थोडेसे लोणी मिळाले. परंतु पहिल्या तडाख्याला जर वर्णी मिळाली तर ऊन चहा मिळावयाचा. पण जरा का उशीर झाला की थंडीच्या तडाख्यात तो तेव्हाच निवून जायचा. शेवटच्या दोन दिवशी ब्रेडच्या ऐवजी तेथे तयार केलेले कसलेसे पदार्थ मातीच्या पंत्यांतून देत असत.

मृण्मय पात्रे

चहा व जेवण पहिल्याने आपल्या पदरात पडावे याबद्दल कशी दक्षता बाळगावी लागत होती याचा तुम्ही कलकत्त्यास अनुभव घेतला आहेच. तोच नमुना येथे होता. मृण्मय पात्रांचा येथेही पदोपदी उपयोग करावा लागत होता. जेवणाकरता निराळी जागा नव्हती. आम्ही उतरलो होतो त्या खोल्यांच्या पुढे जो व्हरांडा होता त्या व्हरांड्यात दोन पंक्ती बसवीत असत. ‘काहारा’कडून जेवणापूर्वी शास्त्राला एकदा खराटा मारला की जेवणाचा हॉल झाला स्वच्छ! जेवणे झाली व नंतर मारला खराटा की झाली उष्टी काढणे, जेवण पळसाच्या पत्रावळीवर. पत्रावळीबरोबर एक मोठासा द्रोण. बसण्यास (एका माणसाच्या बेताच्या) गवती चटया. पाणी पिण्याला भांडी मृत्तिकेची. भात-वरण-तूप, एक भाजी, आमटी, एक चटणी, पोळी, साखर व शेवटच्या दोन दिवशी मागच्या भाताला ताक. पहिले दोन दिवस आमटीवरच वेळ मारून न्यावी लागली. भाज्या तीन प्रकारच्या- वांगी, काशीफळे आणि कॉलिफ्लॉवर परंतु तीन निरनिराळ्या भाज्या शिजविण्याला पुरेशी भांडी नव्हती म्हणून की काय, कोण जाणे, या भाज्या कधी तीन, कधी दोन एके ठिकाणीच शिजविल्या जात होत्या. त्यांत धड मीठ नाही, धड तिखट नाही, मग फोडणीचे तर नाव नकोच. खोबरे आणि ओल्या मिरच्या एका ठिकाणी ठेचल्या-वाटल्या नव्हे - की झाली चटणी तयार. या सर्व थाटावरून आमटी कशा तऱ्हेची होती याची तुम्हाला कल्पना येईल. पोळ्या फुरक्या-वातट, कधी जादा भाजलेल्या, कधी हिरव्या, कधी अतिशय वातट, आचारी पुण्याहून नेले होते. पण त्यांना जसे सामान मिळेल त्या मानाने ते रसोई बनवीत. वाढपी नेलेले नव्हते. पुण्याचेच कोणी young लोक वाढीत असत. त्यांनी अंगात खुशाल शर्ट ठेवावेत, काहींनी X X X विजारी ठेवाव्यात आणि अशा थाटाने वाढावयास यावे. वाढण्यापूर्वी बिचारे हात तरी धूत होते की नाही कोणास ठाऊक! वाढण्याच्या कामात या लोकांना नाजूकपणा कसचा माहीत असणार? भात मागितला म्हणजे गड्याला वाढतो त्याप्रमाणे दोन-दोन हातांनी घालावयाचा. तूप मागितले की एखाद्या वेळी इतके भसकन्‌ ओतावयाचे की जिकडे तिकडे पानभर तूपच तूप! पंगत बसली असता पायात बूट वगैरे घालून खोलीत राहणाऱ्या माणसांनी खुशाल जावे-यावे. त्यांना प्रतिबंध कोण व कसा करणार? कारण व्हरांडा ही बोलूनचालून जाण्या-येण्याची वाट. त्याचा जर तुम्ही डिनर हॉल केलात तर ‘‘भववितुर्वचनीयता’’ याप्रमाणे जेवणाचे हॉल. पदार्थ मातीच्या भांड्यात शिजवावयाचे, मातीच्या भांड्यांतच वाढावयाला आणावयाचे. यामुळे त्यांना एक प्रकारचा वास येत होता. त्यात आणखी काही घाणेरडा प्रकार दृष्टीस आला म्हणजे तोंडात घातलेला घास मागे परतू लागे. आणि असे झाले म्हणजे अर्धपोटीच पानावरून उठावे लागे.

बेळवी संतापले!

या त्रासाने दोन प्रसंगी मी जेवणच टाळले. जवळच्या फळांच्या डब्यावर भागवावयाचे. एकंदरीत अतिशय हाल होते. बेळगावास प्रांतिक परिषदेच्या वेळी आम्ही राजासारखी जी जेवणे जेवलो त्याचे उट्टे लखनौला चांगले निघाले. वर सांगितलेली उतरण्याकरता दिलेली दुसरी जी जागा होती तेथे बेळगाव, विजापूर वगैरे ठिकाणची माणसे उतरली होती. त्यांचेही खाण्यापिण्याचे हाल असेच होते. आमची राहण्याची इमारत तरी नवी होती. त्या बिचाऱ्यांची इमारत जुनी होती. कोणचा भाग केव्हा कोसळेल याचा नेम नाही. तेथे उतरलेल्या इसमांपैकी दोघांना अपघात होऊन त्यांचे हातपाय दुखावले. ही सर्व व्यवस्था - का अव्यवस्था - पाहून नाम. बेळवी फार संतापले होते व त्यांनी सारखा तोंडाचा पट्टा चालूच ठेवला होता. ‘‘सगळी माणसे तुमच्या भजनी लागतात, आमची वास्तपुस्त कोणी घेत नाही’’ अशी त्यांनी टिळकांकडे जाऊन तक्रार केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘येथे माझ्या हातात काही नाही. माझ्यामुळे तुमची अव्यवस्था होत असेल तर मी तुम्हाला एकदा नमस्कार घालतो.’’ माझी स्वत:ची अशी समजूत आहे की, या कामात टिळकांनी जितके लक्ष घालावयाला पाहिजे होते तितके घातले नाही. त्यांच्या एका शब्दाने जे झाले असते ते बेळवींच्या वैतागण्याने काय होणार? सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटीतर्फे नारायण मल्हार जोशी आमच्या कँपचे आपणहून सुपरवायझर झाले होते. त्यांनी आरंभापासून शेवटपर्यंत आपले काळे की गोरे तोंडच दाखविले नाही. शेवटी त्यांना एके दिवशी आग्रहाने बोलावून आणले व जेवणास राहविले. त्यावेळी त्यांची अशी काही भोसडपट्टी काढली की सांगता सोय नाही. बेळवींनी तर त्याला नुसता पापडासारखा निखाऱ्यावर भाजला.

I am sorry. I cannot help it. The thing is mismanaged असे र र करीत होता. असो. राहण्याची जागा संकुचित यामुळे आम्ही बरोबर नेलेले चांगलेचुंगले कपडेही बाहेर काढले नाहीत. चेहरा चांगला दिसावा म्हणून Shaving apparatus बरोबर नेले होते परंतु त्याचा उपयोग करावयाचा कसा खाटेवर बसून? त्यांत ही खाट बाजल्यासारखी. खोल आलेली. टेबल नाही, दऊत नाही, टाक नाही. ही सर्व साधनसामग्री असली तरी पत्र लिहावयास वेळ कोठे होता? स्वत:ची जेवणाची, स्नानाची यातायात. त्यात आणखी कॉंग्रेसची यातायात, मग वेळ कसा मिळणार? दि. २७ रोजी आम्हाला सुट्टी होती. कारण त्या दिवशी सबकमिटीची बैठक होती. त्या दिवशी मात्र आम्ही गाडी करून चोहोकडे हिंडलो. या गाड्या म्हणजे चाकावर पाय सोडून बसण्याच्या हे तुम्ही लक्षात आणा. याप्रमाणे सर्व लोक अव्यवस्थेच्या नावाने खडे फोडत आहेत. अशा स्थितीत देखील आम्हाला रोजचा १।। रु. द्यावा लागला. पहिल्याप्रथम दोन रुपये घेणार असे प्रसिद्ध झाले होते. मग त्यांची त्यांनाच लाज वाटली की काय, कोण जाणे. सर्व डेलिगेटांत पुण्याच्या मंडळींना कमी हाल सोसावे लागले. शिवरामपंत परांजपे बिचारा चुकूनही कधी एक शब्द बोलत नाही. मग आपणहून बोलण्याचे आमचे तरी काय अडले आहे? बेळगावास देखील यांचा वऱ्हाडीपणा पाहावयास सापडला होता. होमरूलमधले हे बरोक्रॅटस नाहीत का?

लेखक - नारायण कृष्ण आगाशे

**********

Google Key Words - Narayan Krishna Agashe, Tilak Era, Lucknow Session Of The Congress, Lucknow Session.

 

इतिहास , सह्याद्री , अनुभव कथन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.