रक्त आणि तेल


मध्यपूर्वेच्या रक्तलांच्छित शंभरीची सुरुवात आणि सौदी अरेबिया, इस्त्राईल, जोर्डन, इराक, सिरीया, इराण, लेबनॉन या सात राष्ट्रांची निर्मिती या विषयावर सुप्रसिद्ध लेखक जयराज साळगावकर यांचे '१९१७: द ग्रेट गेम' नावाचे पुस्तक लवकरच परममित्र प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकाची ओळख...

********

औद्योगिक क्रांतीमध्ये जनावरे व माणसाच्या जागी श्रम करणारी यंत्रे आली. तरफ किंवा प्राण्यांच्या ऊर्जेचा वापर पुरेनासा झाला. मग इंधन म्हणून कोळशाचा वापर सुरू झाला. कोळशाला मर्यादा होत्या. त्याचे उत्पादन खर्चिक होते. मानवी जीव धोक्यात घालून कोळसा मिळवावा लागत होता. पुढे या कामगारांच्या युनियन अस्तित्वात आल्या. पुढे या युनियन राजकीय लोकांच्या हाती गेल्या. कोळशाच्या खाणींत राजकारण घुसले. संप-आंदोलने आली, त्यात तेलाचे महत्त्व पुन्हा वाढले. १९२० च्या दशकात कुवेत आणि इराणमध्ये चांगल्या प्रतीच्या तेलाचे मोठे साठे सापडले.

त्याचवेळी जगात इतरत्र म्हणजे व्हिएनझुएला, इराक, कुवेत, लेबनॉन, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया येथेही तेल मिळू लागले. १८८५ मध्ये गोटालियाब डॅमलर (डॅमलर बेन्झ) या जर्मन इंजीनीअरने मोटारगाडीचा शोध लावला. त्यामुळे पुन्हा पेट्रोलची मागणी वाढू लागली. पहिल्या महायुद्धात (१९१२-१९१९) ट्रक्स, रणगाडे, चिलखती गाड्या यांना मोठ्या प्रमाणात तेल लागू लागले. त्याच दरम्यान कोळशाच्या- वाफेच्या इंजिनावर धावणार्‍या गाड्या डिझेलवर धावू लागल्या होत्या. कारखान्यांतील कोळशावर चालणारे बॉयलर जाऊन त्या जागी फर्नेस ऑईलवर चालणारे बॉयलर आले.

मालवाहू जहाजे व युद्धनौका कोळशाच्या-वाफेच्या इंजिनाऐवजी डिझेलवर धावू लागल्या होत्या. तेल कोळशापेक्षा स्वस्त होते. वाहतुकीसाठी सोपे होते. साठवणुकीसाठी सोयीस्कर होते. तेलाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत होते. अमेरिकेच्या रॉकफेलर उद्योग समूहाच्या स्टँडर्ड ऑईल या कंपनीने वाळवंटात संशोधन करून, सौदी अरेबियाच्या राजघराण्याशी व्यापारी-मुत्सद्दी संबंध प्रस्थापित करून, अरेबियातील तेलात भागीदारी मिळवली. या एका निर्णयाने अमेरिकेने ब्रिटिशांना (इंग्लंडला) मागे टाकत तेलाच्या विश्वात वर्चस्व मिळवले. असे म्हणतात की, स्टँनफोर्डने (तेलाची मोठी अमेरिकी व्यापार कंपनी) तेलाला भाव यावा यासाठी अमेरिकेतील रेल्वेरूळ उखडून टाकले. त्यामुळे अर्थातच ट्रक- मोटारींचा वापर वाढणार होता. तो तसा वाढला. त्यामुळे पर्यायाने तेलाचा वापर वाढला.

फोर्ड यांनी अगदी सुरुवातीला इथेनॉलवर चालणारी गाडी उत्पादन करायचे ठरविले होते, पण त्यांचे (फोर्ड मोटर कंपनीचे) कर्ज बँकांमध्ये कपट रचून अडवून धरून त्यांना पेट्रोलवर चालणारी गाडी बनावायला बड्या तेल कंपन्यांनी भाग पाडले. खरे तर इथेनॉलावर चालणारी गाडी त्याकाळी अमेरिकेला खूपच श्रेयस्कर होती. तेल शस्त्र झाले या सगळ्या बदलत्या परिस्थितीमुळे तेल जी फक्त एक ग्राहकोपयोगी वस्तू होती, तिचे शस्त्र झाले. त्या शस्त्राने मग अरब आणि ज्यूंचे रक्त सांडले. पुढल्या शंभर वर्षांचा मध्यपूर्वेचा इतिहास हा या तेलाचा रक्तरंजित इतिहास आहे. इस्राएल-पॅलेस्टाइन ही ज्यूंची पवित्र भूमी, तीच अरबांची आणि ख्रिश्चनांची पवित्र भूमी. त्यामुळे या प्रदेशावरील धार्मिक, भौगोलिक आणि आर्थिक वर्चस्वासाठी या तिन्ही धर्मीयांत चढाओढ वाढत गेली, जाते आहे.

रशियापासून भारताचा बचाव करण्यासाठी ब्रिटिश सत्तेच्या (एम्पायर) काळात लॉर्ड कर्झनने १९०६ साली पर्शियाची रेकी केली होती. त्याबाबतचा अहवाल इंग्लंड सरकारला दिला होता. त्यातून इंग्लंडने एम.आय.६ (MI6) या गुप्तहेर संघटनेची योजना केली. त्यातून पुढे १९१७ सालापासून संघर्ष होऊन सौदी अरेबिया, इस्राएल, जॉर्डन, इराक, इराण, लेबनॉन, सिरिया आणि कुवेत या राष्ट्रांची निर्मिती झाली. तुर्की ओटोमान व जर्मन सत्ता लयास गेल्या. पुढील साधारण १०० वर्षे तेलाच्या यज्ञात या देशातील तीन धर्मीयांची रक्ताची आहुती दिली जात राहिली. आजही दिली जात आहे. या संघर्षात शिया आणि सुन्नी या वादाची फोडणी कायम पडते. इराण, इराक हे देश शियापंथीय आहेत. सुन्नीपंथीय त्यांना मानत नाहीत. अमेरिकेत ज्यू प्रभावशाली आहेत. अमेरिका ज्यूंच्या बाजूने नेहमीच राहिली आहे.

पूर्वी ज्यू इराणसोबत होते तेव्हा अमेरिकापण इराणसोबत होती, आता ज्यू आणि पर्यायाने अमेरिका सौदी अरेबियासोबत आहे. या सगळ्याच्या मुळाशी अर्थातच तेल आणि धर्म आहे. हेन्री किसिंजर यासंदर्भात गेल्या शतकातील करामती कारस्थानी ‘‘कृष्ण भगवान’’ अमेरिकेचे हेन्री किसिंजर हे होत! १९७१ मध्ये त्यांनी एक अशी चाल खेळली की तेल जागतिक व्यापाराच्या ऐरणीवर आले. तेलाच्या किमती व पुरवठ्यावर जगाची अर्थव्यवस्था खाली-वर होऊ लागली. हेन्री किसिंजर हे ज्यू धर्मीय आहेत. शीतयुद्धाच्या काळात रशियाच्या मार्गात पाचर मारण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी तेल उत्पादक देशांची ओपेक नावाची संघटना स्थापन केली आणि मुत्सद्देगिरीने रशियाला त्या संघटनेच्या आणि पर्यायाने तेल व्यवहाराच्या बाहेर ठेवले. २० वर्षांत रशिया कोसळला.

याच हेन्री किसिंजरनी दुसरे पाऊल उचलले ते चीन-अमेरिका संबंध प्रस्थापित करण्याचे! चीन-अमेरिका संबंध सुधारून त्यांनी दोन कम्युनिस्ट देशांत (चीन-रशिया) दरी निर्माण केली. चीनच्या डेंग झियोपिंग यांच्याशी संपर्क करून त्यांनी हा कार्यभाग साधला. पर्यायाने रशिया व चीन हे आंतरराष्ट्रीय व्यापारात उतरले. चीनचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले. तेलाची मागणी वाढल्यामुळे किमती वाढल्या. तेलाच्या खरेदीसाठी पेट्रोडॉलर हे चलन आले. अमेरिकेचा असा आग्रह होता की, तेलाची खरेदी-विक्री ही डॉलरमध्येच झाली पाहिजे. सद्दाम हुसेनने ही मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच चिडून अमेरिकेने सद्दामचा विनाश केला. खरे तर सद्दाम हा अमेरिकेनेच उभा केलेला हुकुमशहा होता, पण तो फिरला, अमेरिकेवर उलटला तसा तो संपला.

२ डॉलर प्रतिबॅरल या दराने तेल विकू!

सौदी अरेबिया (जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश) अनेकदा तेलाचे उत्पादन कमी करतो. मग तेलाच्या किमती वाढतात. तेलाच्या किमती वाढल्या की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहचतो. जी-5 देश तेलासमोर आर्थिक समतोल साधण्यासाठी डॉलर किंवा सोने यांचा वापर करतात. तेल-डॉलर-सोने या त्रिशंकूवर जगातील सर्व अर्थव्यवस्था खाली-वर होत असतात. आज तेलाचा दर प्रतिबॅरल ७७ डॉलर इतका आहे. पण सौदीच्या सुलतानाने सौदी अरेबिया २ डॉलर प्रतिबॅरल या दराने तेल विकू शकण्यास सक्षम असल्याची धमकी दिली आह, आमच्या वाटेस गेलात तर प्रसंगी तोटा सोसून जगाची वाट आम्ही लावू शकतो, असा त्याचा गर्भितार्थ होता.

अमेरिका आणि सौदी अरेबिया ही दोन राष्ट्रे तेलाच्या किमती आणि पुरवठा ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खरे तर यासाठी ओपेक नावाची संस्था आहे. पण सौदी अरेबिया, इराण, सिरीया, रशिया ओपेकला गुंडाळून ठेवतो. संघर्षही आणि मिलीभगतही  सौदीमध्ये वहाबी जमातीचे वर्चस्व आहे. सौदी अरेबियाच्या स्थापनेत सशस्त्र सहभागी असलेली ही जमात आहे. धर्म एके धर्म अशा विचाराची ही कडवी जमात आहे. सौदीमध्ये सौद कुटुंबाचे राज्य आहे. पण ते राज्य अमेरिकेच्या सुरक्षेखाली आहेत. त्यांचे सैन्य, नौदल आणि वायुदल अमेरिकेच्या सहकार्याने उभे आहे. अमेरिकेने कंत्राटी सैनिकी संरक्षण काढल्यास तेथे वहाबींचा सत्तेविरुद्ध अंतर्गत उठाव होईल, अशी भीती आहे.

सौदी अरेबिया आणि अमेरिकेचे संबंध असे गुंतागुंतीचे आहेत. त्यांच्यात संघर्षही आहे आणि मिलीभगतही आहे. धोरणात सुसंगती नाही. त्यामुळे कधी काय घडेल, ह्याचा अंदाज येत नाही. तेलाची मक्तेदारी संपणार  आता मात्र उर्जाक्षेत्रात मोठा बदल होऊ लागला आहे. विजेवर चालणार्‍या गाड्या येऊ लागल्या आहेत. सौरऊर्जेचा पर्याय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. त्यामुळे अंदाजे पुढील १५-२० वर्षे तेलाची मक्तेदारी चालेल. मग ती संपून जाईल. या बदलामुळेच अमेरिकेने आपल्या भूमीत सापडलेले तेलसाठे, जे भविष्यासाठी राखून ठेवण्याचा विचार होता ते, आता वापरायला सुरुवात केली आहे. अमेरिका तेलाबाबत स्वतंत्र झाली तरी मध्यपूर्वेचा संघर्ष चालूच राहील.

इस्राएल हे या भागातील मुख्य संघर्ष केंद्र आहे. लेबनॉनवरून इस्राएलच्या दिशेने हेजबुल्ला ह्या शिया इराणी संघर्ष दहशतवादी गटाने १४०० क्षेपणास्त्रे रोखून ठेवलेली आहेत. इस्राएलचे क्षेपणास्त्रविरोधी संरक्षक कवच ही क्षेपणास्त्रे भेदू शकतात. हेजबुल्ला संघटनेने इस्त्रायलला लक्ष्य केले आहे. या हेजबुल्ला संघटनेचे इराणच्या पार्लमेंटमध्ये १७ सदस्य आहेत. इराणचा बंदोबस्त तेलाद्वारेच करता येईल असे इस्राएलला वाटते. इराणने जर अणुबॉम्ब बनवला तर तो इस्लामी बॉम्ब ठरेल आणि तो इस्राएलवर टाकला जाईल, अशी भीती ज्यूंना वाटते. मात्र तेलाची मक्तेदारी संपत जाणार आहे. मध्यपूर्वेच्या देशांनाही त्याची जाणीव आहे. त्यांनी पर्यायी उद्योग सुरू केले आहेत. काही वर्षांत तेलाची आग शमेल तेलाची मक्तेदारी संपणार हे ओळखून सौदी अरेबिया, अबुधाबी आणि इतर तेल उत्पादक देश आता जगाबरोबर भारताकडेसुद्धा गुंतवणुकीसाठी वळत आहेत.

नाणार प्रकल्पातील सौदी अरेबिया आणि अबु धाबीची गुंतवणूक हा त्याचाच एक परिणाम आहे. (गेल्या दोन दशकात कोकणात आलेले तीनही महाप्रकल्प- एनरॉन, जैतापूर आणि आता नाणार, हे उर्जाक्षेत्राशी संबंधित आहेत.) म्हणूनच तोल सावरला जातो  मध्यपूर्वेत तेथील राजसत्ता, दहशतवादी संघटना, तुर्की आणि रशिया व अमेरिका या बाह्य शक्तीत संघर्ष आहे. तेथील दहशतवादी संघटना या महाकाय कार्पोरेशनसारख्या आहेत. त्यांना केवळ संघटना म्हणणे म्हणजे हत्तीला मुंगी म्हणण्यासारखे होईल. त्या अत्याधुनिक तंत्रे व साधने वापरतात. या प्रदेशात धार्मिक पगडा मोठा आहे. अमेरिका ज्यूसाठी इथे प्रभाव टाकते.

अमेरिका व इस्राएल येथील दुसऱ्या महायुद्धातील रशियन व जर्मन निर्वासित पोलीश ज्यू धर्मीय असल्याने इस्राएलच्या बाजूचे आहेत. त्यामुळे रशियाचे पुतीन यांनाही ज्यूंच्या बाजूनेही विचार करावा लागतो. ही सगळी गुंतागुंत आहे. पण म्हणूनच इथे सतत तोल सावरला जातो. थोडी हालचाल झाली की नवी समीकरणे जुळवली जातात. असे सतत सुरू असते. आता भारत महत्त्वाचा खेळाडू  भारताचे सौदी अरेबियाशी संबंध आता सुधारले आहेत. नरेंद्र मोदी हे सौदी व इस्राएलला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. आज भारताची अर्थव्यवस्थाही जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवथा आहे. इंदिरा गांधींच्या काळात भारत-पॅलेस्टाईन-रशिया संबंधात आणि यासर अराफतच्या जमान्यात भारत अर्थ-राजकीयदृष्ट्या नगण्य होता. भारताच्या आवाजाला किंमत नव्हती.

पण आता परिस्थिती बदलली आहे. भविष्यकाळात भारत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. भारताने आज तेलाच्या घडामोडीवर जेवढे शक्य असेल तेवढे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भारताचे मध्यपूर्वेतील संबंध सुधारत आहेत. इजिप्तमधून अध्यक्ष मुबारक पदच्युत झाल्यावर आणि लिबियातून गडाफी दूर झाल्यावर तेथील परिस्थिती आणखी बिघडली आहे. मध्यपूर्वेतील समीकरणे बदलली आहेत. भारताने ती आपल्या बाजूने वळवून घेणे आवश्यक आहे. तसे केले तर भारतालाच तेल हे शस्त्र म्हणून वापरता येईल. आज जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत हा भविष्यात तेलाची आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश ठरणार आहे. तेव्हा सर्वांपासून समान अंतर राखून तटस्थपणे भारताने तेल हा विषय हाताळणे महत्त्वाचे ठरेल. ********

लेखक- जयराज साळगावकर 



प्रतिक्रिया

  1. jyoti patwardhan

      4 वर्षांपूर्वी

    करामती कारस्थानी कृष्ण भागवान हे विधान अतिशय चुकीचे आहे आणि दिशाभूल कृरणारे आहे

  2. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    किती वेळा लिहीणार. चार काय चाळीस शब्द लिहून झाले पण नोंद होतच नाही. संक्षिप्त अभिप्राय म्हणजे लेख आवडला.

  3. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    लेख आवडला. ह्या आधी गिरीश कुबेर लिखित पुस्तक वाचले होते. दोन्ही मधील माहिती जवळपास सारखीच आहे.

  4. prithvithakur1

      7 वर्षांपूर्वी

    लेख चांगला आहे. मात्र यातला "करामती कारस्थानी कृष्ण भगवान" हा उल्लेख खटकला. तोअनाठायी व अप्रस्तुत वाटतो. कृष्ण भगवान करामती व कारस्थानी कसे होते ? त्यांची आणि किसिंजर ची तुलना कशी होऊ शकेल? कृष्ण हे शांतीदूत होते तर किसिंजर हा आगलाव्या होता. चांगला लेख सुद्धा एखाद्या फाजीलपणामुळे बिघडतो त्याचे हे नमुनेदार उदाहरण.

  5. ulhas

      7 वर्षांपूर्वी

    तरफ व उर्जा संबंधी वर केलेला उल्लेख अनावधानाने झाला.क्षमस्व!

  6. ulhas

      7 वर्षांपूर्वी

    "एका तेलियाने व तेल नावाचा इतिहास"ही पुस्तके ज्यांनी वाचली आहेत त्यांना ह्या पुस्तकात धर्म, दहशदवादी संघटना, त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरील पगडा, हस्तक्षेप ह्या गेल्या १०/१५वर्षातील नवीन घटनांची माहिती मिळेल असे ह्या लेखावरून जाणवते. पुस्तकाची वाट बघू. एक छोटी दुरूस्ती.... तरफ हा उर्जेचा प्रकार नाही. कमी उर्जा वापरून जास्त काम करणारे यंत्र आहे ह्याची नोंद घ्यावी.

  7. kamalakar keshav panchal

      7 वर्षांपूर्वी

    जयराज साळगांवकर यांचा रक्त आणि तेल हा लेख वाचला . खरे तर साळगावकर अथॅशास्त्रीय अभ्यासक, त्यांची विवेचन शैली अत्यंत मामिॅक आहे. त्यांचे आगामी पुस्तक वाचायला नक्की आवडेल.

  8. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    सशुल्क सभासदांसाठी दर बुधवार आणि शनिवार संरक्षित लेख असतात. आपण १०० रुपये त्या १०४ ( ५२*२ )लेखांचे घेतो. त्याशिवाय काही लेख असतात जे आपल्याला निःशुल्क मिळतात ( जसा हा आजचा ) किंवा एवढे मोठे नसतात ( हजार शब्दांपेक्षा कमी) की ते सशुल्क मध्ये द्यावेत. म्हणून मग आपण ते अवांतर मध्ये निःशुल्क देतो. त्यातून अजून एक गोष्ट साध्य होते की काही वाचक ज्यांना अजून पुनश्च बद्दल माहिती नाही, त्यांना हा लेख आपण forward करू शकता. त्या योगे ते तो लेख वाचून सभासद होण्याचा विचार करतील.

  9. vasant deshpande

      7 वर्षांपूर्वी

    शंभर रुपये भरूनही सभासदांसाठीचे ''अवांतर लेख'' निःशुल्क कसे, हे कृपया स्पष्ट कराल का?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen