प्रश्नपत्रिका
***
दांडेकर आणि इनामदार घराण्यातील गौरी आणि गणपती काल शिरले. यावर्षीचा गणपती इतरांसाठी नेहमीसारखाच असला तरी शार्दूल आणि ओवीसाठी तो विशेष होता. खरंतर या सात दिवसात गणपतीसमोर जे काही विशेष 'दिवे लावले होते' ते फक्त त्या दोघांनाच माहिती होते.
पण या दोघांनी या सात दिवसात फक्त भविष्याचा अंदाज घेतला. हा अंदाज कसा आणि किती आला हाही खरा एक प्रश्नच होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे दांडेकर अगदी पाकात मुरलेल्या चिरोट्यांसारखे पुणेकर होते. त्याचा त्यांना' जाज्वल्य अभिमान' होता. बाहेरून पुण्यात आलेल्या सगळ्या लोकांनी पुणं सडवलं या सार्वत्रिक समजात यांचाही होकार होताच.
पुण्याच्या परंपरा, चालीरीती, स्थळं याबद्दल दांडेकर भरभरून बोलत असत. पांढरी टीशर्ट आणि हाफ पँट घालून टेनिस खेळायला जाणं आणि मग श्रमपरिहाराला रुपालीत जाऊन हाणणं हा दांडेकर काकांचा रविवारचा ठरलेला दिनक्रम होता. एक गणपती सोडला तर चौकोनी कुटुंबात रमण्यात दांडेकरांना धन्यता वाटायची. ओवीची आईसुद्धा पुण्यातल्या श्रीमंत बायकांच्या मांदियाळीतली होती. एनजीओचं काम, सोनेरी फ्रेमचा चष्मा घालून पुण्यातल्या सामाजिक परिस्थितीवर कोरेगाव पार्कात जाऊन चर्चा करणं असा तिच्या आईचा थाट होता.
त्यामुळेच कदाचित ओवीवर समाजशास्त्राचे संस्कार झाले असं शार्दूल तिला गंमतीने म्हणायचा. त्याउलट इनामदारांचा कारभार म्हणजे अतिशय अघळपघळ होता. महात्मा सोसायटीत टुमदार घर, घरात कायम पै पाहुण्यांचा वावर, सातारा, कोल्हापूरहून अनेक ओळखीपाळखीचे लोक येणं हे सगळं शार्दूल लहानपणापासून पहात होता. पण हे सगळं पुढे जाऊन आपल्याला झेपेल का याबद्दल त्याच्या मनात अनेक शंका होत्या. पुणेकरांची चेष्टा हाही त्याच्या काळजीचा विषय होता.
फॅमिली ग्रुप वर 'स्थळ अर्थातच पुणे' या नावाने सुरू होणाऱ्या जोक्सचा त्याला वीट आला होता. हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का याबद्दल त्याला प्रश्न पडला होता. या छोट्या गोष्टीच पुढे जाऊन मोठ्या होतात याचीही त्याच्या संवेदनशील मनाला खात्री होती. त्यामुळे या सगळ्यांचा ताळमेळ कसा साधायचा हा मोठा प्रश्न त्याला होता.
आज सकाळी बाबांना एकट्यात गाठायचं शार्दूलने ठरवलं. बाबा बाहेर जात असल्याचं पाहून शार्दूल त्यांच्याबरोबर जायला निघाला.
"अरे बिछायतीचे पैसे द्यायला चाललोय. तू कशाला येतोय?" बाबा विचारते झाले.
"नाही चला ना.. घरात बसून कंटाळा आलाय.." शार्दूल उत्तरला.
कारमध्ये बसल्यावर बाबा उसासा टाकून म्हणाले,
"गणपती आले काय गेले काय, अगदी रिकामं रिकामं वाटतंय."
"हो ना." शार्दूल उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
" बाबा, तुमचं लग्न झालं तेव्हा आईने या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पेलल्या हो? "
" हा हा.. काय रे एकदम आज जबाबदाऱ्या वगैरे सांगा ना?"
"तुझी आई सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जाणारी आहे. ती सगळ्यांमध्ये रमणारी आहे. तिला ते सुुरुवातीपासूनच आवडायचं. आजी असताना सोवळं ओवळं कडक होतं तेेव्हा तिची त्रेधातिरपिट होत होती. पण शिकली ती. आता तिच्यावाचून पान हलत नाही कोणाचं. "
" हम्म्म... मला ना बाबा या गणपतीत फार वेगळं वाटलं हो. म्हणजे मोठं झाल्यासारखं वाटलं. दरवर्षी तुम्ही मूर्ती घरात आणता यावेळी ती मी आणली. अनेक छोट्या छोट्या गोष्टीत माझं मत लक्षात घेतलं गेलं. मला फार वेगळं वाटलं. "
" मग मोठा मुलगा आहेस तू. पुढे जाऊन तुलाच तर हे सगळं सांभाळायचं आहे ना."
"तेही आहेच म्हणा.. "
थोडावेळ शांततेत गेला. बिछायत केंद्राचे पैसे दिले गेले. ते दोघं घरी आले. घर जवळ आलं तेवढ्यात बाबा म्हणाले,
"काय मग आग्रहाचा लाडू गोड लागला की नाही ओवीला?"
"बाबा...."
" हे डाय केलेले केस उगाच पांढरे झाले का रे खुळ्या?"
बाबा त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलले. शार्दूलला कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असं झालं.
तिथे ओवीची परिस्थिती फार वेगळी नव्हती. काल हळदीकुंकवाला जमलेल्या बायका आता ओवीचं लग्न कधी वगैरे असं आडूनआडून सुचवत होत्या. ओवीच्या आईने त्याकडे फारसं लक्ष दिलं नसलं तरी ओवीला प्रचंड कानकोंडलं झालं. सहज शार्दूलला घरी बोलवावं या गोष्टीने मोठं रुप घेतलं होतं. यावेळेचा गणपती विचारांची जंत्री घेऊन आला होता. प्रभात रोड ते एफसी रोड मधलं बेफिकीर आयुष्य आता आकार घेऊ लागलं होतं.
शार्दूल आणि ओवीने एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यानंतर यावेळेला फक्त गंमत म्हणून त्यांनी एकमेकांच्या घरी बोलावलं होतं. पण त्या 'अँडव्हेंचरने' अनेक प्रश्नांना जन्म घातला होता. हे प्रश्न वेळेनुरूप सुटतीलही, पण या वयात दोघांसमोर फक्त प्रश्न होते. मात्र त्यांची उत्तरं अंधारात होती. परवा ती घरी गेल्यावर शार्दूलचा मेसेज आला होता. 'तुम्हारे साथ रहकर अक्सर मुझे लगा है कि हम असमर्थताओं से नही संभावनाओं से घिरे है हर दिवार मे द्वार बन सकता है और हर द्वार से पुरा का पुरा पहाड गुजर सकता है'
परवा ती घरी गेल्यापासून शार्दूल आणि ओवी सर्वेश्वर दयाल सक्सेनांच्या या कवितेशिवाय फारसं बोलले नाहीत. दोघंही थोडेफार जमिनीवर आले होते. चॉकलेट सँडविच पलीकडच्या आयुष्यातले अनेक प्रश्न या गणेशोत्सवाने दोघांसमोर मांडले होते. त्याची उत्तरं दोघांना शोधायची होती.
काल महापालिकेच्या हौदात जेव्हा गणपतीची मूर्ती शिरवताना बाबांनी तीन वेळा 'पुनरामगनयाच' चा जयघोष केला तेव्हा शार्दूलने या प्रश्नांची उत्तरं सापडू दे अशी प्रार्थना गणरायासमोर केली. शाडूच्या विरघळत्या मातीबरोबर अनेक मूर्त अमूर्त नाती आकार घेत होती.
(समाप्त)
**********
लेखक - रोहन नामजोशी
समाजकारण
, कथा
, सोशल मिडीया
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीछान कथा
Rdesai
6 वर्षांपूर्वीछान !
Rdesai
6 वर्षांपूर्वीशेवट खूपच मस्त! मनाला भावला
schoudha
6 वर्षांपूर्वीExcellent