माणसाची ओळख कशामुळे असते? माणूस कोणत्या श्रद्धांवर जगत असतो? प्रत्येक व्यक्ती, समाज, देश यांना आपली स्वतःची विशिष्ट ओळख हवी असते. ती ओळख कशात असते? धर्म, संस्कृती, विचारसरणी, भाषा की आणखी काही? या अनेक पदरी गुंतागुंतीच्या विषयावर प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक अलीकडे वाचलं- ‘अनुबंध धर्मसंस्कृतींचे’.
हे पुस्तक इंडस सोर्स बुक्स ने २०१७ मधेच प्रकाशित केले आहे. पण त्यामानाने त्याची चर्चा झाली नाही असं वाटतं. विशेषतः जगात अनेक देशात विविध कारणांनी होत असलेल्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचणे इंटरेस्टिंग आहे. प्रतिभा रानडेंनी हे पुस्तक सहा प्रकरणात विभागले आहे, आणि त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि इंडोनेशिया या देशांवर विस्तृत अशी चार प्रकरणे आहेत.
अनेक दशके परकीयांचे आणि स्वकीयांचे आघात सोसून बदलेल्या अफगाणिस्तानची ओळख आज काय आहे? एकच इस्लाम धर्म त्या देशात असूनही कट्टरतेमुळे त्या देशाच्या संस्कृतीत झालेला बदल पूर्ण उध्वस्ततेकडे घेऊन गेला. म्हणजे धर्म आणि संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि धर्म जितका पोथीनिष्ठ होत जातो तितका तो निसर्गापासून दूर होत जातो का, आणि त्यामुळे सांस्कृतिक अधःपतन होते का हे प्रश्न आपल्याला वाचताना पडतात. पाकिस्तान तर स्वतःची ओळख वेगळी असलीच पाहिजे या अटीतटीला येऊन निर्माण झालेला देश. धर्माच्या नावाखाली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या नादात, जे जे म्हणून अखंड भारत असताना तिथल्या लोकांचे सांस्कृतिक रीतीरिवाज, भाषा होते त्याला नाकारत उर्दूची सक्ती, धार्मिक कट्टरता याला त्याने प्रोत्साहन दिले आणि देश आर्थिक, सामाजिक दृष्ट्या भारताच्या तुलनेत कितीतरी मागे राहिला.
इथेही धर्म एक असूनही भाषा आणि सांस्कृतिक दमन झाल्यामुळे बांगलादेश वेगळा झालाच. म्हणजे धर्म जनसमूहाला एकत्र ठेवू शकतो असे नाही हे पुन्हा सिद्ध झाले. तसे असते तर सर्व इस्लाम धर्मीय राष्ट्रांचा, सर्व ख्रिश्चन बहुसंख्य असलेल्या देशांचा चेहरा एक असता. तसे नसतेच, कारण प्रादेशिक संस्कृती, सामाजिक चालीरीती परंपरा माणसाच्या जीवनाचा खूप मोठा भावनिक भाग बनून राहिलेल्या असतात. त्या तो सहजासहजी सोडू शकत नाही कारण त्यात त्याचे स्वतंत्र अवकाश सामावलेले असते.
भारताइतका बहुविध संस्कृती, परंपरा, धर्म, भाषा, जाती असलेला आणि तरीही लोकशाही टिकवून असलेला प्रचंड देश दुसरा नाहीच. ही खरे तर अभिमानाची बाब असली पाहिजे. इतकी आक्रमणे होऊनही हिंदू धर्म जिवंत राहिला ही एक आश्चर्याची बाब वाटू शकते, याचे कारण आक्रमणाद्वारे मिळवलेली आर्थिकसत्ता आणि राजसत्ता यांची परिणती धर्मांतरात होत आली आहे हे जगभरच्या आक्रमणांनी आपल्याला दाखवून दिले आहे. आपल्याकडेही धर्मांतरे झाली पण तरी भारतात हिंदू बहुसंख्यच राहिले आणि एवढी बहुविधता राहावी या उद्देशाने स्वातंत्र्यानंतर आपली घटनाही धर्मनिरपेक्ष ठेवली गेली.
इंडोनेशिया हाही मुस्लीम बहुसंख्य असून धर्मनिरपेक्ष देश आहे. तिथे सुरुवातीला व्यापारानिमित्त आलेले हिंदू आणि बौद्धधर्मीय अनेक लोक होते आणि त्या संस्कृतीचे प्रतिबिंब आजही तिथल्या मंदिरांमध्ये, लोकांच्या नावांमध्ये दिसते. तिथेही कालांतराने आर्थिक सत्ताकारणातून इस्लामीकरण केले गेले पण तरी कट्टरपंथीयांना रोखून ठेवण्यात अजूनतरी तिथल्या राज्यव्यवस्थेला यश आल्यामुळे अफगाणिस्तानसारखा तिथे हिंदू बौद्ध मंदिरांचा नाश झालेला नाही.
या पुस्तकातले एक प्रकरण एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सनिमित्त लेखिकेला जाणवलेल्या विचारांवर आहे. त्या कॉन्फरन्समधे मूळ आफ्रिका खंडातील वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या काही विचारवंतांनी पेपर्स वाचले. त्या सर्व प्रतिनिधींचे हेच सांगणे होते की आफ्रिकेतल्या टोळ्यांची संस्कृती, त्यांचे देव, आराधनेच्या पद्धती, रिती, यावर पूर्वीच्या ख्रिश्चन धर्मीय आक्रमकांनी घाव घालून जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले तरीही तिथल्या लोकांनी नवीन धर्माबरोबर जुन्याही चालीरीती, पूर्वीच्या पूजा गुपचूप चालू ठेवल्याच. त्या गरजांची भावनिक पोकळी नवीन धर्म भरून काढू शकला नाही.
हे वाचल्यावर असे जाणवत राहिले की शरीराला आपण जितके गृहीत धरले असते तितकेच आपल्या धर्माला आणि संस्कृतीला. जोपर्यंत त्याला काही धक्का लागत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व जाणवत नाही. धर्माचे ते अस्तित्व कोणासाठी अमुक देवात असेल, कोणाचे निसर्गात असेल तर कोणाचे आणखी कशात. पण माणूस कोणत्यातरी श्रद्धांवर, मूल्यांवर जगत असतो, त्यावर आक्रमण करून धर्मांतर करायला लावले तरी माणूस आपली जुनी मुळे शोधत राहतोच
आणि ती मुळे केवळ धर्म नाही तर कला, साहित्य, भाषा या आपल्याला सर्वांगाने समृद्ध करणाऱ्या संस्कृती नामक ठेव्यात असतात. इतक्या गहन विषयावरचं हे पुस्तक अजिबात कंटाळवाणे नाही. इतिहासातली पुष्कळ माहिती यात मिळते. पुस्तकाचा आवाका मोठा आहे त्यामुळे त्याची केवळ तोंडओळख व्हावी एवढाच या पोस्टचा उद्देश.
**********
लेखिका- माधवी कुलकर्णी
अनुबंध: धर्म आणि संस्कृतींचे - परीक्षण
निवडक सोशल मिडीया
माधवी कुलकर्णी
2021-08-10 14:00:03
Prakash Ghatpande
4 वर्षांपूर्वीखूपच सुंदर परिचय करुन दिलात.
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीधर्म म्हणजे काय हेच आता कळेनास झालय. जगण्याच्या रीतीला, खाणे -पिण्याच्या पद्धतीला धर्म म्हणावंयाचे कि आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतिचा तिरस्कार करण्यास धर्म मानवयाचे? कोणीतरी निसर्गाचे व्यवहार चालवीणारी शक्ती असून तिच्यासमोर झुकण्याच्या आपापल्या रीतीला आपला धर्म मानावयाचे?
ugaonkar
6 वर्षांपूर्वीलेखिका प्रतिभाताई याचे व त्याच्या पतीचे पुस्तके वाचनात आली खूप माहितीपूर्ण असतात . हे पण वाचायला पाहिजे
Reewa
6 वर्षांपूर्वीधर्माचे अशा रितीने विवेचन करणारे हे पुस्तक अभ्यासूंसाठी नक्कीच मार्गदर्शन करणारे असणार...धन्यवाद!
raginipant
6 वर्षांपूर्वीरुपपरेषेवरून पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली खूप छान
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीखूप छान पोस्ट . पुस्तका विषयी दिलेली महिती उत्तम .