०१/ १०/ २०१८
सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका कविता महाजन यांचं धक्कादायक आणि अकाली निधन झालं. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यावर विविध प्रकारे हळहळ आणि दुःख व्यक्त झाले. सोशल मिडीया तर त्यांच्यावरील पोस्ट्स नी भरून गेला. पुनश्चचे मार्गदर्शक-सल्लागार आणि महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्री. श्रीकांत बोजेवार यांचे कविता महाजनांशी अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध होते. कविता महाजनांबद्दल ते काय म्हणतात हे त्यांच्याच शब्दात वाचूया विशेष अवांतर सदरात ...
**********
कविता महाजन कविताचे अचानक असे निघून जाणे धक्कादायक असले तरी तिला जवळून ओळखणारांना ते अनपेक्षित होते असे म्हणता येत नाही. अनेक व्याधी, मानसिक ताण-तणाव घेऊन ती जगत होती. अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवता ठेवता स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होती आणि काही जवळच्या व्यक्ती याबाबत नाराजी व्यक्त करत तेव्हा त्या नाराजीकडेही ती दुर्लक्ष करत होती. घाईत असेन किंवा बोलायला भरपूर वेळ नसेल तर मी तिचा फोन रिसिव्ह करत नसे आणि केला तरी अर्जंट काही असेल तेवढं ऐकून घेऊन रात्री निवांत बोलतो म्हणून ठेवून देत असे. कारण तिचा फोन कधी कधी तास दीडतासही चालत असे. त्यात जास्तवेळ अर्थातच कविता बोलत असे आणि मी ऐकत असे. कारण बोलणं, व्यक्त होणं हा तिचा श्वास होता. कविताशी बोलताना, विनोद करताना, चर्चा करताना ‘ती बाई आहे’ याचं भान ठेवण्याची गरज नसे. अर्थात हे जवळच्या काही लोकांसाठी होतं आणि असे तिच्या जवळचे मात्र संख्येनं बऱ्यापैकी होते.
आम्ही जवळपास समवयस्क. तिच्याशी पहिली भेट किंवा ओळख झाली तेंव्हा कविता ही कविता महाजन म्हणून घडायची होती. म्हाळगी प्रबोधिनीने समांतर चित्रपटांची सूची तयार करण्यासाठी एक शिष्यवृत्ती जाहीर केली होती. त्यासाठी आलेल्या अर्जातून केवळ दोघांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं, कविता आणि मी. आम्ही दोघेही बाहेर वाट बघत होतो तेव्हा ओळख झाली. माझे चित्रपटांवरचे लेख तिने वाचले होते. ती मला म्हणाली, ‘अरे, हा विषय तुझाच आहे, तूच कर मी माघार घेते.’ मी म्हटलं ‘मुलाखत होऊ तर दे, बघू या.’ पण तिनं ती मुलाखत बहुधा तिची निवड होऊ नये किंवा माझी निवड व्हावी अशाच पद्धतीनं दिली असणार. तेव्हापासून आमची मैत्री मात्र झाली.
कविता लिहिते हे माहिती होतं. ती गंभीरपणे संशोधन करणाऱ्यांपैकी आहे हेही लक्षात आलं होतं. अधून मधून भेटी व्हायच्या. परंतु तिच्या लिखाणाची ताकद वगैरे काही माहिती नव्हती. ब्र ही कादंबरी आली तेव्हा ती वाचून स्तंभित झालो. ‘ज्यांना ब्र उच्चारता आला नाही त्या सर्व जिभांना’ या अर्पणपत्रिकेपासून तर कादंबरीची रचना, शैली, विषय सर्वकाही मराठीतील समकालिन कादंबरीत स्वतःचं वेगळं दमदार स्थान सांगणारं होतं. मी आणि माझी सहकारी शुभदा चौकर दोघांनाही ती कादंबरी लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं वाटलं. शुभदा कुमार केतकरांशी बोलली आणि त्यांना तिनं सांगितलं की चतुरंगच्या पहिल्या पानावर पूर्ण पानभर लेख करायला हवा. केतकर अशा गोष्टींसाठी पूर्णपणे सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे संपादक होते. स्वतःच एक प्रतिभावंत कादंबरीकार असलेल्या अरूण साधू यांनी 'ब्र'ची बलस्थाने आणि वेगळेपण सांगणारा लेख लिहिला. त्या एका लेखानं ‘ब्र’चा आवश्यक तो प्रारंभिक गाजावाजा झाला आणि मग स्वतःच्या गुणवत्तेवरच ती अधिकाधिक पोचत गेली, अनेक मानसन्मान घेऊन आली.
तिची निरिक्षणं आणि मतंही अफाट असंत, माणसांविषयीची आणि घटनांविषयीचीही. कादंबरी किंवा कथा लिहित असताना लिहून झालेलं वाचून दाखविण्याची तिला दांडगी हौस तर असं अर्धवट काही वाचून दाखविण्याच्या मी ठाम विरोधात. माझी ‘पावणे दोन पायांचा माणूस’ ही कादंबरी आली तेव्हा ती वाचून तिची पहिली प्रतिक्रिया होती, ‘मला आधी वाचायला दिली असती तर तुला आणखी शंभरेक पानं लिहायला सांगितली असती.’ त्यानंतर ‘मी दुसरी कादंबरी लिहितो आहे’ असं मी तिला सतत सांगत आलो आणि ‘ती झाली तेवढी तरी दाखव मला’ असं ती मला सतत सांगत आली. माझी कादंबरी काही लिहून झाली नाही, तेवढ्या अवधित तिच्या मात्र आणखी तीन कादंबऱ्या आल्या, अनुवाद आले, बालकथा संग्रह आला, कविता संग्रह आला, स्तंभ लिहून झाले...अफाट उर्जा असलेली बाई होती ती.
‘भिन्न’ आली तेव्हा पूर्ण कांदबरी वाचून झाल्यावर मी तिला म्हटलं, ‘मला कादंबरी खूप आवडली पण यात मध्ये वारंवार जी स्वप्न येतात ती अजिबात पटली नाही. रसभंग करतात. मी जर ही कादंबरी संपादित केली असती तर स्वप्नांची शंभर पानं कमी केली असती.’ त्यावर ‘तुला स्वप्नांचा काय रे एवढा राग?’ म्हणून ती किती तरी वेळ हसत होती. मला म्हणाली, ‘मी आता जेव्हा जेव्हा स्वप्न लिहेन, तेव्हा तेव्हा तुझी आठवण येणार मला. कारण मी स्वप्ने लिहिणारच. मला आवडतात ती.’
कविताची ‘कुहू’ ही कादंबरी म्हणजे मराठीतला एक अनोखा आणि धाडसी प्रयोग होता. एकाचवेळी छापील कादंबरी, सोबत ऑडिओ सीडी, चित्रे बरेच काही. ती मराठी आणि इंग्रजीतही. शिवाय मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी कादंबरीच्या वेगळ्या आवृत्त्या. कविताच्या मनात होतं ते आणि तसं कुणी प्रकाशक करू धजावणारच नव्हता, कारण ती व्यावसायिक हाराकिरी होती. ती कविताच करू जाणे. या कादंबरीसाठी सारस्वत बँक कदाचित बिनव्याजी कर्ज देऊ शकेल, कारण एकनाथ ठाकूर यांना साहित्याची जाण आहे, साहित्यिकांविषयी आदर आहे, असं कविताचं म्हणणं होतं. ‘त्यांना भेटायला तू माझ्यासोबत ये’ असं कविता म्हणाली. तिला अपेक्षित असलेली कर्जाची रक्कम बऱ्यापैकी मोठी होती, त्यामुळे काम होईल की नाही अशी मला शंका होती. ठाकुरांना भेटायला जाण्यापूर्वी मी कुमार केतकरांना त्यांच्याशी बोलायला सांगितलं आणि मग आम्ही गेलो. त्यांनी ते कर्ज मंजूर केलंही, परंतु ‘कुहू’ साकारता साकारता आणि नंतर ती वितरित करता करता कविताच्या आयुष्यातली चार-पाच वर्ष वाया गेली. तिला खूप मानसिक त्रास झाला आणि तिचा आर्थिक ताळेबंदही बिघडला. ‘कुहू’ हा मराठी साहित्य विश्वातला पूर्णतः वेगळा प्रयोग होता. त्यातलं वेगळेपण ज्यांना भावलं अशा रीमा लागूंपासून अनेकांनी कविताला कुहूसाठी कोणताही मोबदला न घेता सहकार्य केलं, तरीही ‘कुहू’चे गठ्ठे पडून राहिले. कधीही न खचणारी कविता त्या काळात मात्र निराश झालेली दिसली. त्यातूनही काही मार्ग काढण्यासाठी कुमार केतकरांनी प्रयत्न केले, तिने स्वतः तर अनेक लटपटी खटपटी केल्या,परंतु ‘कुहू’ची निर्मिती उत्तम असूनही तो प्रयोग फसलाच.
आयुष्यात अतोनात अडचणी सोसतही ती सतत लिहित होती, अनुवादाची कामे अंगावर घेत होती. मध्यंतरी तिने नोकरी शोधण्याचाही प्रयत्न केला, परंतु नोकरी करणं खरं तर तिच्या स्वभावात नव्हतं. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळं तिनं सगळीकडे स्वतःचे शत्रु निर्माण करून ठेवले होते आणि तरीही ती व्यवहार म्हणून तोंडदेखलं एखाद्याशी किंवा एखाद्या विषयी तिच्या मनात नसताना चांगलं बोलण्याचा कधी प्रयत्न करत नव्हती. ‘एकटी स्त्री आणि त्यातही स्त्री-पुरुषांच्या शारिरिक व्यवहाराबद्दल लिहिताना,त्याची वर्णने करताना न कचरणारी’ म्हटलं की अनेकांच्या नजरा बदलतात, भाषा बदलते, टोन बदलतो. तिच्या कादंबऱ्यातली वर्णनं वाचून तिला जी पत्रे येत ती वाचली तर सभ्यपणाचं आवरण जरा उचकटवून काढलं की माणसं कशी उघडी पडतात, समाज किती भयंकर आहे याचे शेकडो दाखले मिळंत. असल्या पत्रांना कवितानं भीक घातली नाही, किंवा आपलं लिखाणही थांबवलं नाही. मध्यंतरी तिला सोशल मिडियावर त्रास देणाऱ्यांच्या विरोधातही ती अशीच खंबीरपणे लढली आणि नडलीही. हे सर्व खरं असलं तरी त्यातून आत जखमा व्हायच्या त्या होतातच. असे अनेक अनुभव ती हसत हसत, मजा घेत सांगायची तेव्हाही तिच्या डोळ्यांत वेदना असायचीच.
लेखक कितीही यशस्वी असला तरी केवळ लिखाणावर मराठी साहित्यिक जगू शकत नाहीच. मात्र तिच्या बेधडक बोलण्यामुळे, कादंबऱ्यांमधून निर्माण झालेल्या प्रतिमेमुळे तिला भाषणांसाठी सतत बोलावणं येऊ लागलं तेव्हा तिनं त्यासाठी बऱ्यापैकी मानधन मागायला सुरुवात केली आणि त्याचा तिला नक्कीच आधार मिळाला. अलिकडे दिशाचं भवितव्य हाच तिच्या बोलण्याचा विषय असायचा. त्या दोघींची एकमेकींशी चालणारी थट्टा मस्करी, दोघींमधलं मनमोकळं नातं आणि कवितामुळेच दिशात उतरलेली परिपक्वता हा तिच्या आयुष्यातला अलिकडला एक लोभस अध्याय.
तिच्या कादंबरीवर बेतलेली पटकथा न आवडल्यानं भयंकर चिडलेली कविता, एक नाजूक धागा अकस्मात तुटल्यावर ते फोनवर सांगता सांगताच बांध फुटलेली कविता, समाजात मोठं नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीनं फोनवर सूचकपणे काय म्हटलं ते सांगताना हसून हसून फुटलेली कविता, नव्या लेखनाविषयी उत्साहानं बोलणारी कविता, माजगावकरांविषयी पितृतूल्य प्रेमानं बोलणारी कविता, एखादा विषय कोण लिहू शकेल असं विचारल्यावर भराभरा ढिगभर पर्याय समोर करणारी कविता, समोरच्या व्यक्तीला समजून घेणारी कविता आणि नैतिक-अनैतिकतेची समाजमान्य व्याख्या धुडकावून लावण्याचं बळ देणारी कविता...अशी तिची खूप रूपं पाहिली. माझ्या कादंबरीला बाबा पद्मनजी पुरस्कार मिळाला, तो घेण्यासाठी मी वर्धेला गेलो तिथे अकस्मात कविता दिसली. पुरस्कार तिच्या हस्ते आहे हे तिनं तोवर मुद्दाम मला सांगितलं नव्हतं. असे सुखद धक्केही ती द्यायची.
काही महिन्यांपूर्वी एका छायाचित्राच्या निमित्तानं काही लोकांनी महाराष्ट्र टाइम्सला ठरवून टार्गेट गेलं होतं. सोशल मीडियावर गरळ ओकणं सुरु होतं. त्यात एका पोस्टवर कवितानंही मटाच्या विरोधातील भूमिकेला पाठींबा दिला, तेव्हा मला संताप आला होता. मटाची आजवरची वैचारिक भूमिका, संपादकीय परंपरा आणि जयंत पवार, प्रतिमा जोशी, समर खडस, इब्राहिम अफगाण, विजय चोरमारे अशा पुरोगामी व्यक्तींची फळी असताना महाराष्ट्र टाइम्सच्या भूमिकेविषयी तू शंका कशी काय घेऊ शकतेस, असं तिला विचारलं तेव्हा ती स्वतःचं समर्थन करू लागली. मी चिडून फोन ठेवून दिला. तो अबोला महिनाभर टिकला. माझी एक पोस्ट वाचून त्यानंतर तिने फोन केला त्यात तो अबोला वाहून गेला. तो वाहून न जाताच, काही महिन्यांच्या अबोल्यापाठोपाठ ती अशी कायमची अबोल झाली असती तर मी स्वतःला माफ करु शकलो नसतो. गेल्या काही दशकांतली मराठीतली एक महत्त्वाची प्रतिभावंत लेखिका आपण मैत्रिण म्हणावं एवढी जवळची होती याचा अभिमान आहे आणि तिनं लिहिणं जेवढं गांभीर्यानं घेतलं तेवढ जगणं गांभीर्यानं घेतलं नाही याची खंतही आहे.
**********
श्रीकांत बोजेवार
कविता... दिसली तशी !
निवडक सोशल मिडीया
श्रीकांत बोजेवार
2021-07-09 12:00:02
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीछान.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीमी ब्र ही कादंबरी वाचली व ती परीणाम कारक असल्याचे प्रकर्षाने जाणवले व त्याचमुळे लेखिका कविता महाजन ह्या लक्षात राहील्या. कादंबरी उत्तम च होती पण थोडीफार पाल्हाळीक वाटली. पण विषय कळकळीने मांडला होता.
Dr. Anuradha Deshpande
4 वर्षांपूर्वीनमस्कार! क्षमा असावी पण मी पहिल्यांदाच कविता महाजन यांच्याविषयी वाचले... आणि ते लिखाण इतके सुंदर झाले आहे की त्यांचे इथे उल्लेख केलेले सर्व लिखाण वाचण्याचा मोह आवरत नाहीये. धन्यवाद, इतक्या थोर प्रतिभेबद्दल सांगितल्याबद्दल आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीमोजक्या शब्दात फार सुंदर रितीने व्यक्त केले
Jayashree Kurundkar
4 वर्षांपूर्वीफार छान लिहिले आहे
Rdesai
6 वर्षांपूर्वीखूप सुंदर लेख मनाला भावला.
Nima shinde
7 वर्षांपूर्वीVery Touchi and truthful
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख!कविता महाजन यांच्याविषयी त्यांच्या साहित्याव्यतिरिक्त माहीत नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यांचे अचानक जाणे हे मनाला चुटपुट लावणारे आहे. तुमची शब्दरूप श्रद्धांजली मनाला भावली.
sureshjohari
7 वर्षांपूर्वीलेख अप्रतिम . आवडला . कविता ताईंचे अकस्मात जाणे मनाला चुटपूट लावणारे . श्रध्दांजली
jayashreehinge
7 वर्षांपूर्वीकविता महाजन यांच्याविषयी खूपच कमी माहीत होत.ह्या लेखामुळे खूप माहीती मिळाली.
Pravin Damle
7 वर्षांपूर्वीकविता वरचा लेख खूपच बोलका आणि आठवणी जागवणारा . . तिच्या नात्यांच्या अवघड काळात काही काल मी तिच्या संपर्कात होतो . ते सफरींग मी पहिले आहे. आता आयुष्याच्या नव्या गोष्टी सुरु होत असताना तिचे असे अचानक जाणे खूप धक्कादायक आहे. अनेक कामे करताना आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होत जाते आहे हे आपल्याला समजत नाही. हे फार गंभीर आणि धोकादायक आहे . गौरी च्या बाबतीत जे झाले तेच कविताचे. त्यांची जवळ राहून कोणीतरी काळजी घेणे आवश्यक होते.. आता काय लिहिणार
Arun Dixit
7 वर्षांपूर्वीलेख छान आहे...
Anjali
7 वर्षांपूर्वीलेख आवडला. लेखिका कवितेपेक्षा कवयित्री कविता जास्त आवडायची. फेसबुकवर तिचे स्वतःचे लेखिका म्हणून असणारे काही स्थान विसरून सर्वसमावेशक असणे फार आवडून गेलेले. चुकीला चूक म्हणून धडा शिकवायला उभ्या राहणाऱ्या खूप कमी बायका असतात. आपले काही नुकसान होऊ शकते तरी स्पष्टवक्तेपणा सोडायचा नाही ही वृत्ती असताना जगणे सोपे नाही. मात्र सतत झेलणारी माणसं कुठेतरी विध्द झालेली असतातच मनाने शरीराने, इतकी की साथ देत नाही शरीर आजारपण आले की.कविताही त्याला अपवाद ठरली नाही. आता जिथे असेल तिथे मात्र शांततेत काम करेल नक्की .ती काही कुठे बिनकामाची राहायची नाही....
Jayantgune
7 वर्षांपूर्वीअप्रतिम, मोजक्या शब्दात जीवनपट उलगडून दाखवणारा एवढेच नव्हे तर वाचकाला कविता महाजनांशी आपला परिचय असावा असं वाटायला लावणारा लेख
drvyankatesh
7 वर्षांपूर्वीफारच सुन्दर कविताच अचानक जाण फारच धक्कादायक होत बोजवारानी फार च
Anita
7 वर्षांपूर्वीहृद्य लेख !
Varsha
7 वर्षांपूर्वीकविता ताईंच्या अकाली जाण्याचा धक्का हा आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्या इतकाच आहे. त्यांची ठकी कादम्बरीही मला ब्र इतकीच आवडली होती. अत्यंत हुशार,निष्कपट, स्वतंत्र बाण्याची लेखिका चित्रकार कवियत्री कविता महाजन यांनी इतक्या लवकर निरोप घ्यायला नको होता.
lovetolivetoeat
7 वर्षांपूर्वी. हृद्य लेख !
manasi
7 वर्षांपूर्वीसुरेख श्रद्धांजली
Meenal Ogale
7 वर्षांपूर्वीत्यांचे अकाली जाणे चटका लावून गेले.सरोजिनी वैद्यबाईंवरील त्यांच्या एका पोस्टला मी प्रतिसाद दिल्यावर त्यांनी लगेच मला उत्तर दिले होते.असे निष्कपट मनमोकळे वागणे फार क्वचित आढळते.श्रध्दांजली.
asiatic
7 वर्षांपूर्वीश्रीकांत, फारच छान. कविताला शब्दात पकडणं कठीणच. परवापासून मी प्रथम पाहिलेली ,पंचवीस वर्षांची, उत्फुल्ल, नवनवीन कल्पनांंनी मन ओसंडत असलेली कविता डोळ्यांंसमोर येतेय. आयुष्याच्या धकाधकीत मनस्वी,जिद्दी माणसांचं असंच होतं का असंच राहून राहून मनात येतंय.