आपण सकाळी धावत पळत कॉलेजला पोचतो. लक्षातच नसतं आज शिक्षक दिन वगैरे आहे. अर्ध्या वाटेत पावसाने गाठलेलं असतं. आधीच उशीर त्यात पाऊस असं चरफडत आपण गाडी साईडला घेतो. डिकीतून रेनकोट काढून अंगावर चढवतो. तोपर्यंत बरंचसं भिजलेलं असतोच. तसंच कॉलेजमध्ये पोचतो.
बाहेर हवा कुंदच असते. आपण लॅपटॉप लावतो. लॉग इन करतो. लेक्चरच्या नोट्स काढायला घेतो. एकंदर दिवसाचं मीटर चालू होतं दुपारी मुलं बोलवायला येतात. सगळ्या शिक्षकांना खाली हॉलमध्ये एकत्र जमायचं आमंत्रण असतं. मग छान छोटासा एक कार्यक्रम होतो. एखाद दुसरे गेम्स टीचर्सना पण खेळायला लावले जातात.आदबशीर मस्करी केली जाते. मित्रत्वाचं नातं असतं पण गळ्यात हात टाकण्याची आगाऊ धिटाई नसते. सगळा कार्यक्रम लाघवी असतो.
मग रीतसर एखाद दुसरी शिक्षक किती छान अशी कविता सादर होते. केक कापला जातो. वेफर्स,केक, समोसा अशी एक डिश सर्व्ह होते. एकूणच सगळ्या कार्यक्रमाचा जीव तासाभरापेक्षा जास्त नसतो. पण त्यामागची मनापासून घेतलेली मेहनत जाणवते. आवर्जून एखादा विद्यार्थी आजही बॅच तर्फे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा असा मेसेज पाठवतो. त्यातले जवळपास सगळेच विद्यार्थी कुठे ना कुठे विखुरलेले असतात. देशापरदेशात स्थायिक झालेले असतात. तुम्ही त्यांच्या फेसबुक अकाऊंटशी कनेक्टेड असता. अधूनमधून काय कसं काय इतपतच ते संपर्कात असतात.
पण शिक्षक दिनाला त्यातले बरेचजण आवर्जून मेसेज करतात. काय म्हणताय मॅम अशी चौकशी करतात. आता पुण्यात आलो की नक्की भेटायला येईन असं आवर्जून सांगतात. आपणही ये म्हणतो. नक्की भेटून जा म्हणतो. दिवसभर आपणही समाधानी असतो. व्रत एकच, तावडीत पोरगं सापडलं की घासून पुसून जगात पाठवून देणे म्हणणाऱ्या चितळे मास्तरांची आठवण येते.
आपण काही अगदीच व्रत उद्देशाने हा पेशा स्विकारलेला नसतो. आपलीही नोकरीच असते. त्यामुळे त्या नोकरीच्या सगळ्या अपरिहार्यताही त्यात येतात. आपल्यालाही एखाद्या दिवशी कामावर यायचा कंटाळा आलेला असतो.कधी ब्रेकफास्ट चुकतो आणि नेमकी त्याच दिवशी पाठोपाठ लेक्चर्स असतात. जेवायला वेळ मिळत नाही. मुलं वाचायला दिलेलं मटेरीयल न वाचताच वर्गात आलेली असतात. ते वाचणार आहेत हे गृहीत धरुन आपण शिकवणं प्लॅन केलेलं असतं ते मोडीत निघतं. सुट्टी मिळत नाही. पेपर्सचा ढीग पडलेला असतो तपासण्यासाठी. एक ना दोन. तक्रारींचा पाढा आपला बे वीसे चाळीसच्याही पुढे निघून गेलेला असतो.
अशातच कधीतरी मग एखादी विद्यार्थिनी अचानक भेटते. वर्गात एका बाजूला बसणारी, काहीशी अलिप्त राहणारी ही मुलगी एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करत सते. खूष असते. मॅम तुम्ही हे शिकवलं ते शिकवलं वगैरे चिवचिवते. आपणही तिला मायेने जवळ घेतो. छान म्हणून पाठीवरून हात फिरवतो आणि निघतो. सतत पेरत रहातच असतो आपण शिक्षक म्हणून. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात असं शिक्षकाला तरी म्हणता येत नाही. प्रत्येक जमिनीचं रुजाव्याचं वैशिष्ट्य वेगळं असतं.
कुणाला बोटांनी उकरुन बी रोवलं तरी चालतं.कुणाला मशागत मेहनत घेऊन पेरावं लागतं. पण अशी बहरुन आलेली पिकं पाहिली की मन शांत होतं. त्या मेहनतीचं सार्थक रुप डोळ्यापुढे आलं की मन निवतं एव्हढं मात्र खरं. काळ्याभोर केसांचं कौतुक आपल्याला असतंच पण किंचित रुपेरी कड आल्याशिवाय वर्गात बोलायला आपल्यालाही आत्मविश्वास येत नसावा. एखादी संकल्पना शिकवताना हिंदी चित्रपटातली उदाहरणं दिली की हे तुम्हाला माहित आहे असा एक सूक्ष्म भाव तरळून जातो समोरु्या चेहऱ्यांवर, तो पहायला मजा येते फार.
आपणही कधीकाळी मागच्या बाकांवर बसलेलो असतो. आपणही काय शिकवणार आता ह्या असा चेहरा केलेला असतो. हे सगळं मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करुन फळ्याशेजारी उभं रहाताना मागच्या बाकांवर आपली स्पेशल नजर असते. आपली विद्यार्थीदशा मनात जागी ठेवल्यानेच उत्तम शिक्षक होता येत असावं बहुतेक. शिक्षकाने पैशाशी तडजोड करु नये असं माझं ठाम मत आहेच पूर्वीपासून. पण त्याहीपलीकडे जाऊन जे पैशात तोलता येत नाही ते समाधानही हा पेशा मुक्तहस्ताने देतो.
कृतज्ञतेचं अदृश्य नातं असणारा हा पेशा आहे आणि ही फक्त विद्यार्थ्यांनी व्यक्त करण्याची कृतज्ञता नाही. शिक्षकही विद्यार्थ्यांप्रति कृतज्ञ असतात. अभिव्यक्ती फक्त वेगळी असते इतकंच. एखाद्या लेक्चरनंतर आज मस्त झालं लेक्चर अशी पोचपावती येते, पुढच्या तासाचे शिक्षक डोकावून जातात मग आपल्याला एकदम वेळेचं भान येतं, वर्गातून बाहेर पडताना आपण स्वतःशीच समाधानाने हसतो. ती देवाणघेवाण विद्यार्थ्यांनाही जाणवलेली असते. ती सतत रोज होतेच असं नाही पण होण्याचं प्रमाणही नक्कीच जास्त असतं.
जसा शिक्षकही आजन्म विद्यार्थीच असतो आणि रहातो तसा विद्यार्थीही कधीतरी शिक्षक होऊन आपल्याला अनुभवसमृद्ध करतोच नाही का? शेवटी सगळाच परस्पर स्नेहाचा व्यवहार आणि सोहळा... कृतज्ञतेची वेगळी अभिव्यक्ती अजून काय असते...
**********
लेखिका- प्राजक्ता काणेगावकर
एकाच नाण्याच्या दोन बाजू
निवडक सोशल मिडीया
प्राजक्ता काणेगावकर
2021-09-13 10:00:04
Dr. Anuradha Deshpande
4 वर्षांपूर्वीसुरेख झाला आहे लेख..
Shreekrushna Manohar
4 वर्षांपूर्वीछान लेख
manisha.kale
6 वर्षांपूर्वीLekh pharach avadla.
ShubhadaChaukar
6 वर्षांपूर्वीChhan
dhawal
6 वर्षांपूर्वीउत्तम लेख ??
arush
6 वर्षांपूर्वीमस्त