सद्यकाळात सगळ्यात जास्त वापरले जाणारे संपर्कसाधन म्हणजे मोबाईल फोन. फक्त कॉलिंगच नव्हे तर कॅमेरा, टॉर्च, कॅलेंडर, इंटरनेट अशा अनेक सुविधा त्यात आहेत. त्यातली फोटो आणि सेल्फी काढण्याची सोय तर बहुदा सगळ्यात जास्त वापरली जाते. पण आधी ही सुलभता नव्हती. फार जुनी गोष्ट नाही; अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा फोटो हा प्रकार अतिशय अपूर्वाईचा होता.
कधीतरी, विशेष प्रसंगी लाभणारा सोहळा असायचा तो. आमच्याकडे आम्हा भावंडांचा वाढदिवस साजरा केला जायचा. यातले सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे फोटोग्राफर बोलावला जायचा. भिंतीला एक चांगल्या डिझाईनची चादर बांधली जायची; त्यासमोर खुर्चीवर सत्कारमूर्ती, समोर औक्षणाचे ताट, पार्ले किंवा रावळगावच्या चॉकलेटचा पुडा आणि भोवती नातेवाईक आणि शेजारपाजारच्या लहान मुलांची गर्दी.
एकट्याचे दोन तीन फोटो, मग ओवाळतानाचे फोटो, आणि मग ग्रुप फोटो असा कार्यक्रम असायचा. तेव्हापासून मनात फोटोग्राफी आणि कॅमेऱ्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले ते आजतागायत कायम आहे ! बारावीच्या निकालानंतर याशिकाचा कॅमेरा मिळाला होता; ती खरेदी करायला हैद्राबादला गेलो होतो. बेसिक ऑटोमॅटिक मॉडेल होते. बरीच वर्ष त्याने साथ दिली; नंतर मोबाईल आणि डिजिटल कॅमेरे आले आणि तो बिचारा अडगळीत गेला.
या कॅमेऱ्यामध्ये रोल टाकायला लागायचा. वाढदिवस, मोठा सण, शाळेचे गॅदरिंग, अशा विशेष प्रसंगीच रोल घेतला जायचा. एरवी कॅमेरा सेल काढलेल्या अवस्थेत त्याच्या लेदर कव्हरमध्ये आराम करत असायचा. एका रोलमध्ये साधारण छत्तीस फोटो यायचे, कधी सदतीस आले की बोनस मिळाल्यासारखं वाटायचं.
प्रत्येक फोटो मौल्यवान होता आणि फार विचारपूर्वक काढला जायचा. माणसांचेच फोटो काढायचे असायचे, निसर्गचित्रण वगैरे केलं की मोठी माणसं फोटो वाया घालवला म्हणून रागवायची . रोल संपत आला की तो धुवायला टाकण्याची उत्सुकता वाढीस लागायची आणि तेव्हा मात्र शेवटचे दोन तीन फोटो दिसेल त्याचे, थोडे सढळ हाताने काढले जायचे.
रोल धुवायला टाकणे, ते तो धुवून येणे, हा काळ फार टेन्शनचा असायचा; क्वचित कधी रोल चुकून एक्सपोझ होऊन सगळेच फोटो नष्ट व्हायचे, त्याची भीती वाटायची. एरवीसुद्धा एखाददोन फोटो तरी खराब व्हायचेच . फोटो आले की ते पाहण्याचा एक सोहळा असायचा. ज्यांचे ज्यांचे फोटो काढले ते शेजारी/ मित्र आठवणीने विचारायचे आणि आवर्जून बघायचे.
या कॅमेऱ्यातून बरेच फोटो काढले; विद्यार्थीदशेत कॉलेज, हॉस्टेल, ट्रिप यांच्या आठवणी साठवून ठेवता आल्या. लग्नानंतर फिरायला गेलो तेव्हा हा सोबत होता. मग मुलांचे वाढतानाचे बरेच फोटो काढले. कुटुंबातल्या एरवी लाजणाऱ्या सगळ्या आजी आजोबांना फोटोंमध्ये कैद केले. माझ्या आजीने तर छान तयार होऊन फोटो काढून घेतले, नंतर भिंतीवर लावायला सुंदर फोटो असावा, "नायतर बायकांचा मेला एक धड फोटो नसतो", म्हणत सुदैवाने अजून त्याची गरज पडली नाहीय!
आता फोटो या प्रकाराचे अजिबात अप्रूप राहिलेले नाहीय. क्लिक करतानाही फार विचार न करता 'पाच सहा काढू आणि त्यातला बरा वाटेल तो ठेऊन बाकी डिलीट करू', असा अप्रोच असतो. त्यातही इतके एडिटिंग उपलब्ध आहे की परफेक्ट क्लिक असा काही प्रकारच राहिला नाहीय! सगळंच मुबलक असण्याच्या या काळात निगुतीने काही वापरणं, जतन करून ठेवणं, लोप पावतं की काय असे वाटत आहे.
अशा मर्यादेत वापरता येणाऱ्या साधनांनी आम्हाला काटकसर शिकवली होती. अजूनही कुठली गोष्ट 'सहज मिळते आहे तर बेसुमार वापरा', ही वृत्ती मनात रुजली नाही याचे श्रेय थोडे या कमेऱ्याचेही आहे!
**********
लेखिका- डॉ. शीतल श्रीगिरी
रोलवाला कॅमेरा- एक नॉस्तॅल्जिया
निवडक सोशल मिडीया
डॉ. शीतल श्रीगिरी
2021-09-03 10:00:02
ShaileshN
6 वर्षांपूर्वीकाहीसं उशिराच वाचला लेख, सुंदर वाटला ! जुन्या आठवणी जाग्याकेल्याबद्दल धन्यवाद !! - शैलेश पुरोहित