भलेबुरे जे घडून गेले


अस्मिता मोहिते   

पॉप्युलर प्रकाशनाचे लेखक, वाचक आणि प्रकाशन व्यवसायातले आमचे सहकारी, मित्रपरिवार, हितचिंतक या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांसाठी आनंद, सुख-समाधान घेऊन येवो ही सदिच्छा !!  

सरत्या वर्षात घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटनांना मागे सारत येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपण दर वर्षी अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि नव्या आशा, नवी स्वप्नं उराशी घेऊन करत असतो. गेल्या वर्षी २०२० या वर्षाचं स्वागतही याच उत्साहात झालं, तेव्हा येऊ घातलेल्या भयंकर संकटाची चाहूलही लागली नव्हती. पण अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाच्या ड्रॅगनने साऱ्या जगाला विळखा घातला. न भूतो न भविष्यती अशा या जागतिक महामारीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, उद्योगधंदे बुडाले. मानवाच्या बुद्धीचा, त्याच्या जिद्दीचा, त्याच्यातील माणुसकीचा कस लागला. एका टोकाला जगातल्या सर्वशक्तिमान, संपन्न आणि प्रगत देशांमधल्या सुशिक्षित, सुसंस्कृत, सुरक्षित म्हणवल्या जाणाऱ्या माणसांच्या मनात दडून असलेली असुरक्षिततेची भावना, पशुवृत्ती, परस्पर द्वेष, मत्सर यांचं विदारक दर्शन घडत होतं, त्याच वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस आणि प्रशासनातले इतर कर्मचारी, लॉकडाउनच्या काळात एकाकी पडलेल्या गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारी सर्वसामान्य माणसं यांच्या रूपाने माणुसकीचं दर्शनही घडत होतं.

  कोरोनाच्या या भयकारी थैमानात जगभर दुःखाचा महापूर उसळला. लक्षावधी लोकांनी आपले प्राण गमावले. ज्यांचे आप्तस्वकीय गेले त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. आपल्या आजारी असलेल्या प्रिय व्यक्तीची शुश्रुषा करता येऊ नये, तिला भेटता येऊ नये आणि अशा एकाकी अवस्थेत तिचा मृत्यू झाला तर तिच्यावर अंतिम संस्कारच काय पण तिचं अंतिम दर्शनदेखील घेता येऊ नये यापरते दुःख ते कोणते ? अनेक उद्योगधंदे बंद पडले, कित्येकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. गावी शेती नाही, शहरात हाताला काम नाही, हाती पैसे नाहीत अशी हातावर पोट असलेली गरीब माणसं देशोधडीला लागली. अन्नपायी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं स्थलांतर याच काळात जगाने बघितलं. जगण्यासाठी देशांतराला निघालेले माणसांचे तांडे बघताना काळजाला पीळ पडत होता.

  सारं जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं असताना त्याचाच एक साधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस आपल्याकडे कोरोनाची चाहल लागला तरी तिच्या रौद्र रूपाची कल्पना आली नव्हती. चेहऱ्याला मास्क लावून किंवा स्कार्फ गुंडाळून, आठवणीने हाताला सॅनिटायझर लावत नियमित ऑफिसला जाणं सुरूच होतं. पण हे उपाय पुरेसे नाहीत याची जाणीव होऊ लागली आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात काही दिवस घरीच थांबायचा निर्णय आम्ही घेतला. गुढीपाडव्यानंतर पुन्हा भेटू असं ठरवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पंधरावीस दिवसांत सर्व काही पूर्ववत होईल ही आमची अपेक्षा फोल ठरली. सरकारी पातळीवरच लॉकडाउनची घोषणा झाली आणि जग जणू आहे त्या स्थितीत स्तब्ध झालं.

  लॉकडाउनमुळे मिळालेल्या सक्तीच्या रजेचा आनंद काही दिवस उपभोगला आणि हळूहळू परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं. लॉकडाउनचा काळ किती लांबेल याचा अंदाज येत नव्हता. बाहेर कोरोनाचं भयंकर तांडव सुरू झालं होतं. त्याची निराशा मनात पसरत चालली होती, त्याच वेळी अडकून पडलेली कामं, दिवसेंदिवस होत असलेलं नुकसान यामुळे अस्वस्थता वाढत होती. एकप्रकारची हतबलता येऊ लागली होती. अशातच दोन अतिशय दुःखद घटना घडल्या.

पहिली म्हणजे पॉप्युलरच्या कुटुंबातल्या नीलिमा अनपेक्षितपणे आमच्यातून निघून जाणं. हा आम्हा सर्वांसाठी मोठाच धक्का होता. या ना त्या कारणाने पॉप्युलरशी संबंध आलेल्या सर्वांनाच नीलिमा आचार्य हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. पॉप्युलरमधल्या प्रत्येक व्यक्तीशी जसे तिचे अतिशय जिव्हाळ्याचे संबं होते तसेच आमच्या मराठी-इंग्रजी पुस्तकांचे लेखक, चित्रकार यांच्याशीही होते. तिचा स्वभावच अतिशय लाघवी, प्रेमळ आणि इतरांना समजून घेणारा असा होता. हसरा चेहरा, शांत, संयमी आणि आश्वासक बोलणं यांमुळे नीलिमाच्या संपर्कात एकदा आलेली व्यक्ती तिच्याशी कायमची जोडली जात असे, त्यामुळेच केवळ रामदास किंवा हर्षच नव्हे तर ती भटकळ कुटुंबातल्या सर्वांनाच जवळची वाटत असे. पॉप्युलरमध्येही प्रत्येकाशी तिचे संबंध कामापलीकडचे होते. स्टाफपैकी नव्या-जुन्या सगळ्यांसाठीच ती अनेक अर्थांनी आधारस्तंभ होती. प्रत्येकाच्या मनात तिच्यासाठी माया, आपुलकी, मैत्रभाव होता. आपल्या वागण्यातून तिने तो मिळवला होता. तिने सर्वांची मनं जिंकली होती. त्यामुळेच तिचं अचानक जाणं हा पॉप्युलरवर मोठाच आघात होता.  

 नीलिमाच्या जाण्याचं दुःख मनात ताजं असताना पंधराच दिवसांत रत्नाकर मतकरी यांच्या अनपेक्षित निधनाची वार्ता कानी आली. पॉप्युलरसाठी हा दुसरा धक्का होता. रत्नाकर मतकरी यांचे आणि पॉप्युलर प्रकाशनाचे संबंध लेखक-प्रकाशक नात्याच्या पलीकडचे होते. ते रामदास भटकळ यांचे कॉलेजपासूनचे मित्र. भटकळांनी प्रकाशक म्हणून मतकरींनी लेखक म्हणून एकत्रच आपली कारकीर्द सुरू केली. पॉप्युलरने त्यांची मुलांसाठी लिहिलेली नाटकं आणि काही प्रौढांसाठीची नाटक प्रकाशित केली आहेत. मतकरींनी नाटक, कादंबरी, कथा अशा अनेक वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केलं. त्यामुळे अनेक प्रकाशकांशी त्यांचा संबंध आला तरीही त्यांचं पॉप्युलरबरोबर असलेलं नातं काही वेगळंच होतं. ते स्वतः उत्तम चित्रकार होते. आपल्या नाटकांसाठी ते स्वतःच रेखाचित्रं काढून देत असतच, पण आमच्या इतर अनेक पुस्तकांसाठी केवळ आमच्या आग्रहाखातर त्यांनी मुखपृष्ठ, रेखाचित्रं दिलेली आहेत. मतकरींच्या जाण्याने मराठी साहित्य, मराठी रंगभूमीचं जसं नुकसान झालं आहे तसंच वैयक्तिक पातळीवर पॉप्युलरचंही फार मोठे नुकसान झालं आहे. आमचा एक जवळचा सुहृद मित्र आम्ही गमावला आहे.  

पण काळ कुणासाठी थांबत नाही. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी मनात जागवत इतरांना पुढे जाणं भाग असतं. लॉकडाउन उठण्याची चिन्हं दिसत नव्हती. घरातून बाहेर पडता येत नव्हतं. कामं अडकली होती. अशा परिस्थितीत पुढची कार्यपद्धती ठरवण्यासाठी आम्ही झूमवर मिटिंग घेतली. लॉकडाउनमुळे या नव्या तंत्रज्ञानाशी ओळखच नव्हे तर चांगली घट्ट मैत्री झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्या पुस्तकांची कामं सुरू होती ती पूर्ण करण्याचे सगळे मार्ग बंद होते. अशा वेळी एरवी दुर्लक्षित झालेले दोन अतिशय महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करायचं आम्ही नक्की केलं. पहिला प्रकल्प म्हणजे आमची अनेक वर्ष बंद असलेली वेबसाइट नव्या स्वरूपात परत सुरू करायची आणि दुसरा प्रकल्प जास्तीत जास्त पुस्तकांच्या ई-आवृत्त्या किंडलवर उपलब्ध करायच्या.

  छापील पुस्तकांचे महत्त्व, त्यांच्याविषयी वाचकांच्या मनात असलेलं ममत्व तीळमात्र कमी होणार नाही, हे जरी खरं असलं तरी काळाची गरज ओळखून नवीन गोष्टी आत्मसात करण्यातच शहाणपण असतं. खरंतर नवीन पिढीची आवड लक्षात घेऊन बरंच आधी ई बुक्स उपलब्ध करायला हवी होती. पण रोजच्या धबडग्यात या कामाकडे पुरेसं लक्ष देताच आलं नव्हतं. काही तुरळक पुस्तकांच्या ई-आवृत्त्या आम्ही तयार करून घेतल्या होत्या पण त्यांमध्ये अनेक त्रुटी होत्या, कमतरता होत्या; ज्या तातडीने दूर करायला हव्या होत्या. लॉकडाउनमुळे मिळालेला रिकामा वेळ ई-बुक्ससाठी देऊन जास्तीत जास्त पुस्तकं किंडलवर उपलब्ध करून देणं सहज शक्य होतं. घरबसल्या हे करता येणार होतं. तीच गोष्ट वेबसाइटची. सध्याच्या काळात आपल्या उद्योग-व्यवसायाचा विस्तार व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येकाला चांगल्या वेबसाइटशिवाय पर्याय नाही. वेबसाइट हा जगापुढे आपलं उत्पादन मांडण्याचा सर्वांत सुलभ आणि किफायतशीर मार्ग असतो. वेबसाइट हा आपलं उत्पादन आणि ग्राहक यांच्यातला थेट दुवा असतो.  

सोशल मीडियाचं, नवीन तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखणाऱ्या हर्ष भटकळांना ई-बुक्स आणि वेबसाइट यांचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नव्हती. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करायचा संकल्प आम्ही सोडला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच गेल्या आठ-नऊ महिन्यांच्या काळात सुमारे २५० पुस्तकांच्या ई-आवृत्त्या आम्ही किंडलवर उपलब्ध करू शकलो आणि दसऱ्याला पॉप्युलर प्रकाशनाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधून www.popularprakashan.com या वेबसाइटचं लोकार्पणही करू शकलो, ही २०२० या वर्षातली आनंदाची गोष्ट आहे. वाइटातूनही काहीतरी चांगलं घडतं म्हणतात ते असं. ई-बुक्स आणि वेबसाइट यांच्यामुळे कितीतरी नवीन तरुण वाचक आमच्याशी जोडले गेले. भोवतालच्या निराशेच्या वातावरणात आमच्यासाठी आनंदाचे, आशेचे किरण घेऊन येणाऱ्या या घटना होत्या.

  जसजशी साथ आटोक्यात येऊ लागली तसतसा टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल होऊ लागला. पुण्यात आणि इतर शहरांत व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले, तरी मुंबईत मात्र जोवर लोकल ट्रेन सुरू होत नाही तोवर व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकत नाहीत. कामाच्या ठिकाणाहून दीडदोन तासांच्या अंतरावर राहणाऱ्यांना प्रवासासाठी ट्रेनशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अद्यापही आमचं ऑफिस बंदच आहे. परंतु आता घरूनच अधिकाधिक काम करण्याचा निश्चय आम्ही केला आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. गेलं वर्षभर अडकून पडलेली नवीन पुस्तकं वाचकांसाठी आम्ही घेऊन येतो आहोत. लॉकडाउनमध्येही अनेकांनी आपल्या नियतकालिकांच्या प्रकाशनात खंड पड़ दिला नाही ही विशेष कौतुकाची बाब आहे. आम्हाला ते जमलं नाही. पण गेल्या वर्षी एप्रिलपासून प्रकाशित न झालेले 'प्रिय रसिक' चे अंकही नवीन स्वरूपात आमच्या सर्व मित्रमंडळींना मिळतील अशी सोय आता करतो आहोत. हे अंक आता डिजिटल स्वरूपात असतील. सर्व रसिकांना विनंती ही की त्यांनी आपले ईमेल आयडी आम्हाला कळवावेत जेणेकरून अंक पाठवणे शक्य होईल. अंक जसजसे तयार होतील तसतसे आमच्या वेबसाइटवरही उपलब्ध होतील.

  कितीही संकटं आली तरी राखेतून उठून पुन्हा झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे माणसाची जिद्द पुनःपुन्हा त्याला संकटावर मात करून ताठ उभं राहायला भाग पाडते. कोरोनाच्या विनाशकारी संकटापुढे माणूस काही काळ हतबल झाला तरी हळूहळू का होईना, तो सावरला. आपली बुद्धी, जिद्द, प्रयत्न यांच्या बळावर याही संकटावर त्याने मात केली आणि घडून गेलेल्या वाईट घटना मागे टाकत पूर्वीच्याच उत्साहाने, आनंदाने नवीन स्वप्नं उराशी घेऊन तो नवीन वर्षाच्या स्वागताला सिद्ध झाला. माणसाच्या या जिद्दीला सलाम!! पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा !

********

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रिय रसिक - संपादकीय जानेवारी २०२१

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    नवीन वर्षानिमित्त हार्दिक सदिच्छा!🙏

  2. Mohan Ranade

      4 वर्षांपूर्वी

    मागील वर्षाचा अनुभव खरोखरच वाईट होता माणसाला जीवनाची किमत समजली लोकांनी पर्याय शोधले अनेक चागल्या व्यक्ती निधून गेल्या मात्र आपण नवीन मार्ग शोधले नेहमीच जग चालतच रहाते हेही संकट निवारण होईल



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen